रविवार, १९ डिसेंबर, २०१०

भैरप्पा व नेमाडे: एक तौलनिक अभ्यास:५

दाब व त्यांचे समर्थन :
चुकीचा निष्कर्ष व त्याचे चुकीचे समर्थन ह्याचे एक उदाहरण पाहू. "हिंदू"त जातीयते मुळे जातीजातींचा एकमेकावरचा दाब कसा उफाळून येतो हे दाखवणारा खास नेमाडपंथी वळणाचा एक किस्सा ( पृ.१५६) दिलाय. तो असा :
"एक बुला वेसकर. वेशीखालच्या देवडीत बसलेला. हा ह्याच नावानं विख्यात होण्याचं कारण आजूबाजूला कोणी नाही, हे चाणाक्षपणे पाहून हा एकदम त्याच्या धोतरातली बुल्लीच मुठीत धरून आम्हा पोरांना दाखवायचा. पुन्हा धोतर खाली टाकून साळसूद चेहर्‍यानं काहीच झालं नाही, किंवा काहीच केलं नाही, असं दाखवायचा. हे कोणाला सांगायचं तरी कसं ? याचा अर्थ आपल्याला तेव्हा लागत नव्हता. आता लागतो: सवर्ण हिंदू -अस्पृश्य संबंधाचा तो दृष्टांत होता, कव्हणी एकु कुरवंडी करीत सांता कुरघोडी करी त्या वेसकरीयाचा दृष्टांत. जैसे फ्राइडचा सिद्धांत जातीयतेत मोडून सांगितल्यास जैसे होईल तैसे. किंबहुना ज्ञानेश्वर : ऐसा शिवमुष्टिगुंडु । घेउनु ठाके ॥ अस्पृश्यता एक हजार वर्षांपासून आहेच, तेव्हापासूनचे दाब असे वर येतात. "
ज्ञानेश्वरीच्या अध्याय १३ त ओवी ७१५-७१७ मध्ये विद्या व वय ह्यांच्या उन्मादाने माणुस कसा गर्व करीत छाती काढून चालतो व माझ्यासारखा मोठा कोणी नाही असा शिवभक्तांना असतो तसा गर्व ( शिवमुष्टीगंडु, गुंडु नव्हे) धारण करतो व मग त्याला चांगले बघवत नाही अशा अर्थाच्या ह्या ओव्या मुळात अशा : म्हणे मीं चि येकु आथि । माझा चि घरिं संपत्ति । माझी आचरती रीती । कोण्हासी नाही ॥ नाहिं माझे नि पाडे वाडु । मी चि सर्वज्ञु एकु रूढु । ऐसा शिवमुष्टिगंडु । घेउनु ठाके ॥ व्याधिलेया माणसा । न ये भोगु दाखवुं जैसा । नीके न साहे तैसा । पुढिलाचे ॥ आता ह्यात वेसकराने काय दाखवले त्याचा व का दाखवले त्याचा हा कसा काय दृष्टांत होतो.काव्यात दृष्टांत म्हणजे जे निवेदन केले त्याच्या समर्थनार्थ दुसरे तसेच एखादे उदाहरण देणे. काव्यशास्त्रात दृष्टांत हा अलंकार, व्याख्या करताना, म्हणतात की "विषयाचे वर्णन करून झाल्यावर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टांत अलंकार होतो." इथे मूळ गोम "त्याच अर्थाचा दाखला" ही आहे. ज्ञानेश्वर म्हणत आहेत गर्व, ताठा बाळगू नका. त्याचा अर्थ त्यांनी ताठा दाखवला, असा आपण काढू शकत नाही. काढलाच तर ते अज्ञानाचे वा खोडसाळपणाचे लक्षण होईल. इथे हा वेसकर ब्राह्मणांच्या दारासमोर जाऊन काही दाखवीत नाही आहे. शिवाय कोणाही मानसशास्त्रज्ञाला विचारा, अत्याचाराच्या दाबाची प्रतिक्रिया अशी नसते.शाळेत लहान मुले असा व्रात्यपणा करतात तो अर्धवट लैंगिक कुतुहुलातून असतो.तर पुष्ट्यर्थ फ्राइड ह्या मानसोपचारतज्ज्ञाचा निर्वाळा आहे. जेव्हा कोणी असे वागतो तेव्हा मानसशास्त्र सांगते की ती एक विकृती असून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न ( अटेंशन डेफिशियन्सी सिन्ड्रोम ) असतो. किंवा क्वचित प्रसंगी, समजा आपण बाथरूम मध्ये टॉवेल न्यायला विसरलो, व पॅसेजमधला वाळत टाकलेला टॉवेल घ्यायला तसेच बाहेर आलो, तर असे अपघाताने होते. काही ठिकाणी ( जसे अमेरिकेत मोठमोठ्या क्लबातून सामूहिक बाथरूम मध्ये) लोक नागडयाने वावरू धजतात. पण बाहेर योग्य कपडे घालूनच येतात. कधी कधी क्रिकेट मॅच दरम्यान कोणी नागडयाने मैदानावर पळतो. त्याला मग पोलीस अटक करतात. ह्या सर्व प्रतिक्रियांमध्ये कुठले दाब उफाळून येण्याचे दिसत नाही. हां, लेखकाने जर कथानकात असे दाखविले असते की हा वेसकर, निवडून, ब्राह्मणांच्या घरांसमोर जाऊन असे करायचा किंवा ब्राह्मण व्यक्ती दिसल्या की त्यांच्या समोर असे करायचा, तर "दाब वर येणे" दिसणे शक्यतेतले होते.त्यामुळे हे अनुमान शक्यतेतल्या कोटीचे वाटत नाही. शिवाय ह्या वेडसर वेसकराने धोतर उचलून जे दाखवले ते लेखक म्हणतो तसे "आम्हा पोरांना"!. त्यात महानुभावी पंथाचे नेमाडे वा नायक खंडेराव व त्यांचे ब्राह्मण नसलेले मित्र आहेत. त्यामुळे हा दाब असलाच तर कुणब्यांच्या विरुद्धचा आहे. ब्राह्मणांच्या किंवा ज्ञानेश्वरांच्या विरुद्धचा अजिबात होत नाही. लेखक हेच पुढे कबूलतो ते असे : "शेतकर्‍यांनी कष्ट करावेत आणि ह्या लोकांनी कणसं खुडून न्यावी ? काय नीतीच्या गोष्टी करता हो. ...शेवटी कुणब्याकडेच खेटे घालतील ना ? " . असा अर्थ काढून दलित व कुणब्यांमध्ये हे लावून देणेही वाईट व निषेधार्यच आहे. कदाचित दलितांच्या लक्षात ही गोष्ट येईलच. शिवाय ज्या अकादेमीच्या मानसन्मानासाठी कादंबरीचा आटापिटा आहे, तिच्या सौंदर्यात काडीचीही अशा कलागतींनी भर पडत नाही.
आता असलाच, ब्राह्मणांविरुद्ध दाब वर येण्याचा, भैरप्पांच्या "जा ओलांडुनी" मधला, ( पृ.२२६) हा संवाद पहा. कथेची नायिका असलेल्या सत्या चा भाऊ ( जो ब्राह्मण व पुजारी असतो ) तो निवडणुकात ब्राह्मण-विरोधात कसा प्रचार करतात ते सांगताना म्हणतो:
"हजारो वर्ष घरात बसून ब्राह्मणांच्या बायकांनी आपली कातडी गोरी करून घेतली आहे, आमच्या बायका उन्हातान्हात शेतात राबून काळ्या झाल्या आहेत. त्या बिचार्‍या बामणांची घरची खरकटी भांडी घासत होत्या. माझ्या हातात आणखी दहा वर्ष सत्ता येऊ दे. बामणांच्या बायकांना आमच्या घरचे केरवारे करून खरकटी भांडी घासायला लावतो, आमच्या शेतांवर उन्हा-तान्हात राबायला लावतो--". आता भैरप्पांच्या कादंबरीचा मूळ रोख, प्रत्येक जात ब्राह्मणासारखे वागायचे प्रयत्न करते, असा वेगळाच असला तरी ब्राह्मण-विरोधाचा प्रसंग वर्णन करताना इथे पहा ते कसे सांगोपांग तर्क देत आहेत. असलेच तर हे खरे "दाब वर येणे " म्हणता येईल. ह्याला फ्राइडचा वरदहस्त नको किंवा ओढून ताणून ज्ञानेश्वरांचे विडंबन करायला नको. शिवाय सगळे कसे सभ्यतेत बसणारे आहे. बरे ह्या कादंबरीला खुद्द साहित्य अकादेमीनेच पुरस्कार दिलेला आहे. म्हणजे ती तुल्यबळ आहेच. भले नेमाडे आता शिकण्यापल्याड असतील पण नवशिक्या कादंबरीकारांना, एखादे विद्रोहाचे कसे वर्णन करावे, व समर्थनाचा पाया कसा मजबूत असावा, त्याचा हा आदर्श असा वस्तुपाठच आहे. (क्रमश: )
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

३ टिप्पण्या:

  1. अरूण भालेराव यांची टिपणी विचारपूर्वक केलेली असते. ती informed असते. भालेरावांनी ज्ञानेश्वरी व तुकारामी अभंग यांचा अभ्यास केलेला आहे. त्यांचं ज्ञानेश्वर तुकारामाकडं पहाणं पारंपरीक नाही, ते नव आहे, ताजं आहे. त्यात एक तटस्थपणा आहे, काळाचं भान आहे. कोणाही वारीकर किंवा कीर्तनकारांचं ऐकवत नाही, भालेरावांचं निरूपण लक्ष देण्यासारखं आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. मी तुमच्या मताशी सहमत आहे. भैरप्पा हे खरे देशी साहित्यिक आहेत. त्यांची कादंबरी एका अर्थाने वैश्विक आहे. " मंद्र" ही कादम्बरी वाचताना तो अनुभव आला. नेमाडेंच्या कादंबर्या त्या जवळी येत नाहीत. पांडुरंग सांगवीकरासारखे नेमाडेही भंकस आहेत असे वाटू लागते. उदाहरणार्थ , हिंदु मध्ये खूपच भंकसगिरी आहे. त्यांचे कोणते तत्वज्ञान आहे हेच समजत नाही. असो.

    उत्तर द्याहटवा