बुधवार, २० मार्च, २०१३

नेमाडेंचा प्रवास थांबवा !

------------------------
नेमाडेंचाच प्रवास थांबवा !
-------------------------
    जनस्थान पुरस्काराच्या वेळी समजा त्यांची चूक झाली असेल असे मानले तर आता मराठी साहित्य ई-संमेलनातही त्यांनी चूकच करावी हे त्यांच्या स्वभावाप्रमाणे होते किंवा जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही हेच खरे ठरते. मराठी साहित्य ई-संमेलनाच्या अधिकृत भाषणात देशीवादासंबंधी बोलताना नेमाडे म्हणतात :
"पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेकडे पाहा. तिथे आता खूप अपघात होतात. वास्तविक तिथे प्रवासाच्या अनेक सोई आहेत, पोलिस आहेत; पण तरी अपघात कमी होत नाहीत. आता पूर्वीच्या पुणे-मुंबई मार्गाचं पाहा. तिथे शिंगडोबाचं देऊळ असायचं. तिथे प्रत्येक वाहन थांबलं पाहिजे, नारळ वगैरे ठेवून पुढे गेलं पाहिजे, अशी परंपरा होती. यातला अंधश्रद्धेचा भाग सोडा, पण एवढ्या मोठ्या घाटाच्या प्रवासात कुठे तरी थांबणं आवश्यक असतं, त्यामुळे तुम्हीही थंड होता आणि इंजिनही थंड होतं. पण एक्स्प्रेस हायवेवर असं होत नाही. तिथे आपल्याला वेगाची धुंदी आलेली असते. मग सूचनांचे कितीही बोर्ड लावले तरी त्याने अपघातांचं प्रमाण कमी होत नाही. म्हणून परंपरेने काही गोष्टी तुम्हाला दिलेल्या असतील, तर त्या फार विचार न करता मान्य केल्या पाहिजेत."
    जनस्थान पुरस्काराच्या वेळेसही त्यांनी हेच उदाहरण दिले होते. त्यावर मी लिहिले होते की त्यांना अंधश्रद्धा-निर्मूलन कायद्याखाली अटकच करायला पाहिजे. तेव्हा आता त्यात सुधारणा करत त्यांनी एक वाक्य टाकले आहे की "यातला अंधश्रद्धेचा भाग सोडा,..." आता सिमल्याच्या संस्थेत नेमाडेंनी वाहतूक संचालनाचे काही शिक्षण घेतल्याचे ऐकीवात नाही. शिवाय नेमाडेंच्या अनेक पदव्यात वाहतूक व्यवस्थेची काही पदवी नाहीय. नेमाडेंचा हा विषयही नाही. तेव्हा सबंध भारतभर एक्स्प्रेस-वेंचा मोठ्ठा कॉरीडॉर होत असताना लोकांनी सलग प्रवास करू नये असे नेमाडे कशाच्या जोरावर म्हणत आहेत ? मुंबई ते पुणे अवघे दोन तास तर लागतात, त्यातही थांबावे हे म्हणणे कसल्या देशीवादाचे लक्षण आहे ? मला वाटते नेमाडेंची सध्या जी पुरस्कार मिळण्याची घोडदौड चालली आहे तिने त्यांना भोंवळ आली असावी. म्हणूनच त्यांना पुरस्कार देणार्‍यांनी ( जसे: साहित्य अकादमी, ज्ञानपीठ, नोबेल वगैरे ) अंमळ थांबावे कारण नेमाडेंचा देशीवाद त्यांना थांबण्यास सांगतो आहे !
-----------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा