शुक्रवार, ३१ जानेवारी, २०१४

नेमाडेंचा बलात्कार :
नेमाडे हे जितके गंभीर लेखक आहेत असे उमरीकरांना वाटते त्यापेक्षा किती तरी ज्यास्त गंभीर कुसुमाग्रज आहेत. त्यांच्या नावाने आपण मराठी-दिन साजरा करतो तेव्हा निदान काही पथ्ये तरी त्यांनी पाळायला हवी. अशा वेळी त्यांनी बिढार मध्ये कुसुमाग्रजांना आडदांड कुत्रा का म्हटले त्याचे एक तर स्पष्टीकरण द्यायला हवे होते अथवा दिलगीरी. निदान अशा पुरस्कारावेळी आपण जे बोलतो ते कोणा जाणकारांना विचारून ( ते इंटरनेट निरक्षर असल्याने विकीपीडीयात तरी पडताळून बोलायला पाहिजे होते असे म्हटले नाही.), जे बोलतो आहोत ते हंशा मिळवणारे असल्यापेक्षा तर्काचे असणे त्यांनी महत्वाचे मानायला हवे होते. उदाहरणार्थ : आजकाल बलात्कार का होत आहेत. खरे तर हा समाजशास्त्रात संशोधनाचा विषय असताना त्याची आपल्या देशीवादाच्या बळावर कशीही बोळवण करणे हे खचितच विचारवंताचे लक्षण नाही. नेमाडे त्या पुरस्कारात म्हणते झाले की बायकांची संख्या कमी असल्याने हे पुरुषांच्या नॅचरल इन्स्टिक्ट मुळे बलात्कार होत आहेत. त्यांनी जुजबी वाचन केले असते तरी त्यांना कळले असते की जेंडर रेशोचे जे आकडे असतात ( जसे दर १००० पुरुषांमागे ८७५ स्त्रिया ) ते जन्माच्या वेळेसचे असतात. पुरुषांचे मरणे ( Mortality) हे त्यांच्या हयातीत बायकांच्या मरण्यापेक्षा ज्यास्त असते. शिवाय लढाया व पुरुषांच्या इतर हिंसक वागण्याने ते बायकांपेक्षा ज्यास्त मरतात. बरे जन्मलेल्या बालकातले ज्यास्तीचे पुरुष बलात्कार करूच शकत नसतात. त्यांना जरा तरी मोठे व्हावे लागते. त्यासाठीच तर जेंडर रेशो मध्ये १५-६५ अशा वयोगटासाठी वेगळा रेशो देतात. अमेरिकेत तर ह्या वयोगटासाठी दर हजार स्त्रियांमागे केवळ ७२० पुरुष अशी परिस्थिती आहे. भारतासाठी ह्याच वयोगटासाठी हा आकडा आहे : दर हजार स्त्रियांमागे १०७० पुरुष ( हे समसमान होते). ६५ वर्षांवरच्या वयोगटासाठी हाच आकडा दर हजार स्त्रियांमागे ९०० पुरुष असा होतो. आता तुम्हाला विकीपीडीया किंवा इतर दस्त-ऐवज वाचायचा नसेल तर निदान आपल्या घरात ह्या वयोगटातली माणसे मोजलीत तरी कळेल की वरील कारणांमुळे आणि स्त्रियांचे सरासरी आयुमान पुरुषांपेक्षा ज्यास्त असल्याने त्यांचीच संख्या कुटुंबात ज्यास्त असते.
आता हे इतके सरळ साध्या तर्काचे असल्याने कुठलेही वाचन न करता इतक्या प्रगल्भ लेखकाने असे दडपून सांगावे हा मराठी सारस्वताच नव्हे तर कुसुमाग्रजांनाही गृहीत धरण्याचा प्रकार आहे. हे खचितच भूषणाचे नाही. तशात आम्ही हे त्यांच्या नजरेस आणूही शकत नाही. कारण ते इतरांचे वाचत नाहीत हे तर दिसतेच शिवाय त्यांचे भाट ही त्यांना हे सांगत नसावेत. मग नेमाडेंच्या चुका सुधारायच्या तरी कशा ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा