शुक्रवार, १० डिसेंबर, २०१०

भैरप्पा व नेमाडे:
एक तौलनिक अभ्यास:---५

निवेदन शैली:
बख्तिनच्या हुकुमाबरहुकूम "हिंदू"ची शैली विनोद, विडंबन, त्रागा, असणारी आहे. त्यात गोष्टीवेल्हाळपणा आहे. लोकवाङमायतले पोवाडे, गार्‍हाणे, अभंग, ओव्या, वगैरे असणारे आहे. त्यात उत्क्रांतीच्या कथा आहेत. बोली भाषेचा बाज आहे. नायकाचे निवेदन व इतर वर्णने अप्रतीम भारदस्त प्रमाण भाषेत आहेत. त्यात राजकारणातले नामांतर प्रकरण आहे. मराठवाडा विद्यापीठातले भ्रष्टाचार प्रकरणाचे किस्से आहेत. आधुनिक जागतिक वस्तुस्थिती सांगणारे ( नायकाला कसे सहा महिन्यात अमेरिकेतून व्हिसा संपला की हाकलतात,) शहरीकरणाने नायक कसा विव्हळ होतो, तरी मुलाच्या सोयीसाठी दहिसरला फ्लॅट घेऊन राहतो असे वस्तुस्थितिचे वर्णन करणारे आधुनिकपण आहे. प्रमाणभाषेचा भारदस्तपणा आहे, बोलीचा आभास आहे. बोधपर वचने आहेत, त्राग्याची स्वगते आहेत तर तात्विक चर्चा कराव्यात असल्या विषयांवरची भाषिते आहेत. एकूण नेमाडे म्हणतात तशी शैलीचीही समृद्ध अडगळ आहे.
भैरप्पांची भाषा अतिशय सरळ, बाळबोध, अनलंकृत अशी आहे. त्यात जी अवतरणे येतात ती कथेतली पात्रे जेव्हा श्लोक वगैरे म्हणतात तेव्हाच येतात. भर आहे तो निरनिराळ्या जातींची माहीती, त्यांचे रीतीरिवाजांचे बारकावे, त्यांच्या समजुती वगैरेवर. प्रसिद्ध प्रचलित म्हणी आहेत. इतिहासाच्या अभ्यासानिमित्त इतिहासावरची भाष्ये आहेत. उमा कुलकर्णी ह्यांनी आतापर्यंत ३८ पुस्तकांची भाषांतरे केलेली आहेत तसेच त्यांना बरेच पुरस्कारही मिळालेले आहेत. मुद्रणाच्या अनेक चुका असल्या तरी भाषांतरित भाषा सरळ साधी आहे. भैरप्पांची अशी हातोटी आहे की ते अतिशय बारकाईने व सावकाश वर्णन करतात. नायिका मळ्यात झोपडीत स्वयपाक करते असे दाखवताना चुलीवर ती कशी काटकसर करते, आधी कोणती भांडी घासून घेते, कपडे कसे वगैरे बारकाईचे निरिक्षण असते, त्यामुळे चित्र अगदी रेषा अन रेषाने चितारल्या जाते.
नेमाडेंना स्वत: अलंकारिक भाषा आवडत नाही. प्रमाण भाषा ही बोली भाषा बोलणार्‍यांच्या सहनशीलतेचे उदाहरण आहे , असा त्यांचा लाडका दावा आहे. कदाचित त्यामागे भाषेच्या साधेपणाच्या सौंदर्याचे भान असावे. असाच शैलीचा साधेपणाही भैरप्पांच्या लिखाणात भावणारा आहे. इथे नेमाडेंची अगडबम/भारदस्त प्रमाण शैली ही सरळ शैलीवाल्यांच्या सहनशीलतेचे उदाहरण ठरावे !
नेमाडेंची शैली गुंतागुंतीची, प्रचंड दाहक, व्यवस्थेच्या टोकाच्या विरोधासाठी प्रचंड शिव्या व विडंबन असलेली अशी आहे तर भैरप्पांची शैली सरळ, बाळबोध वळणाची, तरीही विचार प्रबोधन करणारी, अशी आहे. अर्थात ह्यावरून कोणती शैली चांगली व कोणती वाईट हे आपण ठरवू शकत नाही, पण फरक अवश्य जाणवू शकतो.
कादंबरी आत्मचरित्रपर केल्याने नेमाडेंना विश्वासार्हतेचा फायदा जरूर मिळतो पण त्याचबरोबर भैरप्पांची पात्रे जी उदात्ततेचा रंग लेतात ते नेमाडेंच्या पात्रांकडून हुकतेच. कल्पितकथेत नायिका मळ्यावर राहून हवन, शेती, अभ्यास, करू शकते; तिचे पुजारी वडील देवाला दगड म्हणू शकतात, वेडे होऊ शकतात; परत मुलीला वारसाहक्क देऊन आदर्शही होतात. असे नेमाडेंची पात्रे करू शकत नाहीत. त्यामुळे पात्रे वास्तवातली मुळमुळीत, रीतीनिष्ठ, पण लेखकाची व पात्रांची स्वगते मात्र जहाल असा विरोधाभासही जाणवतो. विद्रोहाच्या रंगासाठी नेमाडेंची आत्मचरित्रपर शैली थोडी तोकडी पडते तर भैरप्पांची कल्पितकथा विषयाला न्याय देते. ( क्रमश: )
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा