बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१२

३) स्त्रीवादी समीक्षा सिद्धान्त व हिंदू :

    आपल्याला स्त्री-मुक्तीची चळवळ माहीती असते. पण साहित्यात अशी काही समीक्षा-सिद्धान्त पद्धती असेल असा अदमास नसतो. सिमॉन द बोवा ह्या प्रख्यात फ्रेंच स्त्रीवादी लेखिकेचे नेहमी नाव घेतल्या जाते. तिच्या "द सेकंड सेक्स" ह्या पुस्तकातून ही मते मांडलेली आहेत. सर्वच क्षेत्रात पुरुषवर्चस्ववादी दृष्टीने स्त्रीकडे पाहिल्या जाते आणि न्यूनवादच अंगिकारल्या जातो असे तिचे प्रतिपादन आहे. त्याअगोदर न्यूनवादात ऍरिस्टॉटलने कसे "स्त्रीमध्ये जे न्यून असते त्यातच तिचे स्त्रीत्व असते" असे म्हटलेले आहे हे आपल्याला कळते. तसेच फ्रॉईड्सारख्या डॉक्टरानेही स्त्रीच्या कामभावनेचा आधार हा तिचे पुरुषाविषयीचे लिंग-वैषम्य ( पेनिस-एन्व्ही ) असते असे सांगितले होते त्याचा ही लेखिका समाचार घेते. हे पुरुषप्रधानत्व इतके सूक्ष्मपणे समाजात बोकाळलेले असते  की अमेरिकेसारख्या प्रगत समाजात, जिथे मिळकतीत निम्मा वाटा कायदा स्त्रीला देते, जिथे पगारात स्त्री असल्यामुळे भेदभाव होत नाही, तिथे स्त्रीचे सरासरी उत्पन्न आजही पुरुषांपेक्षा कमीच भरते. कारण एम.बी.ए च्या वर्गात जरी मुली मुलांच्या बरोबरीने असल्या तरी नोकरीत मूल झाल्यावर अजूनही स्त्रीचे प्राधान्याचे मुद्दे पुरुषांपेक्षा वेगळेच होतात. ह्या बाबतीत सिमॉन द बोवा चे एक प्रसिद्ध वाक्य फार उद्‌बोधक आहे. ते असे: "स्त्री जन्माने स्त्री नसते, तर नंतर स्त्री बनते.". ह्यात समाज तिला देत असणारी वागणूक फार प्रभावीपणे दाखविल्या जाते. आपल्या साहित्यातले बरेचसे शब्द पुरुषी वर्चस्वाच्या खुणा दाखवतात. जसे : बंधुभाव, सर्व प्राणीमात्रांसाठी सरसकट माणूस हा शब्द वापरणे, जसे रस्त्यावरचा माणूस, वगैरे, चेयरमॅन, वगैरे. ह्याबाबत माझे असे निरिक्षण आहे की कैक काळापासून सर्व समाजात जो पुरुष-प्रधान दृष्टीकोण बोकाळलाय त्याचे दृश्य, प्रत्यक्ष, परिमाण म्हणजे समाजातला जेंडर रेशो. दर हजार पुरुषांमागे अजूनही सर्व योजनांअखेर फक्त ९०० स्त्रिया आढळतात. समाजात प्रत्यक्ष स्त्रियाच वर्षानुवर्षे कमी असतील तर भाषेतही त्यांचे स्त्रीवाचक शब्द कमीच असणार. मराठी भाषेत पुरुषवाचक शब्द किती व स्त्रीवाचक शब्द किती असे कोणी अजून मोजून पाहिलेले नाही. शब्दकोशात प्रत्येक शब्दाचे तो पुरुषवाचक आहे का स्त्रीवाचक, अशी नोंद कंसात दिलेली असते. जसे : १) सळ ( पु ): तलवारीचे म्यान; तिच्या मुठीला अडकवण्याची दोरी; घडीचा मोड, दुमड , सोन्याची लगड, पीक कापल्यानंतर उरणारा बुडखा २) सळई ( स्त्री ) : शलाका ; धातूची बारीक काडी; गणना करताना संख्या समजण्यासाठी काढून ठेवलेला भाग; लोखंडाचे कडे बसविल्यावाचून असलेले मुसळाचे लाकूड; जनानी मुकट्यावरच्या उभ्या रेघा. वा.गो.आपटयांच्या "शब्दरत्नाकर" ह्या शब्दकोशात एकूण ६०,५५९ शब्द आहेत, पैकी स पासून सुरू होणार्‍या शब्दांचा गट हा सगळ्यात मोठा असून त्यात ५८८८ शब्द आहेत. आता ह्यापैकी पुरुषवाचक व स्त्रीवाचक शब्द मोजले ( एक मोठा नमुना म्हणून ) तर ते भरतात: पुरुषवाचक : १३३९ तर स्त्रीवाचक : ९३६. आता लिंगभेद जसा दर १०००वर मोजतात तसे स्त्रीवाचक शब्दांचे प्रमाण काढले तर ते भरते : दर १००० पुरुषवाचक शब्दांमागे : ६९९ स्त्रीवाचक शब्द. नशीब आपल्या भाषेचे नाव "मराठी" हे स्त्रीवाचक आहे व "भाषा" हेही स्त्रीवाचक आहे. तरीही स्त्रीवाचक शब्द ( हा मात्र पुरुषवाचक) असे कमी आहेत.
कधी कधी वाटते की शब्दकोशात काय, शब्द असतात भरपूर, पण आपण वापरतो त्यातले मोजकेच. तर मग त्यापैकी आपण किती पुरुषवाचक वापरतो व किती स्त्रीवाचक वापरतो हे रॅंडमली पहावे. तर असे आढळून आले:
मंगला गोडबोले : पुस्तक "आडवळण"( पृ.३३ )--पु:३६;स्त्री:१९ ( दर १००० मागे ५२७ स्त्रीवाचक शब्द )
शांता शेळके : पुस्तक "सांगावेसे वाटले म्हणून" ( पृ.५७ ) पु:४३;स्त्री:२० ( दर १००० मागे ४५६ स्त्रीवाचक शब्द )
अशोक रा. केळकर : पुस्तक "वैखरी" ( पृ.९२ ) पु: २०; स्त्री: ५० ( दर १००० मागे २५०० स्त्रीवाचक शब्द )
भालचंद्र नेमाडे : पुस्तक "तुकाराम गाथा" ( पृ.११ ): पु: ८३; स्त्री: २२ ( दर १००० मागे २६५ स्त्रीवाचक शब्द )
भालचंद्र नेमाडे : पुस्तक "टीकास्वयंवर" ( पृ.३४ ) : पु: २६; स्त्री: २४ ( दर १००० मागे ९२३ स्त्रीवाचक शब्द )
ज्ञानेश्वर नाडकर्णी: पुस्तक "अश्वत्थाची सळसळ" ( पृ.३५ ) पु:२३; स्त्री: २३ ( दर १००० मागे १००० स्त्रीवाचक शब्द )
एक केळकरांचा अपवाद वगळला, तर स्त्रीवाचक शब्द आपण कितीतरी कमी वापरतो असे दिसते.
    संपत्तीदर्शक, मालमत्तादर्शक असे शब्द जमा केले व त्यात स्त्रीवाचक किती हे पाहिले तर चित्र असे दिसते : खालील ७७ शब्दात पुरुषवाचक आहेत: १७, तर स्त्रीवाचक आहेत: ३७ ( नपुसक : २२) ( माल, संपत्ती, स्थावर, मिळकत, पैसा, रोकड, धन, मालमत्ता, वित्त, बंगला, गाडी, जमीन, शेती, शेत, प्लॉट, भूखंड, फ्लॅट, सदनिका, बॅंक, नोट, चिल्लर, कपडे, दागिने, अलंकार, सोने, वळी, हार, अंगठी, पाटली, बांगडी, जमा, फर्निचर, हिरा, चांदी, माणिक, मोती, कोठार, रत्न, वाडा, बंगली, देवडी, वस्त्र, मेजवानी, जहागीर, मोहरा, सिक्के, गोधन, स्त्रीधन, घर, शेअर्स, गुंतवणूक, भांडवल, पत, नगद, मान/मरातब, श्रीमंती/गरीबी, गडगंज, विपुल/ता, वाडी, कंपनी, उद्योग, उद्योगपती, उद्योजिका, खाते, आंदण, बक्षीस/सी, भेट, आहेर, मानपान, पगडी, जमा/डिपॉझिट, लाच/लुचपत, वास्तू, महाग, महागाई, दान, दाता ). ह्यावरून स्त्रीयांकडे मराठी समाज एक मालमत्ता म्हणूनच पाहतो हे उघड होते. लिंगाचे बिंग असे उघडे पडते, मराठी भाषेत !
    स्त्रीवादाचा पुरस्कार करण्यात नेमाडे त्यांच्या हिंदू ह्या कादंबरीत फारच कमी पडतात. त्यांनी वेळोवेळी स्त्रियांच्या कणवेची वाक्ये  पेरलेली असली तरी तो केवळ बुरखा आहे हे दिसून येते. हे तोंडदेखलेपण नेमाडे चांगले सांभाळतात जेव्हा ते मोघम म्हणतात की, "स्त्री ही सामाजिक कल्पना आहे का जीवशास्त्रीय ?" पण त्यावरचे उत्तर "हिंदू" त् ते कुठेच देत नाहीत. उलट नीट न्याहाळले तर खालील विधानांवरून त्यांची स्त्रियांकडे पाहण्याची ( किंवा बिलकुल न पाहण्य़ाची ) दृष्टी पारंपारिक पुरुषी असल्याचेच दिसून येईल:
(पृ.२६):"मुक्त ह्या संस्कृत शब्दाऐवजी आपला देशी शब्द मोकाटच ह्या संदर्भात वापरला पाहिजे. बस. तेवढ एक झालं की आपल्या मुली सुधारल्याच समज. लैंगिकदृष्ट्या लहानपणापासून ह्या बायका मोकाट असल्यानं पुढे काही भीड राहत नाही. व्यभिचाराचीही शक्यता ह्यात गृहित धरली जाते. प्रत्यक्षात लैंगिक अतिचार अशाच बाया करतात."
(पृ.१५७):"...अरे, पण सुईच्या मर्जीशिवाय दोरा जाईल काय ? "
(पृ.२०६):"..ह्या मारवाड्याच्या सारख्या दिसणार्‍या पोरांना गावातल्या शेतकर्‍यांच्या कामानं रंजलेल्या बायका, रे, इकडे ये बरं. तू कोणाचा ? असं विचारायच्या, मग त्यानं बापाचं नाव सांगितलं, की सगळ्य़ा पोट धरधरून हसायच्या. धनमत्सर. "
(पृ.२५७):"गाय आणि बायको---संध्याकाळशी दावणीला पाह्यजे."
(पृ.२६३):"आता दोन राण्याही गेल्या, त्यामुळे हल्ली एकाच बायकोत आवडती आणि नावडती दोघी आलटून पालटून पाहावं लागतं."
(पृ.२८०):"...मला पहा अन फुलं वाहा....लभान्यांनो, सवतीची फुगडी अन फेडा एकमेकीची लुगडी."
(पृ.३४०):" कि अबला वरतारे दाबली नं खाले भलत्याची नार."
(पृ.३४६):"...हे पहा वहिनी, कुलूप एकीकडे अन किल्ली एकीकडे असं चालतं का ?"
(पृ.३९०):"स्त्रीवादाविरुद्ध आम्ही सगळ्यांनी चर्चासत्राच्या आधीच नीट तयारी केली होती" हे वाक्य केळ्यांवरून सुचणे हे म्हणजे अश्लीलतेची कमालच.
(पृ.४२२):"..का वं ए नागरगोंडी, लई छाती काढून दबोयती का आम्हले ?....उंदरं खाता साल्या, त्याच्यागुनं पाहा कशा घागरी याहिच्या.." ( स्त्रीपात्रे अशीच ठेवल्यामुळे लेखकाला सर्वत्र पहा कशा इरसाल शिव्या वाहता आल्या आहेत.).
(पृ.४३८):"...गुरुची शिष्या गुरूला फळली..."
(पृ.४५२):"...दक्षिणेतूनच स्त्रीदाक्षिण्य हा शब्द आला असावा..."
(पृ.५३८.):"...बायकोला मी सोडून दुसर्‍यापासून मूल नाही होऊ शकत ?...ही नैतिकता भारतीयांच्या केंद्रस्थानी यायला पाहिजे."
कादंबरीचा नायक ब्रह्मचारी दाखविल्यामुळे एक स्त्रीपात्र वाया घालवले आहे. शिवाय जेव्हा तो म्हातारा होतो तेव्हा मुलाशी होणारा बेबनाव लेखकाला महत्वाचा वाटतो. पण म्हातारीच्या जाणीवा दाखवण्याचे कटाक्षाने टाळण्यात आले आहे. खंडेरावाच्या लहानपणी बापाची व्यक्तिरेखा रंगविली आहे, पोराच्या डोळ्याच्या जखमेची कणव दाखविली आहे, पण आईचे कोणतेही थोरपण चितारलेले नाही. हे विशेष जाणवण्याचे कारण, लेखक व्यक्तिश: मराठी साहित्यिकात फक्त "श्यामची आई" वाल्या साने गुरुजींनाच मानतो, तरीही आईचे थोरपण चितारीत नाही. कादंबरीत स्वत:ची ओळख पटवण्यासाठी वाचकाला स्त्री पात्रेच उपलब्ध नसतील( जी पात्रे आहेत ती लभान्या, रांड, अशा,किंवा महानुभावी आत्यासारख्या संन्याशीण ) तर स्त्रीवाद कसा वाखाणायचा ? अखेरच्या घटकेला दुसर्‍या आत्येवरचा अन्याय दाखवलाय. पण नायक त्याचे निराकरण करीत नाही, पारंपारिकतेने म्हणतो, बायकांनी सहनशील रहावे. मूळ पुरुषप्रधान विचारसरणी शाबूत ठेवून, त्या आड सरावाच्या-टाळीच्या-फुटकळ स्त्रीसहानुभूतीच्या काही व्याक्यांच्या मिषाने / मिशाने नेमाडे स्त्रीवादाची तळी समर्थपणे पेलू शकणार नाहीत हे एव्हाना वाचकांच्या सहजी ध्यानात यावे.
    मार्क्सवादाच्या मिषाने कादंबरीकार वर्गसंघर्षाची चित्रणे करतो त्याला समाजशास्त्रीय पद्धत वापरून ते निष्कर्ष जोखता येतात असे इतरत्र आढळून आले आहे. जसे एस.एल.भैरप्पा ह्यांच्या "जा ओलांडुनी" ह्या कादंबरीत नायिका ब्राह्मण असून तिचा दलित, लिंगायत जातीच्या पात्रांशी संघर्ष रंगवला असून प्रत्येक ब्राह्मणेतर जातीला आपण ब्राह्मणांबरोबर किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असे वाटत असते असे दाखवले आहे. हा त्या कादंबरीतला निष्कर्ष समाजशास्त्राच्या एका पिएच.डी.च्या विद्यार्थ्याने संशोधनाअंती दाखवून दिला आहे. एक पीएच.डी.चा प्रबंध : श्री.रमेश बायरी टी एस ,  ह्यांनी कर्नाटकातल्या ब्राह्मणांची मुलाखती घेत केलेला आहे ( "बीईंग ब्राह्मीन-बीईंग मॉडर्न" रूटलेज प्रकाशन २०१० ). असे नेमाडेंच्या हिंदूतल्या चिकित्सेचे वा निष्कर्षांचेही होऊ शकते व तेच खरे मूल्यमापन होईल.
    (स्त्रीवादामध्ये सर्व जगात स्त्रीकडे पाहण्याची सर्वच समाजांची दृष्टी कशी पुरुषप्रधान आहे असे सांगत असताना एक फरक म्हणून जाता जाता नोंदवावे वाटते की काही मध्यपूर्व आशियन राज्यात जरा वेगळे चित्र दिसू लागले आहे. मी नोकरीनिमित्त चार वर्षे बॅंकॉक येथे असताना तिथे डोळ्याला दिसण्याएवढे स्त्रियांचे प्राबल्य दिसत असे. सगळीकडे झकपक पाश्चात्य पोषाखातल्या स्त्रिया व पुरुष जवळ जवळ गायबच. नंतर कळले की तिथल्या पुरुषात व्यसनाधीनता व नपुंसकत्व हे मोठ्या प्रमाणात असून आजकाल तिथे तरुण मुले, मुलीसारखे राहतात. एवढेच नव्हे तर कॅबेरेत मुलेच मुलींच्या भूमिका करतात. रोजच्या व्यवहारातही जी मुले दिसतात ती मुले का मुली अशा काठावर असतात, इतकी मुलींसारखी राहतात. शहरात ५०० बार्स असे आहेत की जिथे मुली, मुलांना नेण्यासाठी येतात. अर्थात हे निरिक्षण वैयक्तिक असून कुठल्याही समाजशास्त्रीय पद्धतीने नसल्याने, ह्याला बदलता कल म्हणता येणार नाही .)

                                                ( क्रमश: ४)
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बुधवार, १९ ऑक्टोबर, २०११

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

२) मार्क्सवाद/सामाजिकता समीक्षा व "हिंदू"
सध्याच्या जगातला मार्क्सवादाचा पाडाव पाहता आता मार्क्सवादी समीक्षा सिद्धान्ताचे प्रयोजन आहे काय असेच कोणाला वाटावे. पण एखाद्या सिद्धान्ताचे अपयश हेसुद्धा बरेच सांगणारे असते. शिवाय बर्‍याच जणांच्या मते खरी मार्क्सवादी संस्था जगात कोठेच अस्तित्वात नव्हती. ज्या होत्या त्या पक्षाच्या हुकुमशाह्या होत्या. त्यामुळे ह्या समीक्षापद्धतीचा उहापोह करायला हरकत नाही. मनोविश्लेषणात्मक समीक्षा सिद्धान्तात आपण जसे माणसाच्या वैयक्तिक वागणुकीचा विचार केला तसाच ह्या मार्क्सवादी पद्धतीत माणसांचे समूह दिलेल्या अर्थव्यवस्थेत कसे वागतात त्याचा विचार केला जातो. माणसांचे शोषणाच्या रेषे अलीकडचे व पलीकडचे बनणारे वर्ग, आहे-रे,नाही-रे, त्यांचे वर्ग-हितसंबंध, वर्गकलह वगैरे संज्ञा सर्वश्रुत आहेतच. मार्क्सवादात असे मानल्या जाते की माणसांच्या सर्व वागण्यात ( जसे;शिक्षण, धर्म, कला, सत्ताकारण, तत्वज्ञान, तंत्रज्ञान, प्रसार-माध्यमे, वगैरे ) आर्थिक सत्ता काबीज करणे व टिकवणे हेच प्रमुख कार्य असते. त्याचे वागणे हे तो दिलेल्या व्यवस्थेत त्याक्षणी कोणत्या स्तरावर आहे त्यावर अवलंबून असते. मार्क्सवादात सर्व विचारसरण्या ह्या आर्थिक व्यवस्थेने बाधित झालेल्या असतात. ज्या विचारसरण्या चांगल्या नसतात त्या नैसर्गिक भावनेवर आधारित असून साहजिकच आहेत असे भासवतात, पण परिणामी चुकीचे राजकीय वर्तन घडवतात. जसे: वैयक्तिक व्यक्तिवाद. प्रत्येकाला बंगला, गाडी, चैन हे दिसायला नैसर्गिक वाटते पण त्याने कामकरी वर्गाचे शोषण होते, म्हणून मार्क्सवादात ही विचारसरणी बाद ठरवतात. मार्क्सवादात माणसाच्या मानसशास्त्रावर भांडवलशाहीचे कसे दुष्परिणाम होतात ह्यावर आवर्जून जोर दिलेला असतो. माणसाचे एक प्रकारे वस्तुकरण ( कॉमॉडिफिकेशन ) होते असे मानतात.
हिंदू ह्या कादंबरीचे उप-शीर्षकच आहे मुळी : जगण्याची समृद्ध अडगळ ! त्यात हिंदू धर्मामुळे माणसाचे बिनकामाच्या वस्तूंमध्ये कसे रूपांतर घडते आहे, अशाच अर्थाची खंत जागवली आहे. ही खंत थेट मार्क्सवादी वळणाचीच आहे. शिवाय वर्ग-कलहाची चित्रे सर्वत्र ओतप्रोत पहायला मिळतात. जसे : ब्राह्मणद्वेष : ब्राह्मण-द्वेषाची किंवा ब्राह्मण-दोषाची काही उदाहरणे पाहू. ( पृ.१३):"....सोम पिऊन होम जाळणार्‍या ब्राह्मण स्तोमड्यांनो, अर्कात गर्क होत तर्क करत राहणार्‍या कर्कांनो, यज्ञातील सेवेसाठी ठेवलेल्या आमच्या सुंदरींना बेवारस संतती निर्मिणार्‍या जुगाड्यांनो, द्यूतात विद्युतसदृश बायका पणाला लावून, हरून, यांना पोरांसकट वार्‍यावर सोडून देणार्‍या जुगार्‍यांनो, हा पहा, एकवीस वेळा ही पृथ्वी निर्ब्राह्मण करण्यास्तव वैठल खंडेराव आला आहे". व्वा ! भारदस्त भाषेमुळे हा खंडेराव म्हणजेच नेमाडे, काही ब्राह्मण-द्वेष करीत आहेत हे कळतही नाही ! ( पृ.१४ ) : "ह्या आर्यवर्तात ब्राह्मणच प्रत्येक युगात राज्य करील", "तुम्हास शोध लावता आलेच तर ते गणितातलं शून्य किंवा बुद्धीबळाचा खेळ असे किंवा माया, संन्यास, अपरिग्रह, अहिंसा, समाधी, हठयोग, सल्लेखना, अशा नकार्‍या गोष्टीचेच तुम्ही शोध लावसान...", ( पृ.१५७): "एवढा जातीभेद मोडणारा आपला वारकरी पंथ ह्या ब्राह्मणांनी नासवला. पुन्हा ब्राह्मणी धर्मच वारकरी पंथावाटे लादला हो आपल्यावर पेशवाईपासून. स्वराज्य तर बुडवलच, आता चालले एकेक इंग्रजी शिकून नोकर्‍या धरायले शहराईत. शहरी होत चालले ब्राह्मण...अरे बामण तसे झाले, तुम्ही कोनते शहाणे हैतं ? ", ( पृ.२६८) : "लाखो हिंदू जन आपला पवित्र सनातन हिंदू धर्म सोडून नास्तिक बौद्धधर्म स्वीकारते झाले. पर्यायी स्वर्ग, देव, वेद, इत्यादी न मानणार्‍या बौद्ध धर्माची सर्व जंबू द्वीपात गावोगाव वाढ होत चालली. बौद्ध भिक्षूंनी तर ह्या सर्व बौद्ध धर्मवृद्धीचे श्रेय मग नाशिक क्षेत्री सनातन ब्राह्मणांस दिले. कारण एरव्ही त्यांस मंदीर प्रवेश करू दिला असता तर एवढी प्रचंड बौद्ध वृद्धी झाली नसती. हे तर खरेच असून शरमिंदे करणारे होते. तसेच बर्‍याच सुधारकांनी असे प्रयत्नही केले होते", ( पृ.३२९) : "आपला हिंदू धर्म खालच्यांसाठी काय शेटं करतो ?". पुस्तकाच्या प्रमोशन दरम्यान जी प्रदीर्घ मुलाखत नेमाडेंनी दिली त्यात राजवाड्यांसंबंधी असेच सांगितले आहे. त्यांच्या मते मूळ ज्ञानेश्वरीची प्रत राजवाडेंनी जाळली व तीत आपल्या पदरच्या ओव्या घुसडल्या. हे कादंबरीत आलेले नसले तरी लेखकाचे मत असून ते वर्गकलहातले लेखकाचे धागेदोर कोणासमवेत गुंतले आहेत ते छान दाखवते ! त्याकाळच्या समाजरचनेत अत्यल्प संख्य असूनही समाजात सर्व थरात ब्राह्मणांचे वर्चस्व होते व त्यामुळे खालच्या वर्गांचे शोषण झाले हे उघडच मार्क्सवादाप्रमाणे होते व तेच हिंदू ह्या कादंबरीत नेमाडे ह्यांनी नेटाने लावून धरलेले दिसेल.
वर्ग कलह हा त्याकाळी मराठा/कुणबी व दलित बलुतेदार ह्यांच्यातही असला पाहिजे. त्यावरची कादंबरीतली भाष्ये अशी : "शेतकर्‍यांनी कष्ट करावेत आणि ह्या लोकांनी कणसं खुडून न्यावी ? काय नीतीच्या गोष्टी करता हो. ...शेवटी कुणब्याकडेच खेटे घालतील ना ? " . दलित व कुणब्यांमध्ये हे लावून देणे आहे. कदाचित दलितांच्या लक्षात ही गोष्ट येईलच. एके ठिकाणी तर ते म्हणतात, ( पृ.१५१ ): "मानवी हक्कांची सगळी परिभाषा मोरगावच्या महारा-पोरांपर्यंत पोहोचली. जयभीम." हा दिलासा मिळतो न मिळतो तोच नेमाडेंची पात्रे म्हणतात : ( पृ.३८४) : "सोमा देवनारकडे कत्तलखान्यात चामडे उचलून न्यायचं काम करतो. गायीचं मटण मिळतं फुकट--खेडी सोडून हे नवबुद्ध काय वाघ मारायला गेले शहराईत ? --काय फरक पडला, सांग .", किंवा ( पृ.४०६) : "सुरुवातीला सटार्‍या देशमुख म्हणतो, हल्ली कायदाही शेतकर्‍यांच्या विरुद्ध चालला आहे. शेतकर्‍यानं काही पेरू नये, उत्पन्न काढू नये, असे कायदे काढले आहेत. अहो उद्या महारामांगांनी कुणब्याची गांड मारावी, असाही कायदा निघेल...आपल्याच भागातले कुणबी लोक गांडू आहेत हो, दुसरीकडे लोक नाही सहन करणार एवढं . म्हणजे ? अरे ह्या ह्या इसमानं आम्हाला जातिवाचक शिव्या दिल्या, असं नुस्तं पोलीस चौकीवर सांगून आले हे हरिजन कीं, पोलिसांना भागचं पडतं गुन्हा नोंदवणं. धरून नेणंच पडतं तुम्हाला जेलात. का हो पाव्हणं, तुमच्या तिकडे मोगलाईत असंच चालतं का ? ". मार्क्सवादात वर्गकलहाचे अप्रूप असल्याने त्याची चित्रणे नेमाडे अशी इमाने इतबारे करतात त्यावरून त्यांचा मार्क्सवादी समीक्षा सिद्धान्ताबद्दलचा विश्वास असा दिसून येतो. ह्याच विश्वासापोटी ते मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचे प्रकरणही लावून धरतात व दलितांच्या अंडर-डॉग असण्यावरची सहानुभूती कादंबरीत दाखवतात.
ह्याच वर्गकलहात खरे तर वारकर्‍यांना कोणीही घेतले नसते व ती भक्तीमार्गाला वाहिलेली सहानुभूती ठरती. पण वारकरी विरुद्ध स्थानिक मुसलमान व महारमांग असा वर्गकलह ऊभारून ते वारकर्‍यांना आरोपीच्या पिंजर्‍यात, मार्क्सवादाच्या निकडीपायी असे उभे करतात :( पृ.४४० ) : "पैठण . वारकरी पंथाबद्दल एकच मिनिटात ओळख---कसे जातिभेद मिटवले वगैरे. मुसलमान तर सोडाच, आपापल्या गावातल्या महारामांगानांसुद्धा वारकर्‍यांनी जवळ घेतले नाही. सामावून घेणं आणखी दूरचं . विठठलाच्या चरणीं सगळे एक ? पंढरपुरात आषाढीला चोवीस सवर्णांच्या पालख्या गेल्यावर अजामेळ मांगाची शेवटून....एकादशीला मिरची, रताळं, पेरू, पपया, शेंगदाणे, खजूर, बटाटा, साबुदाणा, असले म्लेंच्छ यावनी पदार्थ कसे काय चालतात ?" वर्गकलहाची निकड इतकी जबरदस्त दिसतेय की वारकर्‍यांच्या उपवासाचे निरुपद्रवी खाणेही खटकावे अशा पद्धतीने ते केवळ मूळचे म्लेंच्छ/यावनी आहेत ह्या विरोधाभासावर वाचकाला एक कलह म्हणून दाखवतात. हा वर्गसंघर्ष एरव्ही इतर कोणा लेखकाला दिसलाही नसता. पण खुद्द नेमाडे पडले लेवा पाटील व महानुभाव पंथाचे व ह्या पंथाचा परंपरेने वारकर्‍यांशी उभा दावा आहे. इतका की विष्णुबोवा जोगांवर त्यांनी कचेरीत दावाही लावलेला होता. कदाचित लेखक-नायक-व्यक्ती ह्यात आत्मचरित्रपर कादंबरीत गल्लत झाल्याने हिंदूत नायकाच्या बहिणीचे संन्यासीण होणे, महानुभावी पंथाचे असणे ह्याचे उदात्तीकरण सहजी दिसून येते. कादंबरीत तर्काला हवे तसे मोडण्याची मुभा असल्याने, वर्गकलहाच्या दाट रंगाखातर इथे आसूड वारकर्‍यावरही नेमाडेंना ओढावा लागतो आहे.
पुरुष विरुद्ध स्त्री हा वाद तर तसा पुरातनच. नेमाडे हे काही स्त्रीवादासाठी प्रसिद्ध नाहीत. त्यांची पात्रेही स्त्रीयांपासून फटकूनच राहतात. हिंदूतला नायक तर लग्नही करीत नाही. मार्क्सवादाच्या वर्गकलहाच्या निकडीत हे अजिबात बसणारे नसल्याने मग नेमाडे स्त्रियांवर ज्यांनी अत्याचार केले आहेत त्यांचा निषेध वा टर उडवतात. त्याने स्त्रीवादाची तळी उचलल्यासारखे होत नसले तरी शत्रूचा शत्रू तो मित्र ह्या न्यायाने तोड निघू शकते. म्हणून ते रामदासांसारख्या संतांनी ऐन लग्नातून पळ काढला व त्यामुळे त्या लग्नमंडपात एकाकी पडलेल्या वधूचे दु:ख आपल्याला कसे विदारक वाटते ते जराशा टगेगिरीने असे सांगतात : ( पृ.४५० ): "रामदास स्वामींच्या मंडपात राहून गेलेल्या बायकोच्या दु:खावर फार सुंदर कविता होईल नाही ? वानखेडे म्हणाला, सुंदर ? तिकडे कवळी पोरगी का बोडकी ठेवली जन्मभर का मारली--आणि तुला सुंदर कविता लिहायचीय ? त्यापेक्षा ही उध्वस्त बाई हातात वाहाण घेऊन याला शोधत शिवथरकडे चाललीय अशी कविता--पेक्षा श्लोकच का नाही लिहीत ? --जनाचे श्लोक : मनाची नको लाज ठेवू जरी तू । जनाची तरी ठेवी पळपुट्या नागड्या तू ॥---तू भडव्या सिद्धार्थ गौतमावरच का नाही लिहीत ? ते तं एक पोरगं पण काढून पळालं बायको सोडून ....इथे मराठी कवींना रामदासाच्या ह्या बिचारीचं नाव सुद्धा माहीत नै..." खरे तर परमार्थात मोक्ष साधायचा असेल तर आपल्याकडे संसारात न पडता ब्रह्मचर्य आचरावे असा शास्त्रोक्त विचार खूप प्रसिद्ध आहे व विनोबा भाव्यांनी त्याचे समर्थनही केले आहे. पण इथे ब्रह्मचर्य पाळावे का संसार करावा असा पेच कादंबरीत नसल्याने निदान स्त्रीवादाला एक श्रद्धांजली वहावी हा नेकीचा विचार करून रामदास व गौतम बुद्ध ह्यांची टिंगल केली आहे. पण ती स्त्रीवादाची तळी उचलण्याच्या निकडीपायी आहे व त्यावरची निष्ठा दाखवताना पहा मी किती जोखीम उचलतोय असा लेखक आव आणतोय. रामदास हे ब्राह्मण. तेव्हा सच्च्या मार्क्सवादी विचाराने ब्राह्मण-बहुजन हा वर्ग-संघर्ष ज्यास्त सुकर ठरता, पण त्याऐवजी स्त्री-पुरुष असा सनातन संघर्ष लेखकाने काढला आहे, जो वरकरणी परमार्थ-संसार-ब्रह्मचर्य ह्या विचारात लागू होत नाही. स्त्रीवादाचे खरेच एवढे सोयर सुतक असेल तर , रामदास , गौतम बुद्ध असे चौफेर दंडुके मारत असताना, एवढी ६०३ पानं दिमतीला असताना, नेमाडेंनी मोहमद पैगंबर व त्याच्या अनेक बायकांना कसं काय सोडलं बुवा ? कदाचित्‌ हिंदू नंतर इस्लाम लिहितील तेव्हा घेतील त्यांचा समाचार ! नेमाडे काही मुसलमानांना घाबरतात काय ?
मार्क्सवादाने म्हणावे की सामाजिक संघर्षात रत असलेल्या प्रमुख वर्गाचे हितसंबंध जपणारे कल्पनाविश्व ( आयडियालॉजी ) हे प्राय: भासमान असते व ते एखाद्या आज्ञाधारक विद्यार्थ्यासारखे नेमाडेंनी फेटाळून लावत वर्ग-संघर्षात अंडरडॉगची बाजू लावून धरावी हे चित्र मोठे बाळबोध आहे. तशात मार्क्स नंतर लुकाच ह्याने ह्या कल्पनाप्रणालीत वर्गसंघर्ष वगळून जी तटस्थ कल्पना दाखवली त्याप्रमाणे समाजधारणेच्या मुळाशी असलेल्या विविध संघर्षांना साहित्यकृतीशी जोडताना रूपाचे आशयाचे लेखकाला अर्थनिर्णयन करावे लागते असे दाखवले आहे. ह्यात अर्थनिर्णयन करणार्‍याच्या हेतूकडेही आपल्याला बघावे लागते. ह्यामागची सुलभता पाहता ह्या सुलभतेमागेही कोठलेतरी अंतर्विरोध दडविणारी कल्पनाप्रणाली ( आयडियालॉजी ) असण्याची शक्यता नाकारता येत नाही. निदान मार्क्सवादाचा आज जगात झालेला प्रत्यक्ष पाडाव लक्षात घेता, नेमाडेंनी मार्क्सवादाची इतकी कास धरण्याची आवश्यकता नव्हती, असेच वाचकाला जाणवेल.

( क्रमश: ३ )
-----------------------------------------------------------------------------------------------------

बुधवार, ७ सप्टेंबर, २०११

साहित्यिक समीक्षा सिद्धान्त आणि नेमाडेंची "हिंदू" --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- "क्रिटिकल थियरी" किंवा "लिटररी थियरी" नावाचा विषय साहित्याच्या उच्च शिक्षणात असतो व असले विषय समजणार्‍यांभोवती, खरे असो वा खोटे, एक प्रकारच्या आदराचे वलय असते. अशांना उंच ठिकाणी ( जसे सिमला वगैरे ) मानाच्या व चांगल्या पगाराच्या नोकर्‍या मिळतात, ज्यामुळे ते कित्येक वर्षे नवीन साहित्य निर्माण न करता, आपल्या मागील शिदोरीवर मिरवू शकतात. कालांतराने ह्याच साहित्यिक समीक्षा सिद्धान्ता-बरहुकूम ते नवीन साहित्य प्रसवतात व ते सामान्य वाचकाला समजले नाही तरी, ते सिद्धान्त जाणणार्‍यांच्या उच्च वर्तुळात अति-आदर पावतात, पुरस्कार पावतात. आपण मोठ्या अपेक्षेने अशी पुस्तके विकत घेतो, वाचण्याचा प्रयत्न करतो, आणि न समजल्यावर अशाच वर्तुळातल्या कोणाच्या, मोठेपणाच्या पावतीवर डोलत, शिक्कामोर्तब करतो. आपण हे जसे नकळत करतो त्याविरुद्ध कळून सवरून हे कसोटीचे साहित्यिक सिद्धान्त जाणणारे लोक त्यावर अशी पुस्तके बेततात व मानमरातब पावतात. ह्या मागे जे हे मोलाचे कसोटीचे साहित्यिक सिद्धान्त असतात त्यांची आपण ओळख करून घेऊ व हेच कसे "हिंदू" ह्या भालचंद्र नेमाडेंच्या कादंबरीला लागू होतात ते पाहू. ह्या निमित्ताने कसोटीच्या साहित्यिक सिद्धान्तांची आपल्याला ओळख होईल व ते कसे कलाकृतीला लागू करावेत ह्याचा सरावही होईल. ( ह्या उहापोहासाठी "क्रिटिकल थियरी टुडे" हे इंटरनेटवर उपलब्द असलेले लुइस टायसन ह्यांचे पुस्तक आधाराला घेतलेले आहे . ) साहित्याच्या कसोटीसाठी जे साहित्यिक सिद्धान्त वापरले जातात ते असे असतात : १) मनोविश्लेषणात्मक समीक्षा २) मार्क्सवाद आणि सामाजिकतेची समीक्षा ३) स्त्रीवाद आणि लिंगभेदाची समीक्षा ४) आधुनिकता/न्यू क्रिटिसिझम्‌ वा उत्तर आधुनिकतेची समीक्षा ५) वाचकवादाची समीक्षा ६) संरचनावाद, चिन्हात्मकतेची समीक्षा ७) उत्तर-संरचनावाद / विरचना समीक्षा ८) नव-इतिहासवाद व सांस्कृतिक समीक्षा ९) समलिंगी, गे,व विचित्र समीक्षा १०) आफ्रिकन-अमेरिकन वा वर्णवादाची समीक्षा ११) उत्तर वसाहतवाद. क्रमवारीत थोडयाफार फरकाने हेच मुद्दे श्री.मिलिंद मालशे व अशोक जोशी लिखित "आधुनिक समीक्षा-सिद्धान्त" ( मौज प्रकाशन ) ह्या पुस्तकातही पहायला मिळतात. एखाद्या कलाकृतीकडे वा साहित्याकडे समजूतीच्या सोयीसाठी, लावावयाचे हे जणु चष्मेच असतात, असे म्हणतात. म्हणजे त्या सिद्धान्तापुरते आपण त्याच नजरेने पाहू शकतो व साहित्य जोखू शकतो. मुळात साहित्य असतेच कशासाठी व ते आपण वाचावे का ? हा आपल्याला पडलेला आदिम सवाल असतो. साहित्य वाचल्याने आपल्या अनुभवाच्या कक्षा रुंदावतात . असे म्हणतात की आयुष्यात आपण जसजसे ज्यास्त अनुभवी होऊ लागतो, चार पावसाळे ज्यास्त पाहतो, तसतशी साहित्यात अनुभव घेण्याची आपली क्षमता वाढते. वरील समीक्षांचे सिद्धान्त एखाद्या कलाकृतीला लावून, ती कलाकृती फसलेली आहे ( किंवा कसे ), असे दाखविले तरी त्यानिमित्ताने समीक्षा पद्धतीतल्या सिद्धान्ताची आपल्याला ओळख होते. शेवटी प्रत्येक साहित्यिक आपले साहित्य निर्माण करीत असताना त्याच्या दृष्टीने जे अंतिम सत्य वा सुंदर आहे त्याचाच माग काढीत असतो व तो प्रयत्न फसलेला आहे असे समीक्षा-सिद्धान्ताने दिसले, तरी त्यानिमित्ताने सत्य वा सुंदर कसे असते, ह्याची जाण होऊन, आपल्या साहित्यिक अभिरुचीच्या कक्षा रुंदावतात हा फायदाच आहे. तसा तो तुम्हा-आम्हाला होवो ! ( क्रमश: १ ) -------------------------------------------------------------------------------------------- मनोविश्लेषणात्मक समीक्षा सिद्धान्त आणि हिंदू : --------------------------------------------------------------------------------------------------- मनोविश्लेषणात्मक समीक्षा सिद्धान्त इतके आता रुळलेले आहेत की सामान्य जनताही ते जाणते. उदा: खेड्यापाड्यातील लोकही म्हणतात, काय राव वड्याचं तेल वांग्यावर काढताय का ? कोणाचा राग कोणावर काढताय ? आणि मनोव्यापारांचे प्राबल्य आपण इतके कबूलतो की एक रोगी केवळ विलपॉवरने कॅंन्सरला चांगले तोंड देतो तर फाईव्ह-स्टार हॉस्पिटलातही मनाने हरलेला रोगी सहजी दगावतो ह्यात आपल्याला काहीच वावगे वाटत नाही. मनोविश्लेषणात्मक सिद्धान्त फ्रॉइड सारख्या डॉक्टराने आपल्या अनुभवातून रूढ केलेले असल्याने ते आजकाल सार्वत्रिक मान्यता पावलेले आहेत. जसे: आपण इच्छांचे दमन करतो, त्यांचे उन्न्यन वा उदात्तीकरण करतो, त्यांचे दुसर्‍यांवर प्रक्षेपण करतो, त्यांच्या समर्थनासाठी आपले एक खासे बचावतंत्र तयार करतो, ह्यासाठी आता आपण काही पुरावे मागत नाही इतके ते सर्वमान्य आहेत. फ्रॉइडने विस्मृती व स्वप्नकृती ह्यांचेही स्पष्टीकरण बरेचसे पटण्यासारखे दिलेले आहेत. इतर मनोवैज्ञानिक कल्पना आहेत स्थानांतरण ( डिस्प्लेसमेंट ), संक्षिप्तिकरण ( कन्डेंसेशन ), दुसर्‍या स्तरावरील विस्तृतीकरण ( सेकंडरी इलॅबोरेशन ). फ्रॉइडच्या मोलाच्या कल्पना आहेत जाणीव ( कॉन्शस ) व नेणीव ( अनकॉन्शस ) आणि त्यातही त्याने नेणीवेला ज्यास्त महत्व दिले आहे. "हिंदू"ला मनोविश्लेषणात्मक समीक्षा लागू करणे अजून एका कारणासाठी प्रशस्त आहे. कारण लेखकाने कबूल केल्याप्रमाणे हे आत्मचरित्रात्मक साहित्य आहे. इतके की त्यातला नायक खंडेराव जिथे राहतो त्या के.बी.देशपांडेंचा बंगला औरंगाबादी मी व अनेक जणांनी पाहिलेला आहे. त्यामुळे इथे लेखक व नायक ह्यांच्यातला आंतरपाट समीक्षेने काढायची गरज न पडता वाचकाला सहजी काढता येतो. मनाच्या अनेक व्यापारांपैकी दुसर्‍याला इजा ( व्हायलेंस ) करण्याच्या माणसाच्या मूळ प्रवृत्तीचे एक दर्शन घेऊ. वास्तवात नेमाडे हे अपयशी प्राध्यापक होते हे त्यांनी बिढार ह्या कादंबरीतही चित्रित केलेले आहे. त्या चित्रणात त्यांना वर्गात पोरे जी त्रास देतात त्यावर खरे तर एखाद्या अभ्यासू वृत्तीच्या प्राध्यापकाने पब्लिक स्पीकिंग मध्ये नैपुण्य कमव, शिकवण्यातले काही हातखंडे शीक, असा मार्ग अवलंबला असता. पण इथे नेमाडे अगदी सोपा मार्ग अवलंबतात व एका टारगट पोराला वर्गात श्रीमुखात लगावून देतात व त्यामुळे इतर मुले चपापतात, असे नमूद करतात. ही नेमाडे ह्यांची एक सूप्त वृत्तीच झालेली आहे, असे त्यांचे टीकावाङमय वाचून कोणाही चाणाक्ष वाचकाच्या लक्षात येईल. खरे तर वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी नेमाडेंची पहिलीच कादंबरी "कोसला" ही मराठी सारस्वताने वाखाणली, उचलून धरली. त्याने एखाद्याने जरा मवाळ धोरण धारण केले असते. पण नेमाडे चपराक लगावून देण्याच्या वृत्तीचे. त्यांनी टीकास्वयंवरात सर्व प्रस्थापित मंडळींना यथेच्छ बदडून काढलेले दिसेल. अगदी पु.ल.देशपांडेंनाही त्यांनी सोडलेले नाही. वर्गातल्या टारगट पोराला थोबाडीत दिल्यावर जसे सगळे कॉलेज चपापले, तसेच टीकास्वयंवरातल्या घायाळ व चौफेर टीकेने मराठी सारस्वत गळाठले व तेव्हापासून नेमाडे प्रस्थापित "लेखकराव" झाले. नुसती बंडखोरी वेगळी व चपराक लगावणे वेगळे. महाराष्ट्रात ज्ञानेश्वरांचे स्थान अतीव आदराचे असून सर्वच जण त्यांना "माऊली"चा दर्जा देतात. ज्ञानदेवे रचला पाया, असे वारकरी संप्रदाय व भक्तिमार्ग मानतात. ज्ञानेश्वरांनी वर्णव्यवस्थेचे त्या काळात समर्थन केले ह्या दूषणापायी अनेक मान्यवरांनी त्यांच्याशी वाद घातलेला आहे. अलिकडच्या काळात कवी विंदा करंदीकरांनी "अमृतानुभव"च्या अर्वाचीनीकरणाच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रदीर्घ वाद घातलेला आहे. पण ज्ञानेश्वरांना चपराक मारण्याचे धारिष्टय फक्त नेमाडेच करू जाणे. कारण हे मूळ स्वभावाने होते आहे. त्याचे हे उदाहरण पहा :"हिंदू" ह्या कादंबरीतले पृ.१५६ वरचे हे भाष्य पहा: "एक बुला वेसकर. वेशीखालच्या देवडीत बसलेला. हा ह्याच नावानं विख्यात होण्याचं कारण आजूबाजूला कोणी नाही, हे चाणाक्षपणे पाहून हा एकदम त्याच्या धोतरातली बुल्लीच मुठीत धरून आम्हा पोरांना दाखवायचा. पुन्हा धोतर खाली टाकून साळसूद चेहर्‍यानं काहीच झालं नाही, किंवा काहीच केलं नाही, असं दाखवायचा. हे कोणाला सांगायचं तरी कसं ? याचा अर्थ आपल्याला तेव्हा लागत नव्हता. आता लागतो: सवर्ण हिंदू -अस्पृश्य संबंधाचा तो दृष्टांत होता, कव्हणी एकु कुरवंडी करीत सांता कुरघोडी करी त्या वेसकरीयाचा दृष्टांत. जैसे फ्राइडचा सिद्धांत जातीयतेत मोडून सांगितल्यास जैसे होईल तैसे. किंबहुना ज्ञानेश्वर : ऐसा शिवमुष्टिगुंडु । घेउनु ठाके ॥ अस्पृश्यता एक हजार वर्षांपासून आहेच, तेव्हापासूनचे दाब असे वर येतात. " ज्ञानेश्वरीच्या अध्याय १३ त ओवी ७१५-७१७ मध्ये विद्या व वय ह्यांच्या उन्मादाने माणुस कसा गर्व करीत छाती काढून चालतो व माझ्यासारखा मोठा कोणी नाही असा शिवभक्तांना असतो तसा गर्व( शिवमुष्टीगंडु, गुंडु नव्हे) धारण करतो व मग त्याला चांगले बघवत नाही अशा अर्थाच्या ह्या ओव्या मुळात अशा : म्हणे मीं चि येकु आथि । माझा चि घरिं संपत्ति । माझी आचरती रीती । कोण्हासी नाही ॥ नाहिं माझे नि पाडे वाडु । मी चि सर्वज्ञु एकु रूढु । ऐसा शिवमुष्टिगंडु । घेउनु ठाके ॥ व्याधिलेया माणसा । न ये भोगु दाखवुं जैसा । नीके न साहे तैसा । पुढिलाचे ॥. आता ह्यात वेसकराने काय दाखवले त्याचा व का दाखवले त्याचा हा कसा काय दृष्टांत होतो. काव्यात दृष्टांत म्हणजे जे निवेदन केले त्याच्या समर्थनार्थ दुसरे तसेच एखादे उदाहरण देणे.काव्यशास्त्रात दृष्टांत अलंकाराची व्याख्या करताना म्हणतात की "विषयाचे वर्णन करून झाल्यावर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टांत अलंकार होतो." इथे मूळ गोम "त्याच अर्थाचा दाखला" ही आहे. ज्ञानेश्वर म्हणत आहेत गर्व, ताठा बाळगू नका. त्याचा अर्थ त्यांनी ताठा दाखवला, असा आपण काढू शकत नाही. काढलाच तर ते अज्ञानाचे वा खोडसाळपणाचे लक्षण होईल. इथे हा वेसकर फक्त ब्राह्मणांच्या दारासमोर जाऊन काही दाखवीत नाही आहे. शिवाय कोणाही मानसशास्त्रज्ञाला विचारा, अत्याचाराच्या दाबाची प्रतिक्रिया अशी नसते. शाळेत लहान मुले असा व्रात्यपणा करतात तो अर्धवट लैंगिक कुतुहुलातून असतो.तर पुष्ट्यर्थ फ्राइड ह्या मानसोपचारतज्ज्ञाचा निर्वाळा आहे. जेव्हा कोणी असे वागतो तेव्हा मानसशास्त्र सांगते की ती एक विकृती असून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न ( अटेंशन डेफिशियन्सी सिन्ड्रोम ) असतो. किंवा क्वचित प्रसंगी, समजा आपण बाथरूम मध्ये टॉवेल न्यायला विसरलो, व पॅसेजमधला वाळत टाकलेला टॉवेल घ्यायला तसेच बाहेर आलो, तर असे अपघाताने होते. काही ठिकाणी ( जसे अमेरिकेत मोठमोठ्या क्लबातून सामूहिक बाथरूम मध्ये) लोक नागडयाने वावरू धजतात. पण बाहेर योग्य कपडे घालूनच येतात. कधी कधी क्रिकेट मॅच दरम्यान कोणी नागडयाने मैदानावर पळतो. त्याला मग पोलीस अटक करतात. ह्या सर्व प्रतिक्रियांमध्ये कुठले दाब उफाळून येण्याचे दिसत नाही. हां, लेखकाने जर कथानकात असे दाखविले असते की हा वेसकर निवडून ब्राह्मणांच्या घरांसमोर जाऊन असे करायचा किंवा ब्राह्मण व्यक्ती दिसल्या की त्यांच्या समोर असे करायचा तर "दाब वर येणे" शक्यतेतले होते.त्यामुळे हे अनुमान शक्यतेतल्या कोटीचे वाटत नाही. कादंबरीतले लिखाण हे प्राय: एक ललित लिखाण व काल्पनिक असते. पण नेमाडे कबूलतात की ही आत्मचरित्रपर कादंबरी असून आदर्श अशा "यमुनापर्यटन" टाइप कादंबरीत असते तसे निश्चित नैतिक भूमिका घेऊनच हे चितारलेले आहे. नेमाडे म्हणतात: "व्यक्ती व समाज ह्यांच्या संबंधात अनेक प्रश्न असतात व ह्या संदर्भात काही निश्चित नैतिक भूमिका घेऊन कादंबरीकाराने भाषिक कृति केलेली असते, त्यानुसार आशयसूत्र निवडलेले असते." ( टीकास्वयंवर--पृ २४२ ). शिवाय कादंबरीच्या प्रमोशन मध्ये नेमाडेंनी स्टार माझा वर जी प्रदीर्घ मुलाखत दिली त्यातही म्हटले होते की हिंदू धर्म ब्राह्मणांनी बिघडवला. त्यामुळे जे लिहिले आहे ते पूर्ण समजून-उमजून , निश्चित नैतिक भूमिकेतूनच लिहिलेले आहे. शिवाय फ्राइड व खुद्द ज्ञानेश्वरांच्या काही ओळी उदधृत करून ते असे मांडत आहेत की ही ब्राह्मणांनी केलेल्या अत्याचारावरची ही रास्त प्रतिक्रिया आहे. जसे काही खुद्द ज्ञानेश्वरांच्या ओवीमधूनच हे सिद्ध होते. ब्राह्मण-द्वेष समाजशास्त्री व मनोवैज्ञानिक एकवेळ रास्त ठरवतीलही. पण लेखकाचा ब्राह्मणद्वेष नायकात, कादंबरीत दिसत नाही. तो महानुभाव पंथाच्या आत्याच्या संन्याशीण होण्याच्या उदात्तीकरणात इतका रंगलेला आहे की तो कादंबरीत ब्राह्मणांची प्रसंगी तारीफही करतो. पण चपराक देण्याची मूळ प्रेरणा लेखक इथे ज्ञानेश्वरांवरही वापरतो. हे मात्र फ्रॉइडच्या मनोविश्लेषणाने, मूळ प्रवृत्तीने, झाले असेल असे वाचकाच्या लक्षात येईल. ह्याचे अजून एक उदाहरण आहे, हिंदूची प्रकाशनपूर्व नेमाडेंची मुलाखत. त्यात ते राजवाडेंबद्दल म्हणतात, की हा ब्राह्मण इतका हुशार की ह्याने मूळ ज्ञानेश्वरीची प्रत नष्ट करून, आपल्या पदरच्या ओव्या घुसडल्या असतील. हे लेखकाचे मत, आपल्याला कादंबरीत दिसत नसले, तरी लेखकाचा ब्राह्मणद्वेष मात्र उघड होतो. मनोविश्लेषणात्मक समीक्षा ते उघड करते. मनोविश्लेषणात उदात्तीकरणाचे जे प्रकरण आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव मला असा आला. पार्ल्याच्या एका सभेत मी त्यांना विचारले की परंपरेच्या विरुद्ध बंडखोरी करताना तुम्ही "हिंदू" त ज्ञानेश्वरांची खिल्ली उडवलीत, स्त्रीवादाचा कैवार घेत संत रामदासांना नागड्या, पळपुट्या म्हटले, त्याच वादात गौतम बुद्धाला एक पोरगं काढून पळून गेल्याबद्दल दूषणे दिलीत, वारकरी समाजाने महारामांगांना सामावून घेतले नाही म्हणून त्यांना दूषणे दिली, तर हे सर्व तुम्ही बंडखोरीच्या आकर्षणामुळे ( किंवा खपाच्या लोभाने ?) केले असेल हे समजू शकते. पण प्रत्येक बंडखोरीत व्यवस्थेची नवीन व्यवस्था लावण्याचे सामर्थ्य असते असे जे म्हणतात तर त्याप्रमाणे बंडखोरीच्या अभिनिवेषानंतर तुम्हाला कोणती व्यवस्था येणार आहे किंवा आणायची आहे, त्याचे नेमके चित्र काय दिसते ? त्यावर ते म्हणाले की त्यांची संतांची टर उडवण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण एक सामाजिक संदर्भ देता यावा म्हणून मी हे केले आहे. हे झाले चपराक लगावण्याच्या अनिवार इच्छेचे उदात्तीकरण . व्यवस्थेत बंडखोरी करून पुढचे कुठले पडघम तुम्हाला ऐकू येतात वा दिसतात, ह्यावर ते म्हणाले की मला असे काही दिसत नाही. म्हणजे केवळ चपराक लगावून देऊन आसमंत चपापता करणे हेच मूळ होते, हे मनोविश्लेषणाने दिसते. चपराक लगावणे ही किती अनावर वृत्ती आहे, हे अजून एका उदाहरणाने दिसेल. नेमाडेंना वारकरी संप्रदायाबद्दल अप्रूप आहे व प्रसंगी त्यांनी त्यांची प्रशंसा केलेली आहे. विशेषत: महानुभाव पंथाच्या तुलनेत त्यांच्या मौखिक परंपरेने कसे साहित्य टिकवले हे ते "तुकाराम गाथा" (हे त्यांनी संपादित केलेल्या पुस्तक )च्या प्रस्तावनेत चांगले सांगतात. ह्या वारकरी संप्रदायाला त्यांनी "हिंदू"त मारलेली ही चपराक पहा :"हिंदू त (पृ.४४०):वर : ...पैठण. वारकरी पंथाबद्दल एकच मिनिटात ओळख---कसे जातिभेद मिटवले वगैरे. मुसलमान तर सोडाच, आपापल्या गावातल्या महारा-मांगानासुद्धा वारकर्‍यांनी जवळ घेतले नाही. सामावून घेणं आणखी दूरच. विठ्ठ्लाच्या चरणीं सगळे एक ? पंढरपुरात आषाढीला चोवीस सवर्णांच्या पालख्या गेल्यावर अजामेळ मांगाची शेवटून...एकादशीला मिरची, रताळं, पेरू, पपया, शेंगदाणे, खजूर, बटाटा, साबुदाणा, असले म्लेंछ यावनी पदार्थ कसे काय चालतात ? ". महाराष्ट्रात लाखांच्या संख्येने वारी करणारा, समानतेचा आदर्श असणारा, हा संप्रदाय. पण स्वत: महानुभावी पंथाचे असलेल्या नेमाडेंना, त्यात वैगुण्यच दिसते. ते सगळ्यांनाच शिव्या देतात, चपराक लगावतात, असा फक्त आव आणतात. कारण पुस्तकात कुठेच नायक असलेला खंडेराव, म्हणजे नेमाडे, महानुभाव पंथाचे काही विश्लेषण का करीत नाहीत ? उलट आत्या महानुभाव पंथाची संन्याशीण असते तिचे किती उदात्त भव्य चित्रण ! मुसलमानांबद्दल का मूग गिळून गप्प ? नायक तर पाकीस्तानात असतो. त्याला भरपूर वाव होता, मुसलमानांना चपराकी ठेवून द्यायला. ( क्रमश: २ )
साहित्यिक समीक्षा सिद्धान्त आणि नेमाडेंची "हिंदू" "क्रिटिकल थियरी" किंवा "लिटररी थियरी" नावाचा विषय साहित्याच्या उच्च शिक्षणात असतो व असले विषय समजणार्‍यांभोवती, खरे असो वा खोटे, एक प्रकारच्या आदराचे वलय असते. अशांना उंच ठिकाणी ( जसे सिमला वगैरे ) मानाच्या व चांगल्या पगाराच्या नोकर्‍या मिळतात, ज्यामुळे ते कित्येक वर्षे नवीन साहित्य निर्माण न करता, आपल्या मागील शिदोरीवर मिरवू शकतात. कालांतराने ह्याच साहित्यिक समीक्षा सिद्धान्ता-बरहुकूम ते नवीन साहित्य प्रसवतात व ते सामान्य वाचकाला समजले नाही तरी, ते सिद्धान्त जाणणार्‍यांच्या उच्च वर्तुळात अति-आदर पावतात, पुरस्कार पावतात. आपण मोठ्या अपेक्षेने अशी पुस्तके विकत घेतो, वाचण्याचा प्रयत्न करतो, आणि न समजल्यावर अशाच वर्तुळातल्या कोणाच्या, मोठेपणाच्या पावतीवर डोलत, शिक्कामोर्तब करतो. आपण हे जसे नकळत करतो त्याविरुद्ध कळून सवरून हे कसोटीचे साहित्यिक सिद्धान्त जाणणारे लोक त्यावर अशी पुस्तके बेततात व मानमरातब पावतात. ह्या मागे जे हे मोलाचे कसोटीचे साहित्यिक सिद्धान्त असतात त्यांची आपण ओळख करून घेऊ व हेच कसे "हिंदू" ह्या भालचंद्र नेमाडेंच्या कादंबरीला लागू होतात ते पाहू. ह्या निमित्ताने कसोटीच्या साहित्यिक सिद्धान्तांची आपल्याला ओळख होईल व ते कसे कलाकृतीला लागू करावेत ह्याचा सरावही होईल. ( ह्या उहापोहासाठी "क्रिटिकल थियरी टुडे" हे इंटरनेटवर उपलब्द असलेले लुइस टायसन ह्यांचे पुस्तक आधाराला घेतलेले आहे . ) साहित्याच्या कसोटीसाठी जे साहित्यिक सिद्धान्त वापरले जातात ते असे असतात : १) मनोविश्लेषणात्मक समीक्षा २) मार्क्सवाद आणि सामाजिकतेची समीक्षा ३) स्त्रीवाद आणि लिंगभेदाची समीक्षा ४) आधुनिकता/न्यू क्रिटिसिझम्‌ वा उत्तर आधुनिकतेची समीक्षा ५) वाचकवादाची समीक्षा ६) संरचनावाद, चिन्हात्मकतेची समीक्षा ७) उत्तर-संरचनावाद / विरचना समीक्षा ८) नव-इतिहासवाद व सांस्कृतिक समीक्षा ९) समलिंगी, गे,व विचित्र समीक्षा १०) आफ्रिकन-अमेरिकन वा वर्णवादाची समीक्षा ११) उत्तर वसाहतवाद. क्रमवारीत थोडयाफार फरकाने हेच मुद्दे श्री.मिलिंद मालशे व अशोक जोशी लिखित "आधुनिक समीक्षा-सिद्धान्त" ( मौज प्रकाशन ) ह्या पुस्तकातही पहायला मिळतात. एखाद्या कलाकृतीकडे वा साहित्याकडे समजूतीच्या सोयीसाठी, लावावयाचे हे जणु चष्मेच असतात, असे म्हणतात. म्हणजे त्या सिद्धान्तापुरते आपण त्याच नजरेने पाहू शकतो व साहित्य जोखू शकतो. मुळात साहित्य असतेच कशासाठी व ते आपण वाचावे का ? हा आपल्याला पडलेला आदिम सवाल असतो. साहित्य वाचल्याने आपल्या अनुभवाच्या कक्षा रुंदावतात . असे म्हणतात की आयुष्यात आपण जसजसे ज्यास्त अनुभवी होऊ लागतो, चार पावसाळे ज्यास्त पाहतो, तसतशी साहित्यात अनुभव घेण्याची आपली क्षमता वाढते. वरील समीक्षांचे सिद्धान्त एखाद्या कलाकृतीला लावून, ती कलाकृती फसलेली आहे ( किंवा कसे ), असे दाखविले तरी त्यानिमित्ताने समीक्षा पद्धतीतल्या सिद्धान्ताची आपल्याला ओळख होते. शेवटी प्रत्येक साहित्यिक आपले साहित्य निर्माण करीत असताना त्याच्या दृष्टीने जे अंतिम सत्य वा सुंदर आहे त्याचाच माग काढीत असतो व तो प्रयत्न फसलेला आहे असे समीक्षा-सिद्धान्ताने दिसले, तरी त्यानिमित्ताने सत्य वा सुंदर कसे असते, ह्याची जाण होऊन, आपल्या साहित्यिक अभिरुचीच्या कक्षा रुंदावतात हा फायदाच आहे. तसा तो तुम्हा-आम्हाला होवो ! ( क्रमश: १ ) -------------------------------------------------------------------------------------------- मनोविश्लेषणात्मक समीक्षा सिद्धान्त आणि हिंदू : मनोविश्लेषणात्मक समीक्षा सिद्धान्त इतके आता रुळलेले आहेत की सामान्य जनताही ते जाणते. उदा: खेड्यापाड्यातील लोकही म्हणतात, काय राव वड्याचं तेल वांग्यावर काढताय का ? कोणाचा राग कोणावर काढताय ? आणि मनोव्यापारांचे प्राबल्य आपण इतके कबूलतो की एक रोगी केवळ विलपॉवरने कॅंन्सरला चांगले तोंड देतो तर फाईव्ह-स्टार हॉस्पिटलातही मनाने हरलेला रोगी सहजी दगावतो ह्यात आपल्याला काहीच वावगे वाटत नाही. मनोविश्लेषणात्मक सिद्धान्त फ्रॉइड सारख्या डॉक्टराने आपल्या अनुभवातून रूढ केलेले असल्याने ते आजकाल सार्वत्रिक मान्यता पावलेले आहेत. जसे: आपण इच्छांचे दमन करतो, त्यांचे उन्न्यन वा उदात्तीकरण करतो, त्यांचे दुसर्‍यांवर प्रक्षेपण करतो, त्यांच्या समर्थनासाठी आपले एक खासे बचावतंत्र तयार करतो, ह्यासाठी आता आपण काही पुरावे मागत नाही इतके ते सर्वमान्य आहेत. फ्रॉइडने विस्मृती व स्वप्नकृती ह्यांचेही स्पष्टीकरण बरेचसे पटण्यासारखे दिलेले आहेत. इतर मनोवैज्ञानिक कल्पना आहेत स्थानांतरण ( डिस्प्लेसमेंट ), संक्षिप्तिकरण ( कन्डेंसेशन ), दुसर्‍या स्तरावरील विस्तृतीकरण ( सेकंडरी इलॅबोरेशन ). फ्रॉइडच्या मोलाच्या कल्पना आहेत जाणीव ( कॉन्शस ) व नेणीव ( अनकॉन्शस ) आणि त्यातही त्याने नेणीवेला ज्यास्त महत्व दिले आहे. "हिंदू"ला मनोविश्लेषणात्मक समीक्षा लागू करणे अजून एका कारणासाठी प्रशस्त आहे. कारण लेखकाने कबूल केल्याप्रमाणे हे आत्मचरित्रात्मक साहित्य आहे. इतके की त्यातला नायक खंडेराव जिथे राहतो त्या के.बी.देशपांडेंचा बंगला औरंगाबादी मी व अनेक जणांनी पाहिलेला आहे. त्यामुळे इथे लेखक व नायक ह्यांच्यातला आंतरपाट समीक्षेने काढायची गरज न पडता वाचकाला सहजी काढता येतो. मनाच्या अनेक व्यापारांपैकी दुसर्‍याला इजा ( व्हायलेंस ) करण्याच्या माणसाच्या मूळ प्रवृत्तीचे एक दर्शन घेऊ. वास्तवात नेमाडे हे अपयशी प्राध्यापक होते हे त्यांनी बिढार ह्या कादंबरीतही चित्रित केलेले आहे. त्या चित्रणात त्यांना वर्गात पोरे जी त्रास देतात त्यावर खरे तर एखाद्या अभ्यासू वृत्तीच्या प्राध्यापकाने पब्लिक स्पीकिंग मध्ये नैपुण्य कमव, शिकवण्यातले काही हातखंडे शीक, असा मार्ग अवलंबला असता. पण इथे नेमाडे अगदी सोपा मार्ग अवलंबतात व एका टारगट पोराला वर्गात श्रीमुखात लगावून देतात व त्यामुळे इतर मुले चपापतात, असे नमूद करतात. ही नेमाडे ह्यांची एक सूप्त वृत्तीच झालेली आहे, असे त्यांचे टीकावाङमय वाचून कोणाही चाणाक्ष वाचकाच्या लक्षात येईल. खरे तर वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी नेमाडेंची पहिलीच कादंबरी "कोसला" ही मराठी सारस्वताने वाखाणली, उचलून धरली. त्याने एखाद्याने जरा मवाळ धोरण धारण केले असते. पण नेमाडे चपराक लगावून देण्याच्या वृत्तीचे. त्यांनी टीकास्वयंवरात सर्व प्रस्थापित मंडळींना यथेच्छ बदडून काढलेले दिसेल. अगदी पु.ल.देशपांडेंनाही त्यांनी सोडलेले नाही. वर्गातल्या टारगट पोराला थोबाडीत दिल्यावर जसे सगळे कॉलेज चपापले, तसेच टीकास्वयंवरातल्या घायाळ व चौफेर टीकेने मराठी सारस्वत गळाठले व तेव्हापासून नेमाडे प्रस्थापित "लेखकराव" झाले. नुसती बंडखोरी वेगळी व चपराक लगावणे वेगळे. महाराष्ट्रात ज्ञानेश्वरांचे स्थान अतीव आदराचे असून सर्वच जण त्यांना "माऊली"चा दर्जा देतात. ज्ञानदेवे रचला पाया, असे वारकरी संप्रदाय व भक्तिमार्ग मानतात. ज्ञानेश्वरांनी वर्णव्यवस्थेचे त्या काळात समर्थन केले ह्या दूषणापायी अनेक मान्यवरांनी त्यांच्याशी वाद घातलेला आहे. अलिकडच्या काळात कवी विंदा करंदीकरांनी "अमृतानुभव"च्या अर्वाचीनीकरणाच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रदीर्घ वाद घातलेला आहे. पण ज्ञानेश्वरांना चपराक मारण्याचे धारिष्टय फक्त नेमाडेच करू जाणे. कारण हे मूळ स्वभावाने होते आहे. त्याचे हे उदाहरण पहा :"हिंदू" ह्या कादंबरीतले पृ.१५६ वरचे हे भाष्य पहा: "एक बुला वेसकर. वेशीखालच्या देवडीत बसलेला. हा ह्याच नावानं विख्यात होण्याचं कारण आजूबाजूला कोणी नाही, हे चाणाक्षपणे पाहून हा एकदम त्याच्या धोतरातली बुल्लीच मुठीत धरून आम्हा पोरांना दाखवायचा. पुन्हा धोतर खाली टाकून साळसूद चेहर्‍यानं काहीच झालं नाही, किंवा काहीच केलं नाही, असं दाखवायचा. हे कोणाला सांगायचं तरी कसं ? याचा अर्थ आपल्याला तेव्हा लागत नव्हता. आता लागतो: सवर्ण हिंदू -अस्पृश्य संबंधाचा तो दृष्टांत होता, कव्हणी एकु कुरवंडी करीत सांता कुरघोडी करी त्या वेसकरीयाचा दृष्टांत. जैसे फ्राइडचा सिद्धांत जातीयतेत मोडून सांगितल्यास जैसे होईल तैसे. किंबहुना ज्ञानेश्वर : ऐसा शिवमुष्टिगुंडु । घेउनु ठाके ॥ अस्पृश्यता एक हजार वर्षांपासून आहेच, तेव्हापासूनचे दाब असे वर येतात. " ज्ञानेश्वरीच्या अध्याय १३ त ओवी ७१५-७१७ मध्ये विद्या व वय ह्यांच्या उन्मादाने माणुस कसा गर्व करीत छाती काढून चालतो व माझ्यासारखा मोठा कोणी नाही असा शिवभक्तांना असतो तसा गर्व( शिवमुष्टीगंडु, गुंडु नव्हे) धारण करतो व मग त्याला चांगले बघवत नाही अशा अर्थाच्या ह्या ओव्या मुळात अशा : म्हणे मीं चि येकु आथि । माझा चि घरिं संपत्ति । माझी आचरती रीती । कोण्हासी नाही ॥ नाहिं माझे नि पाडे वाडु । मी चि सर्वज्ञु एकु रूढु । ऐसा शिवमुष्टिगंडु । घेउनु ठाके ॥ व्याधिलेया माणसा । न ये भोगु दाखवुं जैसा । नीके न साहे तैसा । पुढिलाचे ॥. आता ह्यात वेसकराने काय दाखवले त्याचा व का दाखवले त्याचा हा कसा काय दृष्टांत होतो. काव्यात दृष्टांत म्हणजे जे निवेदन केले त्याच्या समर्थनार्थ दुसरे तसेच एखादे उदाहरण देणे.काव्यशास्त्रात दृष्टांत अलंकाराची व्याख्या करताना म्हणतात की "विषयाचे वर्णन करून झाल्यावर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टांत अलंकार होतो." इथे मूळ गोम "त्याच अर्थाचा दाखला" ही आहे. ज्ञानेश्वर म्हणत आहेत गर्व, ताठा बाळगू नका. त्याचा अर्थ त्यांनी ताठा दाखवला, असा आपण काढू शकत नाही. काढलाच तर ते अज्ञानाचे वा खोडसाळपणाचे लक्षण होईल. इथे हा वेसकर फक्त ब्राह्मणांच्या दारासमोर जाऊन काही दाखवीत नाही आहे. शिवाय कोणाही मानसशास्त्रज्ञाला विचारा, अत्याचाराच्या दाबाची प्रतिक्रिया अशी नसते. शाळेत लहान मुले असा व्रात्यपणा करतात तो अर्धवट लैंगिक कुतुहुलातून असतो.तर पुष्ट्यर्थ फ्राइड ह्या मानसोपचारतज्ज्ञाचा निर्वाळा आहे. जेव्हा कोणी असे वागतो तेव्हा मानसशास्त्र सांगते की ती एक विकृती असून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न ( अटेंशन डेफिशियन्सी सिन्ड्रोम ) असतो. किंवा क्वचित प्रसंगी, समजा आपण बाथरूम मध्ये टॉवेल न्यायला विसरलो, व पॅसेजमधला वाळत टाकलेला टॉवेल घ्यायला तसेच बाहेर आलो, तर असे अपघाताने होते. काही ठिकाणी ( जसे अमेरिकेत मोठमोठ्या क्लबातून सामूहिक बाथरूम मध्ये) लोक नागडयाने वावरू धजतात. पण बाहेर योग्य कपडे घालूनच येतात. कधी कधी क्रिकेट मॅच दरम्यान कोणी नागडयाने मैदानावर पळतो. त्याला मग पोलीस अटक करतात. ह्या सर्व प्रतिक्रियांमध्ये कुठले दाब उफाळून येण्याचे दिसत नाही. हां, लेखकाने जर कथानकात असे दाखविले असते की हा वेसकर निवडून ब्राह्मणांच्या घरांसमोर जाऊन असे करायचा किंवा ब्राह्मण व्यक्ती दिसल्या की त्यांच्या समोर असे करायचा तर "दाब वर येणे" शक्यतेतले होते.त्यामुळे हे अनुमान शक्यतेतल्या कोटीचे वाटत नाही. कादंबरीतले लिखाण हे प्राय: एक ललित लिखाण व काल्पनिक असते. पण नेमाडे कबूलतात की ही आत्मचरित्रपर कादंबरी असून आदर्श अशा "यमुनापर्यटन" टाइप कादंबरीत असते तसे निश्चित नैतिक भूमिका घेऊनच हे चितारलेले आहे. नेमाडे म्हणतात: "व्यक्ती व समाज ह्यांच्या संबंधात अनेक प्रश्न असतात व ह्या संदर्भात काही निश्चित नैतिक भूमिका घेऊन कादंबरीकाराने भाषिक कृति केलेली असते, त्यानुसार आशयसूत्र निवडलेले असते." ( टीकास्वयंवर--पृ २४२ ). शिवाय कादंबरीच्या प्रमोशन मध्ये नेमाडेंनी स्टार माझा वर जी प्रदीर्घ मुलाखत दिली त्यातही म्हटले होते की हिंदू धर्म ब्राह्मणांनी बिघडवला. त्यामुळे जे लिहिले आहे ते पूर्ण समजून-उमजून , निश्चित नैतिक भूमिकेतूनच लिहिलेले आहे. शिवाय फ्राइड व खुद्द ज्ञानेश्वरांच्या काही ओळी उदधृत करून ते असे मांडत आहेत की ही ब्राह्मणांनी केलेल्या अत्याचारावरची ही रास्त प्रतिक्रिया आहे. जसे काही खुद्द ज्ञानेश्वरांच्या ओवीमधूनच हे सिद्ध होते. ब्राह्मण-द्वेष समाजशास्त्री व मनोवैज्ञानिक एकवेळ रास्त ठरवतीलही. पण लेखकाचा ब्राह्मणद्वेष नायकात, कादंबरीत दिसत नाही. तो महानुभाव पंथाच्या आत्याच्या संन्याशीण होण्याच्या उदात्तीकरणात इतका रंगलेला आहे की तो कादंबरीत ब्राह्मणांची प्रसंगी तारीफही करतो. पण चपराक देण्याची मूळ प्रेरणा लेखक इथे ज्ञानेश्वरांवरही वापरतो. हे मात्र फ्रॉइडच्या मनोविश्लेषणाने, मूळ प्रवृत्तीने, झाले असेल असे वाचकाच्या लक्षात येईल. ह्याचे अजून एक उदाहरण आहे, हिंदूची प्रकाशनपूर्व नेमाडेंची मुलाखत. त्यात ते राजवाडेंबद्दल म्हणतात, की हा ब्राह्मण इतका हुशार की ह्याने मूळ ज्ञानेश्वरीची प्रत नष्ट करून, आपल्या पदरच्या ओव्या घुसडल्या असतील. हे लेखकाचे मत, आपल्याला कादंबरीत दिसत नसले, तरी लेखकाचा ब्राह्मणद्वेष मात्र उघड होतो. मनोविश्लेषणात्मक समीक्षा ते उघड करते. मनोविश्लेषणात उदात्तीकरणाचे जे प्रकरण आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव मला असा आला. पार्ल्याच्या एका सभेत मी त्यांना विचारले की परंपरेच्या विरुद्ध बंडखोरी करताना तुम्ही "हिंदू" त ज्ञानेश्वरांची खिल्ली उडवलीत, स्त्रीवादाचा कैवार घेत संत रामदासांना नागड्या, पळपुट्या म्हटले, त्याच वादात गौतम बुद्धाला एक पोरगं काढून पळून गेल्याबद्दल दूषणे दिलीत, वारकरी समाजाने महारामांगांना सामावून घेतले नाही म्हणून त्यांना दूषणे दिली, तर हे सर्व तुम्ही बंडखोरीच्या आकर्षणामुळे ( किंवा खपाच्या लोभाने ?) केले असेल हे समजू शकते. पण प्रत्येक बंडखोरीत व्यवस्थेची नवीन व्यवस्था लावण्याचे सामर्थ्य असते असे जे म्हणतात तर त्याप्रमाणे बंडखोरीच्या अभिनिवेषानंतर तुम्हाला कोणती व्यवस्था येणार आहे किंवा आणायची आहे, त्याचे नेमके चित्र काय दिसते ? त्यावर ते म्हणाले की त्यांची संतांची टर उडवण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण एक सामाजिक संदर्भ देता यावा म्हणून मी हे केले आहे. हे झाले चपराक लगावण्याच्या अनिवार इच्छेचे उदात्तीकरण . व्यवस्थेत बंडखोरी करून पुढचे कुठले पडघम तुम्हाला ऐकू येतात वा दिसतात, ह्यावर ते म्हणाले की मला असे काही दिसत नाही. म्हणजे केवळ चपराक लगावून देऊन आसमंत चपापता करणे हेच मूळ होते, हे मनोविश्लेषणाने दिसते. चपराक लगावणे ही किती अनावर वृत्ती आहे, हे अजून एका उदाहरणाने दिसेल. नेमाडेंना वारकरी संप्रदायाबद्दल अप्रूप आहे व प्रसंगी त्यांनी त्यांची प्रशंसा केलेली आहे. विशेषत: महानुभाव पंथाच्या तुलनेत त्यांच्या मौखिक परंपरेने कसे साहित्य टिकवले हे ते "तुकाराम गाथा" (हे त्यांनी संपादित केलेल्या पुस्तक )च्या प्रस्तावनेत चांगले सांगतात. ह्या वारकरी संप्रदायाला त्यांनी "हिंदू"त मारलेली ही चपराक पहा :"हिंदू त (पृ.४४०):वर : ...पैठण. वारकरी पंथाबद्दल एकच मिनिटात ओळख---कसे जातिभेद मिटवले वगैरे. मुसलमान तर सोडाच, आपापल्या गावातल्या महारा-मांगानासुद्धा वारकर्‍यांनी जवळ घेतले नाही. सामावून घेणं आणखी दूरच. विठ्ठ्लाच्या चरणीं सगळे एक ? पंढरपुरात आषाढीला चोवीस सवर्णांच्या पालख्या गेल्यावर अजामेळ मांगाची शेवटून...एकादशीला मिरची, रताळं, पेरू, पपया, शेंगदाणे, खजूर, बटाटा, साबुदाणा, असले म्लेंछ यावनी पदार्थ कसे काय चालतात ? ". महाराष्ट्रात लाखांच्या संख्येने वारी करणारा, समानतेचा आदर्श असणारा, हा संप्रदाय. पण स्वत: महानुभावी पंथाचे असलेल्या नेमाडेंना, त्यात वैगुण्यच दिसते. ते सगळ्यांनाच शिव्या देतात, चपराक लगावतात, असा फक्त आव आणतात. कारण पुस्तकात कुठेच नायक असलेला खंडेराव, म्हणजे नेमाडे, महानुभाव पंथाचे काही विश्लेषण का करीत नाहीत ? उलट आत्या महानुभाव पंथाची संन्याशीण असते तिचे किती उदात्त भव्य चित्रण ! मुसलमानांबद्दल का मूग गिळून गप्प ? नायक तर पाकीस्तानात असतो. त्याला भरपूर वाव होता, मुसलमानांना चपराकी ठेवून द्यायला. ( क्रमश: २ )

गुरुवार, २८ जुलै, २०११

देरीदा व नेमाडे :
आपल्याला नेहमी एक कोडे पडलेले असते की , लोक कोणती कादंबरी चांगली व कोणता लेखक दर्जेदार , हे कसे ठरवत असतात ? आपण जेव्हा शिकत असतो तेव्हा कोणी तरी एक सन्मान्य परीक्षा घेत असतात व त्यात चांगले मार्क्स मिळाले की आपले लिहिणे "उत्तम" असे ठरते. तशी काही परीक्षा, प्रकाशित कादंबरीला लागू नसते. चांगले प्रकाशक पदरी जाणकार संपादक ठेवतात व त्यांच्या मते लेखन कसे आहे त्याचा आडाखा घेतात. पण ह्या जाणकार संपादकांचा अंदाज सपशेल चुकलेलाही आपण प्रत्यही पाहतो. शिवाय आपण जर स्वत:च कादंबरी प्रकाशित केली, तर मग ती चांगली आहे का नाही, हे कोण ठरवते ? बरे, खपावरून ठरवावे तर खप काय, तुम्ही कसे खपवता, त्यावर अवलंबून असतो. म्हणतात की जगात सगळ्यात ज्यास्त खपलेले पुस्तक "हॅरी पॉटर" हे होते. नंतर एका आनंद नावाच्या बाईने इंग्लंडात "इंडियन फुड मेड ईझी" नावाचे पुस्तक हॅरी पॉटरपेक्षाही ज्यास्त खपवून दाखवले. आता स्वयपाकाचे पुस्तक हे कादंबरीपेक्षा श्रेष्ठ, असा तर अर्थ ह्याने प्रस्थापित होत नाही. मग ज्या पुस्तकाबद्दल ज्यास्तीत ज्यास्त लोक चांगले बोलतात, तशी परिक्षणे देतात ते पुस्तक चांगले असे समजायचे तर, हे सगळे काही लोक घडवून आणतात हेही आपल्याला नंतर कळते. मग चार नावाजलेले लोक ज्याला चांगले म्हणतात ते चांगले असे समजावे असे ठरवू लागलो तर हे लोक आपापले कंपू स्थापून हे घडवून आणतात असेही दृश्य दिसते. आता ह्या सगळ्या अडचणींवर एकच मार्ग उरतो व तो म्हणजे आपण स्वत:च आपल्याला कोणते पुस्तक आवडते ते ठरवावे व तसे तर्काने सांगावे. किंवा बाजारात कोणी कशी लबाडी करून पुस्तकासंबंधी भ्रम पैदा केले त्याचा शोध घ्यावा. लोकांना सांगावे. कदाचित त्यांना ते पटले, तर मग सगळे मिळून ठरवतील की कादंबरी फसली की जमली ?
पुस्तक चांगले आहे असे ठसविण्याचा सध्याचा अजून एक मार्ग म्हणजे प्राध्यापक मंडळींनी आवई उठवायची की कोणा पाश्चात्य तत्ववेत्त्याच्या मतांप्रमाणे, हे पुस्तक असल्याने, ते श्रेष्ठ आहे. उदाहरणार्थ आत्तापर्यंत "हिंदू" ह्या भालचंद्र नेमाडेंच्या कादंबरीविषयी नावाजलेल्या प्राध्यापक मंडळींनी ज्या कार्यशाळा घेतल्या आहेत, त्यात म्हटले आहे की पाश्चात्य तत्ववेत्ते श्री. देरीदा ह्यांच्या साहित्यविषयक मतप्रणालींनुसार ही कादंबरी असल्यामुळे ती श्रेष्ठच आहे. म्हणजे नुसती "हिंदू" वाचून नव्हे तर हे देरीदा कोण आहेत व ते असे का म्हणत आहेत, हे कळल्याशिवाय आपण काहीच ठरवू शकत नाही.
१९३० ते २००४ दरम्यानच्या काळात ह्या देरीदांनी एकूण ४० पुस्तके लिहिलेली असून त्यांची मते खूपच विवादास्पद होती. तसेच त्यांनी त्या काळातल्या प्रस्थापित तत्ववेत्त्यांच्या विरुद्ध बंडखोरीची मते मांडलेली आहेत. त्यांच्या गाजलेल्या पुस्तकात "ऑफ ग्रॅमॅटोलॉजी", "स्पीच ऍंड फिनॉमिना", "रायटिंग ऍंड डिफरन्स ", "मार्जिन्स ऑफ फिलॉसॉफी", "पोझीशन्स" वगैरे मूलभूत विचारांची पुस्तके आहेत. प्लेटो, ऍरिस्टॉटल च्या काळापासून तर्क ( लॉगॉस ), कार्यकारण-भाव हेच मुख्यकेंद्र मानले जायचे. म्हणजे प्रत्येक विचाराला तर्क व विवेक हे केंद्रस्थानी मानल्या जायचे. देरिदांचे म्हणणे की विचार व वस्तूंना हा कार्यकारण-भाव लागू करणे चुकीचे आहे व त्याऐवजी प्रत्येक विचार व वस्तू, भेदक्रीडा करीत असते हेच खरे आहे. म्हणजे गमतीने म्हणायचे तर जसे म्हणतात की प्रत्येक लठ्ठ माणसात बाहेर पडू पाहणारा एक रोड माणूस असतो व प्रत्येक रोड माणसात आत शिरू पाहणारा एक लठ्ठ माणूस असतो, तशा प्रकारचे अंतर्विरोध सगळ्या जगात व्यापलेले असतात. पूर्वी भाषाशास्त्री म्हणत असत की भाषा म्हणजे बोलणे. लिहिणे ही फक्त बोललेल्या शब्दाची टिकवून धरण्याची फक्त एक युगत आहे. आता देरीदांनी ह्याविरुद्ध म्हणणे त्यांच्या बंडखोरीला साजेसेच होते. ते म्हणाले, प्रत्येक बोललेला शब्द हा आधी कधी तरी बोललेलाच असतो, म्हणून तो पुनरावृत्त झालेला असतो. तो केवळ भेदक्रीडा दाखवतो. म्हणजे समजा आपण "कमळ" असे एखाद्या फुलाला म्हटले तर ते इतर फुलांपेक्षा कसे वेगळे आहे हा भेद दाखवणारा शब्द होतो. त्याऐवजी मूळ लेखनात एक चिन्ह दुसर्‍या चिन्हाचा माग घेत असते व त्यामुळे आज आहे त्यापेक्षा वेगळ्या अर्थाच्या शक्यता मूळ लेखनाच्या संकल्पनेने शक्य होतात. जसे आपण जर म्हटले की "हे मूल आज जन्मलेले आहे" तर इथे जन्म हे चिन्ह "ते मूल कधीतरी मरणार आहे" ह्या "मृत्यू"चा माग काढीत जाते.
"हिंदू" ह्या भालचंद्र नेमाडे ह्यांच्या कादंबरीतले पृ.१५६ वरचे हे भाष्य पहा: "एक बुला वेसकर. वेशीखालच्या देवडीत बसलेला. हा ह्याच नावानं विख्यात होण्याचं कारण आजूबाजूला कोणी नाही, हे चाणाक्षपणे पाहून हा एकदम त्याच्या धोतरातली बुल्लीच मुठीत धरून आम्हा पोरांना दाखवायचा. पुन्हा धोतर खाली टाकून साळसूद चेहर्‍यानं काहीच झालं नाही, किंवा काहीच केलं नाही, असं दाखवायचा. हे कोणाला सांगायचं तरी कसं ? याचा अर्थ आपल्याला तेव्हा लागत नव्हता. आता लागतो: सवर्ण हिंदू -अस्पृश्य संबंधाचा तो दृष्टांत होता, कव्हणी एकु कुरवंडी करीत सांता कुरघोडी करी त्या वेसकरीयाचा दृष्टांत. जैसे फ्राइडचा सिद्धांत जातीयतेत मोडून सांगितल्यास जैसे होईल तैसे. किंबहुना ज्ञानेश्वर : ऐसा शिवमुष्टिगुंडु । घेउनु ठाके ॥ अस्पृश्यता एक हजार वर्षांपासून आहेच, तेव्हापासूनचे दाब असे वर येतात. ".इथे वेसकराने बुल्ली दाखवणे हे "चिन्ह" सर्वसाधारण समाजात एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाला विचारले तर ते तो लक्ष-वेधून-घेण्याची ( अटेंशन डेफिशियन्सी सिन्ड्रोम ) विकृती म्हणून सांगेल. एखाद्या ज्ञानेश्वरीच्या विद्यार्थ्याला विचारले तर तो म्हणेल वर उदधृत केलेल्या ओव्या वेगळ्या संदर्भाच्या आहेत ( शिवभक्तांचा अहंकारही कसा वाईट असतो ते सांगणार्‍या आहेत ). पण हेच "चिन्ह" समाजातल्या एका गटाने दुसर्‍या गटावर केलेल्या अत्याचाराची प्रतिक्रिया आहे असा अर्थ देरीदांच्या चिन्हांच्या माग काढण्याच्या गुणांमुळे दाखवता येतो व तो तसा आहे असे लेखक आपल्याला सांगतो आहे. आंतर-जातीय विवाह केल्याने जातीभेदाची झळ कमी होईल असे एखाद्या समाजशास्त्रज्ञाने म्हणावे व त्याच विवाहासंबंधी एखाद्या जात्यंधाने "तुम्ही आमच्या बायका बाटवल्या होत्या म्हणून आता आम्ही तुमच्या बायका बाटवतो आहोत" असे प्रतिक्रिया म्हणून म्हणावे, त्याच प्रकारचे हे लेखकाचे भाष्य आहे. इथे जात्यंधाला असलेली मुभा, देरीदा ह्यांच्या तत्वामागे बेमालूमपणे लपवता येते. एरव्ही जातीय सलोखा ढवळून काढणारे हे भाष्य ठरवून सामान्य प्रतीच्या लेखकाला संपादकाने अडगळीत लोटले असते. पण, देरीदांच्या चिन्हाच्या माग काढण्याचा व तसा अर्थ लावण्याने, "हिंदू" साहित्यिक श्रेष्ठत्वाला नेऊन पोचवते. आपल्याला देरीदा माहीत नसल्याने हे जमले नसते, जे नेमाडेंनी खुबीने जमवले आहे. हीच साहित्यिक श्रेष्ठता !
देरीदा ह्यांचे दुसरे एक तत्व आहे. ते असे की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कोणतीही संहिता ही एकसंध सेंद्रीय अशी नसावी व विविध संहितांचे काही तुकडे एकत्र करून त्यावर कलमे केली तरी चालावे . त्यामुळे संदिग्धता चांगली दाटते व अनेकार्थता साधते. आता देरीदाने सांगितले व नेमाडेंनी नाही केले तर मग काय मजा ? पडत्या फळाची आज्ञा घेऊन, मग नेमाडे "हिंदू"च्या संहितेत, पूर्वीच्या अनेक संहितांचे तुकडे एकत्र करतात. जसे, "कोसला"तला नायक जसा न-नायक होता तसाच "हिंदू"चा नायक अगदी सरळ-साधा, फारसा तडफदार नसलेला, असा आहे. "बिढार"मधल्या नायकाला जसे शिकवता येत नाही, जिंकण्याची कैफ नसते तसाच "हिंदू"चा नायक ठेवलेला आहे. नामांतर चळवळीचे चर्‍हाट ( चर्‍हाट ह्यासाठी की समता प्रस्थापित व्हावी म्हणून योजलेले नामांतर समता जवळपासही येणार नाही असे आरक्षून बसले आहे. ), युनिव्हर्सिटीलले भ्रष्टाचार, पांचट झालेले विनोदी चुटके, भाषेवर बलात्कार करून केलेले थिल्लर विनोद ( जसे: मराठीतल्या फक्त ला फकत असे उच्चारणे,), महानुभाव पंथाचे किस्से, वगैरे मसाला ! गालिबचे शेर नेमाडे भरपूर वापरतात. ते मोजले तर एकूण १७ शेर भरतात. मोजताना जाणवले की ते सर्व शेवटाच्या शे-दीडशे पानातच येतात. नायक औरंगाबादीचे वर्णन करताना येतात. गालिबच्या काव्याची थोरवी नक्कीच निर्विवाद आहे. त्याचा वापरही वाचकांना माहीतीचा, सरावाचा, आहे. पण तो संभाषण नाही करीत. शेवटी प्रगट होतो. नायकाचे पाकीस्तानात नोकरी करणे पाहता, ते मुक्त हस्ते सर्वत्र यायला हरकत नव्हती. नायकाचा रेखाटलेला स्वभाव पाहता सर्व कालक्रमणेत असायला हवा होता. पण ते शेर असे एकाच कप्प्यात दिल्याने सह्जी येऊन संवाद करणारे राहात नाहीत. अडगळ करणार्‍या भरताडासारखे वाटतात. नेमाडेंना बोली भाषा वापरण्याचे आवर्जून अप्रूप आहे. पण वाक्यांची रचना बोली भाषेतली का प्रमाण भाषेतली अशी मोजदाद केली तर प्रमाण भाषेचे पारडे खूपच जड होईल. बोली भाषेचा परिणाम साधण्यासाठी नेमाडे भरपूर लोकगीतात्मक पोवाडे वापरतात. हे स्वरचित असल्यामुळे की काय, काही ठिकाणी संवादाच्या निकडीपायी ते फारच पोरकट होतात. जसे : आमचा मेहुणा नोकरी नो करी..हॉं,हॉं,...तो पीएचडी करी ; क्या बने भात जहॉं, भात बनाये न बने ॥ ; माह्या घराच्या पाठीमागे रे, उंटणी डुलक्या खाये ।; अरे भाग्यवंताची बाईल मरते, अन अभाग्याचा बैल, हो, रामा रे, जी जी ; अरे लभान्यांच्या बाया, नंग्या पोहती रे मासोया, अरे पाटील गांड फाटिल नको लभानीच्या पडू फंदी यारा, दाटील तिची काचोळी तवर सुटील झगारा, ; वगैरे. संतांची वचनेही मुबलकपणे येतात. विनोद, किस्से, पोवाडे, शेर-शायरी, शाब्दिक कोट्या, उत्क्रांतीच्या कथा, यक्षाच्या कथा, संतवचने, कविता, गाण्यांचे मुखडे, हे शैली प्रकार म्हणूनच कादंबरीत सर्वत्र पेरलेले दिसतात. ह्या इतरत्र उपलब्ध असलेल्या संहिता इथे लेखकाने छान कलमे करून कादंबरीत घुसवलेल्या आहेत. पण नायक वा पात्रे ती एकमेकांशी सहजी संवादीत आहेत असे न झाल्यामुळे हीच काय ती "समृद्ध अडगळ" असे जाणवायला लागते. हे खरे तर देरीदांच्या युक्तीमुळे एवढे सोपे "भरतकाम" होते, मग एका "हिंदू" कादंबरीसाठी ३५ वर्षे का लागावी ह्याचे मात्र वाचकाला कोडेच राहते ! कदाचित आमिर-खानचे सिनेमे जसे वर्षातून एकच केलेले असल्याने दर्जेदार असतात असे इंप्रेशन आहे तसे ३५ वर्षात लिहिलेली म्हणून "हिंदू" केवळ कालमापनानेच श्रेष्ठ ठरावी !
देरीदांना अनेकार्थतेचे एव्हढे अप्रूप आहे की कोणताच निश्चित अर्थ नसावा अशी संहिता त्यांना श्रेष्ठ वाटते. ह्याचा प्रत्यय आपल्याला मराठी समीक्षा-व्यवहारात अजूनही येतो तो मर्ढेकरांच्या कवितांबाबत. आज इतकी वर्षे होऊनही मराठी प्राध्यापक-समीक्षक मंडळी अजूनही मर्ढेकरांच्या ५० वर्षापूर्वीच्या कवितांचा नवनवीन अर्थ नित्यनेमाने व अहमहमिकेने काढत असतात, असे आपण पाह्तो. असेच काहीसे धोरण, हे समीक्षक "हिंदू"साठी वापरतात. बंडखोरी म्हणावी तर ह्यातला अत्याचार पाहणारा नायक काहीच बंडखोरीचे काम करीत नाही. रूढ अर्थाने ज्याला यश, संपन्नता म्हणता येईल असेही काही कथानकात नाहीय. कादंबरी ही काल्पनिक निर्मिती असते असे म्हणावे तर लेखक म्हणतो ही कादंबरी ( व त्याच्या इतर सर्व कादंबर्‍याही ) आत्मचरित्रपरच आहे, म्हणजे घडलेली गोष्ट. स्त्रीवादाचा अपार आदर करण्यासाठी लेखक पारंपारिक साधुसंतांना इथे शिव्यांची लाखोली वाहतो पण त्याचा नायक स्वत: लग्न करण्याच्या विरोधात असतो. असा विरोधाभास सर्वत्र भरून आहे असे आपल्याला वाटते न वाटते तोच देरीदा लेखकाच्या मदतीला असा धावून येतो की ह्यालाच अनेकार्थता म्हणत समीक्षक वाङमयीन महात्मता ह्या कादंबरीला बहाल करू शकतात !
देरीदा हे विरचना ह्या प्रकारासाठी प्रसिद्ध आहेत. विरचनेत काय करतात की कोणत्याही लेखकाच्या संहितेत परस्पर विरोधी भेदक्रीडा असतात असे म्हणून ज्या क्रीडा विरोधी आहेत त्यांना संहितेत उलटे पाडायचे. विवेककेंद्रवादात तर्क, तत्व ह्यांचे अधिष्टान होते तर विरचनेत काही ठाम निश्चित सांगण्याऐवजी "सांगण्यातील" अनिश्चितता वा अनेकार्थता मिरवत राहायचे. ह्याचे प्रात्यक्षिक घेऊ या. नेमाडे हिंदू च्या टीव्ही मुलाखतीत, वा मल-पृष्ठावरच्या ब्लर्बवर काय म्हणतात ? की ब्राह्मणांनी हिंदू धर्म बिघडवला. बरे हे जर रास्त धरले, तर कादंबरीत ह्यावर काही निश्चित मार्ग सुचवला आहे का ? देरीदा म्हणतात त्याप्रमाणे निष्कर्ष सांगायचा नाही, केवळ अनिश्चितता रंगवत जायची. कादंबरीत प्रतिपादले आहे की ही कसली नाती ? पैशांचा प्रसंग आला की निखळून पडणारी ! पण कथानकात ह्यावर काही मार्ग दाखवलाय का ? नाही ! कादंबरीत स्त्रीवादाच्या स्तोमापायी लेखक संत रामदासांना ते बोहल्यावरून पळून गेले म्हणून पळपुट्या, नागड्या असे शेलके बोलतो. पण मग नायक अथवा लेखक स्त्रीवादाबद्दल काय करतो? तो तर लग्नही करायला तयार नसतो. रामदासांना नावे ठेवायची व नायकाने रामदासांसारखेच वागायचे हीच खरे तर देरीदांच्या भाषेतली भेदक्रीडा ठरावी. ह्यावर लेखक निश्चित असे काही सुचवत नाही. स्वत: नेमाडे टीकास्वयंवर मध्ये म्हणून गेलेत की "व्यक्ती व समाज ह्यांच्या संबंधात अनेक प्रश्न असतात व ह्या संदर्भात काही निश्चित नैतिक भूमिका घेऊन कादंबरीकाराने भाषिक कृति केलेली असते, त्यानुसार आशयसूत्र निवडलेले असते." ( टीकास्वयंवर--पृ २४२ ). असे जर निश्चित नैतिक भूमिकेतून वरील विटंबना करणारे लिहिल्या गेले असेल तर नेमाडेंनीच त्याचे उत्तरदायीत्व स्वीकारायला हवे. मतभेद सभ्यतेच्या चौकटीतही ते दाखवू शकले असते. मग ते का दाखवीत नाहीत ? कारण इथेही त्यांना देरीदाच भडकवतो आहे.
विरचनेबाबत प्रा. हरिश्चंद्र थोरात "साहित्याचे संदर्भ"( पृ.९७) वर म्हणतात : "...कुठलाही वि-रचनावादी विचारवंत कोठल्याही संहितेची पूर्ण आणि अंतिम वि-रचना करू शकत नाही. आणि त्याची स्वत:ची संहिताही अंतविरोधांनी युक्त असल्यामुळे वि-रचनेसाठी खुली राहते. अशा परिस्थितीत तो एकच गोष्ट करू शकतो. स्वत:ला भाषेच्या स्वाधीन करून भाषा त्याच्याशी जो खेळ खेळेल त्यात सहभागी होणे. या खेळातून अर्थनिर्मितीच्या अनंत क्षमता निर्माण करत राहणे. अंत नसलेल्या खेळात भाषेच्या हातचे बाहुले झालेला विरचनावादी विचारवंत आणि उपस्थितीच्या अतिभौतिकीच्या प्रभावाखाली असलेला दुसरा एखादा लेखक यांच्यामध्ये फारसा भेद उरत नाही. वि-रचनावादी लेखक हा खेळ खेळण्याचे जाणीवपूर्वक ठरवतो, एवढ्यापुरताच तो भेद मर्यादित राहतो. विरचनेच्या दृष्टिकोणातून हा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यही त्याचे नसते. तळ नसलेल्या पोकळीतले हे तरंगत राहणे असते ! ". देरीदांच्या ऑर्केस्ट्रावरच्या खाणाखुणातून सिमल्याच्या ऍडव्हान्स्ड संस्थेत भरपूर पगारावरच्या लेखकाने हे नाद वाजवत राहावे, खेळ खेळावेत, हे एकवेळ क्षम्य ठरेल, पण बिचार्‍या वाचकांच्या नशीबी हे "तळ नसलेल्या पोकळीतले तरंगणे" का यावे ?

-------------------------------------------------------------

रविवार, २९ मे, २०११

बख्तिनचे ओंगळ रुपडे
"हिंदू": ले: भालचंद्र नेमाडे----४
आता थोडेसे भाषेविषयी व शैलीविषयी पाहू. बख्तिन म्हणतो: (पृ.४७,५०) : "कादंबरीची भाषा ही एक भाषा नसून अनेक भाषांची व्यवस्था असते. ह्या अंतर्व्यवस्थेमुळे त्या एकमेकीशी तात्विकपणे देवाणघेवाण करतात. शैलीमीमांसकांना कादंबरीत, म्हणूनच भाषाप्रकारांच्या खास प्रतिमांचा अभ्यास करावा लागतो. भाषाप्रकारांच्या मिटणे-दिसणे, बंद-चालू होणे, आणि त्यांचे संभाषणात्मक संबंध परिवर्तित होणे हे तपासावे लागते." आता कादंबरीतले एक निरिक्षण: गालिबचे शेर नेमाडे भरपूर वापरतात. ते मोजले तर एकूण १७ शेर भरतात. मोजताना जाणवले की ते सर्व शेवटाच्या शे-दीडशे पानातच येतात. नायक औरंगाबादीचे वर्णन करताना येतात. गालिबच्या काव्याची थोरवी नक्कीच निर्विवाद आहे. त्याचा वापरही वाचकांना माहीतीचा, सरावाचा, आहे. पण तो संभाषण नाही करीत. शेवटी प्रगट होतो. नायकाचे पाकीस्तानात नोकरी करणे पाहता, ते मुक्त हस्ते सर्वत्र यायला हरकत नव्हती. नायकाचा रेखाटलेला स्वभाव पाहता सर्व कालक्रमणेत असायला हवा होता. पण ते शेर असे एकाच कप्प्यात दिल्याने सह्जी येऊन संवाद करणारे राहात नाहीत. अडगळ करणार्‍या भरताडासारखे वाटतात. नेमाडेंना बोली भाषा वापरण्याचे आवर्जून अप्रूप आहे. पण वाक्यांची रचना बोली भाषेतली का प्रमाण भाषेतली अशी मोजदाद केली तर प्रमाण भाषेचे पारडे खूपच जड होईल. पण नेमाडेंची प्रमाण भाषा कमालीची भारदस्त असल्याने ती शोभा वाढवते. मग बोली भाषेचा परिणाम साधण्यासाठी नेमाडे भरपूर लोकगीतात्मक पोवाडे वापरतात. हे स्वरचित असल्यामुळे की काय, काही ठिकाणी संवादाच्या निकडीपायी ते फारच पोरकट होतात. जसे : आमचा मेहुणा नोकरी नो करी..हॉं,हॉं,...तो पीएचडी करी ; क्या बने भात जहॉं, भात बनाये न बने ॥ ; माह्या घराच्या पाठीमागे रे, उंटणी डुलक्या खाये ।; अरे भाग्यवंताची बाईल मरते, अन अभाग्याचा बैल, हो, रामा रे, जी जी ; अरे लभान्यांच्या बाया, नंग्या पोहती रे मासोया, अरे पाटील गांड फाटिल नको लभानीच्या पडू फंदी यारा, दाटील तिची काचोळी तवर सुटील झगारा, ; वगैरे. संतांची वचनेही मुबलकपणे येतात. विनोद, किस्से, पोवाडे, शेर-शायरी, शाब्दिक कोट्या, उत्क्रांतीच्या कथा, यक्षाच्या कथा, संतवचने, कविता, गाण्यांचे मुखडे, हे शैली प्रकार म्हणूनच कादंबरीत सर्वत्र पेरलेले दिसतात. पण नायक वा पात्रे ती एकमेकांशी सहजी संवादीत आहेत असे न झाल्यामुळे हीच काय ती "समृद्ध अडगळ" असे जाणवायला लागते.
हे मिखाइल बख्तिन कोण आहेत ते थोडक्यात पाहिले तर ते एक रशियन साहित्यिक व तत्ववेत्ते होते ( १८९५ ते १९७५) असे आढळते. ह्यांना मान्यता मरणानंतर मिळाली. १९२० दरम्यान ते "बख्तिन सर्कल" चालवीत पण त्यांना मान्यता १९६० नंतर मिळाली. त्यांचा पीएचडीचा प्रबंध खूपच विवादास्पद झाला व सरकारी हस्तक्षेपानंतर त्यांना पीएचडी नाकारल्या गेली. १९५७ त ते मास्कोत हेड ऑफ रशियन व वर्ल्ड लॅंग्वेजेस होते. ते तत्ववेत्ते का समीक्षक ह्यावर अजून खल होतो. सुरुवातीला रूपवाद्यांना हे जवळचे वाटले तरी शेवटच्या काळात बख्तिनच स्वत:ला त्यांच्यापासून वेगळे समजू लागले. कारण त्यांच्या मते रूपवादी, साहित्यातल्या मजकूराचे(कंटेंट) महत्व कमी करतात व रुपबंधाचे अवडंबर माजवितात. बख्तिनच्या कल्पना अशा : दोन माणसे वाद करीत असतील तर सत्य दोघांपैकी एकाकडे असते असे नसून सत्याला प्रगट व्हायला खूप मते, आवाज/संवाद लागतात. एकाच्या तोंडी सत्य असू शकत नाही. त्याचसाठी कादंबरीत अनेकांचा संवाद असावा, रिओ-द-जानिरोत कार्निव्हलचा जल्लोष असतो तसा मतांचा जल्लोष असावा, मी-माझ्यासाठी, मी इतरांसाठी, व इतर माझ्यासाठी असे एक तत्वज्ञान सांगत ते इतरांचा आपल्यावर कसा परिणाम होतो व त्याचा कसा मान राखावा हे आवर्जून सांगतात. ( इथे नेमाडेंचे एक मुंबईतले नुकतेच केलेले भाषण पहा. नेमाडे म्हणतात, मराठी टिकायची असेल तर आपली मुले मराठीतूनच शिकायला हवी. ज्या राजवाडेंबद्दल नेमाडे प्रमोशन मध्ये म्हणाले होते की हा ब्राह्मण मोठा धूर्त होता व त्याने ज्ञानेश्वरीची मूळ प्रत जाळली व ओव्या पदरच्य़ाच घुसवल्या असतील, त्याच राजवाडेंसारखे नेमाडे इथे मराठीच्या काळजीने बोलत आहेत. हा इतरांचा आपल्यावर होणारा परिणाम असा पाह्यला मिळतो.).
बख्तिनचे रूपबंधाचे मुद्यांबाबत, वर आपण पाहिले की "हिंदू" ह्या नेमाडेंच्या कादंबरीला कसे गैरलागू होतात. बख्तिनची विचारसरणी म्हणजे काही वाङमयीन महात्मतेच्या कसोटयांचा भोज्ज्या नाही, असलीच तर ती एक निरिक्षणाची पद्धत म्हणता येईल. शिवाय कादंबरीकारानेच अथवा त्याच्या चाहत्यांनी हीच कसोटी वापरा (...कादंबरीतलीच एक म्हण वापरायची तर,... मला पहा व फुले वहा...) असे म्हणण्यासारखे आहे. हे सूज्ञ वाचकांची, समीक्षकांची, कोंडी केल्यासारखे होईल. कादंबरीतला मुद्देमाल सामान्य़ पण बख्तिनीय क्लृप्त्या वापरल्याने तो असामान्य होतो, हे कदापी सह्य होणारे नाही. उलट मुद्देमाल कमजोर व रुपबंधांचे रुपडेही ओंगळ असे होते ! ( शिवाय बख्तिनचे ब्रह्मवाक्यही सांगते की सत्य हे क्वचितच एकाच्या मुखी ( नेमाडेंच्या मुखी ) असते.)

अरुण अनंत भालेराव
१८६/ए-१, रतन पॅलेस, गरोडियानगर, घाटकोपर( पूर्व) , मुंबई:४०००७७ ;भ्र: ९३२४६८२७९२

रविवार, १५ मे, २०११

बख्तिनचे ओंगळ रुपडे,
हिंदू : भालचंद्र नेमाडे----३
आता कादंबरीत बर्‍याच ठिकाणी येणारे विनोद, शाब्दिक कोटया, चुटके, किस्से हे पाहू :
(पृ.१३४):आंघोळ करणार्‍या लभान्यांकडे पहात दोघे जण संवाद करतात: का रे सुदाम्या, दोघीतली कोनती चांगली लागते तुले ? गाय की वासरी ? दुसरा: आपल्यासारख्या न कांडणार्‍याला काय दोन्ही बोखारे सारखेच.ऊठ शेवटची भाकर टाकाली तव्यावर तुह्या घरात. पहिला: शेवटी आपल्याच घरातल्या तव्यावरची भाकर ऑं ? दुसरा: जे आपली तेच गोड. ("तवा गरम है"वरचे घासून घासून चपटे झालेले जोक, इतक्या प्रतिभावान लेखकाला, पाने भरायला टाकावे लागतात, म्हणजे त्यांचा लेखकरावच झालाय की काय ? का म्हातारपणी "भाकरीची" भूक प्रबळ होते ?)
(पृ.२९८):गांधीजी म्हणतात गरजा कमी करा, पण तो कोण कवी म्हणतो की गरजा जयजयकार. पाने भरण्यासाठी अशा कोट्या म्हणजे गरजवंताला ( पाने भरण्याची गरज ) अक्कल नसते ते खरेच तर !
(पृ.३७२):बोबड्या लेक्चररचे किस्से : साले जहॉंसे अच्छा...लाजाधि लाज....असे पाणचट वाचून वाचकांची बोबडीच वळणार.
(पृ.३९०): तुमची उंची किती, बेलबाला? सटपटून बोलली, चार फिट अकरा उंच...(हाय रे ह्य़ा विनोदाची उंची !)
(पृ.४५७.):युरोपात काय होतं ?...आठशे वर्ष सलग डार्क एजिस---कृष्णयुगं ? ( ---अरेरे असे चातुर्य कामी आले ?)
(पृ.१८३): ...पहा कसे जीएएनडीला पाय लावून... ( हा विनोद जी ए एन डी तच जाणार !)
(पृ.३५७): थंडी कडाक्याची..त्यांचं उठतच नाही तर लोकसंख्या कमी राहणारच...
मुळात गंभीर प्रवृत्तीच्या लेखकाने, ३५ वर्षे खपून लिहिलेल्या गंभीर विषयावरच्या कादंबरीत असले विनोद, कोट्या असाव्यात का ? ( नेमाडे टीकास्वयंवरात पु.ल.देशपांडेंनाही खरमरीत टीकेपासून माफ करीत नाहीत.) तर मग इथे असले विनोद, कोटया कशासाठी असाव्यात ? बख्तिनचे ह्याबाबत काय मार्गदर्शन आहे ? बख्तिन म्हणतो : ( पृ.२३, डायलॉगिक इमॅजिनेशन ):"पात्रांचे वाचकांपासूनचे जे अंतर असते ते हास्य-विनोद कमी करतात. आपण ज्यावर हसतो, ते आपल्या नजीक असते. विनोद-निर्मितीचे सृजन कमाल जवळिकीच्या क्षेत्रात असते. हास्यात अशी शक्ती असते की पात्रे जवळ येतात, ते अशा जाड्याभरड्या संपर्कात येतात की आपण त्यांना उलट सुलट, आत बाहेर, वरून खालून न्याहाळू शकतो. त्यांना उघडे करू शकतो, त्यांची मुक्तपणे पाहणी करू शकतो, त्यांच्याशी नाना प्रयोग करू शकतो. जगाचे असे जवळ आणणे हास्यविनोदाने शक्य होते." पण विनोदाचे दुसरे एक भागधेय बख्तिन सांगत नाही की पुष्कळ वेळा अहमहमिकेने विनोद करू जाता तो हसू आणत नाही, तर आपलेच हसे करतो. आपण विनोदांच्या कार्यक्रमात हे प्रत्यही पाहतोच. विनोद जमणे हे सर्जकतेला म्हणूनच आव्हान असते. आता ३५ वर्ष घेऊन, असे पाणचट विनोद झाले तर ते वैगुण्य आपण बख्तिनचे म्हणू शकत नाही. ह्याचे उत्तरदायीत्व नेमाडेंनाच घ्यावे लागेल किंवा कादंबरी एका बैठकीत लिहावी ( जशी कोसला ) का ३५ वर्षे खपून, हे त्यांचे त्यांनी ठरवावे. वाचकांनी हे विनोद हसण्या सारखे आहेत का हास्यास्पद आहेत, हे पहावे.
नेमाडेंच्या सर्वच कादंबर्‍या आत्मचरित्रपर असतात. त्यामुळे नायकासंबंधी त्यांचे काय व्यूह आहेत हे सहजी उमजून येते. तसेच नायकाची मते, भाषिते, निष्कर्श, आक्रोश, समजूती ह्या सर्व आपल्याला नेमाडेंच्याच आहेत असे मानावे लागते. आपण वर पाहिलेच की टीकाकार म्हणून नेमाडेंना वाटते की नायकाने/लेखकाने काही एक निश्चित नैतिक भूमिका घेऊन कथेत वावरावे लागते. ह्याला बख्तिनचाही पाठिंबा मिळतो तो असा : ( पृ.३८, डायलॉगिक इमॅजिनेशन ): " कादंबरीत नायक वा पात्रे एक आदर्शवादी रूप घेतात व त्याने त्यांची प्रतिमा बदलण्यास मदत होते. पूर्वी हे सॉक्रेटिसच्या प्रतिमेमधून साधल्या जायचे. एक नियम म्हणून सांगता येईल की, कादंबरीत नायक हा बहुतेक करून एक आदर्शवादी असतो." नेमाडेंनी कादंबरीचे नाव दिलेय "हिंदू" व मलपृष्ठावरही सांगण्यात आलेय की हिंदू धर्मातल्या नाना घडामोडींमुळे ह्या धर्मात एक प्रकारची अडगळ साचून राहिली आहे. कादंबरीचे उपशीर्षकच "जगण्याची समृद्ध अडगळ" असे आहे. मग हे कादंबरीत का दिसत नाही. ब्राह्मणांमुळे अडगळ साचली असे कादंबरीत नाहीय, केवळ हिंदू धर्मामुळे नाही तर वैश्विक अशा घडामोडींमुळे सर्वांकडेच अशी समृद्ध अडगळ जमते आहे, ही वस्तुस्थिती आपण जाणतोच. असेच कथानकात आहे. पुस्तकाच्या सुरुवातीस असलेल्या पसायदानात लेखकाने वैश्विक भान मागावे व स्वत: कथानकात कोणत्याही समर्थनाशिवाय केवळ हिंदू धर्मामुळे अडगळ साचतेय असा निष्कर्श काढावा ह्यात आदर्शवाद न दिसता साध्या विचारशक्तीची दिवाळखोरीच ज्यास्त दिसून येते. निश्चित नैतिक भूमिकेचे हे कसले समर्थन ? तसा साधा प्रयत्नही दिसून येत नाही. आदर्शवाद दिसणे तर दूरच. शेतकर्‍याची विदारक परिस्थिती छान रंगवून होते. पण नायकाचा आदर्शवाद त्यावरचा काही मार्ग दाखवत नाही. उलट एक अगतिकताच दाखवतो. वृद्धापकाळी नायकाच्या मुलाने गावी येणार नाही म्हणावे, सोयीसाठी दहिसरला फ्लॅट घ्या म्हणावे व नायकाने तसे करावे ह्यात नेहमी दिसते तशी अगतिकताच, मेलोड्रामा सारखी दिसते. शहरीकरणा विरुद्ध बोलणारा नायक व प्रत्यक्षातला लेखक आनंदाने शहरी होतो, स्त्रिवादापायी समर्थांची, गौतमाची खिल्ली उडवणारा नायक हा स्वत: मात्र लग्न करू इच्छित नाही, आत्यावर झालेल्या वारसाहक्क डावलण्यावर तोडगा काढू शकत नाही, हे अतिशय निराशाजनक आहे व बख्तिनच्या मार्गदर्शनाविरुद्ध आहे. तमाशा कलावंतांच्या जीवनाची ससेहोलपट चालूच रहावी व त्यावरचा नटरंग सिनेमा मात्र खूप चालावा, किंवा शेतकर्‍यांच्या आत्महत्त्या चालूच रहाव्यात व त्यावरची चित्रणे कादंबरीत छान झाली आहेत असे म्हणावे, ह्यातला विरोधाभास उघड दिसणारा आहे. हे कलेचे यश नाही, निश्चित नैतिक भूमिकेचे निदर्शक नाही, अगदीच डेली सोप च्या वळणाचे मात्र होते. त्याला उदात्ततेचा रंग कसा यावा ? मग कादंबरीला यमुनापर्यटनी म्हणावे का कुठलीच निश्चित नैतिक भूमिका न दिसणारी रीती-प्रधान म्हणावे ?
(क्रमश: )