मंगळवार, १० मार्च, २०१५


लिहिता लेखक
पूर्वी ज्ञानपीठ हे लेखकाच्या कलाकृतीला देत. आजकाल ते लेखकाच्या लेखनाला दिले जाते. असे होऊ नये की कधी काळी ( फारा वर्षापूर्वी ) लेखकाने लिहिले व त्याला आज पुरस्कार दिला. म्हणून अजून एक अट अशी की निदान गेल्या २० वर्षात लेखक लिहिता असलेला असावा. ह्या अटीमुळे, नेमाडे ज्यांना आडदांड म्हातारे कुत्रे म्हणतात ( जसे बिढार मध्ये कुसुमाग्रज ) अशा कधीकाळी लिहून गेलेल्या म्हाताऱ्यानाच पुरस्कार जाणार नाही अशी तजवीज होते.  
आता ह्या अटीवर नेमाडे कसे उतरतात ? नेमाडेना पुरस्कार दिला गेला २०१४ सालचा. त्या आधी २० वर्षे, म्हणजे निदान १९९४ पासून हा लेखक लिहिता असला पाहिजे, अशी ही अट होते. आणि ह्या अटीमुळे तरुण लिहित्या लेखकांना पुरस्कार मिळावा ( जी अपेक्षा नेमाडेंचीही त्यांच्या तरुणपणी होती ) अशी व्यवस्था तयार होते.
नेमाडे ह्यांची एकूण साहित्य संपदा पहिली तर १९६३ साली पहिली कादंबरी कोसला, त्यानंतर १९७५च्या आधी बिढार, हूल, जरीला, व झूल ह्या कादंबऱ्या. टीका-स्वयंवर हे १९९० साली व काव्य-संग्रह देखणी व मेलडी हेही १९७५च्या आधीचे. म्हणजे ज्ञानपिठाच्या कट-ऑफ वर्षापासून ( १९९४ पासून ) नेमाडे ह्यांनी केवळ “हिंदू” ही कादंबरी लिहिलेली दिसेल. त्यांचे बाकीचे लेखन हे त्या आधी किती तरी वर्षे अगोदर लिहिलेले. हिंदू कादंबरी त्यांना लिहायला लागली ३५ वर्षे. हे काय सृजन म्हणायचे ? तेव्हढ्यावर का ह्याना “लिहिता लेखक” म्हणायचे ? खरे तर केवळ ह्याच मुद्द्यावर नेमाडे ह्यांनी हा पुरस्कार दुसऱ्या कोणा तरुण, लिहित्या लेखकाला द्या असे म्हणावे !
-------------------------------------


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा