मंगळवार, ११ जून, २०१३

----------------------------------------
नेमाडे असे का वागतात ?
---------------------------
विचारवंतांचे वलय अनेकांना मोहविते. ते नेमाडेंनाही आकर्षित करीत असेल तर त्यात वावगे नाही. पण विचारवंतांचे मुख्य कसब असते ते म्हणजे तर्क. आणि शिस्तशीर, पद्धतशीर विचारांची मांडणी, त्यांची समर्थने व संदर्भ. कुठलाही पीएच.डी.चा प्रबंध पहा त्यात हीच शिस्त दिसेल. पण हे नेमाडेंनी कधी केले नाही. केले ते फक्त "टीकास्वयंवर", देशीवादावरचे काही लेख ह्यामधून. बरे त्यातही आपले गैरसमज दडपून सांगणेच ज्यास्त केले आहे. आता हे वैगुण्य भरून काढायचे तर तर्क-सदृश रकानेच्या रकाने ते आपल्या कादंबर्‍यांतून वा पात्रांमार्फत ठोकून देतात. त्यांना वाटते की ह्यात काही अंगलट आले तर ह्या पात्रांची चोरवाट आपलीच आहे. पण आजकाल असे होत नाही. बखिन ह्यानेही कबूलले आहे की पात्रांची मते ही लेखकाचीच असतात.
ई-संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रथमच ते कबूलतात की मी संगणकात अज्ञ आहे. पण ह्या संगणकाच्या वापरामुळे कागद किती वाचतो त्या फायद्यासाठी मी ह्या ई-संमेलनाला कबूल झालो. तर्काची, ज्ञानाची एक अट अशी असते की आपल्याला माहीत असो वा नसो आधी त्यावरचा ज्यांनी चोखंदळपणे अभ्यास केला आहे ते पहावे. आता कोणीही गुगलवर चौकशी केली तर त्याला कळेल की ह्या संगणक प्रणालीत इतकी प्रचंड वीज लागते की गुगल, इंटेल वगैरे कंपन्या आता वीज-निर्मीतीत उतरलेल्या आहेत. अशा अवस्थेत कागद वाचतो हे समजणे अगदी बावळटपणाचे आहे. एखाद्या साहित्यिकाने त्यावर न भाष्य करणे रास्त ठरते पण "मी विचारवंतच" हा ज्यांचा समज असतो त्यांना ठामपणे असे फशी पडावेच लागते. जर ते आपले क्षेत्र नाही तर सामान्य माणूस थोडी चाचपणी करतो, माहीती काढतो, पण त्याचे जातीवंत विचारवंताला काय हो ?
ज्या त्यांच्या मुलांनी प्राध्यापकी नाकारली व परंपरा मोडत "पसायदान" शिकवीत बसले नाहीत त्याच मुलांच्या लग्नात नेमाडेंनी कसे पारंपारिक रीती आचरल्या वगैरे हकीकती त्यांच्याच शिष्यांकडून ऐकू येतात, ते एकवेळ खाजगी बाब म्हणून सोडले तर ह्या विचारवंताला हा तर्क कसा समजत नाही की असे म्हटल्याने ज्ञानेश्वरांचे पसायदान हे कमी प्रतीचे ठरते व नेमाडे तर स्वत:ला परंपरावादी/देशीवादी म्हणवतात . त्यात तरी हे कसे बसवावे ?
विचारवंतपणाचा हा मोह भल्या-भल्यांना वेड लावतो. निदान जरा जुजबी अभ्यास तरी करावा, अगदी नेमाडपंथी विचारवंतांनी-सुद्धा !
-------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा