-------------------------------
रोमॅंटिक नेमाडे ?
-----------------------
जनस्थान पुरस्कार स्वीकारतानाच्या भाषणात नेमाडे म्हणाले की परंपरेचा चोखंदळपणे विचार करून मग ती पाळावी. आपल्या परंपरेत नसलेले आपण केले तर ते चुकीचे होते. जसे, ते म्हणाले, आपल्याकडे रोमॅंटिसिझम ही भानगड नव्हती. काही कवींनी ती उगाचच आणली. मग कोणी कोणाच्या कुरळ्या केसावर कविता करी, कोणी विशाल भालप्रदेशावर....
आता हे खरे की खोटे हे तपासण्यासाठी मी काही कवितासंग्रह तपासू लागलो. तर काय आश्चर्य ! अगदी नेमाडे म्हणतात तसेच... हे कवी बघा केसांवर काव्य करीत आहेत. उदाहरणादाखल खालील कवितेच्या काही ओळी पहा :
"लामणदिव्याच्या उजेडात
कशी विणीत बसलीस वेणी...
.......
आणि अबंध अबंध केसांच्या वाटा...
.......
केसांच्या कडांवरून घसरतात बोटांची पावलं
..........
दे सोडून केसाकेसांच्या आकाशगंगा होऊ दे---
........
केसाकेसांवर उडू दे त्या विश्वह्रदयाच्या अनाकारबद्ध नाड्या..
..........
ढवळत रहा ह्या नितळखोल केशसमुद्रातून
..........."
हा कवी कुरळ्या केसांवर नव्हे पण लामणदिव्याच्या उजेडात कोण वेणी विणीत बसलेय ते सांगतो आहे. न बांधलेल्या केसांच्या त्याला अबंध वाटा वाटत आहेत. त्याच्या बोटांची पावलं केसांच्या कडांवरून घसरत आहेत. तो तिला म्हणतोय की ह्या जणू केसांच्या आकाशगंगाच आहेत व त्या तिने सोडून द्याव्यात. त्या केसांवर विश्वाच्या ह्रदयाच्या नाड्या उडाव्यात. आणि तिने असेच ह्या नितळखोल केशसमुद्रात ढवळत बसावे, म्हणजे केसात हात फिरवावा....
व्वा ! अगदी खरेच निघाले की हे वर्णन, कुरळ्या केसांसारखे रोमॅंटिक !
......आणि कोण आहे हा कवी ? तर अहो तेच स्वत:ला थोर कवी म्हणवणारे भालचंद्र नेमाडे. ( भाषणात ते म्हणाले होते की मी थोर कवी आहे हे मी जाणतो, तसेच मी थोर कादंबरीकार नाही हेही जाणतो....काय विनय ना ! )
आणि कविता आहे : लामणदिव्याच्या उजेडात ( पृ.७१, दृश्यांतर, चंद्रकांत पाटील संपादित, नॅशनल बुक ट्रस्ट )
---------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा