रविवार, २९ मे, २०११

बख्तिनचे ओंगळ रुपडे
"हिंदू": ले: भालचंद्र नेमाडे----४
आता थोडेसे भाषेविषयी व शैलीविषयी पाहू. बख्तिन म्हणतो: (पृ.४७,५०) : "कादंबरीची भाषा ही एक भाषा नसून अनेक भाषांची व्यवस्था असते. ह्या अंतर्व्यवस्थेमुळे त्या एकमेकीशी तात्विकपणे देवाणघेवाण करतात. शैलीमीमांसकांना कादंबरीत, म्हणूनच भाषाप्रकारांच्या खास प्रतिमांचा अभ्यास करावा लागतो. भाषाप्रकारांच्या मिटणे-दिसणे, बंद-चालू होणे, आणि त्यांचे संभाषणात्मक संबंध परिवर्तित होणे हे तपासावे लागते." आता कादंबरीतले एक निरिक्षण: गालिबचे शेर नेमाडे भरपूर वापरतात. ते मोजले तर एकूण १७ शेर भरतात. मोजताना जाणवले की ते सर्व शेवटाच्या शे-दीडशे पानातच येतात. नायक औरंगाबादीचे वर्णन करताना येतात. गालिबच्या काव्याची थोरवी नक्कीच निर्विवाद आहे. त्याचा वापरही वाचकांना माहीतीचा, सरावाचा, आहे. पण तो संभाषण नाही करीत. शेवटी प्रगट होतो. नायकाचे पाकीस्तानात नोकरी करणे पाहता, ते मुक्त हस्ते सर्वत्र यायला हरकत नव्हती. नायकाचा रेखाटलेला स्वभाव पाहता सर्व कालक्रमणेत असायला हवा होता. पण ते शेर असे एकाच कप्प्यात दिल्याने सह्जी येऊन संवाद करणारे राहात नाहीत. अडगळ करणार्‍या भरताडासारखे वाटतात. नेमाडेंना बोली भाषा वापरण्याचे आवर्जून अप्रूप आहे. पण वाक्यांची रचना बोली भाषेतली का प्रमाण भाषेतली अशी मोजदाद केली तर प्रमाण भाषेचे पारडे खूपच जड होईल. पण नेमाडेंची प्रमाण भाषा कमालीची भारदस्त असल्याने ती शोभा वाढवते. मग बोली भाषेचा परिणाम साधण्यासाठी नेमाडे भरपूर लोकगीतात्मक पोवाडे वापरतात. हे स्वरचित असल्यामुळे की काय, काही ठिकाणी संवादाच्या निकडीपायी ते फारच पोरकट होतात. जसे : आमचा मेहुणा नोकरी नो करी..हॉं,हॉं,...तो पीएचडी करी ; क्या बने भात जहॉं, भात बनाये न बने ॥ ; माह्या घराच्या पाठीमागे रे, उंटणी डुलक्या खाये ।; अरे भाग्यवंताची बाईल मरते, अन अभाग्याचा बैल, हो, रामा रे, जी जी ; अरे लभान्यांच्या बाया, नंग्या पोहती रे मासोया, अरे पाटील गांड फाटिल नको लभानीच्या पडू फंदी यारा, दाटील तिची काचोळी तवर सुटील झगारा, ; वगैरे. संतांची वचनेही मुबलकपणे येतात. विनोद, किस्से, पोवाडे, शेर-शायरी, शाब्दिक कोट्या, उत्क्रांतीच्या कथा, यक्षाच्या कथा, संतवचने, कविता, गाण्यांचे मुखडे, हे शैली प्रकार म्हणूनच कादंबरीत सर्वत्र पेरलेले दिसतात. पण नायक वा पात्रे ती एकमेकांशी सहजी संवादीत आहेत असे न झाल्यामुळे हीच काय ती "समृद्ध अडगळ" असे जाणवायला लागते.
हे मिखाइल बख्तिन कोण आहेत ते थोडक्यात पाहिले तर ते एक रशियन साहित्यिक व तत्ववेत्ते होते ( १८९५ ते १९७५) असे आढळते. ह्यांना मान्यता मरणानंतर मिळाली. १९२० दरम्यान ते "बख्तिन सर्कल" चालवीत पण त्यांना मान्यता १९६० नंतर मिळाली. त्यांचा पीएचडीचा प्रबंध खूपच विवादास्पद झाला व सरकारी हस्तक्षेपानंतर त्यांना पीएचडी नाकारल्या गेली. १९५७ त ते मास्कोत हेड ऑफ रशियन व वर्ल्ड लॅंग्वेजेस होते. ते तत्ववेत्ते का समीक्षक ह्यावर अजून खल होतो. सुरुवातीला रूपवाद्यांना हे जवळचे वाटले तरी शेवटच्या काळात बख्तिनच स्वत:ला त्यांच्यापासून वेगळे समजू लागले. कारण त्यांच्या मते रूपवादी, साहित्यातल्या मजकूराचे(कंटेंट) महत्व कमी करतात व रुपबंधाचे अवडंबर माजवितात. बख्तिनच्या कल्पना अशा : दोन माणसे वाद करीत असतील तर सत्य दोघांपैकी एकाकडे असते असे नसून सत्याला प्रगट व्हायला खूप मते, आवाज/संवाद लागतात. एकाच्या तोंडी सत्य असू शकत नाही. त्याचसाठी कादंबरीत अनेकांचा संवाद असावा, रिओ-द-जानिरोत कार्निव्हलचा जल्लोष असतो तसा मतांचा जल्लोष असावा, मी-माझ्यासाठी, मी इतरांसाठी, व इतर माझ्यासाठी असे एक तत्वज्ञान सांगत ते इतरांचा आपल्यावर कसा परिणाम होतो व त्याचा कसा मान राखावा हे आवर्जून सांगतात. ( इथे नेमाडेंचे एक मुंबईतले नुकतेच केलेले भाषण पहा. नेमाडे म्हणतात, मराठी टिकायची असेल तर आपली मुले मराठीतूनच शिकायला हवी. ज्या राजवाडेंबद्दल नेमाडे प्रमोशन मध्ये म्हणाले होते की हा ब्राह्मण मोठा धूर्त होता व त्याने ज्ञानेश्वरीची मूळ प्रत जाळली व ओव्या पदरच्य़ाच घुसवल्या असतील, त्याच राजवाडेंसारखे नेमाडे इथे मराठीच्या काळजीने बोलत आहेत. हा इतरांचा आपल्यावर होणारा परिणाम असा पाह्यला मिळतो.).
बख्तिनचे रूपबंधाचे मुद्यांबाबत, वर आपण पाहिले की "हिंदू" ह्या नेमाडेंच्या कादंबरीला कसे गैरलागू होतात. बख्तिनची विचारसरणी म्हणजे काही वाङमयीन महात्मतेच्या कसोटयांचा भोज्ज्या नाही, असलीच तर ती एक निरिक्षणाची पद्धत म्हणता येईल. शिवाय कादंबरीकारानेच अथवा त्याच्या चाहत्यांनी हीच कसोटी वापरा (...कादंबरीतलीच एक म्हण वापरायची तर,... मला पहा व फुले वहा...) असे म्हणण्यासारखे आहे. हे सूज्ञ वाचकांची, समीक्षकांची, कोंडी केल्यासारखे होईल. कादंबरीतला मुद्देमाल सामान्य़ पण बख्तिनीय क्लृप्त्या वापरल्याने तो असामान्य होतो, हे कदापी सह्य होणारे नाही. उलट मुद्देमाल कमजोर व रुपबंधांचे रुपडेही ओंगळ असे होते ! ( शिवाय बख्तिनचे ब्रह्मवाक्यही सांगते की सत्य हे क्वचितच एकाच्या मुखी ( नेमाडेंच्या मुखी ) असते.)

अरुण अनंत भालेराव
१८६/ए-१, रतन पॅलेस, गरोडियानगर, घाटकोपर( पूर्व) , मुंबई:४०००७७ ;भ्र: ९३२४६८२७९२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा