बुधवार, २७ ऑक्टोबर, २०१०

सृजन-वेग
प्रगतीची झलक दाखवताना एका पुस्तकात बिल गेटस म्हणतात की दररोज प्रसिद्ध होणारी पुस्तके जर उभी लावली ( म्हणजे त्यांची जाडी मोजली, इंच-मैलात, ) तर इंग्रजी ज्ञानाचा वेग दर ताशी १०० ते १२० मैल भरेल. ह्यालाच मराठी ज्ञानाची तुलना केली तर हा मराठी पुस्तकांचा वेग ताशी ३०-४० मैल भरेल. पुस्तके ही सृजनशक्तीवर चालतात व त्यांचा हा प्रचंड वेग पाहता थक्क व्हायला होते की माणसे किती प्रचंड लिहीत असतात.
सर्जनशीलतेच्या शास्त्रात झटकन लिहून होते ते निर्मितीच्या झटक्यासरशी व ते सहजस्फूर्त असल्याने बर्‍यापैकी असू शकते असे मानतात. म्हणजे सहज रात्री अपरात्री कवीला कविता सुचली, दिसली तर ती त्याने आठवडाभर "र"ला "र", "ट"ला"ट" जोडीत केलेल्या कवितेपेक्षा ज्यास्त चांगली समजतात. कवींना, लेखकांना कधी कधी महिनोन महिने काहीच सुचत नाही. ह्या अवस्थेला "रायटर्स ब्लॉक" किंवा "लेखनाचा बांध" म्हणतात. ह्या वेळच्या त्यांच्या काहीच न सुचण्याला अर्थातच चांगले म्हणता येत नाही.
आता नेमाडेंनी त्यांची पहिली कादंबरी "कोसला" ही वयाच्या पंचविसाव्या वर्षी अवघ्या आठ दिवसात लिहिली म्हणतात. म्हणजे सर्जनाचा वेग किती प्रचंड असेल नाही का ? जर ही कादंबरी ३०० पानांची व प्रत्येक पानावर २५० शब्द धरले तर ७५,००० शब्द आठ दिवसात म्हणजे दिवसाकाठी ९३७५ शब्द होतात. त्याउलट "हिंदू" ही कादंबरी ६०३ पानांची व प्रत्येक पानावर २८० शब्द धरले तर एकूण १,६८,८४० शब्दांची होते. ही कादंबरी नेमाडे म्हणे ३५ वर्षांपासून लिहीत होते. तर हा वेग मोजला तर भरेल दर दिवशी १३.२ शब्द. अवघे १३ शब्द ! हे काय सृजन म्हणायचे का सृजनाचा वांधा ? उन्हाळ्यात कधी कधी आपल्याला उन्हाळी लागते तेव्हा छप्पन्न वेळा बाथरूमला जाऊन अवघे काही थेंब येतात व प्रचंड दाह होतो. ही तर नेमाडेंची सृजन-उन्हाळीच म्हणायची ! फरक इतकाच की उन्हाळी त्यांना व दाह वाचकाला अशी परिस्थिती !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

1 टिप्पणी: