विद्रोह का ढोंग ?
------------------------
जसे म्हणतात की पैशांचा आव आणता येत नाही, तसेच जीवनात ढोंग फार काळ लपत नाही.
जेव्हा नेमाडे म्हणतात की बरे झाले माझी मुले आधुनिक शिकली व कमावती झाली, नाही तर अजून प्राध्यापकीत “पसायदान” शिकवीत बसली असती तेव्हा त्यांचा ज्ञानेश्वरांविरुद्धचा विद्रोह नाही तर आधुनिकतेची मोहिनी जास्त प्रकर्षाने दिसते व मग स्वतः ते आयुष्यभर “पसायदान” शिकवीत बसले ते कसे ढोंग होते हे पुढे येते.
म्हणजे पहा, ह्यांच्या सांग्विकराने सर्व प्राप्त रूढीविरुद्ध विफल व्हावे आणि ह्यांनी मात्र सर्व डावपेच वापरत यश कमवावे, कोसलाला अपार यश मिळावे, ज्ञानपीठ मिळवावे, हा काही दुर्विलास नव्हे तर चक्क हे ढोंग आहे. अर्थात त्यांना मुभा आहे की ते पांडुरंगावर ढोंगीपण ढकलू शकतात.
मराठीतले प्रसिद्ध भाषाशास्त्री अशोक केळकर ह्यांनी कोसला वर अभिप्राय देताना मोठे मर्मज्ञ विवेचन केले आहे. ते खाली वाचा :
"लेखकाचे माप ह्याप्रमाणे त्याच्या पदरात घातल्यावर ( म्हणजेhaving given the devil his due असं मला म्हणायचं होतं ) आपल्याला एक भयानक शंका ग्रासू लागते. पांडुरंग सांगवीकर अखेर निमित्तमात्र. ज्या मृतांचे धर्म निरूपावयाचे आहेत ते शंभरातले नव्व्याण्णव नव्हे. तर स्वत:ला मृत ठरवणारे एक--जीवनमृत. कादंबरीच्या मीच्या आतला मी--गिरधर. ज्याला "स्वदेशबंधु त्याज्य : स्वग्रामबंधु त्याज्य ; संबंधित : यांचा संबंधु : तो विशेषत: त्याज्य, "ज्याला घरी राहणे दिवसेंदिवस जड होते, काही एक करायचे नाही हेच ज्याचे विहित कर्म.
अनुभवाचे विघटन, त्याचे "वगैरे"करण ही नुसती सुरुवात, जमीनीची नांगरट. त्यात पेरणी करायची, ती आपण एकटे आहोत, काम्युने चितारलेला outsider आहोत, ए.ई.हाउसमनने व्यक्तविलेल्या " a stranger and afraid, In a world I never made" ह्या जाणिवेची. आधुनिक मानवाच्या विचार-कल्पनाविश्वातली ही एक महत्वाची जाणीव. हिची जातकुळी एकीकडे शेक्स्पियरच्या हॅम्लेटपर्यंत पोचते; दुसरीकडे बौद्ध, जैन, ह्यांच्यापर्यंत. आधुनिक मराठी साहित्यापुरते म्हणायचे तर मर्ढेकरांचे नाव सुचते . पण मर्ढेकरसुद्धा एक आनंदी, आशावादी प्राणी होता असे तुलनेने वाटावे इतके हे दुखणे विकोपाला गेले आहे.
माणसाला संवेदनक्षमता जरूर असावी. पण तो अवघा संवेदनाच होऊन गेला, "सम्" जाऊन वेदनाच शिल्लक राहिली, तर ज्या विश्वाची चिंता करायची त्या विश्वाशीच संबंध तुटतो---"जैसा स्वये बांधोन कोसला मृत्यू पावे".
आता ह्या केळकरांच्या अभिप्रायाचा काय अर्थ निघतो ? एक तर सॅलिंजरची कादंबरी निवेदन शैलीने जास्त यशस्वी आहे व "कोसला" नाही . कारण नेमाडेंना काय सांगायचे आहे तेच डेंजरस ह्या अर्थी गंभीर आहे. आणि दुसर्या परिच्छेदात ते कसे चूक आहे ते दाखविले आहे. एकटेपणाची जाणीव जरी वैश्विक असली तरी "काही एक करायचे नाही हेच ज्याचे विहित कर्म" ही विचारसरणीच कशी चूक आहे ते केळकर एका उदाहरणाने सांगत आहेत. एखाद्या पक्षाने घरटे ( कोसला ) बांधावे पण स्वत: मरून जावे तशीच ही नेमाडे सांगताहेत ती जाणीव आहे. ह्यापेक्षा तिखट अजून कोण लिहिणार आहे नेमाडेंच्या "कोसला"-पद्धतीच्या विचारांवर ?