नेमाने-नेमाडे
भैरप्पा व नेमाडे--एक तौलनिक अभ्यास:
पात्रे, चारित्र्ये व कथानक:
जोनॅथन कुल्लर नावाच्या समीक्षकाचे एक पुस्तक आहे, "स्ट्रक्चरलिस्ट पोएटिक्स" नावाचे. केंब्रिजच्या सेल्व्हियन कॉलेजचे हे प्राध्यापक. त्यांचे कादंबरीच्या रचनेसंबंधी असे म्हणणे आहे की ( पृ.२३०-२३८) पात्रांचे चारित्र्य हे कोणत्याही कादंबरीचे महत्वाचे अंग असते.कादंबरीतला सर्व पसारा केवळ पात्रांचे चारित्र्य उभारण्यासाठी असतो. ती साक्षात जीवनातली तर वाटलीच पाहिजेत, शिवाय त्या काळात ती आपल्याला सातत्याने धारदार होऊन आवडलीही पाहिजेत. हे खरे म्हणजे अगदी सामान्य वाचकाची अपेक्षाच व्यक्त करण्यासारखे आहे. ह्या दृष्टीने पाहिले तर नेमाडेंचे मुख्य पात्र भले उच्च शिक्षित आहे, नोकरी पुरातत्व खात्याची जरा वेगळी वाटणारी आहे, पण त्याच्या व्यक्तिमत्वाला आवडणारे विविधांगी कंगोरे दिसून येत नाहीत. त्यामानाने भैरप्पांच्या नायिकेची इतिहास शिक्षणाची सूप्त ईच्छा खूपच मोहक आहे. शिवाय तिचे वडिलांसारखे ब्राह्मण होऊन जानवे घालणे, हवन करणे, दलितांचा कैवार घेणे हे एका उत्तुंग व्यक्तिमत्वाची साक्ष देते. नायक, पात्रे भले अतिसामान्य असावीत पण वाचकाला ती भावली पाहिजेत. नेमाडेंची पात्रे व त्यांचे चारित्र्य उभारणी त्यामानाने फारच तोकडी पडते.
कथानकातला फापटपसारा जर पात्रांच्या व्यक्तिमत्वात भर टाकत नसेल तर वाचकांच्या दृष्टीने ती निव्वळ खोगीर-भरतीच ठरते व असे अडगळीचे पसारे नेमाडेंच्या हिंदूत ठासून आहेत. जसे, लमाणी स्त्रिया, नामांतर प्रकरण, विद्यापीठातले भ्रष्टाचार, ढाब्यावरची शेरोशायरी, वगैरे. बरे ह्यासर्वांबाबत नायकाचे प्रेम वा द्वेष कुठेच चित्रित न झाल्याने त्याचे व्यक्तिमत्व बाळसे धरत नाही. त्याउलट भैरप्पांची नायिका कॉलेजच्या अनुभवातून, गावकीतल्या अनुभवातून, मंदिरातल्या वादविवादातून, नातेवाईक व मित्रांच्या वागणुकीतून खूपच उंचीने उभी राहते, भावते. ( क्रमश: )
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा