गुरुवार, १९ डिसेंबर, २०१३

-----------------------
गर्वसे कहो हम "मग्रूर" है !
-----------------------------------
आजच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये एक "रसिक" नावाने एक स्फुट आले आहे. त्यात म्हटले आहे की भालचंद्र नेमाडे ह्यांनी "कोसला"च्या २२ व्या आवृत्तीसाठी जी प्रस्तावना लिहिली आहे त्यात कोसलाचे प्रथम प्रकाशक रा.ज.देशमुख ह्यांना धुरंधर व मग्रूर म्हटले आहे. त्यावर तिथले आजचे हर्डीकर वगैरे त्यासंबंधीचा पत्रव्यवहार खुला करू इच्छित आहेत.
एवढे कष्ट कशाला घ्यायचे ? नेमाडेंना ज्यांचा कुसुमाग्रज पुरस्कार मिळाला त्या कुसुमाग्रजांबद्दल ते बिढार मध्ये काय म्हणतात ते पहा व ठरवा की "मग्रूर" कोण आहे ?
बिढार ( पृ.४१) : "सकाळपासून कुसुमाग्रजाला शिव्या देतोय, कुठं म्हातारं तडफडायला आलं आमच्या नवीन पोरांच्यात ! मग मी त्याला एक क्लासिक उपमा सांगितली. भाद्रपदात नवीनवी कुत्री प्रयत्न करत असतात एखाद्या कुत्रीवर, तेव्हढ्यात एखादं म्हातारं आडदांड निब्बर कुत्रं मध्ये घुसून ताव मारून निघून जातं, तसं प्रधानचं झालं ! खरं म्हणजे सगळीकडे म्हातारी कुत्री बोकाळलीयत. साहित्य परिषदात तीच, बक्षीसात तीच, रेडिओवर , साहित्य अकादमीत, साहित्य संमेलनात---सगळीकडे हेच बाप्ये मनमुराद. तिकडे नेहरू आणि इकडे साले हे."
--------------------------------

बुधवार, १८ डिसेंबर, २०१३

नेमडी

सहजासहजी देशीपणाचे डाग लेखनावर पाडून घेतले
महानुभाव मासिकापासून ग्रामीण साहित्यापर्यंत
प्रत्येकाचे स्वतंत्र राष्ट्रगीत नि राष्ट्रध्वज झाला
तेव्हा मोघम चिखलफेक करीत कपडे झटकले

वासरांच्या कळपात लंगडी गाय होण्यासाठी
कैक वर्षे वेशभूषा केशभूषा चाचपून नीट केली
स्टेजवर एकदम एन्ट्री घेतली ती टाळ्यांच्या कडकडाटात
वाक्याची फेक अशी की प्रॉम्प्टर, नाटककार, नाट्यसमीक्षक
मूळसंहिता, चष्मा, कान शोधण्यात दंग

‘वाचा’ जुनी बंद झाली मागे
म्हणून उपेक्षित सेमिनार्समधून बंदुकीचे बार काढले
येडपटांना जाळ्यात पकडण्यासाठी जुगारवाले
दोनचार बनावट गिऱ्हाईके ठेवतात तसे
हातपुसण्यांना सेमिनार्समधून वापरले

इतके योजनाबध्द, पुन्हा सशासाठी वाघाच्या
शिकारीची तयारी की,
अश्वमेधाचा घोडा धरणे सोडा, टापांच्या आवाजाने
लोक पळू लागले
‘मराठी समीक्षक कळवा अन् हजार रुपये मिळवा’
असे भिंतीभिंतींवर लिहिल्याने
टीका करायला कुणी उरलेच नाही

गैरसोयीची तितकी बंधने तोडली, सोयीची तेवढी मानली
खंत वाटणाऱ्या गोष्टींचा पहाटे पाचपर्यंत जागून
ताळेबंद केला
कॉलेज बदलणे या अनुभवाचे भांडवल केले
विद्यापीठात नोकरी पकडून
अपयशाला थोर मानले
ही यशाची सर्वात मोठी गुरूकिल्ली ठरली
तरीही पुचोळाभर मुलाखतींनी ** पुसून घेतली स्वतःची

एक चुकलं
ते उघड कबूल करण्याचा प्रश्नच नाही म्हणा
पूर्वीच्या प्रेयसींना लिहिलेली पत्र नव्या बायकोच्या
संसारात छापून येत आहेत
प्रेम आणि एकपत्नीत्वातली विसंगती
सुचवू पाहताहेत साले प्रच्छन्नपणे

वास्तविक लेखक ते लेखकराव असाच हा विकास
ते सोडा... प्रीती परि तुजवरती... असं काही रचू

सफल लेखकांच्या तावडीत सापडले की हे असे होणारच
परवडणारा नव्हता त्यांचा कळप
शिवाय त्यांच्या श्रेणीत सिनियारीटी मार खाते
म्हणून निव्वळ बालविधवा लेखकांचा स्वामी झालो आयता

© विश्वास वसेकर
---------------------
प्रथमपुरुषी एकवचनी
( भालचंद्र नेमाडे यांच्यासाठी )..............कवी : दासू वैद्य ( कविता-रती, दिवाळी २०१३ मधून )
-----------------------------------------------------------------
प्रथमपुरुषी
एकवचनी,
वणवण भटकला,
प्रत्येकाने हटकला,
जमेल तिथे स्पष्टीकरण
शक्य तिथे तुष्टीकरण.
राहिला चालत,
आवरेना सुसाट सुटलेलं कथानक
मानवेना रचनेची परंपरा
उपकथानकातल्या अनपेक्षित घटना
घुटमळू लागल्या पायांत,
अगम्य हेलकाव्यांनी
हिंदकळू लागलं अस्तित्वाचं पाणी,
आधार म्हणून कधी ओढ म्हणून
बिलगत गेला एकेका नात्याला.
अडकला पात्रांच्या दाट जाळीत
पसरला जलरंगासारखा भाषेमधून,
कथानकाची गाडी
शेवटच्या स्टेशनात येऊन थांबल्यावर
चाचपले त्याने स्वत:चे खिसे,
खिशात सापडलेल्या
तिकिटावरच्या गावाची अक्षरं
स्टेशनवरच्या नावाशी
किंचितही नव्हती जुळणारी.
तरीही उत्सवी लोक होतेच बाहेर
स्वागताला उत्सुक,
उद्‌घोषणांच्या गोंगाटात
लोक वाजत-गाजत घेऊन गेले
यशस्वी कथानकाला,
प्रथमपुरुषी एकवचनी
शोधू लागला स्टेशनबाहेर
टॅक्सी, रिक्षा, टांगा
इप्सित स्थळी पोचण्यासाठी.

----------------------------------------------
कवितेच्या शीर्षकाखाली कंसात "भालचंद्र नेमाडे यांच्यासाठी" असे लिहून कविता करण्याची ही जुनी परंपरा पुनरुज्जीवित करण्यासाठी श्री. दासू वैद्य ह्यांचे अभिनंदनच करायला पाहिजे. एकेकाळी कवियत्री इंदिरा संत ह्यांनी "केशराचा मळा" ह्या शीर्षकाची कविता श्री. ना.सी. फडके ह्यांच्यावर केलेली मला चांगलीच आठवते. ही जुनी पद्धत असली तरी एका कवीवर, साहित्यकावर कवितेतून केलेली ही अप्रतीम अशी समीक्षा म्हणता येईल.
नेमाडेंना ज्या गावी जायचे होते तिथे ते पोचले नाहीत आणि तरीही लोक त्यांचे स्वागत, उद्‌घोष करीत आहेत असे निष्कर्षाचे वाक्य ह्या कवितेत मोठे कळीचे आहे. नेमाडेंचे सुरुवातीचे लेखन पाहता त्यांना समीक्षेच्या गावी जायचे होते असे कोणालाही वाटते. पण त्यांनी नंतर केवळ कादंबरीची कास धरली व ते भलत्याच गावी पोचले असे कवीला वाटत असावे. किंवा पुरस्कारांच्या भाषेत बोलायचे तर नेमाडेंनी बहुदा "तिकीट" काढलेले गाव "ज्ञानपीठ"चे असावे व ते पोचले फक्त "साहित्य-अकादमी"ला, असाही सूर वरील कवितेतून जाणवू शकतो. अर्थात इथे "ज्ञानपीठ" ऐवजी नेमाडे "नोबेल"चेही तिकिट काढते तरी पोचलेल्या गावी त्यांचा सत्कारच होता. इथे दासू वैद्य समीक्षेच्या पद्धतीने हे दाखवू इच्छित आहेत की त्यांनी जी "प्रथमपुरुषी-एकवचनी" अशी कादंबरीतून शैली अवलंबिली, ( आत्मकथा व काल्पनिक कादंबरी ह्यांचे मिश्रण केले ), त्याने त्यांच्या उपकथानकातल्या पात्रांशी बरेच घोटाळे झाले, त्यांच्या अस्तित्वाचं पाणी ( पोटातलं ) हिंदकळू लागलं. तसेच दासू वैद्य नेमाडेंना त्यांच्या कादंबरीतल्या भाषासौष्ठवासाठीही दाद देत आहेत ते "पसरला जलरंगासारखा भाषेतून"  असे म्हणत. हे अप्रतीम भाष्य समीक्षेच्या प्रांतात गद्यात अशक्यच झाले असते इतके ते इथे काव्यमयरीतीने अवतरले आहे.
नेमाडे "हिंदू" ही कादंबरी, तीन भागात ( अशी त्यांची जाहीरात होती ) आणि गेली ३०/३५ वर्षे लिहीत होते ह्या सृजन-उन्हाळीवर दासू वैद्य अशी टिप्पणी करीत आहेत की "आवरेना सुसाट सुटलेलं कथानक, व मानवेना रचनेची परंपरा !". ही मोठी मार्मिक टिप्पणी असून ते नेमाडेंच्या आवाक्यावर भाष्य करणारे आहे.
जसे परंपरेने आपण घेतलेला वसा टाकत नाही तसेच कदाचित नेमाडे जी शैली ( प्रथमपुरुषी-एकवचनी ) आजही टाकत नाहीत त्यावर दासू वैद्य म्हणत आहेत की शेवटच्या स्टेशनावर पोचल्यावरही ह्या लेखकाला अजूनही टॅक्सी, रिक्षा, टांगा यासारखे एखादे वाहन इप्सित स्थळी पोचण्यासाठी शोधावे लागत आहे. हे एकप्रकारे प्रत्येक लेखकाचेच भागधेय असल्यासारखेही आहे.
कवितेतून समीक्षा करण्याचा हा अनोखा प्रकार आहे आणि त्यात श्री.दासू वैद्य यशस्वी झाले आहेत असेच म्हणावे लागेल.
-----------------------------------