शुक्रवार, १ मार्च, २०१३

-----------------------------
स्त्रीविरोधी नेमाडे !
-----------------------
    जनस्थान पुरस्कार स्वीकारतानाच्या भाषणात नेमाडेंनी स्त्रियांना एक बंडखोरी करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, की स्त्रियांनी स्त्री-भ्रूण-हत्येविरुद्ध फाशीची शिक्षा मागावी, नाही तर स्त्रियांची संख्या इतकी कमी होईल की ते सिमल्यात पाहतात तसे चारपाच पुरुषात मिळून एकच बायको राहील. मानववंशशास्त्रानुसार प्रत्येक पुरुषाला एक बाई हवी व त्यासाठी स्त्रियांनी ह्या स्त्री-भ्रूण-हत्येविरुद्ध जोरदार शिक्षेची मागणी करायला हवी.
    उपदेश बरोबर असला तरी तो चुकीच्या कारणासाठी त्यांनी दिला आहे. पुरुषांना निदान एक तरी बाई मिळावी ह्या कारणासाठी नाही तर स्त्रीला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून मान/न्याय/अस्तित्व मिळावे ही कोणाही स्त्री-पुरुषांची ह्या जेंडर-रेशो-इंम्बॅलेन्स वरची प्रतिक्रिया असली पाहिजे.
तसेही नेहमीच नेमाडे स्त्रीवादी भूमिकेच्या बेदखलीवर पोसलेले आहेत हे त्यांचे साहित्य वाचणार्‍यांना लगेच समजेल. "आधुनिक समीक्षा-सिद्धान्त" ( ले: मिलिंद मालशे/अशोक जोशी ) ह्यांत स्त्रीवादाचा उहापोह करताना म्हटले आहे, ( पृ. २४७) "केट मिले या लेखिकेने Sexual Politics या ग्रंथामध्ये अशी भूमिका मांडली आहे की, पितृसत्ताक समाजव्यवस्था ( patriarchy ) हे स्त्रियांच्या शोषणाचे आदिकारण आहे; आणि आर्थिक व्यवस्था भांडवलशाहीवादी असो वा साम्यवादी असो, स्त्रियांचे शोषण दोहोंमध्ये होतच राहते. समाज कोणत्याही प्रकारचा असला तरी स्त्रियांविषयीचे विशिष्ट प्रकारचे पूर्वग्रह सार्वत्रिक स्वरूपात आढळतात, याचे प्रत्यंतर आपण वर उल्लेखिलेल्या ऍरिस्टॉटल, पेटर, प्रभृतींच्या भूमिकांवरून आलेलेच आहे. लोकशाहीवर आधारलेल्या समाजव्यवस्थांमध्येसुद्धा स्त्रीविषयक कल्पनांचे रूढीबद्ध साचे ( stereotypes) वापरले जातात, आणि त्यांच्याद्वारे पितृसत्ताक व्यवस्थेला स्त्रियांचे शोषण करता येते, त्यांना अबला बनविता येते, विशिष्ट सामाजिक-सांस्कृतिक व्यवहारांपासून त्यांना दूर ठेवता येते, अशी भूमिका केट मिलेने मांडली."
    ज्या कुसुमाग्रजांचा पुरस्कार नेमाडेंना मिळाला ते आज हयात असते तर असे पुरुषसत्ताक बरळणे पाहून ते म्हणाले असते :
        "उजेडात दिसू वेडे
        आणि ठरू अपराधी"
-------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा