शनिवार, २७ नोव्हेंबर, २०१०

स्त्रीवादाची जाण व कादंबरी:
जगात निम्मी लोकसंख्या स्त्रियांची आहे ह्या एकाच निकषावर, खरे तर, कोणाही लेखकाची स्त्रीवादाकडे पाहण्याची व तसे चित्रण करण्याची जबाबदारी खूपच वाढते. पण नेमाडेंच्या कादंबरीत स्त्री-पात्रे अगदी वावडे असल्यासारखी, मख्खपणे, वावरतात. एकवेळ नायक खंडेराव लग्न करीत नाही, हा आपण समर्थांचा प्रभाव म्हणून सोडून देऊ.( समर्थांची ते टिंगल-टवाळी करीत असले तरी !) पण कथानकात प्रभाव पाडणारे स्त्रीपात्र नसावे हे "कास्टिंग कौच" चे गौडबंगाल अनाकलनीय आहे. त्यात भर म्हणजे कथानकात जी पात्रे भरपूर पाने व्यापून राहिली आहेत ती आहेत, कामोत्तेजित करणार्‍या "लभान्या" ( किंवा लमाणी स्त्रिया ), गावातल्या झेंडी, बनी रांड वगैरे नावाच्या वेश्या. ह्यांना करून करून किती उदात्त करणार ? दुसर्‍या आहेत, नात्यातल्या आत्या, आजी वगैरे स्त्रिया, ज्यांची हयात व कर्तबगारी घरकाम व रगाडयातच जाते. त्यातल्या आत्या हे पात्र लग्नानंतर लगेच माघारी येते, घरात अडगळीला राहून राब-राब राबते व इतके करून इस्टेटीत तिला वाटा देत नाहीत. नायक खंडेराव ह्याबाबत खंत बाळगतो पण त्याचे परिमार्जन काही करत नाही. अर्थात नायकाने कसे वागावे हा सर्वस्वी लेखकाच्या अखत्यारीतला प्रश्न असला तरी नेमाडे हे निश्चित नैतिक भूमिकेचे श्रेय मिरवणारे असल्याने नायकही तसे वागेल असे वाटत होते. तशात ही आत्मचरित्रपर कादंबरी असल्याने लेखक व नायक हे एकच आहेत असे समजण्यास वाव राहतो. गंमत म्हणजे ते आवर्जून वडिलांनी त्यांच्या डोळ्याच्या इजा (लहानपणी ) होण्यावर घेतलेली काळजी छान रंगवतात पण त्याच जोडीला आईचे काही सांगत नाहीत. ( आणि तरीही त्यांना साने गुरुजींबद्दल, श्यामच्या आईबद्दल, आदर आहे !). कथेत नायक म्हातारा झाल्यावर त्याचा मुलगा त्याला दहिसरला रहा म्हणतो, गावी येत नाही, असे वर्णन येते ( म्हणजे यथावकाश नायकाने लग्न केलेच असणार ). पण ते आपल्या पत्नीचे, नायकाच्या आईचे एक अवाक्षरही काढीत नाहीत. हे एक प्रकारचे स्त्री-तुसडेपण कादंबरीभर मिरवण्याचे प्रयोजन मात्र दिसत नाही, शोभत तर नाहीच.
इतके असूनही रीतीप्रमाणे ("पोलिटिकली करेक्ट") असण्याचा धाक/रेटा असा आहे की स्त्रीवादाचे सेमिनार ते कथेत दाखवतात, त्यानिमित्ताने समर्थ रामदास काय किंवा गौतम बुद्ध काय ह्यांची टवाळी करतात. तसेच काही काही आवश्यक कल्पना, रम्यपणे, पण न फुलवता, नुसत्या उदघोषित करतात. जसे : "स्त्री ही सामाजिक कल्पना आहे की जीवशास्त्रीय ?" असा एक सवाल ते वाचकांना टाकून जातात. एखाद्या शाळकरी विद्यार्थ्याने परिक्षेत प्रश्न सोडवल्या-(अटेंप्ट)-केल्यासारखा, काठावर (पासिंग) मार्क मिळवण्यासारखा हा यत्न राहतो !
भैरप्पांच्या "जा ओलांडुनी" मध्ये नायिकाच मुळी स्त्री असल्याने सर्व विषयच स्त्रीवादी दृष्टीने मांडल्या जातो. ती वडिलांचा ब्रह्मोपदेश घेऊन स्वत: ब्राह्मण होऊन हवन वगैरे सोपस्कार करते, हरिजन मित्राला अत्याचाराविरुद्ध लढताना ऐतिहासिक पुस्तक लिहून देते, वडिलांच्या ठेवलेल्या बाईला व तिच्या मुलाला मदत करते, भावाशी, गावातल्या लोकांशी जातीयतेविरुद्ध भांडते, वैयक्तिक स्वार्थाला टाळून आपल्या प्रियकराचे हरिजन मुलीशी लग्न लावून देते, वगैरे स्त्रीवादाची चित्रे भक्कम रंगतील असे वागते. ह्या प्रत्यक्ष कृतीतून हे स्त्रीवादाचे वागणे स्पष्टच आहे. शिवाय वेळोवेळी ती जी भाष्ये करते ती हेलावून टाकणारी जाणीव निर्माण करतात. जसे:(पृ.१०६)"बायका आणि शूद्र सारखेच. दोघांनाही शिक्षणाचे अधिकार नाहीत. एवढं सगळं घडायला एका दृष्टीनं माझं शिक्षणच जबाबदार. आता माझं काहीच शिक्षण झालं नाही असं समजते. पोट भरायला काहीतरी उद्योग हवा ना." किंवा : ( पृ.२३८)"या देशात समस्त स्त्रिया शूद्रच होऊन राहिल्या आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, सगळ्यांच्या बायका शूद्रच झाल्या आहेत. त्यांना कसलेही अधिकार नाहीत. वेदाध्ययनाचे अधिकार नाहीत, सिंहासनारोहणाचा अधिकारही नाही आणि संपत्तीमध्येही अधिकार नाही. वडील, नवरा, आणि मुलाच्या वर्चस्वाखालीच तिनं राहायला पाहिजे. वेदकाळी असलेलं स्त्रियांचं ब्राह्मणत्व नंतरच्या काळात नष्ट होऊन गेलं. वेदकाळी शूद्रत्वही आज आहे त्या अवस्थेत नव्हतंच. समस्त स्त्रियांना शूद्रत्वाचा शाप केव्हापासून ग्रासू लागला ? याला सुरुवात केव्हा झाली ? कशी झाली ? हाच खरा इतिहास . हेच खरं जीवनदर्शन. हे मी जाणलं पाहिजे. " स्त्रीवादाचा असा पाठपुरावा भैरप्पा सबंध कादंबरीत करतात, जो नेमाडे पूर्णपणे दुर्लक्षितात......................( क्रमश: )

शनिवार, २० नोव्हेंबर, २०१०

भैरप्पा ते नेमाडे
एक तौलनिक अभ्यास:--२

निश्चित नैतिक भूमिका:
कादंबरीतले लिखाण हे प्राय: एक ललित लिखाण व काल्पनिक असते. ( एक सूचना, ("डिस्क्लेमर"), देण्याची प्रथा असते की ही पात्रे व घटना काल्पनिक आहेत व त्यांचे कोणत्याही जिवंत व्यक्तीशी साम्य नाही. साम्य असण्याने कथेच्या संभाव्यतेला वा विश्वासार्हतेला धोका नसतो. फक्त साम्य असलेल्या लोकांचे आक्षेप नको एवढाच ह्यात उद्देश असावा.). पण नेमाडे कबूलतात की ही आत्मचरित्रपर कादंबरी असून आदर्श अशा "यमुनापर्यटन" टाइप कादंबरीत असते तसे, निश्चित नैतिक भूमिका घेऊनच, हे चितारलेले आहे. नेमाडे म्हणतात: "व्यक्ती व समाज ह्यांच्या संबंधात अनेक प्रश्न असतात व ह्या संदर्भात काही निश्चित नैतिक भूमिका घेऊन कादंबरीकाराने भाषिक कृति केलेली असते, त्यानुसार आशयसूत्र निवडलेले असते." ( टीकास्वयंवर--पृ २४२ ). शिवाय कादंबरीच्या प्रमोशन मध्ये नेमाडेंनी "स्टार-माझा" वर जी प्रदीर्घ मुलाखत दिली, त्यातही म्हटले होते की हिंदू धर्म ब्राह्मणांनी बिघडवला. त्यामुळे जे लिहिले आहे ते पूर्ण समजून-उमजून , निश्चित नैतिक भूमिकेतूनच लिहिलेले आहे. कादंबरीत काही एक "निश्चित नैतिक भूमिका" असते, असे नेमाडेंचे म्हणणे आहे. कादंबरीच्या मलपृष्ठावरच सोयीसाठी ही नैतिक भूमिका दिलेली आहे ती अशी की हिंदू धर्म निरनिराळे प्रवाह स्वीकारीत गेला , ब्राह्मणांमुळे भ्रष्ट होत गेला व त्यामुळे जीवनात एक समृद्ध अशी अडगळ साचत गेली आहे. हेच थोडेसे वेगळ्या वळणाने सुरुवातीच्या पसायदानाच्या घाटाच्या कवितेने नमूद केलेले आढळते. पण संपूर्ण कादंबरीत शोधूनही ह्याचे प्रत्यय येत नाही. नायकाच्या सान्निध्यात खलनायकी थाटाची ब्राह्मण पात्रे योजलेली नसल्याने ब्राह्मणांनी धर्म बिघडवला व तो कसा हे कादंबरीत सापडत नाही. तसेच नायक कुठल्याही धर्माचा असता तरीही शहरीकरणामुळे व ग्लोबलाइझेशनमुळे सध्याचीच अडगळ बाळगून राहिला असता, असेच अडगळीचे वर्णन आहे. इथे कथानकातून वा कादंबरीच्या निवेदनातून नैतिक भूमिका प्रसृत/ज्ञात होत नाही. आधी लेखकाने ठरविली असेल किंवा एक प्रमोशन म्हणून ती असेल तर वाचकाला पुस्तकात सापडत नाही.
ह्या उलट भैरप्पांच्या "जा ओलांडुनी " मध्ये भूमिका सांगितली आहे की जातींमध्ये सर्वांना ब्राह्मण व्हायची इच्छा दिसते. जर सगळेच मूळ ब्राह्मण असते तर ब्राह्मणात एवढे वेगवेगळे पंथ-उपपंथ का आले असते ? हा निष्कर्ष कथानकातून काढल्या सारखा सबंध कादंबरीभर दरवळत राहतो. मग तो वाचकांपर्यंत नेमका पोचतो. ( ह्याच विषयावर समाजशास्त्रामध्ये अनेक पीएच.डी चे प्रबंध लिहून झाले आहेत.त्यामुळे ह्या निष्कर्षाला एक प्रकारची शास्त्रीय बैठक लाभलेली आहे. त्यामानाने हिंदू धर्मा-मुळे-अडगळ-साचणे ह्या बाबतचा अभ्यास निर्विवादपणे झाला आहे असे ठामपणे म्हणता येत नाही. शिवाय ह्या धार्मिक अभ्यासांना एक संशयाची किनार व्यापून राहते.) भैरप्पांची स्वत:ची जात कोणती किंवा नेमाडेंची कोणती हे प्रश्न कलाकृतीबाह्य ठरतात व "न्यू क्रिटिसिझम"च्या निकषांमुळे गौणच ठरतात. त्यामुळे आपल्याला तशी तुलना करता येत नाही. फक्त जाणवते की एकीत ( भैरप्पांच्या) निश्चित नैतिक भूमिका दिसते तर दुसरीत ( नेमाडेंच्या ), ती गाजावाजा केलेला असला तरी दिसत नाही.
नेमाडे हिंदू धर्माबाबत कादंबरीत सखोल चिंतन करीत नसले तरी भैरप्पा मात्र एकूण धर्म-रीतींबद्दल ( उदा:देवपूजा, हवन या बाबत ) फार मार्मिक विचार ( पृ.३५६) देतात: "जेव्हा देवपूजेला सुरुवात झाली तेव्हापासूनच आमच्या समाजाच्या पतनाला सुरुवात झाली असं माझं म्हणणं आहे. फक्त हिंदू देव नव्हेत. लोकांमध्ये फूट पाडणारी अतिशय वाईट शक्ती म्हणजे देव. अल्ला श्रेष्ठ की ख्रिस्ताचा बाप मोठा म्हणून किती रक्तपात झाला ! अल्ला मोठा की राम मोठा या मतभेदात भारतात किती जण मेले ! यांच्यात तरी विष्णू आणि शंकराच्या नावानं कमी भांडणं होतात का ? ही चूक देवाची नव्हे, लोकांची, असंही कुणी समर्थन करील. गेली चार-पाच हजार वर्ष लोक आपल्या नावाचा गैरवापर करताहेत हे त्या खर्‍या देवाला समजायला पाहिजे की नाही ? मतधर्म--देव वगैरे म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे.....पण हे हवन म्हणजे पूजा नव्हे...माणसाच्या आध्यात्मिक तृप्तीसाठी किंवा वाढीसाठी एक ना एक प्रतीक हवं. मला हे अत्युत्तम वाटलं. सगळं जाळून भस्म करून शुद्ध करण्याचा यामागचा सांकेतिक अर्थही मोठा आहे....माणूस फक्त माणूस असला तर तेवढं पुरेसं नाही का ?" नव्या युगात अगदी निरोगी सकारात्मक हा विचार फारच मोहक आहे.
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

रविवार, १४ नोव्हेंबर, २०१०

भैरप्पा ते नेमाडे:--१
एक तौलनिक अभ्यास:
दोन अपत्ये एकमेकात भांडतांना नेहमी म्हणतात की तुम्ही आमच्यात तुलना करू नका. आम्हाला दोघांनाही स्वतंत्रपणे स्वीकारा. आता हे साहित्यात कलाकृतींना लागू होते की नाही ह्याची प्रथम तरी कल्पना येत नाही, पण कळत नकळत आपण तुलना मात्र हमेश करीतच असतो. जसे काही ( उदा: प्रभा गणोरकर ) म्हणतील की नेमाडेंची "हिंदू" ही शतकातली अनन्यसाधारण कादंबरी आहे. तर सामान्य वाचकाला हा प्रत्यय समजा नाही आला, तर म्हणावे लागेल की "ह्यावेळेस नेमाडेंची भट्टी काही जमलेली दिसत नाही." दोन कलाकृती क्वचितच एका विषयावर असतात, एका भाषेत, व एका समयी ! पण काय आश्चर्य, १९८९ साली साहित्य अकादेमीने प्रसिद्ध केलेली एस.एल.भैरप्पा ह्यांची "दाटू" किंवा मराठी भाषांतरित "जा ओलांडुनी" ही कादंबरी व नेमाडेंची "हिंदू" ही एकाच विषयावर ( हिंदू व जातीयता) आहे. भैरप्पांच्या कादंबरीला साहित्य अकादेमीचा पुरस्कार आधीच मिळाला आहे, तर नेमाडेंच्या "हिंदू" ला अजून मिळायचा आहे. दोन्ही कादंबर्‍यांचा काळही साधारण पणे एकच म्हणता येईल. फक्त नेमाडेंची कादंबरी काही कारणाने जरा उशीरा प्रसिद्ध होतेय, पण ते म्हणतात तसे ३५ वर्षांपासून लिहिण्यात होती. म्हणजे दोन्हीही एक कालीयच !
तुलना करायचे दुसरे एक प्रयोजन, श्री. हरिश्चंद्र थोरात, हे आहेत. ह्यांचे नुकतेच "कादंबरीविषयी" हे समीक्षा पुस्तक आलेले आहे. त्यात ते निरनिराळ्या कादंबर्‍यांची समीक्षा करत कोणती कादंबरी ग्रेट आहे ते सांगतात. तसेच त्यांचा विद्यापीठातला हुद्दा ( तौलनिक साहित्याचा अभ्यास ) ही सांगतो की असे तुलना करणे रास्त असावे. ( त्यांच्या घराखाली म्हणतात एक "विठ्ठल मंदिर" नावाचा बार आहे, त्याची आणि खरोखरच्या विठ्ठल-मंदिराची मात्र आपण तुलना करू नये !).
तुलनेचे प्रयोजन अर्थातच दोन कादंबर्‍यात डावे-उजवे करणे होऊ शकत नाही, पण एकाच विषयावर दोन भिन्न प्रकृतिधर्माचे लेखक कशी वेगवेगळी हाताळणी करतात हे पाहण्याचे आहे. त्यातली कुठली हाताळणी भावते ते वाचकाला ठरवणे सोयीचे जावे त्यासाठी ही तुलना !

शनिवार, ६ नोव्हेंबर, २०१०

नेमाडेंचा लैंगिक शिक्षणाचा तास !
"हिंदू" मध्ये नेमाडेंचे अजब लैंगिक आचरण दिसून येते. आता मराठीत आपले काही सर्वमान्य समज आहेत. जसे टेबल हा तो टेबल असतो, तर खुर्ची ही ती खुर्ची असते. आता जुन्या भाषेत मेज म्हटले तर ते मेज होते. म्हणजे एकच वस्तु तीनही लिंग धारण करते. आपण शहरी असू तर अमराठी भाषिक मराठीची कशी लैंगिक वाट लावतात ते रोजच आजूबाजूला वा दूरदर्शनवर पाहतोच व सहनही करतो. पण नेमाडे असे का करत असतील ? पहा:
(पृ.५४): --तिथेसुद्धा तडा गेली. (साधारणांना तडा जातो )
(पृ.३१):..तेव्हा रोज रस्त्यावर ट्रक लावला...(पृ.५६):ट्रक प्रखर हेडलाईट टाकत आली...( आता नेमाडे चढतील तो ट्रक नपुसकी निघो)
(पृ.१७६): एक तीळ सात जणांनी खाल्ली ( साधारण लोक तो तीळ खातात )
(पृ.४१५):..स्प्रिंग वेगानं उसळला...(आपली स्प्रिंग दिली नाही तर ढीली होते )
पुस्तकातली बोली भाषा आजकाल कुठे ऐकू येत नाही. मराठीच आधी कमी ऐकू येते. त्यामुळे आधीच वाचकाची पाचावर असते. त्यात ६०३ पानं. मग नेमाडेंना लक्ष वेधून घ्यायला असेच काही लैंगिक प्रयत्न करायला हवेत. घ्यायचे आहे असे लैंगिक शिक्षण ?
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

मंगळवार, २ नोव्हेंबर, २०१०

नेमाने नेमाडे--२०
मी बोलेन ते प्रमाण !
नेमाडेंचे एक लाडके प्रतिपादन आहे की लोक प्रमाण भाषा होऊ देतात, ही खरं तर बोली भाषा बोलणार्‍यांची सहनशीलता आहे. त्यामुळे ते बोली भाषेत लिहिण्याचे खंदे समर्थक आहेत. म्हणूनच त्यांच्या सर्व कादंबर्‍या अशा स्व-रचित बोली भाषेत असतात.( नशीब आपले की त्यांचे टीका वाङमय तरी प्रमाण भाषेतच असते.). त्यांचा भाषेच्या बोलपणावर इतका दाट भर आहे की कोणी अलंकारयुक्त भाषा वापरली की नसता अर्थ अलंकाराद्वारे आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल ते त्या लेखकावर तुटून पडतात. बरे आजकाल भाषाशास्त्रावरचे पढित व ब्राह्मण नसलेले विद्वान फारसे कोणी शिल्लक नसल्याने किंवा उगाच कुठे खोड काढा ह्या भीतीने , ह्या प्रांतात त्यांना रान मोकळे आहे.
एक सामान्य वाचक म्हणून थोडा विचार करून पहा. सर्व कादंबरी एकाच बोली भाषेत ते का लिहीत नाहीत ? नायकाची स्वगते कधी बोली भाषेत तर त्याची ठाम निष्कर्शे, नैतिक भूमिका, ह्या अतिशय भारदस्त अशा प्रमाण भाषेत असतात. "हिंदू"मध्ये तर हे दोलायमान होण्याचे प्रमाण फारच सारखे होत राहते. आशयसूत्राला अनुसरून भाषेचा आवाका मी निवडतो, असे ते म्हणतात. आता कादंबरीचे कथानक असे आहे की त्याच्या निवेदनाला कुठलीही भाषा चालावी. कारण नायक शिक्षित आहे, शहरी आहे, तर बर्‍याच वेळा तो भूतकाळातले बोलत राहतो व बोलीभाषा निवडतो. हे शैली साठी का काही निश्चित हेतु धरून हे सहज समजू शकते. नेमाडेंची प्रमाण भाषेवरची हुकुमत निर्विवादच आहे. त्यांच्या लोकमान्यतेत ह्या प्रमाण भाषेवरच्या प्राबल्याचे खासे महत्व आहे. आणि हे ते निश्चितच जाणत असावेत. त्यामुळेच त्यांनी प्रमाण भाषा ज्यास्त करून वापरणे साहजिकच ठरते.(कोणी अभ्यास केलाच तर प्रमाण भाषा कमीतकमी ७० टक्के भरेल.). ते खपाच्या दृष्टीनेही सोईचे आहे. तसेच बोली भाषेबद्दल रोमॅंटिक कल्पना बाळगणे चांगले दिसणारे असले तरी वाचकाला ते अंगवळणी न पडणारे आहे. त्यामुळेच १५ हजार खपलेल्या प्रतींचा आढावा घेतला तर बहुतांशी वाचक हे पहिल्या शंभर पानातच अडकलेले व मग तिथून पुढे न धकलेले आढळून येईल. ( अर्थात ज्यास्त लोकांनी वाचले तर तो काही महान साहित्याचा मापदंड होत नाही. कोणीच वाचत नाही अशा पुस्तकांना साहित्य अकादेमीचे महानतेचे पुरस्कार मिळत असतातच.). पण रॉयल्टी ही खपावरच असल्यामुळे समृद्ध अडगळीसाठी हे धोरण बरे पडते.
शिव्यांचा वापर करताना त्या भावनेची तीव्रता दर्शवितात हा हातखंडा होरा असतो. पण भावना वा प्रतिक्रिया प्रमाण भाषिकांना दाखविता येतात व बोली भाषकांना शिव्याच वापराव्या लागतात असा दंडक न्यायाचा नाही. प्रमाण भाषकांनी अलंकारिक भाषा वापरली तर ते भिकार साहित्य व बोली भाषकांनी शिव्या वापरल्या तर ते महान असा कायदा हा "हम करेसो कायदा" होईल. इथे बोली भाषकांनी शिव्या न वापरता का थोडे सहनशील होऊ नये ? शिव्यांनी पटकन लक्ष वेधल्या जाते हा परत किफायतीचाच मार्ग होतो.
मी बोलेन ते प्रमाण हा ह्यावरचा खासा तोडगा नेमाडे काढतात.
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com