शनिवार, २ मार्च, २०१३

गालिबची प्रेमाची परंपरा आणि नेमाडेंचा प्रेमाचा विद्रोह !

---------------------------------------
गालिबची परंपरा आणि नेमाडेंचा प्रेमाचा विद्रोह !
-----------------------------
    कुसुमाग्रजांचा जनस्थान पुरस्कार स्वीकारताना कवितांसंबंधी नेमाडेंना भरून येणे हे साहजिकच होते. तशात त्यांनी गालिबला सोबतीला घ्यावे हे रीतीला, परंपरेला धरूनच आहे. नेमाडे बोलतही परंपरेबद्दलच होते. तर आपल्याला जे सांगायचे आहे ते अजून थोरा मोठ्यांनीही कसे सांगितलेले आहे असे संदर्भ देण्याची आपल्याकडे परंपरा आहे. त्यातल्या त्यात एखादा अवघड विषय असेल किंवा त्यावरचा साग्रसंगीत अभ्यास असेल ( जसे पिएच.डी.चे प्रबंध ) तर असे संदर्भ मुद्दाम द्यावेच लागतात.
    ह्या भाषणात नेमाडे परंपरा आणि विद्रोह ह्याचा उहापोह करताना म्हणत आहेत की परंपरा ह्या जाणीवपूर्वक तपासून घ्यायला हव्यात व त्यात विद्रोह करायचा असेल तर तो प्रेमाने करावा. हे सांगत असताना त्यांनी उदाहरण म्हणून सांगितले की आपल्याकडे रोमॅंटिसिझम ही भानगड परंपरेत नव्हती. जे काही सांगायचेय ते नीट विचारांती, छंदात, दोन ओळीत सांगणे होते. ह्याला समर्थन म्हणून ते गालिबची साक्ष काढतात. म्हणतात की गालिबनेही म्हटले आहे की प्रेम हे बेबुनियाद ( बिन पायाचे ) असते तर एकनिष्ठता ही निश्चित पायाची असते. त्यामुळे ऍन्थ्रॉपॉलॉजिस्ट म्हणतात त्याप्रमाणे संततीही निकोप होते.
    गालिबचे समर्थन म्हणून नेमाडे जो गालिबचा शेर उदाहरणादाखल सांगतात त्याची ओळ ते अशी देतात : "वफा मुकाबिल ओ धावा ए इश्क बेबुनियाद ". आता ह्याचा नेमका अर्थ नेमाडे सांगताहेत तसाच आहे का वेगळा आहे, हे पाहण्यासाठी थोडा अभ्यास करू.     गालिबचा मूळ शेर दोन ओळींचा असा सापडतो:
"वफा मुकाबिल ओ दावा ए इश्क बेबुनियाद
जुनूने साख्ता ओ फस्ले गुल कियामत है"
( अर्थ :प्रियेला म्हटले आहे , तू एकनिष्ठ बनावीस आणि आमचा प्रेमाचा दावा खोटा निघावा (ही आश्चर्येच). जसा वसंत ऋतू यावा पण प्रेमवेड हे बनावटी (खोटे) असावे असाच हा प्रकार आहे...
संदर्भ - मिर्जा गालिब आणि त्याच्या उर्दू गझला (सेतुमाधवराव पगडी)
    इथे गालिब आपल्या प्रियेला म्हणत आहे की माझ्या प्रेमाचा दावा बिनपायाचा किंवा खोटा निघावा हे आश्चर्यच आहे, जसे वसंत ऋतू यावा पण प्रेम आसमंतात पेटून निघण्याऐवजी ते बेगडी, बिनपायाचे वा खोटे निघावे असेच आश्चर्याचे हे आहे.
    "हजारो ख्वाईशे ऐसी के हर ख्वाईश पे दम निकले" अशी प्रेमाची तुतारी वाजवणारा गालिब ह्या वरच्या शेरात प्रेम खोटे ठरावे ह्याबद्दल आश्चर्य व्यक्त करीत असताना नेमाडेंना गालिबने प्रेम हे बिनपायाचे असते तर एकनिष्ठता खरी असते असे वाटावे हे महदाश्चर्यच म्हणायला हवे. बरे नेमाडेंचा गालिबचा अभ्यास नसेल असेही अनुमान काढता येत नाही . कारण एकट्या "हिंदू"तच त्यांनी ४०-५० गालिबचे शेर उदधृत केलेले आहेत. तर ह्या अर्थाच्या भिन्नतेचा अर्थ कसा लावायचा ?
    कदाचित मी जशी पुढचे मागचे संदर्भ तोडून विधाने उदधृत करतो, आणि अशी परंपरा अनेक जण पाळतात, तीच परंपरा नेमाडे पाळत असावेत. किंवा हा त्यांचा प्रेमाने केलेला विद्रोह असावा !
--------------------------------------------------------------------------


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा