बुधवार, २३ फेब्रुवारी, २०११

नेमाने-नेमाडे

भैरप्पा व नेमाडे--एक तौलनिक अभ्यास


स्वगते, भाषणे व संदेश :
बख्तिनने म्हटल्याप्रमाणे सत्य हे नेहमी बहु-आयामी संवादांमध्ये कुठे तरी असण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच की काय नेमाडेंच्या "हिंदू" मध्ये अनेक पात्रांचे, नायक खंडेरावाचे व लेखकाची स्वगते, भाषिते ही खूपच मुबलकपणे पेरलेली आढळतात. त्यातली कित्येक भाषिते ही कथानकात विस्तृत केलेली नसतात किंवा लेखकाचे त्यावर अधिकाचे भाष्य असत नाही. जसे: जसा इतिहास पुरातत्व उत्खननाने उघड होतो, तशा जाणिवाही उरलेल्या किंवा उत्क्रांत झालेल्या दिसायला हव्या हे लेखकाचे म्हणणे. विचार म्हणून ह्याचे आकर्षण मान्य केले तरी त्याची विगतवार फोड किंवा विस्तार कुठे लेखक करीत नाही. व मग हे म्हणणे नुसतेच अधांतरी लोंबकळते. वायाच जाते. तसेच "स्त्री ही समाजशास्त्रीय कल्पना की जीवशास्त्रीय ?". ह्यावर बाजूने अथवा विरुद्ध असे कुठलेच स्पष्टीकरण लेखक करीत नाही, किंवा कथानकही त्यावर कृतींनी, प्रासंगिक घटनांनी, प्रकाश टाकीत नाही. हिंदू धर्म बाकी सर्व धर्माच्या सान्निध्यात आल्यावर त्यांच्या प्रभावाखाली प्रचंड अडगळ निर्माण करणारा झाला असे मलपृष्ठावर व इतरत्र मुलाखतीत लेखकाने म्हटले आहे खरे, पण ह्या कादंबरीत न भाष्याच्या रूपाने वा कथानकातल्या घटना-प्रसंगातून असा काही संदेश वाचकाला मिळत नाही. ज्या राजवाड्यांविरुद्ध नेमाडे संशय व्यक्त करतात (स्टार-माझा मुलाखत), की त्यांनी ज्ञानेश्वरीत स्वत:च्याच ओव्या घुसवल्या असतील त्या राजवाड्यांचा तर (पुस्तकात ) कुठेच उल्लेख येत नाही. ज्ञानेश्वरीत स्वत:च्या ओव्या घुसवण्यासंबंधीही काही भाष्य आढळत नाही. बरे ह्या सर्व गदारोळातून हिंदू समाजाला काही संदेश किंवा मार्ग दाखवलाय असेही मार्गदर्शन पुस्तकात कुठे दिसत नाही. पस्तीस वर्षांच्या खटाटोपातून दिशादर्शक असे काहीच सापडत नाही, हे निश्चित नैतिक भूमिका नसण्याचेच द्योतक आहे.
भैरप्पा "जा ओलांडुनी" कादंबरीचे मर्म सांगतांना म्हणतात: "अवघ्या जातीयतेचा इतिहास काय सांगतोय ? ब्राह्मण व्हायची इच्छा ! कुठल्या मार्गानं का होईना ब्राह्मण म्हणवून घेण्याचा प्रयत्न ! ज्यांनी हे ब्राह्मण्य धिक्कारलं त्यांनीही स्वत:चा एक समूह तयार करून स्वत:ला श्रेष्ठ मानून तेच ब्राह्मण्य वेगळ्या रूपानं आपलंसं केलं. जर सगळेच मूळ ब्राह्मण असते तर त्यामध्ये एवढे वेगवेगळे पंथ-उपपंथ का आले असते ? प्रत्येक समूहानं कसल्यातरी ब्राह्मण्याचाच मुकुट मिरवला. मारम्माच्या पतीनंही असाच, ब्राह्मण होण्याचा प्रयत्न केला होता." हे मर्म जसे लेखक कथानकात पात्रातून त्यांच्या भाष्यातून, कृतीतून जाणवून देतो, त्याचे संगतवार समर्थन करतो तसेच ह्यावरचा उपाय म्हणून प्रत्येकानेच ज्ञानाची कास धरून ब्राह्मण व्हावे, स्वत:चा उद्धार करावा अशी थेट शिकवणही भैरप्पा छान देतात. पृ.२९६ वर असलाच संदेश देणारे एक वचन ते देतात : "कथांवर आधारलेल्या शास्त्राला नीतीचा पाया नसतो. अमुक योग्य आणि तमुक अयोग्य हे नीतीच्या कसावर घासून बघायला पाहिजे, लोकांना ते शिकवायला पाहिजे. माणसा-माणसात भेद करू नये. सगळ्या माणसांच्या शरीरात सारखंच रक्त असतं. " असं काही संदेशपर नेमाडेंच्या पुस्तकात शोधूनही सापडत नाही.
भैरप्पांनी जी निष्कर्षे काढली आहेत त्याला समाजशास्त्रीय अभ्यासातून, निरिक्षणांतून चांगलाच दुजोरा मिळतो. एक हातच्या काकणाला आरसा न लागणारे उदाहरण आहे, सध्याच्या ब्राह्मणांची बदललेली प्रणाली. जेव्हा आरक्षणाचे आधिपत्य सर्वत्र दिसून यायला लागले तेव्हा ब्राह्मणाची मुलेमुली ठराविक चाकोरीतले व्यवसाय सोडून इतरत्र जाऊ लागली. जसे आज राजकारणात, मंत्रीमंडळात, विद्यापीठात, कुलगुरूपदी, कलेक्टर, वगैरे पदांवर ब्राह्मण फारच अभावाने आढळतात. त्याचबरोबर वीस वर्षांपूर्वी अमेरिकेस जाणार्‍यात प्रामुख्याने ब्राह्मण असत. घरटी एकजण तरी आजकाल अमेरिकेत असतो, संगणकाच्या क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात, तांत्रिक क्षेत्रात वगैरे. ज्ञानाची कास न सोडता व्यवसायात असे ते सहजी बदल करू शकले. असाच वरून जातीयतेत ज्ञानाची कास धरून स्वत:चा विकास करून घ्यावा असा सरळ संदेश ठळकपणे दिसून येतो.
नेमाडेंच्या कादंबरीतल्या प्रतिपादनाला अशा अभ्यासाचा काही निर्वाळा दिसून येत नाही. ( अर्थात कादंबरी काल्पनिक असती तर ही गरजही पडली नसती. पण मग नामांतर , विद्यापीठ असली तयार अडगळ टाकता आली नसती !)
तसे पाहिले तर स्वत: नेमाडे ब्राह्मणेतर असून ज्ञानदानाचेच कार्य करतात, त्यावरून ब्राह्मणच ठरतात. ज्ञानाची कास धरणे हेच आजकालचे ब्राह्मण्य ठरते व जे समस्त प्रगती-इच्छुक समाज करीत असतात. वास्तवातल्या काही प्रतिक्रियाही आपल्याला प्रत्यही बघायला मिळतात. जसे "आमचा बाप व आम्ही"चे लेखक डॉ.नरेंद्र जाधव, (जे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, प्लॅनिंग कमिशनचे सदस्य, शेतकर्‍यांच्या आत्महत्यावरच्या शोध-समीतीचे एकमेव सदस्य ) एका मुलाखतीत म्हणतात, की शिष्यवृत्त्या, आरक्षण वगैरे ठीक आहेत, पण आम्ही पंढरपूरच्या देवळातले बडवे पुजारी का होऊ शकत नाही. ( आणि त्याउलट त्यांची मुलगी म्हणते, ब्राह्मणांबद्दल माझ्या मनात द्वेष नाहीय.) .इथे भैरप्पांच्या निष्कर्षाची साक्षात प्रचीती येते व त्याची सर्वमान्यता ध्यानात येते.
टीकास्वयंवरात ( पृ.२८९) वर नेमाडे म्हणतात ते त्यांनाच सांगावयाची वेळ येथे येते ती अशी: "...त्या कल्चर ह्या शब्दाचा खरा अर्थ "वाढ" असा आहे. नुसते उगवले त्याची चर्चा करून सांस्कृतिक कार्य होत नाही तर नीट पेरणे, नीट जोपासणे, व विध्वंसक प्रवृत्तींची कीड नष्ट करणे, हे अधिक सांस्कृतिक आहे. तेच अधिक चर्चास्पदही आहे. पुढल्या पिढीने मराठी समीक्षेत क्रांती करून अभिरुचीचे नष्टचर्य संपवल्याशिवाय ह्या परिस्थितीत फरक पडण्याची शक्यता नाही." ( क्रमश: )
---अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११

भैरप्पा व नेमाडे : एक तौलनिक अभ्यास :

इतिहास व त्याकडे पाहण्याची दृष्टी:
"हिंदू"त इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी संशयाची आहे. पैकी धर्म बिघडवण्याचा दाट संशय ब्राह्मणांवर आहे. पण तो निष्कर्ष म्हणून आणि एक (डिस्कोर्स) भाषण म्हणून येते. कथानकात ब्राह्मण पात्रे व त्यांनी धर्म बिघडवण्याचे केलेले उपद्व्याप असे काही येत नाही. जी निष्कर्षे येतात ती लेखकाची/नायकाची स्वगते, किंवा भाषिते ह्या स्वरूपात येतात.
"जा ओलांडुनी" मध्ये भैरप्पांची नायिकाच ब्राह्मण असते, आजूबाजूची पात्रे लिंगायत, हरिजन, वाणी अशा वेगवेगळ्या जातीची असतात. शूद्राची मातंगी नावाची स्त्री नायिकेच्या वडिलांशी संबंध आलेली बाई असते. तिला ते शेवटी ब्राह्मण करून घेतात. नायिकाही वडिलांनी ब्रह्मोपदेश केला म्हणून जानवे घालते, हवन करते. देवळात सभेत वादविवाद करते. हरिजनाच्या एका पात्राला पूर्वी झालेल्या अत्याचार व छळवणुकीचा इतिहास कागदोपत्रांद्वारे लिहून देते. कादंबरीत जे निष्कर्ष काढलेत की प्रत्येक जात स्वत:ला ब्राह्मण समजण्याचा ( किंवा ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ ) प्रयत्न करते, ते सर्व कथानकातील पात्रे, प्रसंग, संभाषणे समर्थनासारखे सिद्ध करतात. वेळोवेळी इतिहासाबद्दल मते येतात :(पृ.२६८)"एखाद्या उद्देशासाठी त्या दृष्टीनं इतिहास लिहिणं म्हणजे इतिहासाचा दुरुपयोग करणं ह्यावर तिचा विश्वास होता. अभिमानाच्या दृष्टीनंच इतिहास पाहाणं, ठराविक राजकीय किंवा अन्य विचाराच्या पुष्टयर्थ इतिहासाचा क्रम बदलणं किंवा इतिहासाची मोडतोड करणं याला ती बौद्धिक अनीती मानत होती. तिचे प्राध्यापक सांगायचे, जीवनप्रवाह हाच इतिहास आहे. कुठल्याही सिद्धांताच्या उजेडात जीवनाचा शोध घेऊ गेलं तर त्याचा अंत लागत नाही, त्याची नेमकी विशालता समजत नाही--थोडक्यात त्याचं खरं स्वरूपच समजत नाही. सगळे सिद्धान्त जीवनातूनच निर्माण होत असतात. जीवन हाच सत्याचा आधार आहे, सिद्धान्त नव्हे. इतिहासाचही तसंच आहे. सिद्धान्ताच्या नादानं इतिहासही बदलू नये." जेव्हा जेव्हा काही समुदाय ( जसे संभाजी ब्रिगेड, मराठा लॉबी, वगैरे ) आपला इतिहास अभिनिवेशाने बदलायचा किंवा नव्याने लिहिण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना ही दृष्टी लागू होते हे वाचकाला सहजी पटते. ( क्रमश: )
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com