सोमवार, ६ एप्रिल, २०१५

नि. नू. ने. ( नित्य नूतन नेमाडे ! )
घुमान साहित्य संमेलनाला गेलेल्या लोकांना ज्ञानपीठा पेक्षा जिलेबी ज्यास्त आवडते. “ज्यांना नव्याने काही लिहावयाचे नाही, अशी मंडळी संमेलनास उपस्थित राहात असल्याचा आरोप नेमाड्यांनी केला. नाशिक येथील गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे रविवारी झालेल्या जीवन-गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.”
खरेच मराठी सारस्वत, कागद आणि त्यात गुंडाळलेला गूळ एकाच चवीने खाणाऱ्या गाढवाप्रमाणे स्थितप्रद्न्य झालेला असावा . ( पहा : तुझे आहे तुजपाशी ले: पु.ल.देशपांडे ). नसता ते साहित्य संमेलनात ज्ञानपीठ आणि जिलेबी एकाच चवीने का मोजते बरे ? ( पहा : रा.रा . नेमाडे ह्यांचे आरोप ). मराठी सारस्वत गाढव तर नक्कीच असावे नसता त्याने “ज्ञानपीठ” असे भलत्याच माणसाला दिले नसते.
“ज्यांना नव्याने काही लिहायचे नाही अशी मंडळी” असा मार्मिक निकष लावीत रा.रा. नेमाडे ह्यांनी सह-साहित्यिकांना दूषणे दिलीत हे मात्र नेहमीप्रमाणे आहे, नव्याने काही नाही, असे मात्र वाटून घेवू नये. कारण नेमाडे नित्य नेमाने शिव्या देतात असे जरी वरकरणी वाटत असले तरी ते दरवेळी नव्या मंडळींना शिव्या देतात हे नोंद करण्यासारखे आहे. ते केवळ ब्राह्मण साहित्यिकांनाच  शिव्या देतात असे नाही तर त्यात दरवेळी नवीन नवीन ब्राह्मण साहित्यिकांना शिव्या देतात, त्यामुळे दस्तुरखुद्द नेमाडे हे स्वतः नित्य नूतन लिहिणारे लेखक आहेत हे सिद्ध होतेच !
काहींना वाटते की नेमाडेंचा नायक हा नेहमी न-नायक स्वरूपाचा, रुढ रीतीविरुद्ध वागणारा, डीप्रेशनचे अप्रूप असणारा, समाजाला तुच्छ लेखणारा, हरलेला नायक असतो. पण नि.नू.ने. हे दरवेळी त्याचे वेगळे नाव ठेवतात हे किती वाखाणण्याजोगे आहे ! नेमाडेंना उगाच नाही दररोज नित्य नूतन पुरस्कार मिळत आहेत.
इतके असूनही घुमान साहित्य संमेलनाला ज्ञानपीठा ऐवजी जिलेबी ज्यास्त गोड लागावी ? का ह्या आरोपा आडून नेमाडे आमंत्रण मागत आहेत ? एक शेवटचे संमेलन घेवूनच टाका कसे ! ( नेमाडे म्हणे फक्त ( का नेमाडे शैलीत फकत ?) शेवटच्या संमेलनाला येईन असा त्यांचा पण असल्याने ).
---------------------------------------------   


http://epaper.loksatta.com/c/4921098

 http://epaper.loksatta.com/c/4921098

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा