शुक्रवार, ३१ जानेवारी, २०१४

----------------------------
नेमाडेंचे ते बाब्ये, आमचे ते कार्टे ?
------------------
देशीवाद ह्या सदराखाली नेमाडेंनी युनिक फीचर्सच्या मराठी ई-संमेलनात खालील वक्तव्य व लिखाण केले आहे :
"नवीन पिढीला हे जास्त चांगलं कळतं. ही पिढी मोठ्या प्रमाणावर जागतिकीकरणाला सामोरी जातेय. ती आपोआप शिकत असते. उदाहरणार्थ, माझे दोन्ही मुलगे इंजिनियर आहेत. एक मेटरॉलॉजीमधे तर दुसरा इंस्ट्रुमेन्टल सायन्समधे. त्यातला एक लहानपणी कविता करायचा. अशा मुलाने चौथी-पाचवीत मराठीत कविता करणं आणि पुढे इन्स्ट्रुमेन्टल इंजिनियर होऊन नंतर आयआयटीत प्राध्यापक होणं हा बदल जागतिकीकरणामुळे झालेला आहे. नाही तर आधी असा मुलगा मराठीत बी.ए. होऊन कुठेतरी पसायदान वगैरे शिकवत बसला असता. पण ‘दुरितांचे तिमिर जावो’ हे किती दिवस म्हणत बसणार? त्यापेक्षा तिमिरातच काही तरी केलेलं बरं, असं ही नवीन मुलं ठरवतात. नवीन मुलांना आपल्यापेक्षा जास्त जाणीव असते, त्यामुळे काय सोडायला हवं ते ते सोडतात आणि नवीन मार्ग शोधतात."

आपल्याकडे "आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचं ते कार्ट !" असा वाक्‌प्रचार आहे. त्याप्रमाणे परंपरा मोडणारी ही नेमाडेंची मुले म्हणजे बाब्या व एक्स्प्रेसवे वर शिंग्रोबाचे देऊळ न बांधता थांबण्याची सोय न करणारे जागतिकीकरण करणारी मुले ही कार्टी असेच होते ना ?

नेमाडेंच्या नुसत्या पुरस्कारांच्या संख्येवरून त्यांना वैयक्तिक बाबींचाही अभिमानाने उल्लेख करायचा नक्कीच अधिकार आहे, तो त्यांनी केला हे चांगलेच आहे. पण त्यांची स्वत:ची प्राध्यापकाची परंपरा त्यांनी मोडली हे जसे त्यांना अभिमानाचे वाटते तसेच जुना हायवे सोडून नवीन एक्स्प्रेसवे केला हे का अभिमानाचे वाटू नये. त्यावर नसलेल्या शिंग्रोबाच्या देवळाचे वा थांबा नसल्याचे ( थांबा नाही हा त्यांचा गोड गैरसमज आहे हे कोणीही मधल्या फुडमॉल मध्ये काही गोड खावून अनुभवू शकेल ) त्यांना का सलावे व आपल्या मुलांनीच परंपरा तोडली ह्याचे एवढे कौतुक का वाटावे ?
नेमाडेंची मुले म्हणजे बाब्या व आम्ही सारे कार्टे काय ?
-----------------------------------------------------
------------------------
नेमाडे असे का ? कुसुमाग्रज असे का ?
-------------------
जनस्थान पुरस्कार स्वीकारतानाच्या भाषणात नेमाडे ह्यांनी त्यांना चंद्रशेखर व कुसुमाग्रज आवडत असे सांगत त्यांचे कुसुमाग्रजांशी कसे चांगले संबंध होते ते सांगतांना असे म्हटले की तात्यासाहेब ( म्हणजे कुसुमाग्रज ) त्यांना पाठविलेल्या पत्रात त्यांच्या शैलीप्रमाणे नेमाडे असे का ? असे प्रश्नार्थक विचारीत. त्यांच्या एका पत्रात असे दहाबारा प्रश्नचिन्हे तरी असत. आता ह्या माहीतीमुळे सांप्रतच्या वाचकांच्या मनात एकच प्रश्न येतो, तो असा की येवढे चांगले संबंध व आदर नेमाडेंसंबंधी होता तर कुसुमाग्रजांनी निवडलेल्या १०० कवितात नेमाडेंची एकही कविता का नाही ? का कुसुमाग्रज, असे का ?
मराठीतील पन्नास कवींच्या ह्या १०० कविता कुसुमाग्रजांनी निवडून त्याचे पुस्तक अनुभव प्रकाशन तर्फे १९९१ मध्ये छापलेले आहे. त्यात नेमाडेंचे समकालीन विठ्ठल वाघ, ना.धों.महानोर, ग्रेस ( माणिक गोडघाटे), केशब मेश्राम, दया पवार, सुरेश भट, आरती प्रभू, मंगेश पाडगावकर ह्यांची आवर्जून नोंड घेतलेली आहे. फक्त नेमाडे नाहीत. त्याआधी नेमाडेंचे कोसला, बिढार( १९७५), देखणी ( कवितासंग्रह), झूल, हूल, जरीला वगैरे साहित्य प्रसिद्ध झालेलेच होते. टीकास्वयंवरही १९९९० मध्ये प्रकाशित झाले. बिढार मध्ये कुसुमाग्रजांविषयी अत्यंत अश्लाघ्य भाषेत नेमाडेंनी जे लिहिले आहे, ते एकवेळ, ते परंपरा मोडणारे असल्याने क्षम्यही असेल. पण कुसुमाग्रजांनी ज्या नेमाडेंना ( आता ) पुरस्कारही दिला त्यांनी ते हयात असताना व नेमाडेही हयात असताना त्यांच्या कविता ह्या १०० कवितात का बरे घेतल्या नाहीत ? मराठी सारस्वताचे अशाने नुकसान नाही का होत ? ज्यांच्या जन्मदिनी आपण मराठी दिवस  साजरा करतो व नेमाडे म्हणतात त्याप्रमाणे जे त्यांच्याशी संपर्कात असत, त्यांनीच असा भेदभाव का करावा ?  शिवाय त्यांनी बिढार मध्ये जे नेमाडेंनी लिहिले त्याकडे का बरे दुर्लक्ष केले ?
म्हणजे आता मराठी वाचकाने समजायचे तरी काय ? नेमाडे असे का ? का कुसुमाग्रज असे का ? किती हे प्रश्न ! ( हे लिहिताना नेमाडे व कुसुमाग्रज ह्या दोघांबद्दलही आदर राखूनच लिहिलेले आहे हे समीक्षकांनी ध्यानात घ्यावे.).
--------------------------------------------------------
---------------------------------------------------
रंगनाथ पठारेंनी तरी समजवावे ह्यांना....
----------------------------------------
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जी समीती नेमण्यात आलेली आहे ती प्रा.रंगनाथ पाठारे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आहे व त्यांचा अहवाल अजून सरकारला मिळायचा आहे. त्यानंतर एका वर्षात कदाचित हा दर्जा मराठीला मिळू शकतो. मागच्या वर्षी मळ्याळम भाषेला हा दर्जा नाकारण्यात आला होता व ह्या वर्षी त्यांना तो देण्यात आला. ही व इतर माहीती खाली दिलेल्या लेखात अवश्य वाचा.
तसेच प्रा.रंगनाथ पठारे ( हे फेसबुकवर आहेत ) ह्यांना कळवा की जर कोणी ह्या प्रयत्नात खीळ घालत असतील किंवा मराठी ही प्राचीन भाषा नाही असे म्हणत असतील तर त्यांनी त्यांना बिनदिक्कत छान समजवावे....
उदाहरणार्थ :  आपली येऊ घातलेली कादंबरी खपावी म्हणून नुकतेच नेमाडे ह्यांनी असे विधान केले आहे की पुणेरी मराठी ही भाषाच नसून ती प्राचीन तर नाहीच. त्यांच्या मते ते बोलत असलेली खानदेशी भाषा हीच प्राचीन आहे. आजकाल खपाच्या दृष्टीने अशी काही खळबळ किती कामाची असते ते मला नुकतेच ध्यानात आले. आमच्या लायन्स क्लबचा एक सभासद मला परवा विचारीत होता की ए नेमाडे कौन है ? मी त्याला का? असे विचारल्यावर तो म्हणाला की माझ्या फेसबुक भिंतीवर त्याने माझे काही वाचले व म्हणून तो विचारीत होता की ये नेमाडे कौन है, जिससे तुम्हारा पंगा चालू है ? .....पहा , कशीही मिळणारी प्रसिद्धी कशी कामाची असते...

-----------------------------------------------------
नेमाडेंचा बलात्कार :
नेमाडे हे जितके गंभीर लेखक आहेत असे उमरीकरांना वाटते त्यापेक्षा किती तरी ज्यास्त गंभीर कुसुमाग्रज आहेत. त्यांच्या नावाने आपण मराठी-दिन साजरा करतो तेव्हा निदान काही पथ्ये तरी त्यांनी पाळायला हवी. अशा वेळी त्यांनी बिढार मध्ये कुसुमाग्रजांना आडदांड कुत्रा का म्हटले त्याचे एक तर स्पष्टीकरण द्यायला हवे होते अथवा दिलगीरी. निदान अशा पुरस्कारावेळी आपण जे बोलतो ते कोणा जाणकारांना विचारून ( ते इंटरनेट निरक्षर असल्याने विकीपीडीयात तरी पडताळून बोलायला पाहिजे होते असे म्हटले नाही.), जे बोलतो आहोत ते हंशा मिळवणारे असल्यापेक्षा तर्काचे असणे त्यांनी महत्वाचे मानायला हवे होते. उदाहरणार्थ : आजकाल बलात्कार का होत आहेत. खरे तर हा समाजशास्त्रात संशोधनाचा विषय असताना त्याची आपल्या देशीवादाच्या बळावर कशीही बोळवण करणे हे खचितच विचारवंताचे लक्षण नाही. नेमाडे त्या पुरस्कारात म्हणते झाले की बायकांची संख्या कमी असल्याने हे पुरुषांच्या नॅचरल इन्स्टिक्ट मुळे बलात्कार होत आहेत. त्यांनी जुजबी वाचन केले असते तरी त्यांना कळले असते की जेंडर रेशोचे जे आकडे असतात ( जसे दर १००० पुरुषांमागे ८७५ स्त्रिया ) ते जन्माच्या वेळेसचे असतात. पुरुषांचे मरणे ( Mortality) हे त्यांच्या हयातीत बायकांच्या मरण्यापेक्षा ज्यास्त असते. शिवाय लढाया व पुरुषांच्या इतर हिंसक वागण्याने ते बायकांपेक्षा ज्यास्त मरतात. बरे जन्मलेल्या बालकातले ज्यास्तीचे पुरुष बलात्कार करूच शकत नसतात. त्यांना जरा तरी मोठे व्हावे लागते. त्यासाठीच तर जेंडर रेशो मध्ये १५-६५ अशा वयोगटासाठी वेगळा रेशो देतात. अमेरिकेत तर ह्या वयोगटासाठी दर हजार स्त्रियांमागे केवळ ७२० पुरुष अशी परिस्थिती आहे. भारतासाठी ह्याच वयोगटासाठी हा आकडा आहे : दर हजार स्त्रियांमागे १०७० पुरुष ( हे समसमान होते). ६५ वर्षांवरच्या वयोगटासाठी हाच आकडा दर हजार स्त्रियांमागे ९०० पुरुष असा होतो. आता तुम्हाला विकीपीडीया किंवा इतर दस्त-ऐवज वाचायचा नसेल तर निदान आपल्या घरात ह्या वयोगटातली माणसे मोजलीत तरी कळेल की वरील कारणांमुळे आणि स्त्रियांचे सरासरी आयुमान पुरुषांपेक्षा ज्यास्त असल्याने त्यांचीच संख्या कुटुंबात ज्यास्त असते.
आता हे इतके सरळ साध्या तर्काचे असल्याने कुठलेही वाचन न करता इतक्या प्रगल्भ लेखकाने असे दडपून सांगावे हा मराठी सारस्वताच नव्हे तर कुसुमाग्रजांनाही गृहीत धरण्याचा प्रकार आहे. हे खचितच भूषणाचे नाही. तशात आम्ही हे त्यांच्या नजरेस आणूही शकत नाही. कारण ते इतरांचे वाचत नाहीत हे तर दिसतेच शिवाय त्यांचे भाट ही त्यांना हे सांगत नसावेत. मग नेमाडेंच्या चुका सुधारायच्या तरी कशा ?

बुधवार, २९ जानेवारी, २०१४

कोण मग्रूर नेमाडे का देशमुख ?

भालचंद्र नेमाड्यांची सुवर्णमहोत्सवी ‘मगरूरी’

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 28 जानेवारी 2014 


भालचंद्र नेमाडे हे मराठीतील ज्येष्ठ कादंबरीकार. त्यांच्या गाजलेल्या आणि गाजवलेल्या ‘कोसला’ या कादंबरीला 50 वर्षे पुर्ण झाली म्हणून एक विशेष आवृत्ती प्रकाशीत करण्यात आली. त्या निमित्ताने लिहीताना नेमाडे यांनी या कादंबरीच्या पहिल्या प्रकाशकाचा रा.ज.देशमुख यांचा उल्लेख ‘मगरूर’ प्रकाशक असा केला. सध्याचे देशमुख आणि कंपनी चे संचालक रवींद्र गोडबोले आणि संपादक सल्लागार विनय हर्डीकर यांना ही बाब खटकली. नेमाडेंच्या विधानाचा खरपुस समाचार घेत त्यांनी नेमाडेंचा देशमुखांशी असलेला पत्रव्यवहारच वाचकांसाठी खुला केला.
इतरांच्या टोप्या उडविणारे नेमाडे, आधीच्या पिढीच्या लेखक समीक्षकांना झोडपून काढणारे नेमाडे, आपली वादग्रस्त मते तलवारीसारखी सपासप चालवून समोरच्याला घायाळ करणारे नेमाडे हे विसरून गेले की आपलीही टोपी कोणी उडवू शकतो. साहित्यातील अड्ड्यांबद्दल नेमाडे यांचा आक्षेप असा होता, ‘अड्ड्यांची पहिली शपथ म्हणजे मिळून एकमेकांना ‘वर’ चढवणे किंवा मिळून एखाद्याच्या उथळपणाबद्दल मौन पाळणे.... एकमेकांच्या मोठेपणाचा प्रचार करणे, मानमान्यता मिळवून देणे इ. होत.’ आता हा लेख नेमाडे यांनी 1968 मध्ये लिहीला आहे. तोपर्यंत नेमाडे यांची कोसला प्रकाशित झाली होती.  आणि याच वेळी नेमाडे देशमुखांना पत्रात लिहीतात, ‘दावतरांना पत्र टाकले आहे. प्रत पाठवावी (कोसलाची). मीहि आता गेल्यावर ओलोचनेकरिता बी कवींच्या चांफ्यावर लिहून पाहिजे ना? मग कोसल्यावर लगेच छापा असं सांगतोच.’
म्हणजे नेमाडेंच्या कोसला कादंबरीवर परिक्षण वसंत दावतर ‘आलोचने’मध्ये छापणार असतील तर नेमाडे त्यांना बी. कवींच्या कवितेवर लेख लिहून देणार आहेत. आपल्या पुस्तकावर इतरांनी लिहावे या वृत्तीचा नेमाडेंनी नेहमीच उपहास केला आहे. असे नेमाडे रा.श्री. जोग यांच्या सारख्या ज्येष्ठ समीक्षकाबद्दल रा.ज.देशमुख यांना पत्रात लिहीतात, ‘जोगांना लिहिलेय तूम्हाला लवकरच प्रत मिळेल. आमची इच्छा आहे परंतु तुमचीहि असल्यास कुठेतरी कोसल्यावर लिहा.’ आता इतरांवर टिका करणारे नेमाडे रा.श्री.जोग यांना आपल्या कादंबरीवर लिहावे अशी गळ का घालत आहेत? आजचा एखादा नवा लेखक आपल्या पुस्तकाची प्रत मोठ्या लेखक समीक्षकांना आशेने पाठवतो आणि त्यांनी त्यावर लिहावे अशी अपेक्षा धरतो. यात आणि नेमाड्यांत काय फरक आहे?
 आर्थिक व्यवहारांत नेमाडे असे सर्वत्र पसरवत राहिले की देशमुखांनी त्यांना गंडवले. खरी परिस्थिती अशी आहे की 1963 ला पुस्तक प्रकाशित केल्यापासुन 1970 पर्यंत त्याचे कित्येक छापील फॉर्म्स बांधणी न करता देशमुखांच्या गोदामात तसेच पडून होते. शिल्लक सर्व प्रती, सुटे फॉर्म्स हे सर्व नेमाड्यांनी खरेदी केले. विक्री झालेल्या प्रतींचा रॉयल्टीचा हिशोब केला. मधल्या काळात नेमाड्यांना देशमुखांनी उसने पैसेही दिले होते. तसे सविस्तर पत्रच आहे.  हा सगळा हिशोब मिटवून 870 रूपयांचा डिमांड ड्राफ्ट नेमाड्यांनी देशमुखांना दिला. पुस्तकाच्या प्रती व छापील फॉर्म्स ताब्यात घेतले.
नेमाड्यांच्या पुस्तकांना प्रचंड मागणी होती आणि देशमुखांनी त्याचा फायदा करून घेतला असे काही वातावरण नव्हते. नेमाड्यांची कादंबरी सात वर्षे पडून होती. इतकेच नाही तर खुद्द नेमाडे यांनाही मराठी प्रकाशन व्यवसायाबद्दल कल्पना असावी. कारण ‘दुसर्‍या बाजीरावावर एक नाटक पुढच्या वर्षी मूड आल्यास लिहायचा विचार आहे. ते वाचून पाहून खपण्यासारखे असल्यास तुम्ही प्रकाशित करालच. परंतु खपण्यासारखे नसल्यास प्रकाशित कराल काय हे कळवा. नुसते बाड घेऊन प्रकाशकांची दारे हिंडणे बरे नव्हे. म्हणून लिहिण्याआधी प्रकाशक गाठावा हे बरे.’ जर काही शंका असतील तर नेमाडे यांनी दुसरा प्रकाशक गाठावा असे देशमुखांनी स्पष्टपणे लिहीले आहे. त्यावरही परत नेमाडे अहमदनगर येथून 1964 साली आपल्या पत्रात लिहीतात, ‘मी दुसर्‍या कोण्या प्रकाशकासाठी लिहावे असा मुद्दा तुम्ही उपस्थित केला, तो बरोबर नाही. आम्ही इतर प्रकाशकांशी गेल्या वर्षभर किती फटकून वागलो याच्या गोष्टी तुमच्या कानी आल्या असतील.’
नेमाड्यांना दोन पत्रे देशमुखांनी लिहीली. त्यातील एका जास्त सविस्तर आहे. त्याला कारणही तसेच घडले. नेमाड्यांनी देशमुखांकडून उसने पैसे घेतले होते. त्यासाठी स्टँपवर सही द्यावी असा आग्रह देशमुखांनी केल्यावर नेमाडे यांना राग आला. नेमाडे 1965 मध्ये म्हणजे कादंबरी प्रकाशित झाल्यावर दोन वर्षांनी तक्रार करतात, ‘कॉन्ट्रॅक्ट न करता लेखकाजवळून कादंबरी घेणे व स्नेही म्हणून पैसे देऊन स्टॅपवर सही घेऊन अन्नदात्याबद्दल अविश्वास दाखवणे, ह्याचा अर्थ काय?’
आता मात्र देशमुखांमधला ‘देशमुख’ जागा झाला. लेखकांच्या पुस्तकांवर प्रकाशक जगतो. लेखक त्याचे अन्नदाते आहेत हे खरे आहे. पण नेमाड्यांसारखा नवा लेखक आणि ज्याच्या पुस्तकाचा खप अजून फारसा सुरू झाला नाही तो देशमुखांना आपली आर्थिक परिस्थिती सुधारली की लगेच वेगळ्या भाषेत बोलायला लागतो हे देशमुखांना खटकणारच. कुणालाही ते खटकेल.
रा.ज.देशमुखांकडे वि.स.खांडेकर, रणजित देसाई, पु.ल.देशपांडे, कुसुमाग्रज, चि.वि.जोशी, ग.त्र्यं. माडखोलकर यांच्यासारखे ‘खपाऊ’ लेखक होते. शिवाय पाठ्यपुस्तकांचा मोठा व्यवसाय त्यांच्या हाताशी होता. यांपैकी कुणी असा शब्द वापरला तर देशमुखांनी एैकून घेतला असता. यांच्यापुढे आर्थिक दृष्ट्या नेमाड्यांच्या कादंबरीचा काय पाड? आजही इतक्या वर्षांनी ‘कोसला’ च्या किती आवृत्त्या निघाल्या आहेत? तर पन्नास वर्षांत जेमतेम 25 आवृत्त्या. एक आवृत्ती हजार किंवा दोन हजारांची. नेमाड्यांच्या पुस्तकांची वाङ्मयीन गुणवत्ता इथे अभिप्रेत नाही. नेमाड्यांनीच मुद्दा ‘अन्नदाता’ असा शब्द वापरून आर्थिक दिशेने नेला आहे.
यानंतर म्हणजे 1965 ते 1970 देशमुख आणि नेमाडे हे संबंध ताणाताणीचे राहिले. आणि शेवटी हा व्यवहार नेमाड्यांनी 1970 मध्ये पूर्ण केला. पुस्तकांची दुसरी आवृत्ती स्वत: काढायला नेमाडे तयार झाल्यावर अगदी पंधरा दिवसांत देशमुखांनी हा व्यवहार संपवला. या आवृत्तीत नेमाडे पुरते आत आले हा भाग परत वेगळाच.
ह्याच नेमाड्यांनी दुसरी कादंबरी ‘बिढार’ लिहीली. त्यात देशमुख पती पत्नींचे व्यक्तीचित्र ‘कुलकर्णी प्रकाशक पती पत्नी’ असं विरूप करून रंगवले आहे. नविन पुस्तकाचे कौतुक करण्यासाठी देशमुख पती पत्नी गाडी करून औरंगाबादला आले. नेमाडे पती पत्नीला कपड्यांचा आहेर शिवाय मुलांसाठी खेळणी, फळांच्या करंड्या असा सगळा जामानिमा घेऊनच देशमुख आले होते. त्यांनी नेमाड्यांना (इतकं सगळं होवूनही) नविन कादंबरी छापण्यासाठी मागितली.  नेमाड्यांनी ती दिली नाही. नागपुरच्या अमेय प्रकाशनाला ती दिली. ते प्रकाशनही गुंडाळल्या गेले. मग नंतरची नेमाड्यांची सगळी पुस्तके भटकळांच्या पॉप्युलरकडे मुंबईला आली. कदाचित भटकळांना नेमाडे ‘मी तूमचा अन्नदाता’ असे म्हणू शकतात.
दुसर्‍यांच्या टोप्या उडवणार्‍या नेमाड्यांनी देशमुखांच्या बाबतीत संकुचितपणा दाखवत आपल्या विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडविले. सरस्वती भुवन संस्थेत नौकरी लावून द्या म्हणून देशमुखांकडे आग्रह धरणे, नंतर त्याच संस्थेवर टिका करणारी कादंबरी लिहीणे, आपल्याला लेखक म्हणून उभं करणार्‍या देशमुख पती पत्नीचे कादंबरीत व्यंगचित्र रेखाटणे या सगळ्याला काय म्हणावे? आता हर्डीकर/गोडबोले यांनी हा पत्रव्यवहाराद्वारे नेमाडेंची सुवर्णमहोत्सवी मगरूरी उघड केली आहे.
इतरांना शहाणपण शिकविणारे नेमाडे सगळे नियम वाकवून दुसर्‍यांदा साहित्य अकादमीचे अध्यक्षपद पटकावतात, व्यवस्थेला शिव्या देत साहित्य अकादमी पारितोषिक स्विकारतात, पद्मश्री स्वीकारतात. पद्मश्रीसाठी शिफारस महाराष्ट्रातून नाही तर हिमाचल प्रदेशातून झालेली असते आणि हे सगळं होताना नेमाड्यांच्याच जळगांवच्या जून्या स्नेही प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती म्हणून दिल्लीत बसलेल्या असतात. सिमल्याचे राष्ट्रपती भवन नेमाड्यांना मुक्तहस्ते वापरायला भेटते. हे सगळं म्हणजेच समृद्ध अडगळ असं सुजाण वाचकांनी समजून घ्यावे.  (ज्यांना नेमाडे-देशमुख पत्रव्यवहार वाचण्याची उत्सुकता आहे त्यांनी विनय हर्डीकरvinay.freedom@gmail.com व रवींद्र गोडबोले ravindragodbole@aquariustech.ne या मेलवर संपर्क करावा)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575