शनिवार, २७ नोव्हेंबर, २०१०

स्त्रीवादाची जाण व कादंबरी:
जगात निम्मी लोकसंख्या स्त्रियांची आहे ह्या एकाच निकषावर, खरे तर, कोणाही लेखकाची स्त्रीवादाकडे पाहण्याची व तसे चित्रण करण्याची जबाबदारी खूपच वाढते. पण नेमाडेंच्या कादंबरीत स्त्री-पात्रे अगदी वावडे असल्यासारखी, मख्खपणे, वावरतात. एकवेळ नायक खंडेराव लग्न करीत नाही, हा आपण समर्थांचा प्रभाव म्हणून सोडून देऊ.( समर्थांची ते टिंगल-टवाळी करीत असले तरी !) पण कथानकात प्रभाव पाडणारे स्त्रीपात्र नसावे हे "कास्टिंग कौच" चे गौडबंगाल अनाकलनीय आहे. त्यात भर म्हणजे कथानकात जी पात्रे भरपूर पाने व्यापून राहिली आहेत ती आहेत, कामोत्तेजित करणार्‍या "लभान्या" ( किंवा लमाणी स्त्रिया ), गावातल्या झेंडी, बनी रांड वगैरे नावाच्या वेश्या. ह्यांना करून करून किती उदात्त करणार ? दुसर्‍या आहेत, नात्यातल्या आत्या, आजी वगैरे स्त्रिया, ज्यांची हयात व कर्तबगारी घरकाम व रगाडयातच जाते. त्यातल्या आत्या हे पात्र लग्नानंतर लगेच माघारी येते, घरात अडगळीला राहून राब-राब राबते व इतके करून इस्टेटीत तिला वाटा देत नाहीत. नायक खंडेराव ह्याबाबत खंत बाळगतो पण त्याचे परिमार्जन काही करत नाही. अर्थात नायकाने कसे वागावे हा सर्वस्वी लेखकाच्या अखत्यारीतला प्रश्न असला तरी नेमाडे हे निश्चित नैतिक भूमिकेचे श्रेय मिरवणारे असल्याने नायकही तसे वागेल असे वाटत होते. तशात ही आत्मचरित्रपर कादंबरी असल्याने लेखक व नायक हे एकच आहेत असे समजण्यास वाव राहतो. गंमत म्हणजे ते आवर्जून वडिलांनी त्यांच्या डोळ्याच्या इजा (लहानपणी ) होण्यावर घेतलेली काळजी छान रंगवतात पण त्याच जोडीला आईचे काही सांगत नाहीत. ( आणि तरीही त्यांना साने गुरुजींबद्दल, श्यामच्या आईबद्दल, आदर आहे !). कथेत नायक म्हातारा झाल्यावर त्याचा मुलगा त्याला दहिसरला रहा म्हणतो, गावी येत नाही, असे वर्णन येते ( म्हणजे यथावकाश नायकाने लग्न केलेच असणार ). पण ते आपल्या पत्नीचे, नायकाच्या आईचे एक अवाक्षरही काढीत नाहीत. हे एक प्रकारचे स्त्री-तुसडेपण कादंबरीभर मिरवण्याचे प्रयोजन मात्र दिसत नाही, शोभत तर नाहीच.
इतके असूनही रीतीप्रमाणे ("पोलिटिकली करेक्ट") असण्याचा धाक/रेटा असा आहे की स्त्रीवादाचे सेमिनार ते कथेत दाखवतात, त्यानिमित्ताने समर्थ रामदास काय किंवा गौतम बुद्ध काय ह्यांची टवाळी करतात. तसेच काही काही आवश्यक कल्पना, रम्यपणे, पण न फुलवता, नुसत्या उदघोषित करतात. जसे : "स्त्री ही सामाजिक कल्पना आहे की जीवशास्त्रीय ?" असा एक सवाल ते वाचकांना टाकून जातात. एखाद्या शाळकरी विद्यार्थ्याने परिक्षेत प्रश्न सोडवल्या-(अटेंप्ट)-केल्यासारखा, काठावर (पासिंग) मार्क मिळवण्यासारखा हा यत्न राहतो !
भैरप्पांच्या "जा ओलांडुनी" मध्ये नायिकाच मुळी स्त्री असल्याने सर्व विषयच स्त्रीवादी दृष्टीने मांडल्या जातो. ती वडिलांचा ब्रह्मोपदेश घेऊन स्वत: ब्राह्मण होऊन हवन वगैरे सोपस्कार करते, हरिजन मित्राला अत्याचाराविरुद्ध लढताना ऐतिहासिक पुस्तक लिहून देते, वडिलांच्या ठेवलेल्या बाईला व तिच्या मुलाला मदत करते, भावाशी, गावातल्या लोकांशी जातीयतेविरुद्ध भांडते, वैयक्तिक स्वार्थाला टाळून आपल्या प्रियकराचे हरिजन मुलीशी लग्न लावून देते, वगैरे स्त्रीवादाची चित्रे भक्कम रंगतील असे वागते. ह्या प्रत्यक्ष कृतीतून हे स्त्रीवादाचे वागणे स्पष्टच आहे. शिवाय वेळोवेळी ती जी भाष्ये करते ती हेलावून टाकणारी जाणीव निर्माण करतात. जसे:(पृ.१०६)"बायका आणि शूद्र सारखेच. दोघांनाही शिक्षणाचे अधिकार नाहीत. एवढं सगळं घडायला एका दृष्टीनं माझं शिक्षणच जबाबदार. आता माझं काहीच शिक्षण झालं नाही असं समजते. पोट भरायला काहीतरी उद्योग हवा ना." किंवा : ( पृ.२३८)"या देशात समस्त स्त्रिया शूद्रच होऊन राहिल्या आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, सगळ्यांच्या बायका शूद्रच झाल्या आहेत. त्यांना कसलेही अधिकार नाहीत. वेदाध्ययनाचे अधिकार नाहीत, सिंहासनारोहणाचा अधिकारही नाही आणि संपत्तीमध्येही अधिकार नाही. वडील, नवरा, आणि मुलाच्या वर्चस्वाखालीच तिनं राहायला पाहिजे. वेदकाळी असलेलं स्त्रियांचं ब्राह्मणत्व नंतरच्या काळात नष्ट होऊन गेलं. वेदकाळी शूद्रत्वही आज आहे त्या अवस्थेत नव्हतंच. समस्त स्त्रियांना शूद्रत्वाचा शाप केव्हापासून ग्रासू लागला ? याला सुरुवात केव्हा झाली ? कशी झाली ? हाच खरा इतिहास . हेच खरं जीवनदर्शन. हे मी जाणलं पाहिजे. " स्त्रीवादाचा असा पाठपुरावा भैरप्पा सबंध कादंबरीत करतात, जो नेमाडे पूर्णपणे दुर्लक्षितात......................( क्रमश: )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा