गुरुवार, ७ मार्च, २०१३

नेमाडेंची तर्कदुष्टता ( fallacy)

---------------------------------------
नेमाडेंची तर्कदुष्टता ( fallacy )
--------------------------------------------
    जनस्थान पुरस्कार स्वीकारतानाच्या भाषणाची टेप ऐकलीत तर नेमाडेंनी केलेले एक अजब तर्कट लक्षात येते व ते कसे तर्कदुष्ट आहे ते इथे पाहू.
    बलात्कार आणि जेंडर रेशो ह्यावरचे विकीपीडीयाचे जुजबी वाचन केलेले असेल तर हे ध्यानात येईल की बलात्काराचे मूल तत्व हे नराने स्त्रीला तिच्याशी संभोग/लैंगिक अत्याचार करताना तिचा नकार देण्याचा अधिकार नाकारणे हे आहे हे कोणासही कळेल. आजकालच्या स्त्रीसंघटना भारतात लग्नसंबंधातला बलात्कारही ( Marital rape ) कायद्याच्या आधिपत्याखाली आणावा ह्या मताच्या आहेत. अमेरिकेत सर्व स्टेटस्‌ मध्ये हा कायदा लागू असून पुरुषांनी बायकोची संमती नसताना केलेल्या संभोगाला कायद्याने बलात्कार समजून शिक्षेची तरतूद केलेली आहे. तसेच हा कायदा जगात १०४ देशात लागू आहे. ( जगात एकूण देश १९८ आहेत). जन्मतानाचे जेंडर रेशो हे कालांतराने स्त्री-पुरुषांच्या वेगवेगळ्या मरण्याच्या प्रमाणांमुळे( mortality) वेगवेगळ्या वयोगटासाठी वेगळे असतात. पुरुष ज्यास्त प्रमाणात मरतात ( जसे लढाया व स्थलांतरे मुळे) व त्यांचे आयुष्यमानही स्त्रियांपेक्षा कमी असते ( पुरुषांचे ६८, तर स्त्रियांचे ७२). त्यामुळे अमेरिकेत जन्मतानाचे पुरुषांचे प्रमाण दर हजार स्त्रियांमागे जर १०५० पुरुष असे असले तरी १५ ते ६५ वयोगटासाठी ते वरील कारणांमुळे दर हजार स्त्रियांमागे ७२० इतके कमी होते.  भारताचे आकडे घेतले तर जन्मावेळी भारतात स्त्रियांचे प्रमाण दर हजार पुरुषांमागे ८९२ असे आहे, जे १५ ते ६५ वयोगटासाठी ९३४ इतके वाढते व ६५ वर्षापुढच्या वयोगटासाठी ११११ स्त्रिया दर हजार पुरुषांमागे असे होते. आता एवढ्या जुजबी माहीतीनंतर नेमाडेंचे तर्कट बघा:( ज्यांना जरा विस्ताराने हे प्रकरण वाचायचे आहे त्यांच्यासाठी विकीपिडीयाची लिंक अशी :  http://en.wikipedia.org/wiki/Human_sex_ratio  )    :
    नेमाडे म्हणतात की समजा स्त्रियांचे लोकसंख्येतले प्रमाण चारशेने ( दर हजार पुरुषांमागे ) कमी आहे, म्हणजे चारशे पुरुषांना स्त्रिया कमी पडतात. ह्यापैकी समजा २०० पुरुषांनी संयम पाळला असेल, पण उरलेले २०० जण एक नॅचरल इंस्टिंक्ट म्हणून बलात्कार करणारच. .....
    तर्कशास्त्रात ( लॉजिक) तर्कदोष अथवा तर्कदुष्टता ( fallacy of logic) नावाचे एक प्रकरण असते. त्यात सकृदर्शनी तर्काने बरोबर वाटणारे विचार कसे चुकीचे असतात त्याची उदाहरणे देतात. सर्वाधिक लोकप्रिय उदाहरण असते, वर्तुळातल्या तर्काचे. म्हणजे "आधी अंडे का आधी कोंबडी" हया विवेचनाचे. आपण एका वर्तुळात तर्क देत राहतो, पण ती एक तर्कदुष्टता/तर्कदोष असते/तो. असेच दुसरे तर्कदुष्टतेचे उदाहरण देतात जेव्हा समोरच्या माणसाच्या अज्ञानाचा ( वा विरोध न करण्याचा ) फायदा घेत दुसर्‍याने दामटून चुकीचे विधान करणे. ही एक तर्कदुष्टताच असते. नाशिकच्या श्रोत्यांनी विरोध केला नाही म्हणून चुकीचा विचार दामटून सांगणे हे चुकीचेच व तर्कदोषच राहते. जसे वरच्या भाषणात सांगितलेले १) बलात्कार हे पुरुषांच्या नॅचरल इंस्टिक्टने होतात २) स्त्रियांचे लोकसंख्येतले प्रमाण कमी झाल्याने वंचित पुरुष बलात्कार करतात. वर्ल्ड हेल्थ ऑरगनायझेशनने जी आकडेवारी व अभ्यास प्रसिद्ध केलेला आहे त्यात हे कुठेही नाही. वरच्या परिच्छेदात जेव्हा आपण पाहतो की अमेरिकेतले जन्माच्या वेळेसचे पुरुषांचे प्रमाण १५-६५ वयोगटासाढी १०५० वरून कमी होत ७२० इतके कमी होते, तेव्हा पुरुष कमी झाल्याने त्या वयोगटातल्या स्त्रिया काही पुरुषांवर बलात्कार करीत नाहीत. शिवाय बलात्कारात स्त्रीचा संमती नाकारण्याचा हक्क कसा डावललेला असतो, व म्हणूनच त्याला बलात्कार म्हणतात, हे कोणाही वाचकाच्या लक्षात येईल. खरे तर सर्व प्रगत समाजात एकट्या स्त्रीला कुठेही वावरता आले पाहिजे अशाच समजुतीचे लोकव्यवहार संमत असतात. त्यात एका मान्यवर संस्थेच्या व्यासपीठावरून असे पुरुषसत्ताक व बुरसटलेले विचार प्रसृत करणे हे कधीही हितावह नाही.
    ह्या वक्तव्याची दखल घेत महाराष्ट्रातील तमाम स्त्री-पुरुषांनी ह्या तर्कदुष्टतेचा निषेध केला पाहिजे व तसे कुसुमाग्रज प्रतिष्ठानला कळविले पाहिजे. नेमाडेंनी माफी मागायला हवी, पुरस्कारही परत करावा इतकी ही तर्कदुष्टता गंभीर परिणामांची निश्चितच आहे.
(कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे संकेतस्थळ : http://www.nashik.com/organisation/kpratisthan.html  )
-------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा