शुक्रवार, ३१ जानेवारी, २०१४

------------------------
नेमाडे असे का ? कुसुमाग्रज असे का ?
-------------------
जनस्थान पुरस्कार स्वीकारतानाच्या भाषणात नेमाडे ह्यांनी त्यांना चंद्रशेखर व कुसुमाग्रज आवडत असे सांगत त्यांचे कुसुमाग्रजांशी कसे चांगले संबंध होते ते सांगतांना असे म्हटले की तात्यासाहेब ( म्हणजे कुसुमाग्रज ) त्यांना पाठविलेल्या पत्रात त्यांच्या शैलीप्रमाणे नेमाडे असे का ? असे प्रश्नार्थक विचारीत. त्यांच्या एका पत्रात असे दहाबारा प्रश्नचिन्हे तरी असत. आता ह्या माहीतीमुळे सांप्रतच्या वाचकांच्या मनात एकच प्रश्न येतो, तो असा की येवढे चांगले संबंध व आदर नेमाडेंसंबंधी होता तर कुसुमाग्रजांनी निवडलेल्या १०० कवितात नेमाडेंची एकही कविता का नाही ? का कुसुमाग्रज, असे का ?
मराठीतील पन्नास कवींच्या ह्या १०० कविता कुसुमाग्रजांनी निवडून त्याचे पुस्तक अनुभव प्रकाशन तर्फे १९९१ मध्ये छापलेले आहे. त्यात नेमाडेंचे समकालीन विठ्ठल वाघ, ना.धों.महानोर, ग्रेस ( माणिक गोडघाटे), केशब मेश्राम, दया पवार, सुरेश भट, आरती प्रभू, मंगेश पाडगावकर ह्यांची आवर्जून नोंड घेतलेली आहे. फक्त नेमाडे नाहीत. त्याआधी नेमाडेंचे कोसला, बिढार( १९७५), देखणी ( कवितासंग्रह), झूल, हूल, जरीला वगैरे साहित्य प्रसिद्ध झालेलेच होते. टीकास्वयंवरही १९९९० मध्ये प्रकाशित झाले. बिढार मध्ये कुसुमाग्रजांविषयी अत्यंत अश्लाघ्य भाषेत नेमाडेंनी जे लिहिले आहे, ते एकवेळ, ते परंपरा मोडणारे असल्याने क्षम्यही असेल. पण कुसुमाग्रजांनी ज्या नेमाडेंना ( आता ) पुरस्कारही दिला त्यांनी ते हयात असताना व नेमाडेही हयात असताना त्यांच्या कविता ह्या १०० कवितात का बरे घेतल्या नाहीत ? मराठी सारस्वताचे अशाने नुकसान नाही का होत ? ज्यांच्या जन्मदिनी आपण मराठी दिवस  साजरा करतो व नेमाडे म्हणतात त्याप्रमाणे जे त्यांच्याशी संपर्कात असत, त्यांनीच असा भेदभाव का करावा ?  शिवाय त्यांनी बिढार मध्ये जे नेमाडेंनी लिहिले त्याकडे का बरे दुर्लक्ष केले ?
म्हणजे आता मराठी वाचकाने समजायचे तरी काय ? नेमाडे असे का ? का कुसुमाग्रज असे का ? किती हे प्रश्न ! ( हे लिहिताना नेमाडे व कुसुमाग्रज ह्या दोघांबद्दलही आदर राखूनच लिहिलेले आहे हे समीक्षकांनी ध्यानात घ्यावे.).
--------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा