बख्तिनचे ओंगळ रुपडे
"हिंदू" : भालचंद्र नेमाडे
मिखाइल बख्तिन ह्यांचे एक पुस्तक आहे, "द डायलॉगिक इमाजिनेशन" ह्या नावाचे. त्यात कादंबरी ह्या प्रकाराचा मोठा आढावा घेऊन काही आडाखे निरिक्षिलेले आहेत. त्या अनुषंगाने भाषाशास्त्रातली काही तत्वेही दिलेली आहेत. ह्या पुस्तकाची ही प्रस्तावना करण्याचे कारण असे की "हिंदू" ही भालचंद्र नेमाडेंची कादंबरी बरीचशी ह्या बख्तिनच्या तत्वांनुसार लिहिली आहे असे जाणवते. (निदान अकादेमीचा पुरस्कार तरी त्यांना ह्याच कारणास्तव मिळणारा असावा !)
एक उदाहरण पहा: उदा: पृ.१५६ वर हे पहा: "एक बुला वेसकर. वेशीखालच्या देवडीत बसलेला. हा ह्याच नावानं विख्यात होण्याचं कारण आजूबाजूला कोणी नाही, हे चाणाक्षपणे पाहून हा एकदम त्याच्या धोतरातली बुल्लीच मुठीत धरून आम्हा पोरांना दाखवायचा. पुन्हा धोतर खाली टाकून साळसूद चेहर्यानं काहीच झालं नाही, किंवा काहीच केलं नाही, असं दाखवायचा. हे कोणाला सांगायचं तरी कसं ? याचा अर्थ आपल्याला तेव्हा लागत नव्हता. आता लागतो: सवर्ण हिंदू -अस्पृश्य संबंधाचा तो दृष्टांत होता, कव्हणी एकु कुरवंडी करीत सांता कुरघोडी करी त्या वेसकरीयाचा दृष्टांत. जैसे फ्राइडचा सिद्धांत जातीयतेत मोडून सांगितल्यास जैसे होईल तैसे. किंबहुना ज्ञानेश्वर : ऐसा शिवमुष्टिगुंडु । घेउनु ठाके ॥ अस्पृश्यता एक हजार वर्षांपासून आहेच, तेव्हापासूनचे दाब असे वर येतात. "
बख्तिनचे म्हणणे असे की भाषेच्या प्रकारांमध्ये संवाद ह्या प्रकारात अर्थाच्या सर्वात ज्यास्त शक्यता आढळू शकतात. ह्या उतार्यात संवाद असा पारंपारिक प्रकारात दिलेला नाहीय, पण लेखक वा नायक तुमच्याशी संवादच करीत आहे ( "हे कोणाला सांगायचं तरी कसं ?"). त्यानंतर लेखक एक भाषण / ( डिस्कोर्स ) देत आहे, ज्यात तो सांगतो की वेसकराने धोतर वर करून बुल्ली दाखवणे हे ब्राह्मणांनी वेसकरांवर पूर्वी जे अत्याचार केले त्याची प्रतिक्रिया म्हणून "वर आलेला हा दाब" आहे. आता हे सांगतांना अर्थातच संवाद नाहीय, तर निश्चित नैतिक भूमिका घेऊन काढलेले अनुमान आहे. कशावरून हे खरे? तर पुष्ट्यर्थ फ्राइड ह्या मानसोपचारतज्ज्ञाचा निर्वाळा आहे. पण, जेव्हा कोणी असे वागतो तेव्हा मानसशास्त्र सांगते की ती एक विकृती असून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न ( अटेंशन डेफिशियन्सी सिन्ड्रोम ) असतो. किंवा क्वचित प्रसंगी, समजा आपण बाथरूम मध्ये टॉवेल न्यायला विसरलो, व पॅसेजमधला वाळत टाकलेला टॉवेल घ्यायला तसेच बाहेर आलो, तर असे अपघाताने होते. काही ठिकाणी ( जसे अमेरिकेत मोठमोठ्या क्लबातून सामूहिक बाथरूम मध्ये) लोक नागडयाने वावरू धजतात. पण बाहेर योग्य कपडे घालूनच येतात. कधी कधी क्रिकेट मॅच दरम्यान कोणी नागडयाने मैदानावर पळतो. त्याला मग पोलीस अटक करतात. ह्या सर्व प्रतिक्रियांमध्ये कुठले दाब उफाळून येण्याचे दिसत नाही. हां, लेखकाने जर कथानकात असे दाखविले असते की हा वेसकर, मुद्दाम, निवडून, ब्राह्मणांच्या घरांसमोर जाऊन असे करायचा किंवा ब्राह्मण व्यक्ती दिसल्या की त्यांच्या समोर असे करायचा तर "दाब वर येणे" शक्यतेतले होते.त्यामुळे हे अनुमान शक्यतेतल्या कोटीचे वाटत नाही. अर्थात भाषाशास्त्रात कोणत्या जातीच्या लेखकांनी कोणत्या जातीच्या लोकांची बदनामी करावी, वा करू नये, ह्याचा काही दंडक नसल्यामुळे जी ती जात बदनामीची सुखदु:खे भोगतील. ( क्रमश: )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा