मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०१०

नेमाने नेमाडे--१०
देशीवादाचा वृद्धाश्रम
एकेकाळी नेमाडे देशीवादासाठी फार प्रसिद्ध होते. देशीवाद तसा दिसायलाही खूप लोभस असे. पण आज तो कुठे आहे ?
वृद्धाश्रमात जशा सर्वांच्याच कहाण्या साधारण एकसारख्याच असतात तसेच काहीसे नेमाडेंच्या देशीवादाचे झाले आहे.
नेमाडे स्वत: आजकाल भाषणातून मराठीच्या काळजीपायी मुलांना फक्त मराठी माध्यमांच्या शाळातच पाठवा असे म्हणतात. पण ह्यांचे स्वत:चे शिक्षण इंग्रजी ह्या विषयाचेच झाले आहे. देशीवादासंबंधी टीकास्वयंवरात (पृ.१२२) वर ते म्हणाले होते :"आता आपल्या स्वत:च्या भाषासमूहाबाहेर आपण जे जे भाषिक वर्तन करतो त्याला सामान्य दर्जापलीकडे काही महत्व नसते." त्यानंतर ते स्वत:च्या पुस्तकांची इंग्रजीत भाषांतरे करून घेणार्‍यांची खिल्ली उडवतात. पण प्रत्यक्षात साहित्य अकादेमीच्या पुरस्कारांसाठी त्यांना आपल्याच पुस्तकांची भाषांतरे करून घेणे क्रमप्राप्त ठरते. आता हे वृद्धाश्रमातल्या कहाण्यांसारखेच झाले की !
नेमाडेंच्या "हिंदू" कादंबरीची वाखाणणी करण्यात सध्या एक नवी टूम चालू आहे. हरिश्चंद्र थोरात हे एक कार्यशाळा घेऊन हे सिद्ध करू पाहत आहेत की मिखाइल बख्तिन नावाच्या रशियन समीक्षकाच्या "द डायलॉगिक इमॅजिनेशन" ह्या पुस्तकात दिलेल्या निकषांवरून "हिंदू" ही कादंबरी ही अनन्यसाधारण ठरते. ( म्हणजे हिला मोठ्ठा अकादेमीचा सन्मान द्यावा !). आता स्वत: नेमाडे टीकास्वयंवरात म्हणून गेले आहेत ( पृ.१२३) की "आपण निर्माण केलेली प्रमाणके सोडून इतरांच्या प्रमाणकांचा स्वीकार करता कामा नये". शिवाय मालशे म्हणतात तसे बख्तिन हा काही हिंदू गृहस्थ नव्हता, त्याची प्रमाणके गृहित धरायला.
जे नेमाडे म्हणाले की "पाश्चात्य वेशभूषेचे अनुकरण करणार्‍या पुरोगामी आंतरराष्ट्रीय जीवनपद्धती जगणार्‍या शिक्षितांनी मात्र हा सर्वात सौंदर्यशील जुळणभाग परसंस्कृतीच्या दबावामुळे लज्जास्पद ठरवला" , त्यांना कधी कुणी धोतर कुडत्यात पाहिले आहे काय ? आजकाल तर ते सहा महिने कॅनडा व सहा महिने दहिसर असे रहात असतात. आता ह्यांची तिथली नातवंडे कुठल्या माध्यमाच्या शाळेत जात असतील ते सहजी कल्पना करण्यासारखे आहे. शिवाय "हिंदू" त ते गा‍र्‍हाणे घालतात की तिथे व्हिसा संपला की हाकलून देतात, हे काय बरे आहे का ? तसेच खेडयात राहण्याच्या देशी भावनेचे . स्वत: ते शहरात रहात आले आहेत. पण गुण गायचे खेडयात राहण्याचे.
"हिंदू" कादंबरीत देशीवादाच्या तत्वाविरुद्ध किती तरी उदाहरणे बघायला मिळतात. ज्या गालिबच्या शेरशायरीचे नेमाडेंना खूप अप्रूप आहे, ते काय मराठीत आहेत काय ? तसेच हिंदी सिनेमांच्या गीतांचे उदधृत करणे. मराठी सिनेमात काय गाणी नसतात काय ? तसेच सध्या इंग्रजी कादंबर्‍यात प्रचलित असलेल्या एका युगतीचे. उदाहरणार्थ मायकेल क्रिष्टन ह्यांच्या कादंबर्‍यात कथानकाच्या अनुरूपतेने खूप तांत्रिक माहीती वाचकांना दिलेली असते. जसे जुरासिक पार्क वगैरे. आता हा परदेशीच कल म्हणायचा. मग "हिंदू" त जी भरताड भरती अशी केलीय तिला काय म्हणायचे ? जसे ऍंथ्रॉपॉलॉजीचा एक किस्सा की माणूस आडव्याचा उभा झाला म्हणून भाषेचा जन्म झाला व तो जर पुन: चार हातापायावर रांगायला लागला तर भाषा नष्टही होईल. तसेच वाघ नष्ट होण्याची गोष्ट. गरम तव्याचा जोक, बोबड्या प्राध्यापकाचे बोलणे, स्त्री-दाक्षिण्य हे दक्षिणेच्या लोकांनी आणलेले वैशिष्ट्य त्याचा किस्सा, काही पोरकट कविता, नामांतराचा इतिहासात जमा झालेला सविस्तर भाग, विद्यापीठातले भ्रष्टाचाराचे रडगाणे, वगैरे. म्हणजे पहा, स्वत:च अशी अडगळ पेरायची व छदमीपणे रडायचे कशावर तर "जगण्याची समृद्ध अडगळ". ती ही "हिंदू" धर्मामुळे !
देशीवाद जसा स्वत: नेमाडेंनीच अशा अडगळीच्या वृद्धाश्रमात लोटला आहे तशीच ही कादंबरी अडगळीत व वृद्धाश्रमातच आता पहायला मिळेल !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा