गुरुवार, १९ डिसेंबर, २०१३

-----------------------
गर्वसे कहो हम "मग्रूर" है !
-----------------------------------
आजच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये एक "रसिक" नावाने एक स्फुट आले आहे. त्यात म्हटले आहे की भालचंद्र नेमाडे ह्यांनी "कोसला"च्या २२ व्या आवृत्तीसाठी जी प्रस्तावना लिहिली आहे त्यात कोसलाचे प्रथम प्रकाशक रा.ज.देशमुख ह्यांना धुरंधर व मग्रूर म्हटले आहे. त्यावर तिथले आजचे हर्डीकर वगैरे त्यासंबंधीचा पत्रव्यवहार खुला करू इच्छित आहेत.
एवढे कष्ट कशाला घ्यायचे ? नेमाडेंना ज्यांचा कुसुमाग्रज पुरस्कार मिळाला त्या कुसुमाग्रजांबद्दल ते बिढार मध्ये काय म्हणतात ते पहा व ठरवा की "मग्रूर" कोण आहे ?
बिढार ( पृ.४१) : "सकाळपासून कुसुमाग्रजाला शिव्या देतोय, कुठं म्हातारं तडफडायला आलं आमच्या नवीन पोरांच्यात ! मग मी त्याला एक क्लासिक उपमा सांगितली. भाद्रपदात नवीनवी कुत्री प्रयत्न करत असतात एखाद्या कुत्रीवर, तेव्हढ्यात एखादं म्हातारं आडदांड निब्बर कुत्रं मध्ये घुसून ताव मारून निघून जातं, तसं प्रधानचं झालं ! खरं म्हणजे सगळीकडे म्हातारी कुत्री बोकाळलीयत. साहित्य परिषदात तीच, बक्षीसात तीच, रेडिओवर , साहित्य अकादमीत, साहित्य संमेलनात---सगळीकडे हेच बाप्ये मनमुराद. तिकडे नेहरू आणि इकडे साले हे."
--------------------------------

बुधवार, १८ डिसेंबर, २०१३

नेमडी

सहजासहजी देशीपणाचे डाग लेखनावर पाडून घेतले
महानुभाव मासिकापासून ग्रामीण साहित्यापर्यंत
प्रत्येकाचे स्वतंत्र राष्ट्रगीत नि राष्ट्रध्वज झाला
तेव्हा मोघम चिखलफेक करीत कपडे झटकले

वासरांच्या कळपात लंगडी गाय होण्यासाठी
कैक वर्षे वेशभूषा केशभूषा चाचपून नीट केली
स्टेजवर एकदम एन्ट्री घेतली ती टाळ्यांच्या कडकडाटात
वाक्याची फेक अशी की प्रॉम्प्टर, नाटककार, नाट्यसमीक्षक
मूळसंहिता, चष्मा, कान शोधण्यात दंग

‘वाचा’ जुनी बंद झाली मागे
म्हणून उपेक्षित सेमिनार्समधून बंदुकीचे बार काढले
येडपटांना जाळ्यात पकडण्यासाठी जुगारवाले
दोनचार बनावट गिऱ्हाईके ठेवतात तसे
हातपुसण्यांना सेमिनार्समधून वापरले

इतके योजनाबध्द, पुन्हा सशासाठी वाघाच्या
शिकारीची तयारी की,
अश्वमेधाचा घोडा धरणे सोडा, टापांच्या आवाजाने
लोक पळू लागले
‘मराठी समीक्षक कळवा अन् हजार रुपये मिळवा’
असे भिंतीभिंतींवर लिहिल्याने
टीका करायला कुणी उरलेच नाही

गैरसोयीची तितकी बंधने तोडली, सोयीची तेवढी मानली
खंत वाटणाऱ्या गोष्टींचा पहाटे पाचपर्यंत जागून
ताळेबंद केला
कॉलेज बदलणे या अनुभवाचे भांडवल केले
विद्यापीठात नोकरी पकडून
अपयशाला थोर मानले
ही यशाची सर्वात मोठी गुरूकिल्ली ठरली
तरीही पुचोळाभर मुलाखतींनी ** पुसून घेतली स्वतःची

एक चुकलं
ते उघड कबूल करण्याचा प्रश्नच नाही म्हणा
पूर्वीच्या प्रेयसींना लिहिलेली पत्र नव्या बायकोच्या
संसारात छापून येत आहेत
प्रेम आणि एकपत्नीत्वातली विसंगती
सुचवू पाहताहेत साले प्रच्छन्नपणे

वास्तविक लेखक ते लेखकराव असाच हा विकास
ते सोडा... प्रीती परि तुजवरती... असं काही रचू

सफल लेखकांच्या तावडीत सापडले की हे असे होणारच
परवडणारा नव्हता त्यांचा कळप
शिवाय त्यांच्या श्रेणीत सिनियारीटी मार खाते
म्हणून निव्वळ बालविधवा लेखकांचा स्वामी झालो आयता

© विश्वास वसेकर
---------------------
प्रथमपुरुषी एकवचनी
( भालचंद्र नेमाडे यांच्यासाठी )..............कवी : दासू वैद्य ( कविता-रती, दिवाळी २०१३ मधून )
-----------------------------------------------------------------
प्रथमपुरुषी
एकवचनी,
वणवण भटकला,
प्रत्येकाने हटकला,
जमेल तिथे स्पष्टीकरण
शक्य तिथे तुष्टीकरण.
राहिला चालत,
आवरेना सुसाट सुटलेलं कथानक
मानवेना रचनेची परंपरा
उपकथानकातल्या अनपेक्षित घटना
घुटमळू लागल्या पायांत,
अगम्य हेलकाव्यांनी
हिंदकळू लागलं अस्तित्वाचं पाणी,
आधार म्हणून कधी ओढ म्हणून
बिलगत गेला एकेका नात्याला.
अडकला पात्रांच्या दाट जाळीत
पसरला जलरंगासारखा भाषेमधून,
कथानकाची गाडी
शेवटच्या स्टेशनात येऊन थांबल्यावर
चाचपले त्याने स्वत:चे खिसे,
खिशात सापडलेल्या
तिकिटावरच्या गावाची अक्षरं
स्टेशनवरच्या नावाशी
किंचितही नव्हती जुळणारी.
तरीही उत्सवी लोक होतेच बाहेर
स्वागताला उत्सुक,
उद्‌घोषणांच्या गोंगाटात
लोक वाजत-गाजत घेऊन गेले
यशस्वी कथानकाला,
प्रथमपुरुषी एकवचनी
शोधू लागला स्टेशनबाहेर
टॅक्सी, रिक्षा, टांगा
इप्सित स्थळी पोचण्यासाठी.

----------------------------------------------
कवितेच्या शीर्षकाखाली कंसात "भालचंद्र नेमाडे यांच्यासाठी" असे लिहून कविता करण्याची ही जुनी परंपरा पुनरुज्जीवित करण्यासाठी श्री. दासू वैद्य ह्यांचे अभिनंदनच करायला पाहिजे. एकेकाळी कवियत्री इंदिरा संत ह्यांनी "केशराचा मळा" ह्या शीर्षकाची कविता श्री. ना.सी. फडके ह्यांच्यावर केलेली मला चांगलीच आठवते. ही जुनी पद्धत असली तरी एका कवीवर, साहित्यकावर कवितेतून केलेली ही अप्रतीम अशी समीक्षा म्हणता येईल.
नेमाडेंना ज्या गावी जायचे होते तिथे ते पोचले नाहीत आणि तरीही लोक त्यांचे स्वागत, उद्‌घोष करीत आहेत असे निष्कर्षाचे वाक्य ह्या कवितेत मोठे कळीचे आहे. नेमाडेंचे सुरुवातीचे लेखन पाहता त्यांना समीक्षेच्या गावी जायचे होते असे कोणालाही वाटते. पण त्यांनी नंतर केवळ कादंबरीची कास धरली व ते भलत्याच गावी पोचले असे कवीला वाटत असावे. किंवा पुरस्कारांच्या भाषेत बोलायचे तर नेमाडेंनी बहुदा "तिकीट" काढलेले गाव "ज्ञानपीठ"चे असावे व ते पोचले फक्त "साहित्य-अकादमी"ला, असाही सूर वरील कवितेतून जाणवू शकतो. अर्थात इथे "ज्ञानपीठ" ऐवजी नेमाडे "नोबेल"चेही तिकिट काढते तरी पोचलेल्या गावी त्यांचा सत्कारच होता. इथे दासू वैद्य समीक्षेच्या पद्धतीने हे दाखवू इच्छित आहेत की त्यांनी जी "प्रथमपुरुषी-एकवचनी" अशी कादंबरीतून शैली अवलंबिली, ( आत्मकथा व काल्पनिक कादंबरी ह्यांचे मिश्रण केले ), त्याने त्यांच्या उपकथानकातल्या पात्रांशी बरेच घोटाळे झाले, त्यांच्या अस्तित्वाचं पाणी ( पोटातलं ) हिंदकळू लागलं. तसेच दासू वैद्य नेमाडेंना त्यांच्या कादंबरीतल्या भाषासौष्ठवासाठीही दाद देत आहेत ते "पसरला जलरंगासारखा भाषेतून"  असे म्हणत. हे अप्रतीम भाष्य समीक्षेच्या प्रांतात गद्यात अशक्यच झाले असते इतके ते इथे काव्यमयरीतीने अवतरले आहे.
नेमाडे "हिंदू" ही कादंबरी, तीन भागात ( अशी त्यांची जाहीरात होती ) आणि गेली ३०/३५ वर्षे लिहीत होते ह्या सृजन-उन्हाळीवर दासू वैद्य अशी टिप्पणी करीत आहेत की "आवरेना सुसाट सुटलेलं कथानक, व मानवेना रचनेची परंपरा !". ही मोठी मार्मिक टिप्पणी असून ते नेमाडेंच्या आवाक्यावर भाष्य करणारे आहे.
जसे परंपरेने आपण घेतलेला वसा टाकत नाही तसेच कदाचित नेमाडे जी शैली ( प्रथमपुरुषी-एकवचनी ) आजही टाकत नाहीत त्यावर दासू वैद्य म्हणत आहेत की शेवटच्या स्टेशनावर पोचल्यावरही ह्या लेखकाला अजूनही टॅक्सी, रिक्षा, टांगा यासारखे एखादे वाहन इप्सित स्थळी पोचण्यासाठी शोधावे लागत आहे. हे एकप्रकारे प्रत्येक लेखकाचेच भागधेय असल्यासारखेही आहे.
कवितेतून समीक्षा करण्याचा हा अनोखा प्रकार आहे आणि त्यात श्री.दासू वैद्य यशस्वी झाले आहेत असेच म्हणावे लागेल.
-----------------------------------


शनिवार, ३ ऑगस्ट, २०१३

प्रसिद्ध भाषाशास्त्री अशोक केळकरांची "कोसला"वरची मते :
----------------------------------
प्रसिद्ध भाषाशास्त्री श्री. अशोक केळकर हे प्रकांड पंडित, विद्वान, भाषाशास्त्री असून ते नेहमी हसत खेळत आणि एक प्रगल्भ विनोदबुद्धी ठेवून रोखठोक लिहितात. त्यांनी "कोसला" ह्या कादंबरीवर जे परिक्षण ( पृ.२४२-२४५, रुजुवात ) लिहिले आहे त्यातले काही मोजके अभिप्राय पाहण्यासारखे आहेत :
१) "अमेरिकन लेखक जे.डी.सॅलिंजर ह्यांच्या "The Catcher in the Rye ( 1951)" ह्या कादंबरीशी प्रस्तुत कृतीची तुलना केली गेली आहे, तिच्याबद्दल दोन शब्द. कळविण्यास अत्यंत वाईट वाटते की, वाङ्मय फौजदारांना ह्यामध्ये काही मसाला मिळण्यासारखा नाही. साम्यस्थळे जरूर आहेत, पण भेद अधिक महत्वाचे आहेत.
The Catcher in the Rye ही जास्त यशस्वी कादंबरी आहे. जीवनाचा एक पट प्रथमपुरुषी निवेदनात उलगडून दाखवणे आणि कथेतल्या "मी’ला धक्का न लावता सांगायचे ते सांगून टाकणे हा तांत्रिक प्रस्न सॅलिंजर पुढेही आहे आणि तो त्याने निराळ्याच पद्धतीने सोडविला आहे.
फरक पडतो तो काय सांगायचे आहे ह्याबद्दल. "कोसला" ही अधिक गंभीर ( म्हणजे Serious; solemn नव्हे, भारतीयांच्या मनातली एक नेहमीची गल्लत ! ) कादंबरी आहे".
२) "लेखकाचे माप ह्याप्रमाणे त्याच्या पदरात घातल्यावर ( म्हणजे having given the devil his due असं मला म्हणायचं होतं ) आपल्याला एक भयानक शंका ग्रासू लागते. पांडुरंग सांगवीकर अखेर निमित्तमात्र. ज्या मृतांचे धर्म निरूपावयाचे आहेत ते शंभरातले नव्व्याण्णव नव्हे. तर स्वत:ला मृत ठरवणारे एक--जीवनमृत. कादंबरीच्या मीच्या आतला मी--गिरधर. ज्याला "स्वदेशबंधु त्याज्य : स्वग्रामबंधु त्याज्य ; संबंधित : यांचा संबंधु : तो विशेषत: त्याज्य, " ज्याला घरी राहणे दिवसेंदिवस जड होते, काही एक करायचे नाही हेच ज्याचे विहित कर्म.
अनुभवाचे विघटन, त्याचे "वगैरे"करण ही नुसती सुरुवात, जमीनीची नांगरट. त्यात पेरणी करायची, ती आपण एकटे आहोत, काम्युने चितारलेला outsider आहोत, ए.ई.हाउसमनने व्यक्तविलेल्या " a stranger and afraid, In a world I never made" ह्या जाणिवेची. आधुनिक मानवाच्या विचार-कल्पनाविश्वातली ही एक महत्वाची जाणीव. हिची जातकुळी एकीकडे शेक्स्‌पियरच्या हॅम्लेटपर्यंत पोचते; दुसरीकडे बौद्ध, जैन, ह्यांच्यापर्यंत. आधुनिक मराठी साहित्यापुरते म्हणायचे तर मर्ढेकरांचे नाव सुचते . पण मर्ढेकरसुद्धा एक आनंदी, आशावादी प्राणी होता असे तुलनेने वाटावे इतके हे दुखणे विकोपाला गेले आहे.
माणसाला संवेदनक्षमता जरूर असावी. पण तो अवघा संवेदनाच होऊन गेला, "सम्‌" जाऊन वेदनाच शिल्लक राहिली, तर ज्या विश्वाची चिंता करायची त्या विश्वाशीच संबंध तुटतो---"जैसा स्वये बांधोन कोसला मृत्यू पावे".
आता ह्या केळकरांच्या अभिप्रायाचा काय अर्थ निघतो ? एक तर सॅलिंजरची कादंबरी निवेदन शैलीने जास्त यशस्वी आहे व "कोसला" नाही . कारण नेमाडेंना काय सांगायचे आहे तेच डेंजरस ह्या अर्थी गंभीर आहे. आणि दुसर्‍या परिच्छेदात ते कसे चूक आहे ते दाखविले आहे. एकटेपणाची जाणीव जरी वैश्विक असली तरी "काही एक करायचे नाही हेच ज्याचे विहित कर्म" ही विचारसरणीच कशी चूक आहे ते केळकर एका उदाहरणाने सांगत आहेत. एखाद्या पक्षाने घरटे ( कोसला ) बांधावे पण स्वत: मरून जावे तशीच ही नेमाडे सांगताहेत ती जाणीव आहे. ह्यापेक्षा तिखट अजून कोण लिहिणार आहे नेमाडेंच्या "कोसला"-पद्धतीच्या विचारांवर ?
-------------------------------------------- 

मंगळवार, ११ जून, २०१३

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19295542.cms

संजय पवार ह्यांचा लेख वाचा : शंभरातील नव्याणवांना हे समजेल ? 

----------------------------------------
नेमाडे असे का वागतात ?
---------------------------
विचारवंतांचे वलय अनेकांना मोहविते. ते नेमाडेंनाही आकर्षित करीत असेल तर त्यात वावगे नाही. पण विचारवंतांचे मुख्य कसब असते ते म्हणजे तर्क. आणि शिस्तशीर, पद्धतशीर विचारांची मांडणी, त्यांची समर्थने व संदर्भ. कुठलाही पीएच.डी.चा प्रबंध पहा त्यात हीच शिस्त दिसेल. पण हे नेमाडेंनी कधी केले नाही. केले ते फक्त "टीकास्वयंवर", देशीवादावरचे काही लेख ह्यामधून. बरे त्यातही आपले गैरसमज दडपून सांगणेच ज्यास्त केले आहे. आता हे वैगुण्य भरून काढायचे तर तर्क-सदृश रकानेच्या रकाने ते आपल्या कादंबर्‍यांतून वा पात्रांमार्फत ठोकून देतात. त्यांना वाटते की ह्यात काही अंगलट आले तर ह्या पात्रांची चोरवाट आपलीच आहे. पण आजकाल असे होत नाही. बखिन ह्यानेही कबूलले आहे की पात्रांची मते ही लेखकाचीच असतात.
ई-संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रथमच ते कबूलतात की मी संगणकात अज्ञ आहे. पण ह्या संगणकाच्या वापरामुळे कागद किती वाचतो त्या फायद्यासाठी मी ह्या ई-संमेलनाला कबूल झालो. तर्काची, ज्ञानाची एक अट अशी असते की आपल्याला माहीत असो वा नसो आधी त्यावरचा ज्यांनी चोखंदळपणे अभ्यास केला आहे ते पहावे. आता कोणीही गुगलवर चौकशी केली तर त्याला कळेल की ह्या संगणक प्रणालीत इतकी प्रचंड वीज लागते की गुगल, इंटेल वगैरे कंपन्या आता वीज-निर्मीतीत उतरलेल्या आहेत. अशा अवस्थेत कागद वाचतो हे समजणे अगदी बावळटपणाचे आहे. एखाद्या साहित्यिकाने त्यावर न भाष्य करणे रास्त ठरते पण "मी विचारवंतच" हा ज्यांचा समज असतो त्यांना ठामपणे असे फशी पडावेच लागते. जर ते आपले क्षेत्र नाही तर सामान्य माणूस थोडी चाचपणी करतो, माहीती काढतो, पण त्याचे जातीवंत विचारवंताला काय हो ?
ज्या त्यांच्या मुलांनी प्राध्यापकी नाकारली व परंपरा मोडत "पसायदान" शिकवीत बसले नाहीत त्याच मुलांच्या लग्नात नेमाडेंनी कसे पारंपारिक रीती आचरल्या वगैरे हकीकती त्यांच्याच शिष्यांकडून ऐकू येतात, ते एकवेळ खाजगी बाब म्हणून सोडले तर ह्या विचारवंताला हा तर्क कसा समजत नाही की असे म्हटल्याने ज्ञानेश्वरांचे पसायदान हे कमी प्रतीचे ठरते व नेमाडे तर स्वत:ला परंपरावादी/देशीवादी म्हणवतात . त्यात तरी हे कसे बसवावे ?
विचारवंतपणाचा हा मोह भल्या-भल्यांना वेड लावतो. निदान जरा जुजबी अभ्यास तरी करावा, अगदी नेमाडपंथी विचारवंतांनी-सुद्धा !
-------------------------------------

रविवार, २४ मार्च, २०१३

नेमाडेंना इतिहासाची शिस्त नको, पण इतिहास वळवायचा आहे.

---------------------------------------------------------------------------
नेमाडेंना इतिहासाची शिस्त नको, पण इतिहास हवा तसा वळवायचा आहे.
--------------------------------------------------------------
    पार्ल्याच्या एका देशीवादाच्या भाषणात मी नेमाडेंना प्रश्न विचारला होता की तुम्ही हिंदूत ज्ञानेश्वरांची, रामदासांची, बुद्धाची जी टिंगल केली आहेत ते पुस्तक खपावे म्हणून केले आहे काय ? ह्यावर ते म्हणाले होते की टिंगल करायचा त्यांचा उद्देश नव्हता, पण सामाजिक संदर्भ उपलब्द असावेत म्हणून त्यांची हिंदू त योजना केलेली आहे. ह्याच हिंदू च्या प्रमोशन मध्ये ज्या ज्ञानेश्वरीची मुंबई विद्यापीठाने संशोधन करून आवृत्ती काढली त्या राजवाडेंबद्दल "हा म्हातारा इतका धूर्त होता की त्याने पदरच्या ओव्या घुसडल्या असल्या पाहिजेत अशी शंका येते" असे म्हटले आहे. जर लक्षपूर्वक पाहिले तर नेमाडे हे निबंध क्वचितच लिहितात. कारण निबंधात तर्काचे, योग्य संदर्भांचे बंधन येते व पुरावे द्यावे लागतात. त्यामानाने कादंबरीत काहीही ठोकून द्यायची मुभा असते. त्यामुळे कादंबरी लेखन हे नेमाडेंचे एक प्रकारे इतिहासाचे पुनर्लेखनच आहे. अर्थात ते तसे करण्याची त्यांना मुभा व अधिकार आहेच. पण नामदेवांना मध्यवर्ति स्थान हवे असे म्हणताना ऐतिहासिक लेखन न करता भावनिक आवाहन करणे हा एक व्यूहाचाच भाग होतो. जसे हिंदूत नेमाडेंनी महानुभाव पंथाच्या नायकाच्या आत्येला केंद्रस्थानी आणले आहे.
    नेमाडेंची जात वा धर्म काढणे हे तसे प्रशस्त नाही. पण मनोविश्लेषणात्मक समीक्षेच्या अंगाने ते स्वत: महानुभाव पंथाचे असल्याने त्याचे त्यांच्यावर काही प्रभाव उमटले असतील का हे पाहणे रास्त ठरावे. शं.गो. तुळपुळे ह्यांच्या ग्रंथात नुसती श्रीकृष्ण-स्वयंवराची प्रकरणे पाहिली तर दिसते १) नरेंद्र व नृसिंह यांची रुक्मिणीस्वयंवर काव्ये २) संतोषमुनीचे रुक्मिणीस्वयंवर ३) कृष्णमुनि-कविडिंभ-कृत नवखंड-रुक्मिणीस्वयंवर ४) लक्षधीर-कृत रुक्मिणीस्वयंवर ५) एल्हाणाचे रुक्मिणीस्वयंवर ६) हंसबा स्वयंवर इतकी ती मुबलकपणे असताना नेमाडेंच्या  एकमेव समीक्षाग्रंथाचे शीर्षक "टीकास्वयंवर" असावे हे ह्याच प्रभावाचे लक्षण दाखवते. तसेच इतिहास आपल्याला पाहिजे तसा लिहायला हवा हे महानुभाव पंथात सवयीचे असले पाहिजे अशा अर्थाची मराठी विश्वकोशातली ही टिप्पणी पहा : "भासकरभट पंथाचे आचार्य असताना, मुसलमानी आक्रमाच्या काळात ते कोकणात जात असताना, लीळाचरित्र, ऋद्धिपुरचरित्र, स्थानपोथी इ. ग्रंथांच्या अधिकृत पोथ्या चोरांकडून लुबाडल्या गेल्या. त्यानंतर हिराइसा आदी अनेक शिष्यांकडून आपापल्या आठवणीप्रमाणे त्यांचे पुनर्लेखन करण्यात आले. ते करताना त्यांनी इतरांच्या ‘वासना’ ही नमूद केल्या. त्यामुळे या ग्रंथांत अनेक पाठभेद निर्माण झाले आणि पुढेपुढे त्यांत अधिकाधिक भर पडत गेली. "* ( लिहिण्यातल्या चुका मुळातल्याच आहेत. मी फक्त कॉपी पेस्टले आहे ). आता असे महानुभाव पंथात घडत असेल तर साहजिकच त्यांना हिंदूंच्या ग्रंथातही असे व्हावे असे वाटू शकते व त्याच प्रमाणे त्यांचे व्यूह असणे स्वाभाविक ठरावे. असेच आता अनेक संतांचे भाग्य ते उजळू शकतील !
-----------------------------------------------
* पहा "मराठी विश्वकोशातले हे पान : लिंक : http://marathivishwakosh.in/khandas/khand12/index.php?option=com_content&view=article&id=10505