गुरुवार, ४ डिसेंबर, २०१४

जातीवंत विचारवंत !
साहित्य संमेलनात “ब्राह्मणी” विचार आजही प्रभाव टाकतात अशा अर्थाचे नेमाडे ह्यांचे एक वक्तव्य नुकतेच आले आहे. विचारांची एक प्राथमिक नड अशी असते की त्याला काही ताळ-तंत्र असावे लागते. कथा कादंबऱ्यात तसे नसले तरी ते चालते . पण त्याबाहेर जर तुम्ही काही विचार मांडीत असाल तर त्याला कुठल्या तरी शास्त्रीय, तार्किक विचारांचा पाया लागतो. जर नेमाडे ह्यांनी साहित्य संमेलनात येणारे एकूण लोक, व त्यातले ब्राह्मणांचे प्रमाण असे काही आकडे दिले असते तर तो एक तर्क म्हणता आला असता. पण मोघम ठोकून द्यायचे हे कादंबरीचे मुभा-तत्व वापरत त्यानी जातीवाचक निष्कर्ष द्यावेत हे त्यांच्या “जातीवंत-विचारवंत ” असल्याचेच द्योतक आहे !
शिक्षण कुठल्या भाषेत हवे हे सांगण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे हे तर निर्विवादच आहे व त्या सोयीने नेमाडे हवे ते सांगू शकतात. पण त्याला विचारवंत पणाचा धाक आणायचा असेल तर काही शास्त्रीय विचारांचा टेकू हवा. नेमाडे जरी सुशिक्षित असले तरी हा शिक्षणशास्त्राचा, समाजशास्त्राचा, भाषाशास्त्राचा  विषय होतो. त्या प्रांतातील काही प्रमेये घेवून आपली मते दिली तरच  ती मार्गदर्शक म्हणून कोणी स्वीकारील. अन्यथा त्याला शिळोप्याच्या गोष्टीचेच स्वरूप येते. हे नेमाडे कधीच करीत नाहीत. कदाचित कथा कादंबऱ्यात कपोल कल्पित लिहिण्याच्या सवयीमुळे ते असे बरळ, विचार म्हणून रेटीत असावेत .

-----------------------------------