गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०१०

नेमाने नेमाडे---९
स्त्रीवादाचा बुरखा
स्त्रीवादाचा पुळका हे आजकाल एक प्रकारचे "गिव्हन"च असते. स्त्रियांबद्दल धन्योदगार काढणे म्हणूनच एक प्रकारची बांधिलकीच मानावी लागते. हे तोंडदेखलेपण नेमाडे चांगले सांभाळतात जेव्हा ते मोघम म्हणतात की, "स्त्री ही सामाजिक कल्पना आहे का जीवशास्त्रीय ?" पण त्यावरचे उत्तर "हिंदू" त् ते कुठेच देत नाहीत. उलट नीट न्याहाळले तर खालील विधानांवरून त्यांची स्त्रियांकडे पाहण्याची ( किंवा बिलकुल न पाहण्य़ाची ) दृष्टी पारंपारिक पुरुषी असल्याचेच दिसून येईल:
(पृ.२६):"मुक्त ह्या संस्कृत शब्दाऐवजी आपला देशी शब्द मोकाटच ह्या संदर्भात वापरला पाहिजे. बस. तेवढ एक झालं की आपल्या मुली सुधारल्याच समज. लैंगिकदृष्ट्या लहानपणापासून ह्या बायका मोकाट असल्यानं पुढे काही भीड राहत नाही. व्यभिचाराचीही शक्यता ह्यात गृहित धरली जाते. प्रत्यक्षात लैंगिक अतिचार अशाच बाया करतात."
(पृ.१५७):"...अरे, पण सुईच्या मर्जीशिवाय दोरा जाईल काय ? "
(पृ.२०६):"..ह्या मारवाड्याच्या सारख्या दिसणार्‍या पोरांना गावातल्या शेतकर्‍यांच्या कामानं रंजलेल्या बायका, रे, इकडे ये बरं. तू कोणाचा ? असं विचारायच्या, मग त्यानं बापाचं नाव सांगितलं, की सगळ्य़ा पोट धरधरून हसायच्या. धनमत्सर. "
(पृ.२५७):"गाय आणि बायको---संध्याकाळशी दावणीला पाह्यजे."
(पृ.२६३):"आता दोन राण्याही गेल्या, त्यामुळे हल्ली एकाच बायकोत आवडती आणि नावडती दोघी आलटून पालटून पाहावं लागतं."
(पृ.२८०):"...मला पहा अन फुलं वाहा....लभान्यांनो, सवतीची फुगडी अन फेडा एकमेकीची लुगडी."
(पृ.३४०):" कि अबला वरतारे दाबली नं खाले भलत्याची नार."
(पृ.३४६):"...हे पहा वहिनी, कुलूप एकीकडे अन किल्ली एकीकडे असं चालतं का ?"
(पृ.३९०):"स्त्रीवादाविरुद्ध आम्ही सगळ्यांनी चर्चासत्राच्या आधीच नीट तयारी केली होती" हे वाक्य केळ्यांवरून सुचणे हे म्हणजे अश्लीलतेची कमालच.
(पृ.४२२):"..का वं ए नागरगोंडी, लई छाती काढून दबोयती का आम्हले ?....उंदरं खाता साल्या, त्याच्यागुनं पाहा कशा घागरी याहिच्या.." ( स्त्रीपात्रे अशीच ठेवल्यामुळे लेखकाला सर्वत्र पहा कशा इरसाल शिव्या वाहता आल्या आहेत.).
(पृ.४३८):"...गुरुची शिष्या गुरूला फळली..."
(पृ.४५२):"...दक्षिणेतूनच स्त्रीदाक्षिण्य हा शब्द आला असावा..."
(पृ.५३८.):"...बायकोला मी सोडून दुसर्‍यापासून मूल नाही होऊ शकत ?...ही नैतिकता भारतीयांच्या केंद्रस्थानी यायला पाहिजे."
कादंबरीचा नायक ब्रह्मचारी दाखविल्यामुळे एक स्त्रीपात्र वाया घालवले आहे. शिवाय जेव्हा तो म्हातारा होतो तेव्हा मुलाशी होणारा बेबनाव लेखकाला महत्वाचा वाटतो पण म्हातारीच्या जाणीवा दाखवण्याचे कटाक्षाने टाळण्यात आले आहे. खंडेरावाच्या लहानपणी बापाची व्यक्तिरेखा रंगविली आहे, पोराच्या डोळ्याच्या जखमेची कणव दाखविली आहे, पण आईचे कोणतेही थोरपण चितारलेले नाही. हे विशेष जाणवण्याचे कारण, लेखक साहित्यिकात फक्त "श्यामची आई" वाल्या साने गुरुजींनाच मानतो, तरीही आईचे थोरपण चितारीत नाही. कादंबरीत स्वत:ची ओळख पटवण्यासाठी वाचकाला स्त्री पात्रेच उपलब्ध नसतील( जी पात्रे आहेत ती लभान्या, रांड, अशा,किंवा महानुभावी आत्यासारख्या संन्याशीण ) तर स्त्रीवाद कसा वाखाणायचा ? अखेरच्या घटकेला दुसर्‍या आत्येवरचा अन्याय दाखवलाय पण नायक त्याचे निराकरण करीत नाही, पारंपारिकतेने म्हणतो, बायकांनी सहनशील रहावे.
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा