भैरप्पा ते नेमाडे:--१
एक तौलनिक अभ्यास:
दोन अपत्ये एकमेकात भांडतांना नेहमी म्हणतात की तुम्ही आमच्यात तुलना करू नका. आम्हाला दोघांनाही स्वतंत्रपणे स्वीकारा. आता हे साहित्यात कलाकृतींना लागू होते की नाही ह्याची प्रथम तरी कल्पना येत नाही, पण कळत नकळत आपण तुलना मात्र हमेश करीतच असतो. जसे काही ( उदा: प्रभा गणोरकर ) म्हणतील की नेमाडेंची "हिंदू" ही शतकातली अनन्यसाधारण कादंबरी आहे. तर सामान्य वाचकाला हा प्रत्यय समजा नाही आला, तर म्हणावे लागेल की "ह्यावेळेस नेमाडेंची भट्टी काही जमलेली दिसत नाही." दोन कलाकृती क्वचितच एका विषयावर असतात, एका भाषेत, व एका समयी ! पण काय आश्चर्य, १९८९ साली साहित्य अकादेमीने प्रसिद्ध केलेली एस.एल.भैरप्पा ह्यांची "दाटू" किंवा मराठी भाषांतरित "जा ओलांडुनी" ही कादंबरी व नेमाडेंची "हिंदू" ही एकाच विषयावर ( हिंदू व जातीयता) आहे. भैरप्पांच्या कादंबरीला साहित्य अकादेमीचा पुरस्कार आधीच मिळाला आहे, तर नेमाडेंच्या "हिंदू" ला अजून मिळायचा आहे. दोन्ही कादंबर्यांचा काळही साधारण पणे एकच म्हणता येईल. फक्त नेमाडेंची कादंबरी काही कारणाने जरा उशीरा प्रसिद्ध होतेय, पण ते म्हणतात तसे ३५ वर्षांपासून लिहिण्यात होती. म्हणजे दोन्हीही एक कालीयच !
तुलना करायचे दुसरे एक प्रयोजन, श्री. हरिश्चंद्र थोरात, हे आहेत. ह्यांचे नुकतेच "कादंबरीविषयी" हे समीक्षा पुस्तक आलेले आहे. त्यात ते निरनिराळ्या कादंबर्यांची समीक्षा करत कोणती कादंबरी ग्रेट आहे ते सांगतात. तसेच त्यांचा विद्यापीठातला हुद्दा ( तौलनिक साहित्याचा अभ्यास ) ही सांगतो की असे तुलना करणे रास्त असावे. ( त्यांच्या घराखाली म्हणतात एक "विठ्ठल मंदिर" नावाचा बार आहे, त्याची आणि खरोखरच्या विठ्ठल-मंदिराची मात्र आपण तुलना करू नये !).
तुलनेचे प्रयोजन अर्थातच दोन कादंबर्यात डावे-उजवे करणे होऊ शकत नाही, पण एकाच विषयावर दोन भिन्न प्रकृतिधर्माचे लेखक कशी वेगवेगळी हाताळणी करतात हे पाहण्याचे आहे. त्यातली कुठली हाताळणी भावते ते वाचकाला ठरवणे सोयीचे जावे त्यासाठी ही तुलना !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा