बुधवार, १२ जानेवारी, २०११

भैरप्पा व नेमाडे : एक तौलनिक अभ्यास:

विडंबन विरुद्ध तात्विक बैठक:
"हिंदू" ही नुकतीच प्रचंड खपाची समर्थ कादंबरी लिहिणारे भालचंद्र नेमाडे, समर्थ रामदासांची कशी ससेहोलपट करतात, हे पृ.४५० वर पहा: "रामदास स्वामींच्या मंडपात राहून गेलेल्या बायकोच्या दु:खावर फार सुंदर कविता होईल नाही ? वानखेडे म्हणाला, सुंदर ? तिकडे कवळी पोरगी का बोडकी ठेवली जन्मभर का मारली ---आणि तुला सुंदर कविता लिहायचीय ? त्यापेक्षा ही उदध्वस्त बाई हातात वहाण घेऊन याला शोधत शिवथरकडे चाललीय अशी कविता---त्यापेक्षा श्लोकच का नाही लिहीत---जनाचे श्लोक : मनाची नको लाज ठेवू जरी तू । जनाची तरी ठेवी पळपुटया नागडया तू ॥----तू भडव्या सिद्धार्थ गौतमावरच का नाही लिहीत ? ते तं एक पोरगं पण काढून पळालं बायको सोडून....इथे मराठी कवींना रामदासाच्या ह्या बिचारीचं नावसुद्धा माहीत नै...". असा शिष्टाचार आहे की जनमानसात ज्यांना मान आहे अशा संत व्यक्तींना संबोधताना आदरार्थी वचन, भाषा वापरावी.( तुकारामाबद्दल तुम्ही अरे तुरे करणारे लिहून पहा, लगेच शेकडो वारकर्‍यांची पत्रे येतील. प्रमाण भाषिकांनी जसा बोली भाषिकांचा सहानुभूतिपूर्वक आदर दाखवावा असे नेमाडेंना वाटते, तसेच संतांना आदर दाखवला तर काय बिघडते ? ). पण नेमाडेंनी तर "निश्चित नैतिक" भूमिका घेतलेली. मग ते काय नरमतात किंवा नम्रतात ? पळपुट्या काय नागड्या काय ! मनाचे श्लोकला जनाचे श्लोक करणे, तर खूपच मऊ. बरे समर्थ रामदास एकवेळ ब्राह्मण ( व ब्राह्मणांना सध्या वाईट दिवस म्हणून ) एकवेळ जाऊ दिले तरी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या बौद्ध धर्माचे पुनरुथ्थान केले त्यातल्या गौतम बुद्धाने काय घोडे मारले आहे ? मुलगा झाल्यानंतर बायकोला सोडले, तर स्त्रीवादाचा पुळका आलेल्या नेमाडेंना तो अनादरणीय ? त्यातल्या त्यात एवढे एक बरे आहे की अशी निर्भत्सना नेमाडे एक तंत्र म्हणून का होईना सर्वांचीच करतात. ( अर्थात नेमाडेंचा शूरपणा पहायचा तर त्यांनी मोहमदा संबंधी असे लिहून दाखवावे !).
आता ह्या उलट ह्याच बुद्धाच्या पळून जाण्यावर भैरप्पा काय म्हणतात (पृ.३४० "जा ओलांडुनी") ते पाहू : "बुद्धाची शक्ती केवढी होती ! राज्य आणि भर तारुण्यात बायकोला तो सोडून गेला यात काही फारसं नाही. वुइल पॉवर खरी महत्वाची. माझा हा हात तू यापूर्वीही कितीतरी वेळा पाहिला असशील. किती नरम होता तेव्हा ! आणि आता पहा मी तो कसा केला आहे !"..."तुझ्यामध्ये वुइल पॉवर पहिल्यापासूनच आहे !"..."तुझ्यात का ती नसावी ? यानंतर तरी त्यासाठी तू का प्रयत्न करू नयेस ? कुठल्याही विषयाचा एकाग्र चित्तानं ध्यास घेतला, कुठल्याही विश्वासामध्ये सतत मग्न होऊन राहिलं तर त्याच्या साधनेमध्ये संकल्पशक्ती निश्चित वाढते. अशी संकल्पशक्तीच नसेल तर ते व्यक्तिमत्व तरी कसलं ? " ह्या कथानकाची नायिका एक स्त्री असून ह्या घटनेकडे ती अशा उदात्त विचाराने पाहते हे कदाचित भैरप्पा व नेमाडे ह्यांचे प्रकृतिधर्म वा विचारधर्मच दाखवितात असे ह्या उदाहरणांवरून जाणवते.
सर्वच विचारांचे विडंबन करायचे असे नेमाडेंनी ह्या कादंबरीत, ती व्यवस्थेच्या विरुद्ध असावी, म्हणून असे टवाळी करणारे वर्णन केले असणे साहजिक आहे. त्यामुळे मग रामदासांच्या सर्वच व्यक्तिमत्वाचे विडंबन आवश्यक होते. पण कथानकात नायक स्त्रीवादाच्या समर्थनात हे उदाहरण देतो आहे असे भासवून त्याला तात्विक समर्थन देणे आवश्यक होते. तसा प्रयत्न नेमाडे करीत नाहीत. इथे आठवण होते ती विनोबा भावे ह्यांची, जे गांधींचे शिष्योत्तम होते. हे एके ठिकाणी रामदास, तुकाराम व एकनाथ, ज्ञानेश्वरांच्या संसाराकडे पाहण्याच्या दृष्टिकोणांविषयी म्हणतात : ("विनोबा सारस्वत"संपादक राम शेवाळकर, साहित्य अकादेमी प्रकाशन, पृ. ९२ ) : "एकनाथ तुकाराम आणि रामदास यांची एतद्‍ विषयक सर्व वचने विचारात घेतली तर १) संसार आणि परमार्थ यात विरोध आहे--हे प्राथमिक सत्य तिघांनाही मान्य आहे आणि २) संसार आणि परमार्थ एकरूप होऊ शकतो, हे अंतिम सत्यही कोणास नाकबूल नाही. पण
तुकाराम संसारात राहत असूनही परमार्थाशी त्याचा विरोध न विसरणारे;
रामदास संसारापासून अलग राहून अधिकार-भेदाने त्याची परमार्थाशी सांगड घालणारे;
आणि एकनाथ संसार आणि परमार्थ यांतील भेदच मिटवून टाकण्याची हौस बाळगणारे;
असा या त्रिमूर्तीमध्ये वृत्तिभेद दिसतो.
पण एकनाथ आणि रामदास यांच्यातले सर्वात मोठे विचार-साम्य वेगळ्याच गोष्टीत आहे. दोघांनी ज्ञानानंतरही उपासना चालू रहावी याविषयी आग्रह धरला आहे. ज्ञानानंतरही भक्ती असू शकते, हे ज्ञानदेवांनी सप्रमाण सिद्ध केलेले प्रमेय महाराष्ट्रातील एकूण सर्वच संतमंडळींनी कोणी प्रत्यक्ष प्रमाण म्हणून तर कोणी गृहीतकृत्य म्हणून स्वीकारले आहे." कादंबरी हे काही तात्विक चर्चा करण्याचे योग्य माध्यम नव्हे हे खरे असले तरी विडंबनालाच तात्विक चर्चा म्हणून प्रसृत करणे ही घातक प्रथा आहे. भैरप्पा मात्र असे कुठे करीत नाहीत. ( क्रमश: )