मंगळवार, १२ एप्रिल, २०११

बख्तिनचे ओंगळ रुपडे
"हिंदू" : भालचंद्र नेमाडे----२


ज्ञानेश्वरांचा काळ ७५० वर्षांपूर्वीचा. त्यांनी बर्‍याच प्रसंगी वर्णव्यवस्थेचा पुरस्कार केलेला आहे, ही बाब खरी असेल. पण हे जे वचन दिले आहे त्याने असा काही अर्थ निघत नाही.ज्ञानेश्वरीच्या अध्याय १३ त ओवी ७१५-७१७ मध्ये विद्या व वय ह्यांच्या उन्मादाने माणुस कसा गर्व करीत छाती काढून चालतो व माझ्यासारखा मोठा कोणी नाही असा शिवभक्तांना असतो तसा गर्व ( शिवमुष्टीगंडु, गुंडु नव्हे) धारण करतो व मग त्याला चांगले बघवत नाही अशा अर्थाच्या ह्या ओव्या मुळात अशा : म्हणे मीं चि येकु आथि । माझा चि घरिं संपत्ति । माझी आचरती रीती । कोण्हासी नाही ॥ नाहिं माझे नि पाडे वाडु । मी चि सर्वज्ञु एकु रूढु । ऐसा शिवमुष्टिगंडु । घेउनु ठाके ॥ व्याधिलेया माणसा । न ये भोगु दाखवुं जैसा । नीके न साहे तैसा । पुढिलाचे ॥ ह्यात कोठेही जातीव्यवस्थेचा उल्लेख येत नाही वा व्यक्तीश: वेसकरावर काही ताशेरे नाहीत.
आता नेमाडे म्हणतात की हा एक दृष्टांत आहे. काव्यशास्त्रात दृष्टांत हा अलंकार, व्याख्या करताना, म्हणतात की "विषयाचे वर्णन करून झाल्यावर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास, दृष्टांत अलंकार होतो." इथे मूळ गोम "त्याच अर्थाचा दाखला" ही आहे. ज्ञानेश्वर म्हणत आहेत गर्व, ताठा बाळगू नका. त्याचा अर्थ त्यांनी ताठा दाखवला असा आपण काढू शकत नाही. काढलाच तर ते अज्ञानाचे वा खोडसाळपणाचे लक्षण होईल. शिवाय ही युगत बख्तिनने कुठेही सांगितलेली नाही. त्याने संवादाबाबत जे सांगितले आहे (की मी-दुसर्‍यांबरोबर व दुसर्‍यांना-मी कसा वाटतो ह्या विषयी जे संवाद होतात त्यात कुठे तरी खरेपणा असण्य़ाची शक्यता असते), तसे इथे कुठले संवाद लेखकाने दिलेले नाहीत. फक्त कौतुकाची बाब अशी की नेमाडेंचे "निश्चित नैतिक भूमिकेवर ठाम राहणे" इथे प्रभावी आहे. ही आत्मचरित्रपर कादंबरी असून आदर्श अशा "यमुनापर्यटन" टाइप कादंबरीत असते तसे निश्चित नैतिक भूमिका घेऊनच हे चितारलेले आहे. नेमाडे म्हणतात: "व्यक्ती व समाज ह्यांच्या संबंधात अनेक प्रश्न असतात व ह्या संदर्भात काही निश्चित नैतिक भूमिका घेऊन कादंबरीकाराने भाषिक कृति केलेली असते, त्यानुसार आशयसूत्र निवडलेले असते." ( टीकास्वयंवर--पृ २४२ ). शिवाय कादंबरीच्या प्रमोशन मध्ये नेमाडेंनी "स्टार-माझा" वर जी प्रदीर्घ मुलाखत दिली त्यातही म्हटले होते की हिंदू धर्म ब्राह्मणांनी बिघडवला. त्यामुळे जे लिहिले आहे ते पूर्ण समजून-उमजून , निश्चित नैतिक भूमिकेतूनच लिहिलेले आहे. अर्थात "न्यू क्रिटिसिझम"च्या विचारप्रणाली प्रमाणे कलाकृतीबाह्य मुलाखतीला आपण महत्व देऊ नये हे खरेच आहे. पण जनसामान्यात आदराचे स्थान असणार्‍या ज्ञानदेवांवर हे किटाळ आणण्यापूर्वी निदान बख्तिनने असे कुठे सांगितले आहे का असा अदमास तरी त्यांनी घ्यावयास होता. ज्ञानेश्वरांची वा ब्राह्मणांची ही अवहेलना होत असेल तर ते तशी प्रतिक्रिया यथावकाश देतीलच.
आता दोन उतारे घेऊ: ( ते एकत्र घेण्याचे कारण त्यात दोन्हीतही समान धागा आहे.)
पृ.२५३, हिंदू मध्ये हे पहा :"शांतता चिरणारा बनी रांड हिचा कोळीवाडयातून धारदार आवाज...पन तू कोनता सत्वाचा हायेस महात्मा गांधीच्या लवडयाचा ते पाहतेच मी बी, तुह्या बहीनचा झौ...तोंडाची गांड करतूस...
पृ.४५० वर पहा:"रामदास स्वामींच्या मंडपात राहून गेलेल्या बायकोच्या दु:खावर फार सुंदर कविता होईल नाही ? वानखेडे म्हणाला, सुंदर ? तिकडे कवळी पोरगी का बोडकी ठेवली जन्मभर का मारली ---आणि तुला सुंदर कविता लिहायचीय ? त्यापेक्षा ही उदध्वस्त बाई हातात वहाण घेऊन याला शोधत शिवथरकडे चाललीय अशी कविता---त्यापेक्षा श्लोकच का नाही लिहीत---जनाचे श्लोक : मनाची नको लाज ठेवू जरी तू । जनाची तरी ठेवी पळपुटया नागडया तू ॥----तू भडव्या सिद्धार्थ गौतमावरच का नाही लिहीत ? ते तं एक पोरगं पण काढून पळालं बायको सोडून....इथे मराठी कवींना रामदासाच्या ह्या बिचारीचं नावसुद्धा माहीत नै..."
कादंबरीतले एखादे पात्र समाजाच्या अशा थरातले असेल की जिथे कोणाबद्दलच आदर नाहीय व सगळ्यांना नुसत्या शिव्याच देण्यात येतात तर ते त्या पात्राचे बोल समजायचे का लेखकाचे ? ह्यावर नेमाडेंना आदर असलेल्या बख्तिन ह्यांनी पृ.३३३ ( द डायलॉगिक इमॅजिनेशन ) स्पष्ट असे भाष्य केले आहे, ते असे ( मुक्त भाषांतर): "वैयक्तिक पात्रे आणि त्यांचे भागधेय, आणि वैयक्तिक पात्रांची भाषिते ह्यांची कादंबरीला काही काळजी नसते. पात्रांच्या भाषितांची उठून दिसणारी ओळख अशी की ती भाषिते एका ठराविक सामाजिक वैशिष्टयांची असतात, एक सामाजिक रुंद पदर दाखवतात. अशी भाषिते सूप्त भाषांची दमदार शक्यता दाखवितात. अशा भाषितांमुळे कादंबरीत मतांचे बहु-आवाजी आयाम तयार होतात. ( बख्तिन निरनिराळे लोक जे संवाद करतात त्यात सत्य सापडण्याची शक्यता वर्तवताना ह्या बहु-आवाजी आयामांना महत्व देतो.)."
म्हणजे बख्तिनच्या म्हणण्यानुसारसुद्धा पात्रांची भाषा ही लेखकाचीच भाषा ठरते, व त्या भाषेतल्या वैगुण्याबद्दल, प्रमादाबद्दल लेखकच जबाबदार ठरतो. असेच कादंबरीत लेखकाचे एखादे भाषण (डिस्कोर्स )असेल, तत्वज्ञान असेल, तर ते नायकाचे समजायचे का लेखकाचे ? ह्या विषयीही बख्तिनचे म्हणणे बघण्यासारखे आहे. बख्तिन म्हणतो, ( पृ.३३२):" जी गोष्ट कादंबरीला कादंबरीपण देते व महत्वाची आहे ती म्हणजे, बोलणारी व्यक्ती व त्याचे भाषण. बोलणारी व्यक्ती व त्याचे भाषण, हा कादंबरीतला एक कलात्मक अविष्कार असतो. नाटकात असते तसे हे संभाषण नुसते दिले गेलेले नसते तर, ते लेखकीय भाषण असते. संभाषणाच्या इतर दुय्यम अंगांप्रमाणे ( जसे, काही वेळा गप्प बसणे, घटना, प्रसंगोत्पात बोलणे वगैरे ) ते मोघम नसते तर ते निश्चित असे सांगणे असते व त्यासाठी त्याची भाषा शब्द, व्याकरण हे खास असावे लागते. बोलणारी व्यक्ती म्हणूनच कादंबरीत एक आदर्शवाद्यासारखी असते. हे त्याचे बोलणे जगाकडे पाहण्याचा एक निश्चित दृष्टिकोन दाखवते. म्हणूनच ही भाषिते नुसतीच शब्दांचा केवळ एक दिशाहीन व्यापार न राहता लेखकाचे एक आदर्शवत बोलणे होते." हे नेमाडेंनी टिकास्वयंवर मध्ये कबूलले आहेच. ते असे : "व्यक्ती व समाज ह्यांच्या संबंधात अनेक प्रश्न असतात व ह्या संदर्भात काही निश्चित नैतिक भूमिका घेऊन कादंबरीकाराने भाषिक कृति केलेली असते, त्यानुसार आशयसूत्र निवडलेले असते." ( टीकास्वयंवर--पृ २४२ ). असे जर निश्चित नैतिक भूमिकेतून वरील विटंबना करणारे लिहिल्या गेले असेल तर नेमाडेंनीच त्याचे उत्तरदायीत्व स्वीकारायला हवे. मतभेद सभ्यतेच्या चौकटीतही ते दाखवू शकले असते. मग ते का दाखवीत नाहीत ? कारण इथेही त्यांना बख्तिनच भडकवतो आहे. ( अर्थात ते त्यांना अजून उमगले नसावे.).
विडंबन ह्या जुन्या व लोकप्रिय प्रकाराबद्दल बख्तिन म्हणतो,(पृ.५१):"समजा एखाद्या सुनीताचे ( काव्यप्रकार), आपण विडंबन केले तर ते चांगले, वा वाईट असे असू शकते. पण ते त्यातल्या विषयाचे विडंबन न होता, सुनीत ह्या काव्याच्या प्रतिमेचे विडंबन होते"...(पृ.५५,५९,६१):"नालस्ती करणारे विडंबन हे धीरगंभीर एकतर्फी वर्णन करणार्‍या शब्दातल्या वस्तुस्थितीत किंवा गंभीर शब्दाच्या समीक्षेत खेळकर हास्याद्वारे एक प्रकारचे चूक-सुधारणे करते.धीरगंभीर वाङमय प्रकारात विरुद्ध अर्थाचे हे विडंबन बसत नसल्याने ते कादंबरीत एक प्रकारचे बहु-आवाज ( हेटरोग्लॉशिया ) तयार करते. ह्याच हास्यामुळे कादंबरीला एक महत्वाचा घाट येतो. जेव्हा कोणी एखाद्या विषयावर धीरगंभीर गद्य लिहितो तेव्हा ते त्या विषयाला अर्थ देणारे असल्यामुळे थेट प्रकारचे भाष्य असते. अशाच भाषेत देशाची मिथके, पारंपारिक कथानके तयार होत असतात. ह्या उलट विडंबनाची प्रकृतीच ह्याच्याबरोबर उलटी असते. तिचाही रोख कथानायकाकडेच असतो, पण हास्यामुळे ती वस्तुस्थिती व ते चितारणारे शब्द ह्यात एक अंतर निर्माण करते.सिमित शब्दप्रतिमांनी बंदिस्त केलेले वास्तव मग विडंबनामुळे सत्य वर्तविते."
बख्तिनचा हा सगळा शब्दांचा खेळ आहे. आचार्य अत्रे जेव्हा स.का.पाटिलांचे विडंबन करीत तेव्हा ते एखाद्या काव्यप्रकाराचे, किंवा कॉंग्रेसच्या ध्येयधोरणाच्या टीकेचे नसून चक्क स.का.पाटिलांचीच खिल्ली उडविणारे असायचे. ते शब्दांचा कितीही खेळ करून दाखवू गेले तरी सत्य, एक वाङमयप्रकार, चूक-सुधारणारे वगैरे काहीही न होता सरळ त्यांचीच वैयक्तिक, निंदानालस्ती करणारे असते. किंवा नेमाडेंचे वरचे उदाहरण घेतले तर "सावधान" म्हटल्यावर बोहल्यावरून पळ काढणार्‍या संत रामदासांनाच नेमाडे पळपुट्या, नागड्या म्हणत आहेत हे उघड आहे. ते काही ब्रह्मचर्य विरुद्ध संसारिक जीवन ह्या परिसंवादात वाद घालीत नाही आहेत. किंवा "तिसरे ते सावधपण । सर्वविषयी ॥"ह्या रामदासांच्या सूत्रासंबंधी विवाद निर्माण करीत नाही आहेत. ते सरळ स्त्रीवादाच्या कैवारापायी समर्थांना वाकुल्या दाखवीत आहेत. तेव्हा बख्तिनच्या कलागतीने, नेमाडेंनी केलेली ही नालस्तीच ठरते. बरे ह्याला काही नैतिक भूमिकेचा संदर्भ द्यायचा असता तर नायक खंडेरावही स्वत: लग्न करण्यास कचरतो आहे हे कसे ? कींवा विवाह ह्या कल्पनेविरुद्ध काही भाष्य असते व मग हे विडंबन असते तर मग बख्तिनचे म्हणणे लागू तरी पडते. किंवा ज्ञानेश्वरांचे वरचे विडंबन हे काही अभंग ह्या वृत्ताचे विडंबन नसून ते त्यांचेच विडंबन होते. एरव्ही ही चक्क बख्तिनच्या आडून केलेली निखालस नालस्तीच होते, अभिरुची सोडून केलेली. ज्ञानेश्वर, गांधी, व समर्थांच्या सेवकांना वक्र दृष्टीची. ( क्रमश: )