गुरुवार, १९ डिसेंबर, २०१३

-----------------------
गर्वसे कहो हम "मग्रूर" है !
-----------------------------------
आजच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये एक "रसिक" नावाने एक स्फुट आले आहे. त्यात म्हटले आहे की भालचंद्र नेमाडे ह्यांनी "कोसला"च्या २२ व्या आवृत्तीसाठी जी प्रस्तावना लिहिली आहे त्यात कोसलाचे प्रथम प्रकाशक रा.ज.देशमुख ह्यांना धुरंधर व मग्रूर म्हटले आहे. त्यावर तिथले आजचे हर्डीकर वगैरे त्यासंबंधीचा पत्रव्यवहार खुला करू इच्छित आहेत.
एवढे कष्ट कशाला घ्यायचे ? नेमाडेंना ज्यांचा कुसुमाग्रज पुरस्कार मिळाला त्या कुसुमाग्रजांबद्दल ते बिढार मध्ये काय म्हणतात ते पहा व ठरवा की "मग्रूर" कोण आहे ?
बिढार ( पृ.४१) : "सकाळपासून कुसुमाग्रजाला शिव्या देतोय, कुठं म्हातारं तडफडायला आलं आमच्या नवीन पोरांच्यात ! मग मी त्याला एक क्लासिक उपमा सांगितली. भाद्रपदात नवीनवी कुत्री प्रयत्न करत असतात एखाद्या कुत्रीवर, तेव्हढ्यात एखादं म्हातारं आडदांड निब्बर कुत्रं मध्ये घुसून ताव मारून निघून जातं, तसं प्रधानचं झालं ! खरं म्हणजे सगळीकडे म्हातारी कुत्री बोकाळलीयत. साहित्य परिषदात तीच, बक्षीसात तीच, रेडिओवर , साहित्य अकादमीत, साहित्य संमेलनात---सगळीकडे हेच बाप्ये मनमुराद. तिकडे नेहरू आणि इकडे साले हे."
--------------------------------

बुधवार, १८ डिसेंबर, २०१३

नेमडी

सहजासहजी देशीपणाचे डाग लेखनावर पाडून घेतले
महानुभाव मासिकापासून ग्रामीण साहित्यापर्यंत
प्रत्येकाचे स्वतंत्र राष्ट्रगीत नि राष्ट्रध्वज झाला
तेव्हा मोघम चिखलफेक करीत कपडे झटकले

वासरांच्या कळपात लंगडी गाय होण्यासाठी
कैक वर्षे वेशभूषा केशभूषा चाचपून नीट केली
स्टेजवर एकदम एन्ट्री घेतली ती टाळ्यांच्या कडकडाटात
वाक्याची फेक अशी की प्रॉम्प्टर, नाटककार, नाट्यसमीक्षक
मूळसंहिता, चष्मा, कान शोधण्यात दंग

‘वाचा’ जुनी बंद झाली मागे
म्हणून उपेक्षित सेमिनार्समधून बंदुकीचे बार काढले
येडपटांना जाळ्यात पकडण्यासाठी जुगारवाले
दोनचार बनावट गिऱ्हाईके ठेवतात तसे
हातपुसण्यांना सेमिनार्समधून वापरले

इतके योजनाबध्द, पुन्हा सशासाठी वाघाच्या
शिकारीची तयारी की,
अश्वमेधाचा घोडा धरणे सोडा, टापांच्या आवाजाने
लोक पळू लागले
‘मराठी समीक्षक कळवा अन् हजार रुपये मिळवा’
असे भिंतीभिंतींवर लिहिल्याने
टीका करायला कुणी उरलेच नाही

गैरसोयीची तितकी बंधने तोडली, सोयीची तेवढी मानली
खंत वाटणाऱ्या गोष्टींचा पहाटे पाचपर्यंत जागून
ताळेबंद केला
कॉलेज बदलणे या अनुभवाचे भांडवल केले
विद्यापीठात नोकरी पकडून
अपयशाला थोर मानले
ही यशाची सर्वात मोठी गुरूकिल्ली ठरली
तरीही पुचोळाभर मुलाखतींनी ** पुसून घेतली स्वतःची

एक चुकलं
ते उघड कबूल करण्याचा प्रश्नच नाही म्हणा
पूर्वीच्या प्रेयसींना लिहिलेली पत्र नव्या बायकोच्या
संसारात छापून येत आहेत
प्रेम आणि एकपत्नीत्वातली विसंगती
सुचवू पाहताहेत साले प्रच्छन्नपणे

वास्तविक लेखक ते लेखकराव असाच हा विकास
ते सोडा... प्रीती परि तुजवरती... असं काही रचू

सफल लेखकांच्या तावडीत सापडले की हे असे होणारच
परवडणारा नव्हता त्यांचा कळप
शिवाय त्यांच्या श्रेणीत सिनियारीटी मार खाते
म्हणून निव्वळ बालविधवा लेखकांचा स्वामी झालो आयता

© विश्वास वसेकर
---------------------
प्रथमपुरुषी एकवचनी
( भालचंद्र नेमाडे यांच्यासाठी )..............कवी : दासू वैद्य ( कविता-रती, दिवाळी २०१३ मधून )
-----------------------------------------------------------------
प्रथमपुरुषी
एकवचनी,
वणवण भटकला,
प्रत्येकाने हटकला,
जमेल तिथे स्पष्टीकरण
शक्य तिथे तुष्टीकरण.
राहिला चालत,
आवरेना सुसाट सुटलेलं कथानक
मानवेना रचनेची परंपरा
उपकथानकातल्या अनपेक्षित घटना
घुटमळू लागल्या पायांत,
अगम्य हेलकाव्यांनी
हिंदकळू लागलं अस्तित्वाचं पाणी,
आधार म्हणून कधी ओढ म्हणून
बिलगत गेला एकेका नात्याला.
अडकला पात्रांच्या दाट जाळीत
पसरला जलरंगासारखा भाषेमधून,
कथानकाची गाडी
शेवटच्या स्टेशनात येऊन थांबल्यावर
चाचपले त्याने स्वत:चे खिसे,
खिशात सापडलेल्या
तिकिटावरच्या गावाची अक्षरं
स्टेशनवरच्या नावाशी
किंचितही नव्हती जुळणारी.
तरीही उत्सवी लोक होतेच बाहेर
स्वागताला उत्सुक,
उद्‌घोषणांच्या गोंगाटात
लोक वाजत-गाजत घेऊन गेले
यशस्वी कथानकाला,
प्रथमपुरुषी एकवचनी
शोधू लागला स्टेशनबाहेर
टॅक्सी, रिक्षा, टांगा
इप्सित स्थळी पोचण्यासाठी.

----------------------------------------------
कवितेच्या शीर्षकाखाली कंसात "भालचंद्र नेमाडे यांच्यासाठी" असे लिहून कविता करण्याची ही जुनी परंपरा पुनरुज्जीवित करण्यासाठी श्री. दासू वैद्य ह्यांचे अभिनंदनच करायला पाहिजे. एकेकाळी कवियत्री इंदिरा संत ह्यांनी "केशराचा मळा" ह्या शीर्षकाची कविता श्री. ना.सी. फडके ह्यांच्यावर केलेली मला चांगलीच आठवते. ही जुनी पद्धत असली तरी एका कवीवर, साहित्यकावर कवितेतून केलेली ही अप्रतीम अशी समीक्षा म्हणता येईल.
नेमाडेंना ज्या गावी जायचे होते तिथे ते पोचले नाहीत आणि तरीही लोक त्यांचे स्वागत, उद्‌घोष करीत आहेत असे निष्कर्षाचे वाक्य ह्या कवितेत मोठे कळीचे आहे. नेमाडेंचे सुरुवातीचे लेखन पाहता त्यांना समीक्षेच्या गावी जायचे होते असे कोणालाही वाटते. पण त्यांनी नंतर केवळ कादंबरीची कास धरली व ते भलत्याच गावी पोचले असे कवीला वाटत असावे. किंवा पुरस्कारांच्या भाषेत बोलायचे तर नेमाडेंनी बहुदा "तिकीट" काढलेले गाव "ज्ञानपीठ"चे असावे व ते पोचले फक्त "साहित्य-अकादमी"ला, असाही सूर वरील कवितेतून जाणवू शकतो. अर्थात इथे "ज्ञानपीठ" ऐवजी नेमाडे "नोबेल"चेही तिकिट काढते तरी पोचलेल्या गावी त्यांचा सत्कारच होता. इथे दासू वैद्य समीक्षेच्या पद्धतीने हे दाखवू इच्छित आहेत की त्यांनी जी "प्रथमपुरुषी-एकवचनी" अशी कादंबरीतून शैली अवलंबिली, ( आत्मकथा व काल्पनिक कादंबरी ह्यांचे मिश्रण केले ), त्याने त्यांच्या उपकथानकातल्या पात्रांशी बरेच घोटाळे झाले, त्यांच्या अस्तित्वाचं पाणी ( पोटातलं ) हिंदकळू लागलं. तसेच दासू वैद्य नेमाडेंना त्यांच्या कादंबरीतल्या भाषासौष्ठवासाठीही दाद देत आहेत ते "पसरला जलरंगासारखा भाषेतून"  असे म्हणत. हे अप्रतीम भाष्य समीक्षेच्या प्रांतात गद्यात अशक्यच झाले असते इतके ते इथे काव्यमयरीतीने अवतरले आहे.
नेमाडे "हिंदू" ही कादंबरी, तीन भागात ( अशी त्यांची जाहीरात होती ) आणि गेली ३०/३५ वर्षे लिहीत होते ह्या सृजन-उन्हाळीवर दासू वैद्य अशी टिप्पणी करीत आहेत की "आवरेना सुसाट सुटलेलं कथानक, व मानवेना रचनेची परंपरा !". ही मोठी मार्मिक टिप्पणी असून ते नेमाडेंच्या आवाक्यावर भाष्य करणारे आहे.
जसे परंपरेने आपण घेतलेला वसा टाकत नाही तसेच कदाचित नेमाडे जी शैली ( प्रथमपुरुषी-एकवचनी ) आजही टाकत नाहीत त्यावर दासू वैद्य म्हणत आहेत की शेवटच्या स्टेशनावर पोचल्यावरही ह्या लेखकाला अजूनही टॅक्सी, रिक्षा, टांगा यासारखे एखादे वाहन इप्सित स्थळी पोचण्यासाठी शोधावे लागत आहे. हे एकप्रकारे प्रत्येक लेखकाचेच भागधेय असल्यासारखेही आहे.
कवितेतून समीक्षा करण्याचा हा अनोखा प्रकार आहे आणि त्यात श्री.दासू वैद्य यशस्वी झाले आहेत असेच म्हणावे लागेल.
-----------------------------------


शनिवार, ३ ऑगस्ट, २०१३

प्रसिद्ध भाषाशास्त्री अशोक केळकरांची "कोसला"वरची मते :
----------------------------------
प्रसिद्ध भाषाशास्त्री श्री. अशोक केळकर हे प्रकांड पंडित, विद्वान, भाषाशास्त्री असून ते नेहमी हसत खेळत आणि एक प्रगल्भ विनोदबुद्धी ठेवून रोखठोक लिहितात. त्यांनी "कोसला" ह्या कादंबरीवर जे परिक्षण ( पृ.२४२-२४५, रुजुवात ) लिहिले आहे त्यातले काही मोजके अभिप्राय पाहण्यासारखे आहेत :
१) "अमेरिकन लेखक जे.डी.सॅलिंजर ह्यांच्या "The Catcher in the Rye ( 1951)" ह्या कादंबरीशी प्रस्तुत कृतीची तुलना केली गेली आहे, तिच्याबद्दल दोन शब्द. कळविण्यास अत्यंत वाईट वाटते की, वाङ्मय फौजदारांना ह्यामध्ये काही मसाला मिळण्यासारखा नाही. साम्यस्थळे जरूर आहेत, पण भेद अधिक महत्वाचे आहेत.
The Catcher in the Rye ही जास्त यशस्वी कादंबरी आहे. जीवनाचा एक पट प्रथमपुरुषी निवेदनात उलगडून दाखवणे आणि कथेतल्या "मी’ला धक्का न लावता सांगायचे ते सांगून टाकणे हा तांत्रिक प्रस्न सॅलिंजर पुढेही आहे आणि तो त्याने निराळ्याच पद्धतीने सोडविला आहे.
फरक पडतो तो काय सांगायचे आहे ह्याबद्दल. "कोसला" ही अधिक गंभीर ( म्हणजे Serious; solemn नव्हे, भारतीयांच्या मनातली एक नेहमीची गल्लत ! ) कादंबरी आहे".
२) "लेखकाचे माप ह्याप्रमाणे त्याच्या पदरात घातल्यावर ( म्हणजे having given the devil his due असं मला म्हणायचं होतं ) आपल्याला एक भयानक शंका ग्रासू लागते. पांडुरंग सांगवीकर अखेर निमित्तमात्र. ज्या मृतांचे धर्म निरूपावयाचे आहेत ते शंभरातले नव्व्याण्णव नव्हे. तर स्वत:ला मृत ठरवणारे एक--जीवनमृत. कादंबरीच्या मीच्या आतला मी--गिरधर. ज्याला "स्वदेशबंधु त्याज्य : स्वग्रामबंधु त्याज्य ; संबंधित : यांचा संबंधु : तो विशेषत: त्याज्य, " ज्याला घरी राहणे दिवसेंदिवस जड होते, काही एक करायचे नाही हेच ज्याचे विहित कर्म.
अनुभवाचे विघटन, त्याचे "वगैरे"करण ही नुसती सुरुवात, जमीनीची नांगरट. त्यात पेरणी करायची, ती आपण एकटे आहोत, काम्युने चितारलेला outsider आहोत, ए.ई.हाउसमनने व्यक्तविलेल्या " a stranger and afraid, In a world I never made" ह्या जाणिवेची. आधुनिक मानवाच्या विचार-कल्पनाविश्वातली ही एक महत्वाची जाणीव. हिची जातकुळी एकीकडे शेक्स्‌पियरच्या हॅम्लेटपर्यंत पोचते; दुसरीकडे बौद्ध, जैन, ह्यांच्यापर्यंत. आधुनिक मराठी साहित्यापुरते म्हणायचे तर मर्ढेकरांचे नाव सुचते . पण मर्ढेकरसुद्धा एक आनंदी, आशावादी प्राणी होता असे तुलनेने वाटावे इतके हे दुखणे विकोपाला गेले आहे.
माणसाला संवेदनक्षमता जरूर असावी. पण तो अवघा संवेदनाच होऊन गेला, "सम्‌" जाऊन वेदनाच शिल्लक राहिली, तर ज्या विश्वाची चिंता करायची त्या विश्वाशीच संबंध तुटतो---"जैसा स्वये बांधोन कोसला मृत्यू पावे".
आता ह्या केळकरांच्या अभिप्रायाचा काय अर्थ निघतो ? एक तर सॅलिंजरची कादंबरी निवेदन शैलीने जास्त यशस्वी आहे व "कोसला" नाही . कारण नेमाडेंना काय सांगायचे आहे तेच डेंजरस ह्या अर्थी गंभीर आहे. आणि दुसर्‍या परिच्छेदात ते कसे चूक आहे ते दाखविले आहे. एकटेपणाची जाणीव जरी वैश्विक असली तरी "काही एक करायचे नाही हेच ज्याचे विहित कर्म" ही विचारसरणीच कशी चूक आहे ते केळकर एका उदाहरणाने सांगत आहेत. एखाद्या पक्षाने घरटे ( कोसला ) बांधावे पण स्वत: मरून जावे तशीच ही नेमाडे सांगताहेत ती जाणीव आहे. ह्यापेक्षा तिखट अजून कोण लिहिणार आहे नेमाडेंच्या "कोसला"-पद्धतीच्या विचारांवर ?
-------------------------------------------- 

मंगळवार, ११ जून, २०१३

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19295542.cms

संजय पवार ह्यांचा लेख वाचा : शंभरातील नव्याणवांना हे समजेल ? 

----------------------------------------
नेमाडे असे का वागतात ?
---------------------------
विचारवंतांचे वलय अनेकांना मोहविते. ते नेमाडेंनाही आकर्षित करीत असेल तर त्यात वावगे नाही. पण विचारवंतांचे मुख्य कसब असते ते म्हणजे तर्क. आणि शिस्तशीर, पद्धतशीर विचारांची मांडणी, त्यांची समर्थने व संदर्भ. कुठलाही पीएच.डी.चा प्रबंध पहा त्यात हीच शिस्त दिसेल. पण हे नेमाडेंनी कधी केले नाही. केले ते फक्त "टीकास्वयंवर", देशीवादावरचे काही लेख ह्यामधून. बरे त्यातही आपले गैरसमज दडपून सांगणेच ज्यास्त केले आहे. आता हे वैगुण्य भरून काढायचे तर तर्क-सदृश रकानेच्या रकाने ते आपल्या कादंबर्‍यांतून वा पात्रांमार्फत ठोकून देतात. त्यांना वाटते की ह्यात काही अंगलट आले तर ह्या पात्रांची चोरवाट आपलीच आहे. पण आजकाल असे होत नाही. बखिन ह्यानेही कबूलले आहे की पात्रांची मते ही लेखकाचीच असतात.
ई-संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रथमच ते कबूलतात की मी संगणकात अज्ञ आहे. पण ह्या संगणकाच्या वापरामुळे कागद किती वाचतो त्या फायद्यासाठी मी ह्या ई-संमेलनाला कबूल झालो. तर्काची, ज्ञानाची एक अट अशी असते की आपल्याला माहीत असो वा नसो आधी त्यावरचा ज्यांनी चोखंदळपणे अभ्यास केला आहे ते पहावे. आता कोणीही गुगलवर चौकशी केली तर त्याला कळेल की ह्या संगणक प्रणालीत इतकी प्रचंड वीज लागते की गुगल, इंटेल वगैरे कंपन्या आता वीज-निर्मीतीत उतरलेल्या आहेत. अशा अवस्थेत कागद वाचतो हे समजणे अगदी बावळटपणाचे आहे. एखाद्या साहित्यिकाने त्यावर न भाष्य करणे रास्त ठरते पण "मी विचारवंतच" हा ज्यांचा समज असतो त्यांना ठामपणे असे फशी पडावेच लागते. जर ते आपले क्षेत्र नाही तर सामान्य माणूस थोडी चाचपणी करतो, माहीती काढतो, पण त्याचे जातीवंत विचारवंताला काय हो ?
ज्या त्यांच्या मुलांनी प्राध्यापकी नाकारली व परंपरा मोडत "पसायदान" शिकवीत बसले नाहीत त्याच मुलांच्या लग्नात नेमाडेंनी कसे पारंपारिक रीती आचरल्या वगैरे हकीकती त्यांच्याच शिष्यांकडून ऐकू येतात, ते एकवेळ खाजगी बाब म्हणून सोडले तर ह्या विचारवंताला हा तर्क कसा समजत नाही की असे म्हटल्याने ज्ञानेश्वरांचे पसायदान हे कमी प्रतीचे ठरते व नेमाडे तर स्वत:ला परंपरावादी/देशीवादी म्हणवतात . त्यात तरी हे कसे बसवावे ?
विचारवंतपणाचा हा मोह भल्या-भल्यांना वेड लावतो. निदान जरा जुजबी अभ्यास तरी करावा, अगदी नेमाडपंथी विचारवंतांनी-सुद्धा !
-------------------------------------

रविवार, २४ मार्च, २०१३

नेमाडेंना इतिहासाची शिस्त नको, पण इतिहास वळवायचा आहे.

---------------------------------------------------------------------------
नेमाडेंना इतिहासाची शिस्त नको, पण इतिहास हवा तसा वळवायचा आहे.
--------------------------------------------------------------
    पार्ल्याच्या एका देशीवादाच्या भाषणात मी नेमाडेंना प्रश्न विचारला होता की तुम्ही हिंदूत ज्ञानेश्वरांची, रामदासांची, बुद्धाची जी टिंगल केली आहेत ते पुस्तक खपावे म्हणून केले आहे काय ? ह्यावर ते म्हणाले होते की टिंगल करायचा त्यांचा उद्देश नव्हता, पण सामाजिक संदर्भ उपलब्द असावेत म्हणून त्यांची हिंदू त योजना केलेली आहे. ह्याच हिंदू च्या प्रमोशन मध्ये ज्या ज्ञानेश्वरीची मुंबई विद्यापीठाने संशोधन करून आवृत्ती काढली त्या राजवाडेंबद्दल "हा म्हातारा इतका धूर्त होता की त्याने पदरच्या ओव्या घुसडल्या असल्या पाहिजेत अशी शंका येते" असे म्हटले आहे. जर लक्षपूर्वक पाहिले तर नेमाडे हे निबंध क्वचितच लिहितात. कारण निबंधात तर्काचे, योग्य संदर्भांचे बंधन येते व पुरावे द्यावे लागतात. त्यामानाने कादंबरीत काहीही ठोकून द्यायची मुभा असते. त्यामुळे कादंबरी लेखन हे नेमाडेंचे एक प्रकारे इतिहासाचे पुनर्लेखनच आहे. अर्थात ते तसे करण्याची त्यांना मुभा व अधिकार आहेच. पण नामदेवांना मध्यवर्ति स्थान हवे असे म्हणताना ऐतिहासिक लेखन न करता भावनिक आवाहन करणे हा एक व्यूहाचाच भाग होतो. जसे हिंदूत नेमाडेंनी महानुभाव पंथाच्या नायकाच्या आत्येला केंद्रस्थानी आणले आहे.
    नेमाडेंची जात वा धर्म काढणे हे तसे प्रशस्त नाही. पण मनोविश्लेषणात्मक समीक्षेच्या अंगाने ते स्वत: महानुभाव पंथाचे असल्याने त्याचे त्यांच्यावर काही प्रभाव उमटले असतील का हे पाहणे रास्त ठरावे. शं.गो. तुळपुळे ह्यांच्या ग्रंथात नुसती श्रीकृष्ण-स्वयंवराची प्रकरणे पाहिली तर दिसते १) नरेंद्र व नृसिंह यांची रुक्मिणीस्वयंवर काव्ये २) संतोषमुनीचे रुक्मिणीस्वयंवर ३) कृष्णमुनि-कविडिंभ-कृत नवखंड-रुक्मिणीस्वयंवर ४) लक्षधीर-कृत रुक्मिणीस्वयंवर ५) एल्हाणाचे रुक्मिणीस्वयंवर ६) हंसबा स्वयंवर इतकी ती मुबलकपणे असताना नेमाडेंच्या  एकमेव समीक्षाग्रंथाचे शीर्षक "टीकास्वयंवर" असावे हे ह्याच प्रभावाचे लक्षण दाखवते. तसेच इतिहास आपल्याला पाहिजे तसा लिहायला हवा हे महानुभाव पंथात सवयीचे असले पाहिजे अशा अर्थाची मराठी विश्वकोशातली ही टिप्पणी पहा : "भासकरभट पंथाचे आचार्य असताना, मुसलमानी आक्रमाच्या काळात ते कोकणात जात असताना, लीळाचरित्र, ऋद्धिपुरचरित्र, स्थानपोथी इ. ग्रंथांच्या अधिकृत पोथ्या चोरांकडून लुबाडल्या गेल्या. त्यानंतर हिराइसा आदी अनेक शिष्यांकडून आपापल्या आठवणीप्रमाणे त्यांचे पुनर्लेखन करण्यात आले. ते करताना त्यांनी इतरांच्या ‘वासना’ ही नमूद केल्या. त्यामुळे या ग्रंथांत अनेक पाठभेद निर्माण झाले आणि पुढेपुढे त्यांत अधिकाधिक भर पडत गेली. "* ( लिहिण्यातल्या चुका मुळातल्याच आहेत. मी फक्त कॉपी पेस्टले आहे ). आता असे महानुभाव पंथात घडत असेल तर साहजिकच त्यांना हिंदूंच्या ग्रंथातही असे व्हावे असे वाटू शकते व त्याच प्रमाणे त्यांचे व्यूह असणे स्वाभाविक ठरावे. असेच आता अनेक संतांचे भाग्य ते उजळू शकतील !
-----------------------------------------------
* पहा "मराठी विश्वकोशातले हे पान : लिंक : http://marathivishwakosh.in/khandas/khand12/index.php?option=com_content&view=article&id=10505

गुरुवार, २१ मार्च, २०१३

दुय्यम दर्जाच्या लोकांना येतेय महत्व !

-------------------------------------------
दुय्यम दर्जाच्या लोकांना येतेय महत्व
-------------------------------------
    प्रथम नेमाडेंचे आभार की त्यांनी एका दुय्यम दर्जाच्या कवीचा ( पहा टीकास्वयंवर पृ.११५) म्हणजे आंग्ल कवी टी.एस.इलियट चा इतका आदराने उल्लेख केला आपल्या अध्यक्षीय भाषणात ( पहा : युनीक फीचर्सचे तिसरे मराठी साहित्याचे ई-संमेलन ). त्यामुळे काय कारण असावे ह्या कवीचा असा अध्यक्षीय भाषणात उद्धार व्हावा, ते शोधणे क्रमप्राप्तच होते.
    नेमाडेंचा विषय चालला आहे देशीवाद हा . त्यात इलियट हाही कसा परंपरावादी होता हे सांगत ते त्याच्या कंडोम वापराबाबतचे मत देत आहेत, "टी. एस. इलियटचंही एक उदाहरण या संदर्भात देता येईल. त्या काळात इंग्लंडमधे कंडोम वापरण्याचं शिक्षण मुलांना द्यावं किंवा नाही यावर वाद सुरू होता. त्यासंबंधी इलियटला विचारलं, तर तो म्हणाला, ‘असं शिक्षण अजिबात देऊ नये. कारण मुलांना हे कळलं पाहिजे की, आपली बायको सोडून दुसरीकडे जाणं बरोबर नाही. आपल्या परंपरेतच ते आहे. कंडोम वापरण्याचं शिक्षण देऊन गुप्तरोग काही कमी होणार नाही, फक्त कंडोमनिर्मितीचे कारखाने मात्र चालतील.’ इलियटसारखा मोठा कवीसुद्धा परंपरा मानणाराच होता."
    प्रथम तपासणे आले की इलियट खरेच असे म्हणाला होता का ? असल्यास का ? तर असे सापडते की इलियट असे म्हणाले होते की कंडोम वापरून आपले स्वास्थ्य सांभाळण्यापेक्षा आपले चारित्र्य ( दुसर्‍या बाईकडे न जाणे) सांभाळणे हे ज्यास्त महत्वाचे आहे व शालेय शिक्षणात त्यावर भर असायला हवा. ( T.S. Eliot (1886-1965), poet and critic, wrote that modern thinkers are always “dreaming of systems so perfect that no one will need to be good.” Some views of sex education display this mentality. They assume, in Barbara Dafoe Whitehead’s words, “a deeply technocratic understanding of teenage sexuality.” In other words, “once teenagers acquire a formal body of sex knowledge and skills, along with the proper contraceptive technology, they will be able to govern their own sexual behavior responsibly.”

Responsible sexual behavior, in this view, does not involve virtuous ordering of one’s sexual feelings, passions, and emotions for the sake of making morally good choices. Rather, all that’s required to be sexually “responsible” is a condom. Allegedly, one can avoid both pregnancy and sexually transmitted diseases with this contraceptive technology. It is the quick fix, technical solution for avoiding harm, in short, “safe sex.” The assumption seems to be that harming one’s health is the only issue at stake. Totally ignored is the question of harming one’s character, of being morally good. Indeed, as William Kilpatrick rightly says, “The link between sex and character is a missing link in sex education.” )
 ह्याबद्दल दुमत नसले तरी समाजमनाला संततीनियमनाचे पर्याय उपलब्ध असलेच पाहिजेत ह्या आधुनिक व्यक्तिस्वातंत्र्याच्या सोयीसाठी कंडोम वापरावर अवश्य भर द्यावाच लागतो, आधुनिक काळात.
    आता म्हणे येऊ घातलेल्या कादंबरीतून ( हिंदू २ व ३) नेमाडे म्हणताहेत की मी हिंदू धर्मात परंपरा जोपासत लोकांनी कसे बदल घडवून आणलेत ते दाखवणार आहे. आत्ता आपल्या लक्षात येईल की इलियटचे संदर्भ का येत आहेत. कारण टी.एस.इलियट ह्यांचा एक प्रसिद्ध निबंध आहे Tradition and Individual Talent ( परंपरा आणि वैयक्तिक कर्तब ) . ह्या निबंधात इलियट न्यू क्रिटिसिझमचे तत्व मांडत सांगत आहेत की कोणताही बदल नवीन लेखक करतो तेव्हा तो परंपराही पाळत असतो. हेच तर नेमाडे देशीवादातून मांडत आले आहेत.
    ह्या देशीवादावर अगदी सामान्यांना समजेल असे थोरात ह्यांनी देशीवाद : भूमिका आणि उपयोजन ( पृ. १७९ , साहित्याचे संदर्भ ) ह्या लेखात फार छान मांडले आहे. थोरात म्हणतात : " जे आहे ते बरोबरच आहे, किंवा एखादी गोष्ट आहे म्हणून ती बरोबर आहे, अशी ही भूमिका आहे. मूल्यांच्या निर्मितीचा आणि अनुभवांच्या अर्थनिर्णयनांचा अधिकार पूर्णपणे संस्कृतीच्या हाती सोपवला की तिची आतून किंवा बाहेरून केली जाणारी चिकित्सा अशक्य होते. तिच्याबद्दल कोठल्याही प्रकारचे प्रश्न उपस्थित करता येत नाहीत. उदाहरणार्थ व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा गैरलागू ठरतो, कारण ते पाश्चात्य मूल्य आहे. जातपात न मानणे चुकीचे ठरते, कारण जातिव्यवस्था हे भारतीय संस्कृतीने आपल्या नागरिकांना मानाने जगण्यासाठी उपलब्ध करून दिलेले उपकरण आहे.....एखादी गोष्ट आहे म्हणून ती बरोबर आहे, ही भूमिका बदलाला नकार देणारी, उदारमतवादाला विरोध करणारी आणि सनातनी आहे. परिस्थिती आहे तशी ठेवण्यात ज्यांना रस असतो, अशा लोकांच्या ती सोयीची आहे."
    तर असा नेमाड्यांना देशीवादाची स्फूर्ती देणारा, नोबेल पारितोषिक मिळालेला ( पहिल्या पत्नीला वेड लागल्यावर तिला १५ वर्षे न भेटणारा व ६८ व्या वर्षी ३० वर्षाच्या सेक्रेटरीशी लग्न करणारा ( ती मागच्याच महिन्यात वारली ), हा आंग्ल कवि त्याच्या प्रसिद्ध "द वेस्ट लॅंड" ह्या कवितेची शेवट "शांती शांती शांती" अशी करतो तेव्हा तो जणु नेमाडेंचाच देशीवाद उचलून धरत आहे असा नेमाडेंना भास झाला असल्यास नवल नाही.
    दुय्यम लोकांना आजकाल महत्व येते आहे हे मात्र खरे !
--------------------------------------------------------------

बुधवार, २० मार्च, २०१३

नेमाडेंचा प्रवास थांबवा !

------------------------
नेमाडेंचाच प्रवास थांबवा !
-------------------------
    जनस्थान पुरस्काराच्या वेळी समजा त्यांची चूक झाली असेल असे मानले तर आता मराठी साहित्य ई-संमेलनातही त्यांनी चूकच करावी हे त्यांच्या स्वभावाप्रमाणे होते किंवा जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही हेच खरे ठरते. मराठी साहित्य ई-संमेलनाच्या अधिकृत भाषणात देशीवादासंबंधी बोलताना नेमाडे म्हणतात :
"पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेकडे पाहा. तिथे आता खूप अपघात होतात. वास्तविक तिथे प्रवासाच्या अनेक सोई आहेत, पोलिस आहेत; पण तरी अपघात कमी होत नाहीत. आता पूर्वीच्या पुणे-मुंबई मार्गाचं पाहा. तिथे शिंगडोबाचं देऊळ असायचं. तिथे प्रत्येक वाहन थांबलं पाहिजे, नारळ वगैरे ठेवून पुढे गेलं पाहिजे, अशी परंपरा होती. यातला अंधश्रद्धेचा भाग सोडा, पण एवढ्या मोठ्या घाटाच्या प्रवासात कुठे तरी थांबणं आवश्यक असतं, त्यामुळे तुम्हीही थंड होता आणि इंजिनही थंड होतं. पण एक्स्प्रेस हायवेवर असं होत नाही. तिथे आपल्याला वेगाची धुंदी आलेली असते. मग सूचनांचे कितीही बोर्ड लावले तरी त्याने अपघातांचं प्रमाण कमी होत नाही. म्हणून परंपरेने काही गोष्टी तुम्हाला दिलेल्या असतील, तर त्या फार विचार न करता मान्य केल्या पाहिजेत."
    जनस्थान पुरस्काराच्या वेळेसही त्यांनी हेच उदाहरण दिले होते. त्यावर मी लिहिले होते की त्यांना अंधश्रद्धा-निर्मूलन कायद्याखाली अटकच करायला पाहिजे. तेव्हा आता त्यात सुधारणा करत त्यांनी एक वाक्य टाकले आहे की "यातला अंधश्रद्धेचा भाग सोडा,..." आता सिमल्याच्या संस्थेत नेमाडेंनी वाहतूक संचालनाचे काही शिक्षण घेतल्याचे ऐकीवात नाही. शिवाय नेमाडेंच्या अनेक पदव्यात वाहतूक व्यवस्थेची काही पदवी नाहीय. नेमाडेंचा हा विषयही नाही. तेव्हा सबंध भारतभर एक्स्प्रेस-वेंचा मोठ्ठा कॉरीडॉर होत असताना लोकांनी सलग प्रवास करू नये असे नेमाडे कशाच्या जोरावर म्हणत आहेत ? मुंबई ते पुणे अवघे दोन तास तर लागतात, त्यातही थांबावे हे म्हणणे कसल्या देशीवादाचे लक्षण आहे ? मला वाटते नेमाडेंची सध्या जी पुरस्कार मिळण्याची घोडदौड चालली आहे तिने त्यांना भोंवळ आली असावी. म्हणूनच त्यांना पुरस्कार देणार्‍यांनी ( जसे: साहित्य अकादमी, ज्ञानपीठ, नोबेल वगैरे ) अंमळ थांबावे कारण नेमाडेंचा देशीवाद त्यांना थांबण्यास सांगतो आहे !
-----------------------------------------

मंगळवार, १९ मार्च, २०१३


इंटरनेट निरक्षरता
--------------------------

"खरं तर मी इंटरनेटच्या क्षेत्रात पूर्ण निरक्षर माणूस आहे, पण या गोष्टींचे फायदे काय याची मला पूर्ण कल्पना आहे. एक तर इंटरनेटमुळे कागद लागत नसल्यामुळे ते पर्यावरणपूरक माध्यम आहे. त्यामुळे मी सुरुवातीपासूनच ई-रीडिंग, ई-बुक अशा नव्या माध्यमांमधल्या सहभागाला कायमच होकर देत आलो आहे, आताच्या ई-संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारण्यासही मी त्या कारणानेच होकार दिला आहे. अशा उपक्रमांची वाढ होणं ही चांगलीच गोष्ट आहे."-----तिसर्‍या मराठी ई-साहित्य-संमेलनाचे अध्यक्ष : नेमाडे

आता स्वत: नेमाडेंनीच कबूलल्याप्रमाणे ते निरक्षर असल्याने आपणच इंटरनेटने खरेच फायदा होतो का हे पहायचे ठरवले तर काय कळते ? इंटरनेट हे फुकटचे आहे असे वाटणे पटणारे नाही. कारण इंटरनेट जोडणीसाठी दर महिन्याला कमीत कमी २५०/३०० रुपये मोजावे लागतात. शिवाय त्यात GB ची जी मर्यादा असते ती ओलांडली तर ज्यास्तीचा खर्च येतो. संगणक चालवायला शिवाय वीज लागते. ही वीज किती लागत असावी ? आपल्याला जे दर महिन्याचे विजेचे बिल येते त्यात एसी ,गीजर, फ्रिज, टीव्ही, लाईट व संगणक ह्या उतरत्या श्रेणीने संगणक शेवटी असल्याने खुष व्हायचे कारण नाही, कारण संगणकांची एकूणातली संख्या प्रचंड मोठी आहे. अमेरिकेत गेलो असताना, सॅन होजे येथे एक इमारत ३२ मजल्याची दाखवण्यात आली जी गुगल कंपनीची एक डेटा-सेंटरची इमारत होती. त्यात म्हणे मोजकीच माणसे, पण प्रचंड संगणकीय आयुधे असतात. अशा अनेक कंपन्यांचे डेटा सेंटर्स असतात. सगळ्य़ांचे मिळून कैक हजार . ह्यांना एकूणात वीज किती लागते?  तर गुगल आता स्वत: वीज निर्मितीच्या क्षेत्रात उतरली आहे त्यावरून किती वीज लागते त्याचा अंदाज यावा .
आता खालचा व्हिडीओ पहा. तो सांगेल की किती प्रचंड वीज लागते इंटरनेटला आणि ते किती पर्यावरण ढवळते ते. आता नेमाडेंचे खरे की ह्या व्हिडिओतले ? पहा बुवा ! मी तर नेहमीच नेमाडेंच्या विरोधात असतो !

गुरुवार, ७ मार्च, २०१३

नेमाडेंची तर्कदुष्टता ( fallacy)

---------------------------------------
नेमाडेंची तर्कदुष्टता ( fallacy )
--------------------------------------------
    जनस्थान पुरस्कार स्वीकारतानाच्या भाषणाची टेप ऐकलीत तर नेमाडेंनी केलेले एक अजब तर्कट लक्षात येते व ते कसे तर्कदुष्ट आहे ते इथे पाहू.
    बलात्कार आणि जेंडर रेशो ह्यावरचे विकीपीडीयाचे जुजबी वाचन केलेले असेल तर हे ध्यानात येईल की बलात्काराचे मूल तत्व हे नराने स्त्रीला तिच्याशी संभोग/लैंगिक अत्याचार करताना तिचा नकार देण्याचा अधिकार नाकारणे हे आहे हे कोणासही कळेल. आजकालच्या स्त्रीसंघटना भारतात लग्नसंबंधातला बलात्कारही ( Marital rape ) कायद्याच्या आधिपत्याखाली आणावा ह्या मताच्या आहेत. अमेरिकेत सर्व स्टेटस्‌ मध्ये हा कायदा लागू असून पुरुषांनी बायकोची संमती नसताना केलेल्या संभोगाला कायद्याने बलात्कार समजून शिक्षेची तरतूद केलेली आहे. तसेच हा कायदा जगात १०४ देशात लागू आहे. ( जगात एकूण देश १९८ आहेत). जन्मतानाचे जेंडर रेशो हे कालांतराने स्त्री-पुरुषांच्या वेगवेगळ्या मरण्याच्या प्रमाणांमुळे( mortality) वेगवेगळ्या वयोगटासाठी वेगळे असतात. पुरुष ज्यास्त प्रमाणात मरतात ( जसे लढाया व स्थलांतरे मुळे) व त्यांचे आयुष्यमानही स्त्रियांपेक्षा कमी असते ( पुरुषांचे ६८, तर स्त्रियांचे ७२). त्यामुळे अमेरिकेत जन्मतानाचे पुरुषांचे प्रमाण दर हजार स्त्रियांमागे जर १०५० पुरुष असे असले तरी १५ ते ६५ वयोगटासाठी ते वरील कारणांमुळे दर हजार स्त्रियांमागे ७२० इतके कमी होते.  भारताचे आकडे घेतले तर जन्मावेळी भारतात स्त्रियांचे प्रमाण दर हजार पुरुषांमागे ८९२ असे आहे, जे १५ ते ६५ वयोगटासाठी ९३४ इतके वाढते व ६५ वर्षापुढच्या वयोगटासाठी ११११ स्त्रिया दर हजार पुरुषांमागे असे होते. आता एवढ्या जुजबी माहीतीनंतर नेमाडेंचे तर्कट बघा:( ज्यांना जरा विस्ताराने हे प्रकरण वाचायचे आहे त्यांच्यासाठी विकीपिडीयाची लिंक अशी :  http://en.wikipedia.org/wiki/Human_sex_ratio  )    :
    नेमाडे म्हणतात की समजा स्त्रियांचे लोकसंख्येतले प्रमाण चारशेने ( दर हजार पुरुषांमागे ) कमी आहे, म्हणजे चारशे पुरुषांना स्त्रिया कमी पडतात. ह्यापैकी समजा २०० पुरुषांनी संयम पाळला असेल, पण उरलेले २०० जण एक नॅचरल इंस्टिंक्ट म्हणून बलात्कार करणारच. .....
    तर्कशास्त्रात ( लॉजिक) तर्कदोष अथवा तर्कदुष्टता ( fallacy of logic) नावाचे एक प्रकरण असते. त्यात सकृदर्शनी तर्काने बरोबर वाटणारे विचार कसे चुकीचे असतात त्याची उदाहरणे देतात. सर्वाधिक लोकप्रिय उदाहरण असते, वर्तुळातल्या तर्काचे. म्हणजे "आधी अंडे का आधी कोंबडी" हया विवेचनाचे. आपण एका वर्तुळात तर्क देत राहतो, पण ती एक तर्कदुष्टता/तर्कदोष असते/तो. असेच दुसरे तर्कदुष्टतेचे उदाहरण देतात जेव्हा समोरच्या माणसाच्या अज्ञानाचा ( वा विरोध न करण्याचा ) फायदा घेत दुसर्‍याने दामटून चुकीचे विधान करणे. ही एक तर्कदुष्टताच असते. नाशिकच्या श्रोत्यांनी विरोध केला नाही म्हणून चुकीचा विचार दामटून सांगणे हे चुकीचेच व तर्कदोषच राहते. जसे वरच्या भाषणात सांगितलेले १) बलात्कार हे पुरुषांच्या नॅचरल इंस्टिक्टने होतात २) स्त्रियांचे लोकसंख्येतले प्रमाण कमी झाल्याने वंचित पुरुष बलात्कार करतात. वर्ल्ड हेल्थ ऑरगनायझेशनने जी आकडेवारी व अभ्यास प्रसिद्ध केलेला आहे त्यात हे कुठेही नाही. वरच्या परिच्छेदात जेव्हा आपण पाहतो की अमेरिकेतले जन्माच्या वेळेसचे पुरुषांचे प्रमाण १५-६५ वयोगटासाढी १०५० वरून कमी होत ७२० इतके कमी होते, तेव्हा पुरुष कमी झाल्याने त्या वयोगटातल्या स्त्रिया काही पुरुषांवर बलात्कार करीत नाहीत. शिवाय बलात्कारात स्त्रीचा संमती नाकारण्याचा हक्क कसा डावललेला असतो, व म्हणूनच त्याला बलात्कार म्हणतात, हे कोणाही वाचकाच्या लक्षात येईल. खरे तर सर्व प्रगत समाजात एकट्या स्त्रीला कुठेही वावरता आले पाहिजे अशाच समजुतीचे लोकव्यवहार संमत असतात. त्यात एका मान्यवर संस्थेच्या व्यासपीठावरून असे पुरुषसत्ताक व बुरसटलेले विचार प्रसृत करणे हे कधीही हितावह नाही.
    ह्या वक्तव्याची दखल घेत महाराष्ट्रातील तमाम स्त्री-पुरुषांनी ह्या तर्कदुष्टतेचा निषेध केला पाहिजे व तसे कुसुमाग्रज प्रतिष्ठानला कळविले पाहिजे. नेमाडेंनी माफी मागायला हवी, पुरस्कारही परत करावा इतकी ही तर्कदुष्टता गंभीर परिणामांची निश्चितच आहे.
(कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे संकेतस्थळ : http://www.nashik.com/organisation/kpratisthan.html  )
-------------------------------------------------

शनिवार, २ मार्च, २०१३

गालिबची प्रेमाची परंपरा आणि नेमाडेंचा प्रेमाचा विद्रोह !

---------------------------------------
गालिबची परंपरा आणि नेमाडेंचा प्रेमाचा विद्रोह !
-----------------------------
    कुसुमाग्रजांचा जनस्थान पुरस्कार स्वीकारताना कवितांसंबंधी नेमाडेंना भरून येणे हे साहजिकच होते. तशात त्यांनी गालिबला सोबतीला घ्यावे हे रीतीला, परंपरेला धरूनच आहे. नेमाडे बोलतही परंपरेबद्दलच होते. तर आपल्याला जे सांगायचे आहे ते अजून थोरा मोठ्यांनीही कसे सांगितलेले आहे असे संदर्भ देण्याची आपल्याकडे परंपरा आहे. त्यातल्या त्यात एखादा अवघड विषय असेल किंवा त्यावरचा साग्रसंगीत अभ्यास असेल ( जसे पिएच.डी.चे प्रबंध ) तर असे संदर्भ मुद्दाम द्यावेच लागतात.
    ह्या भाषणात नेमाडे परंपरा आणि विद्रोह ह्याचा उहापोह करताना म्हणत आहेत की परंपरा ह्या जाणीवपूर्वक तपासून घ्यायला हव्यात व त्यात विद्रोह करायचा असेल तर तो प्रेमाने करावा. हे सांगत असताना त्यांनी उदाहरण म्हणून सांगितले की आपल्याकडे रोमॅंटिसिझम ही भानगड परंपरेत नव्हती. जे काही सांगायचेय ते नीट विचारांती, छंदात, दोन ओळीत सांगणे होते. ह्याला समर्थन म्हणून ते गालिबची साक्ष काढतात. म्हणतात की गालिबनेही म्हटले आहे की प्रेम हे बेबुनियाद ( बिन पायाचे ) असते तर एकनिष्ठता ही निश्चित पायाची असते. त्यामुळे ऍन्थ्रॉपॉलॉजिस्ट म्हणतात त्याप्रमाणे संततीही निकोप होते.
    गालिबचे समर्थन म्हणून नेमाडे जो गालिबचा शेर उदाहरणादाखल सांगतात त्याची ओळ ते अशी देतात : "वफा मुकाबिल ओ धावा ए इश्क बेबुनियाद ". आता ह्याचा नेमका अर्थ नेमाडे सांगताहेत तसाच आहे का वेगळा आहे, हे पाहण्यासाठी थोडा अभ्यास करू.     गालिबचा मूळ शेर दोन ओळींचा असा सापडतो:
"वफा मुकाबिल ओ दावा ए इश्क बेबुनियाद
जुनूने साख्ता ओ फस्ले गुल कियामत है"
( अर्थ :प्रियेला म्हटले आहे , तू एकनिष्ठ बनावीस आणि आमचा प्रेमाचा दावा खोटा निघावा (ही आश्चर्येच). जसा वसंत ऋतू यावा पण प्रेमवेड हे बनावटी (खोटे) असावे असाच हा प्रकार आहे...
संदर्भ - मिर्जा गालिब आणि त्याच्या उर्दू गझला (सेतुमाधवराव पगडी)
    इथे गालिब आपल्या प्रियेला म्हणत आहे की माझ्या प्रेमाचा दावा बिनपायाचा किंवा खोटा निघावा हे आश्चर्यच आहे, जसे वसंत ऋतू यावा पण प्रेम आसमंतात पेटून निघण्याऐवजी ते बेगडी, बिनपायाचे वा खोटे निघावे असेच आश्चर्याचे हे आहे.
    "हजारो ख्वाईशे ऐसी के हर ख्वाईश पे दम निकले" अशी प्रेमाची तुतारी वाजवणारा गालिब ह्या वरच्या शेरात प्रेम खोटे ठरावे ह्याबद्दल आश्चर्य व्यक्त करीत असताना नेमाडेंना गालिबने प्रेम हे बिनपायाचे असते तर एकनिष्ठता खरी असते असे वाटावे हे महदाश्चर्यच म्हणायला हवे. बरे नेमाडेंचा गालिबचा अभ्यास नसेल असेही अनुमान काढता येत नाही . कारण एकट्या "हिंदू"तच त्यांनी ४०-५० गालिबचे शेर उदधृत केलेले आहेत. तर ह्या अर्थाच्या भिन्नतेचा अर्थ कसा लावायचा ?
    कदाचित मी जशी पुढचे मागचे संदर्भ तोडून विधाने उदधृत करतो, आणि अशी परंपरा अनेक जण पाळतात, तीच परंपरा नेमाडे पाळत असावेत. किंवा हा त्यांचा प्रेमाने केलेला विद्रोह असावा !
--------------------------------------------------------------------------


शुक्रवार, १ मार्च, २०१३






-------------------------------
रोमॅंटिक नेमाडे ?
-----------------------
    जनस्थान पुरस्कार स्वीकारतानाच्या भाषणात नेमाडे म्हणाले की परंपरेचा चोखंदळपणे विचार करून मग ती पाळावी. आपल्या परंपरेत नसलेले आपण केले तर ते चुकीचे होते. जसे, ते म्हणाले, आपल्याकडे रोमॅंटिसिझम ही भानगड नव्हती. काही कवींनी ती उगाचच आणली. मग कोणी कोणाच्या कुरळ्या केसावर कविता करी, कोणी विशाल भालप्रदेशावर....
    आता हे खरे की खोटे हे तपासण्यासाठी मी काही कवितासंग्रह तपासू लागलो. तर काय आश्चर्य ! अगदी नेमाडे म्हणतात तसेच... हे कवी बघा केसांवर काव्य करीत आहेत. उदाहरणादाखल खालील कवितेच्या काही ओळी पहा :

"लामणदिव्याच्या उजेडात
कशी विणीत बसलीस वेणी...
.......
आणि अबंध अबंध केसांच्या वाटा...
.......
केसांच्या कडांवरून घसरतात बोटांची पावलं
..........
दे सोडून केसाकेसांच्या आकाशगंगा होऊ दे---
........
केसाकेसांवर उडू दे त्या विश्वह्रदयाच्या अनाकारबद्ध नाड्या..
..........
ढवळत रहा ह्या नितळखोल केशसमुद्रातून
..........."
हा कवी कुरळ्या केसांवर नव्हे पण लामणदिव्याच्या उजेडात कोण वेणी विणीत बसलेय ते सांगतो आहे. न बांधलेल्या केसांच्या त्याला अबंध वाटा वाटत आहेत. त्याच्या बोटांची पावलं केसांच्या कडांवरून घसरत आहेत. तो तिला म्हणतोय की ह्या जणू केसांच्या आकाशगंगाच आहेत व त्या तिने सोडून द्याव्यात. त्या केसांवर विश्वाच्या ह्रदयाच्या नाड्या उडाव्यात. आणि तिने असेच ह्या नितळखोल केशसमुद्रात ढवळत बसावे, म्हणजे केसात हात फिरवावा....
    व्वा ! अगदी खरेच निघाले की हे वर्णन, कुरळ्या केसांसारखे रोमॅंटिक !
......आणि कोण आहे हा कवी ? तर अहो तेच स्वत:ला थोर कवी म्हणवणारे भालचंद्र नेमाडे. ( भाषणात ते म्हणाले होते की मी थोर कवी आहे हे मी जाणतो, तसेच मी थोर कादंबरीकार नाही हेही जाणतो....काय विनय ना ! )
आणि कविता आहे : लामणदिव्याच्या उजेडात ( पृ.७१, दृश्यांतर, चंद्रकांत पाटील संपादित, नॅशनल बुक ट्रस्ट )

---------------------------------

-----------------------------
स्त्रीविरोधी नेमाडे !
-----------------------
    जनस्थान पुरस्कार स्वीकारतानाच्या भाषणात नेमाडेंनी स्त्रियांना एक बंडखोरी करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, की स्त्रियांनी स्त्री-भ्रूण-हत्येविरुद्ध फाशीची शिक्षा मागावी, नाही तर स्त्रियांची संख्या इतकी कमी होईल की ते सिमल्यात पाहतात तसे चारपाच पुरुषात मिळून एकच बायको राहील. मानववंशशास्त्रानुसार प्रत्येक पुरुषाला एक बाई हवी व त्यासाठी स्त्रियांनी ह्या स्त्री-भ्रूण-हत्येविरुद्ध जोरदार शिक्षेची मागणी करायला हवी.
    उपदेश बरोबर असला तरी तो चुकीच्या कारणासाठी त्यांनी दिला आहे. पुरुषांना निदान एक तरी बाई मिळावी ह्या कारणासाठी नाही तर स्त्रीला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून मान/न्याय/अस्तित्व मिळावे ही कोणाही स्त्री-पुरुषांची ह्या जेंडर-रेशो-इंम्बॅलेन्स वरची प्रतिक्रिया असली पाहिजे.
तसेही नेहमीच नेमाडे स्त्रीवादी भूमिकेच्या बेदखलीवर पोसलेले आहेत हे त्यांचे साहित्य वाचणार्‍यांना लगेच समजेल. "आधुनिक समीक्षा-सिद्धान्त" ( ले: मिलिंद मालशे/अशोक जोशी ) ह्यांत स्त्रीवादाचा उहापोह करताना म्हटले आहे, ( पृ. २४७) "केट मिले या लेखिकेने Sexual Politics या ग्रंथामध्ये अशी भूमिका मांडली आहे की, पितृसत्ताक समाजव्यवस्था ( patriarchy ) हे स्त्रियांच्या शोषणाचे आदिकारण आहे; आणि आर्थिक व्यवस्था भांडवलशाहीवादी असो वा साम्यवादी असो, स्त्रियांचे शोषण दोहोंमध्ये होतच राहते. समाज कोणत्याही प्रकारचा असला तरी स्त्रियांविषयीचे विशिष्ट प्रकारचे पूर्वग्रह सार्वत्रिक स्वरूपात आढळतात, याचे प्रत्यंतर आपण वर उल्लेखिलेल्या ऍरिस्टॉटल, पेटर, प्रभृतींच्या भूमिकांवरून आलेलेच आहे. लोकशाहीवर आधारलेल्या समाजव्यवस्थांमध्येसुद्धा स्त्रीविषयक कल्पनांचे रूढीबद्ध साचे ( stereotypes) वापरले जातात, आणि त्यांच्याद्वारे पितृसत्ताक व्यवस्थेला स्त्रियांचे शोषण करता येते, त्यांना अबला बनविता येते, विशिष्ट सामाजिक-सांस्कृतिक व्यवहारांपासून त्यांना दूर ठेवता येते, अशी भूमिका केट मिलेने मांडली."
    ज्या कुसुमाग्रजांचा पुरस्कार नेमाडेंना मिळाला ते आज हयात असते तर असे पुरुषसत्ताक बरळणे पाहून ते म्हणाले असते :
        "उजेडात दिसू वेडे
        आणि ठरू अपराधी"
-------------------------------------------

मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१३

हेच का नेमाडे ?








"बिढार" ( पृ.४१-४२) ले: भालचंद्र नेमाडे
''सकाळपासून कुसुमाग्रजाला शिव्या देतोय, कुठं म्हातारं तडफडायला आलं आमच्या नवीन पोरांच्यात ! मग मी त्याला एक क्लासिक उपमा सांगितली. भाद्रपदात नवीनवी कुत्री प्रयत्न करत असतात एखाद्या कुत्रीवर, तेवढय़ात एखादं म्हातारं आडदांड निब्बर कुत्रं मध्ये घुसून ताव मारून निघून जातं. तसं प्रधानचं झालं! खरं म्हणजे सगळीकडे म्हातारी कुत्री बोकाळलीयत. साहित्य परिषदांत तीच, बक्षिसांत तीच, रेडिओवर, साहित्य अकादमीत, साहित्य संमेलनात-सगळीकडे हेच बाप्ये मनमुराद. तिकडे नेहरू आणि इकडे साले हे..''
    " स्वातंत्र्य मिळायच्या आधी साले तरुण होते तेव्हा यांना संधी नव्हती. नुस्ते कातावले होते. सत्तेचाळीसनंतर आणि संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर साल्या सरकारनी धडाधड उत्तेजनपर प्रकार सुरू केले. तेव्हा ही म्हातारी मंडळी त्यावेळची राहिलेली खाज भागवायला तुटून पडली. आज इतकी वर्ष झाली तरी ह्या निब्बर लोकांची चढायची हौस कमी होत नाही. तुम्हा नवीन पोरांचं कौतुक कोण करणार ह्या गर्दीत ? "

--------------------
तर नेमाडेंच्या मते कुसुमाग्रज हे निब्बर व आडदांड कुत्र आहेत. अप्रतीम उपमा आहे. पूर्वी दत्ताच्या तसबिरीत श्वान दाखवलेले असत. श्वान म्हणजे देवाचे लाडके. त्यातल्याच एका आडदाड श्वानाचे प्रतीक करीत कुसुमाग्रजांना नेमाडे ह्यांनी हा बहुमानच केला आहे. ह्याच प्रतिमासृष्टीचे देखावे बघताना मग संजय भास्कर जोशी हे अजून एका डॉग-स्क्वॅड मधले श्वान वा चालक असावेत. त्यांनी इतर पुस्तकांचे गठ्ठे हुंगून हुंगून नेमाडेंचे साहित्य बिनधोक ठरवले हे बरे झाले ! आता त्यावर इतर श्वान मंडळी आपापली तंगडी वर करतीलच !
आता ह्या श्वान प्रतिमेला जागून स्वत: नेमाडे हे कुठल्या प्रकारचे श्वान आहेत असा प्रश्न निर्माण झाला तर त्यांच्या झुबकेदार मिशा आठवा व आठवा एक लाडके केसाळ श्वान, ज्याचे तोंड कुठे व ढुंगण कुठे हे दाट केसाळ प्रतिमेत दिसत नाही. हेच का नेमाडे ?
-----------------------

गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१३

----------------------
ओवेसी कदाचित उदारमतवादी---नेमाडे ?
--------------------------------------------
    श्री.श्रिकांत उमरीकर ह्यांनी भालचंद्र नेमाडे ह्यांची ४० वर्षांपूर्वीची एक कविता देत नेमाडे कसे उस्फुर्तपणे धर्मांध मुस्लिमांना जवाब देत आहेत, त्यांच्या तुमानीत...वगैरे.. त्याची वाखाणणी केली आहे.
    कदाचित श्रेष्ठ विचारवंतांचे हे एक लक्षण असावे की त्यांच्या साहित्यात कायम परस्पर विरोधी विचारांचे दर्शन होत असते. कारण १९८३ साली लिहिलेल्या ( म्हणजे ३० वर्षांपूर्वी ) एका लेखात ते म्हणतात : ( टीकास्वयंवर पृ. १२०, ):
"देशीयतेचा अतिरेक एखाद्या समाजाला आत्मकेंद्रित करून र्‍हासशील करू शकतो, हे आपण मागे अंतर्जननासंबंधीच्या चर्चेत उल्लेखले. जगातल्या इतर समाजापासून विभक्त राहाण्याची प्रवृत्ती त्यामुळे आपोआपच बळावते. एक प्रकारचा वंशाभिमान आणि आत्मसंतुष्ट जीवनव्यवहार अशा समाजात वाढतात. साहजिकच अशा संस्कृती परकीय आक्रमणात नष्ट होण्याची भीती असते. अल्‌-बिरुणीने इसवी सनाच्या दहाव्या शतकाच्या आधी अस्तित्वात असलेल्या ब्राह्मण-केंद्री हिंदू समाजात अशा देशीयतेचा अतिरेक अतिशय स्पष्टपणे वर्णिलेला आहे. तथापि हिंदुस्थानला आपला देश मानून निर्माण झालेल्या, उदारमतवादी मुसलमान वर्ग आणि महानुभाव-वारकरी अशा ब्राह्मण्यविरोधी संप्रदायांनी देशभर उभारलेल्या आत्मशुद्धीपर देशीवादी चळवळींनी हिंदुस्थानातील समाजाचा पाया पुन्हा नव्याने घालून सर्वनाश चुकविला....... "
    नेमाडेंच्या आगामी हिंदूनंतरच्या कादंबरीत कदाचित मुसलमानांच्या उदारमतवादाचे चित्र पहायला मिळणार असावे. कारण हिंदूतला हिरो पाकिस्तानात असूनही त्यात मुसलमानांसंबंधी काहीच ( चांगले वा वाईट ) नव्हते. कदाचित ब्राह्मणांनी हिंदू धर्म बिघडवला हे प्रमुख चित्र दाट करण्यासाठी त्यांनी हे केले असावे. आता मुसलमानांच्या तुमानीचे काही खरे नाही. बा अदब, मुलाहिजा....उदारमतवादी महानुभाव-मुसलमान-युती येत आहे..!
------------------------------------------------------------