शनिवार, २० नोव्हेंबर, २०१०

भैरप्पा ते नेमाडे
एक तौलनिक अभ्यास:--२

निश्चित नैतिक भूमिका:
कादंबरीतले लिखाण हे प्राय: एक ललित लिखाण व काल्पनिक असते. ( एक सूचना, ("डिस्क्लेमर"), देण्याची प्रथा असते की ही पात्रे व घटना काल्पनिक आहेत व त्यांचे कोणत्याही जिवंत व्यक्तीशी साम्य नाही. साम्य असण्याने कथेच्या संभाव्यतेला वा विश्वासार्हतेला धोका नसतो. फक्त साम्य असलेल्या लोकांचे आक्षेप नको एवढाच ह्यात उद्देश असावा.). पण नेमाडे कबूलतात की ही आत्मचरित्रपर कादंबरी असून आदर्श अशा "यमुनापर्यटन" टाइप कादंबरीत असते तसे, निश्चित नैतिक भूमिका घेऊनच, हे चितारलेले आहे. नेमाडे म्हणतात: "व्यक्ती व समाज ह्यांच्या संबंधात अनेक प्रश्न असतात व ह्या संदर्भात काही निश्चित नैतिक भूमिका घेऊन कादंबरीकाराने भाषिक कृति केलेली असते, त्यानुसार आशयसूत्र निवडलेले असते." ( टीकास्वयंवर--पृ २४२ ). शिवाय कादंबरीच्या प्रमोशन मध्ये नेमाडेंनी "स्टार-माझा" वर जी प्रदीर्घ मुलाखत दिली, त्यातही म्हटले होते की हिंदू धर्म ब्राह्मणांनी बिघडवला. त्यामुळे जे लिहिले आहे ते पूर्ण समजून-उमजून , निश्चित नैतिक भूमिकेतूनच लिहिलेले आहे. कादंबरीत काही एक "निश्चित नैतिक भूमिका" असते, असे नेमाडेंचे म्हणणे आहे. कादंबरीच्या मलपृष्ठावरच सोयीसाठी ही नैतिक भूमिका दिलेली आहे ती अशी की हिंदू धर्म निरनिराळे प्रवाह स्वीकारीत गेला , ब्राह्मणांमुळे भ्रष्ट होत गेला व त्यामुळे जीवनात एक समृद्ध अशी अडगळ साचत गेली आहे. हेच थोडेसे वेगळ्या वळणाने सुरुवातीच्या पसायदानाच्या घाटाच्या कवितेने नमूद केलेले आढळते. पण संपूर्ण कादंबरीत शोधूनही ह्याचे प्रत्यय येत नाही. नायकाच्या सान्निध्यात खलनायकी थाटाची ब्राह्मण पात्रे योजलेली नसल्याने ब्राह्मणांनी धर्म बिघडवला व तो कसा हे कादंबरीत सापडत नाही. तसेच नायक कुठल्याही धर्माचा असता तरीही शहरीकरणामुळे व ग्लोबलाइझेशनमुळे सध्याचीच अडगळ बाळगून राहिला असता, असेच अडगळीचे वर्णन आहे. इथे कथानकातून वा कादंबरीच्या निवेदनातून नैतिक भूमिका प्रसृत/ज्ञात होत नाही. आधी लेखकाने ठरविली असेल किंवा एक प्रमोशन म्हणून ती असेल तर वाचकाला पुस्तकात सापडत नाही.
ह्या उलट भैरप्पांच्या "जा ओलांडुनी " मध्ये भूमिका सांगितली आहे की जातींमध्ये सर्वांना ब्राह्मण व्हायची इच्छा दिसते. जर सगळेच मूळ ब्राह्मण असते तर ब्राह्मणात एवढे वेगवेगळे पंथ-उपपंथ का आले असते ? हा निष्कर्ष कथानकातून काढल्या सारखा सबंध कादंबरीभर दरवळत राहतो. मग तो वाचकांपर्यंत नेमका पोचतो. ( ह्याच विषयावर समाजशास्त्रामध्ये अनेक पीएच.डी चे प्रबंध लिहून झाले आहेत.त्यामुळे ह्या निष्कर्षाला एक प्रकारची शास्त्रीय बैठक लाभलेली आहे. त्यामानाने हिंदू धर्मा-मुळे-अडगळ-साचणे ह्या बाबतचा अभ्यास निर्विवादपणे झाला आहे असे ठामपणे म्हणता येत नाही. शिवाय ह्या धार्मिक अभ्यासांना एक संशयाची किनार व्यापून राहते.) भैरप्पांची स्वत:ची जात कोणती किंवा नेमाडेंची कोणती हे प्रश्न कलाकृतीबाह्य ठरतात व "न्यू क्रिटिसिझम"च्या निकषांमुळे गौणच ठरतात. त्यामुळे आपल्याला तशी तुलना करता येत नाही. फक्त जाणवते की एकीत ( भैरप्पांच्या) निश्चित नैतिक भूमिका दिसते तर दुसरीत ( नेमाडेंच्या ), ती गाजावाजा केलेला असला तरी दिसत नाही.
नेमाडे हिंदू धर्माबाबत कादंबरीत सखोल चिंतन करीत नसले तरी भैरप्पा मात्र एकूण धर्म-रीतींबद्दल ( उदा:देवपूजा, हवन या बाबत ) फार मार्मिक विचार ( पृ.३५६) देतात: "जेव्हा देवपूजेला सुरुवात झाली तेव्हापासूनच आमच्या समाजाच्या पतनाला सुरुवात झाली असं माझं म्हणणं आहे. फक्त हिंदू देव नव्हेत. लोकांमध्ये फूट पाडणारी अतिशय वाईट शक्ती म्हणजे देव. अल्ला श्रेष्ठ की ख्रिस्ताचा बाप मोठा म्हणून किती रक्तपात झाला ! अल्ला मोठा की राम मोठा या मतभेदात भारतात किती जण मेले ! यांच्यात तरी विष्णू आणि शंकराच्या नावानं कमी भांडणं होतात का ? ही चूक देवाची नव्हे, लोकांची, असंही कुणी समर्थन करील. गेली चार-पाच हजार वर्ष लोक आपल्या नावाचा गैरवापर करताहेत हे त्या खर्‍या देवाला समजायला पाहिजे की नाही ? मतधर्म--देव वगैरे म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे.....पण हे हवन म्हणजे पूजा नव्हे...माणसाच्या आध्यात्मिक तृप्तीसाठी किंवा वाढीसाठी एक ना एक प्रतीक हवं. मला हे अत्युत्तम वाटलं. सगळं जाळून भस्म करून शुद्ध करण्याचा यामागचा सांकेतिक अर्थही मोठा आहे....माणूस फक्त माणूस असला तर तेवढं पुरेसं नाही का ?" नव्या युगात अगदी निरोगी सकारात्मक हा विचार फारच मोहक आहे.
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा