---------------------
प्रथमपुरुषी एकवचनी
( भालचंद्र नेमाडे यांच्यासाठी )..............कवी : दासू वैद्य ( कविता-रती, दिवाळी २०१३ मधून )
-----------------------------------------------------------------
प्रथमपुरुषी
एकवचनी,
वणवण भटकला,
प्रत्येकाने हटकला,
जमेल तिथे स्पष्टीकरण
शक्य तिथे तुष्टीकरण.
राहिला चालत,
आवरेना सुसाट सुटलेलं कथानक
मानवेना रचनेची परंपरा
उपकथानकातल्या अनपेक्षित घटना
घुटमळू लागल्या पायांत,
अगम्य हेलकाव्यांनी
हिंदकळू लागलं अस्तित्वाचं पाणी,
आधार म्हणून कधी ओढ म्हणून
बिलगत गेला एकेका नात्याला.
अडकला पात्रांच्या दाट जाळीत
पसरला जलरंगासारखा भाषेमधून,
कथानकाची गाडी
शेवटच्या स्टेशनात येऊन थांबल्यावर
चाचपले त्याने स्वत:चे खिसे,
खिशात सापडलेल्या
तिकिटावरच्या गावाची अक्षरं
स्टेशनवरच्या नावाशी
किंचितही नव्हती जुळणारी.
तरीही उत्सवी लोक होतेच बाहेर
स्वागताला उत्सुक,
उद्घोषणांच्या गोंगाटात
लोक वाजत-गाजत घेऊन गेले
यशस्वी कथानकाला,
प्रथमपुरुषी एकवचनी
शोधू लागला स्टेशनबाहेर
टॅक्सी, रिक्षा, टांगा
इप्सित स्थळी पोचण्यासाठी.
----------------------------------------------
कवितेच्या शीर्षकाखाली कंसात "भालचंद्र नेमाडे यांच्यासाठी" असे लिहून कविता करण्याची ही जुनी परंपरा पुनरुज्जीवित करण्यासाठी श्री. दासू वैद्य ह्यांचे अभिनंदनच करायला पाहिजे. एकेकाळी कवियत्री इंदिरा संत ह्यांनी "केशराचा मळा" ह्या शीर्षकाची कविता श्री. ना.सी. फडके ह्यांच्यावर केलेली मला चांगलीच आठवते. ही जुनी पद्धत असली तरी एका कवीवर, साहित्यकावर कवितेतून केलेली ही अप्रतीम अशी समीक्षा म्हणता येईल.
नेमाडेंना ज्या गावी जायचे होते तिथे ते पोचले नाहीत आणि तरीही लोक त्यांचे स्वागत, उद्घोष करीत आहेत असे निष्कर्षाचे वाक्य ह्या कवितेत मोठे कळीचे आहे. नेमाडेंचे सुरुवातीचे लेखन पाहता त्यांना समीक्षेच्या गावी जायचे होते असे कोणालाही वाटते. पण त्यांनी नंतर केवळ कादंबरीची कास धरली व ते भलत्याच गावी पोचले असे कवीला वाटत असावे. किंवा पुरस्कारांच्या भाषेत बोलायचे तर नेमाडेंनी बहुदा "तिकीट" काढलेले गाव "ज्ञानपीठ"चे असावे व ते पोचले फक्त "साहित्य-अकादमी"ला, असाही सूर वरील कवितेतून जाणवू शकतो. अर्थात इथे "ज्ञानपीठ" ऐवजी नेमाडे "नोबेल"चेही तिकिट काढते तरी पोचलेल्या गावी त्यांचा सत्कारच होता. इथे दासू वैद्य समीक्षेच्या पद्धतीने हे दाखवू इच्छित आहेत की त्यांनी जी "प्रथमपुरुषी-एकवचनी" अशी कादंबरीतून शैली अवलंबिली, ( आत्मकथा व काल्पनिक कादंबरी ह्यांचे मिश्रण केले ), त्याने त्यांच्या उपकथानकातल्या पात्रांशी बरेच घोटाळे झाले, त्यांच्या अस्तित्वाचं पाणी ( पोटातलं ) हिंदकळू लागलं. तसेच दासू वैद्य नेमाडेंना त्यांच्या कादंबरीतल्या भाषासौष्ठवासाठीही दाद देत आहेत ते "पसरला जलरंगासारखा भाषेतून" असे म्हणत. हे अप्रतीम भाष्य समीक्षेच्या प्रांतात गद्यात अशक्यच झाले असते इतके ते इथे काव्यमयरीतीने अवतरले आहे.
नेमाडे "हिंदू" ही कादंबरी, तीन भागात ( अशी त्यांची जाहीरात होती ) आणि गेली ३०/३५ वर्षे लिहीत होते ह्या सृजन-उन्हाळीवर दासू वैद्य अशी टिप्पणी करीत आहेत की "आवरेना सुसाट सुटलेलं कथानक, व मानवेना रचनेची परंपरा !". ही मोठी मार्मिक टिप्पणी असून ते नेमाडेंच्या आवाक्यावर भाष्य करणारे आहे.
जसे परंपरेने आपण घेतलेला वसा टाकत नाही तसेच कदाचित नेमाडे जी शैली ( प्रथमपुरुषी-एकवचनी ) आजही टाकत नाहीत त्यावर दासू वैद्य म्हणत आहेत की शेवटच्या स्टेशनावर पोचल्यावरही ह्या लेखकाला अजूनही टॅक्सी, रिक्षा, टांगा यासारखे एखादे वाहन इप्सित स्थळी पोचण्यासाठी शोधावे लागत आहे. हे एकप्रकारे प्रत्येक लेखकाचेच भागधेय असल्यासारखेही आहे.
कवितेतून समीक्षा करण्याचा हा अनोखा प्रकार आहे आणि त्यात श्री.दासू वैद्य यशस्वी झाले आहेत असेच म्हणावे लागेल.
-----------------------------------

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा