शनिवार, १९ मार्च, २०११

बख्तिनचे ओंगळ रुपडे
"हिंदू" : भालचंद्र नेमाडे


मिखाइल बख्तिन ह्यांचे एक पुस्तक आहे, "द डायलॉगिक इमाजिनेशन" ह्या नावाचे. त्यात कादंबरी ह्या प्रकाराचा मोठा आढावा घेऊन काही आडाखे निरिक्षिलेले आहेत. त्या अनुषंगाने भाषाशास्त्रातली काही तत्वेही दिलेली आहेत. ह्या पुस्तकाची ही प्रस्तावना करण्याचे कारण असे की "हिंदू" ही भालचंद्र नेमाडेंची कादंबरी बरीचशी ह्या बख्तिनच्या तत्वांनुसार लिहिली आहे असे जाणवते. (निदान अकादेमीचा पुरस्कार तरी त्यांना ह्याच कारणास्तव मिळणारा असावा !)
एक उदाहरण पहा: उदा: पृ.१५६ वर हे पहा: "एक बुला वेसकर. वेशीखालच्या देवडीत बसलेला. हा ह्याच नावानं विख्यात होण्याचं कारण आजूबाजूला कोणी नाही, हे चाणाक्षपणे पाहून हा एकदम त्याच्या धोतरातली बुल्लीच मुठीत धरून आम्हा पोरांना दाखवायचा. पुन्हा धोतर खाली टाकून साळसूद चेहर्‍यानं काहीच झालं नाही, किंवा काहीच केलं नाही, असं दाखवायचा. हे कोणाला सांगायचं तरी कसं ? याचा अर्थ आपल्याला तेव्हा लागत नव्हता. आता लागतो: सवर्ण हिंदू -अस्पृश्य संबंधाचा तो दृष्टांत होता, कव्हणी एकु कुरवंडी करीत सांता कुरघोडी करी त्या वेसकरीयाचा दृष्टांत. जैसे फ्राइडचा सिद्धांत जातीयतेत मोडून सांगितल्यास जैसे होईल तैसे. किंबहुना ज्ञानेश्वर : ऐसा शिवमुष्टिगुंडु । घेउनु ठाके ॥ अस्पृश्यता एक हजार वर्षांपासून आहेच, तेव्हापासूनचे दाब असे वर येतात. "
बख्तिनचे म्हणणे असे की भाषेच्या प्रकारांमध्ये संवाद ह्या प्रकारात अर्थाच्या सर्वात ज्यास्त शक्यता आढळू शकतात. ह्या उतार्‍यात संवाद असा पारंपारिक प्रकारात दिलेला नाहीय, पण लेखक वा नायक तुमच्याशी संवादच करीत आहे ( "हे कोणाला सांगायचं तरी कसं ?"). त्यानंतर लेखक एक भाषण / ( डिस्कोर्स ) देत आहे, ज्यात तो सांगतो की वेसकराने धोतर वर करून बुल्ली दाखवणे हे ब्राह्मणांनी वेसकरांवर पूर्वी जे अत्याचार केले त्याची प्रतिक्रिया म्हणून "वर आलेला हा दाब" आहे. आता हे सांगतांना अर्थातच संवाद नाहीय, तर निश्चित नैतिक भूमिका घेऊन काढलेले अनुमान आहे. कशावरून हे खरे? तर पुष्ट्यर्थ फ्राइड ह्या मानसोपचारतज्ज्ञाचा निर्वाळा आहे. पण, जेव्हा कोणी असे वागतो तेव्हा मानसशास्त्र सांगते की ती एक विकृती असून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न ( अटेंशन डेफिशियन्सी सिन्ड्रोम ) असतो. किंवा क्वचित प्रसंगी, समजा आपण बाथरूम मध्ये टॉवेल न्यायला विसरलो, व पॅसेजमधला वाळत टाकलेला टॉवेल घ्यायला तसेच बाहेर आलो, तर असे अपघाताने होते. काही ठिकाणी ( जसे अमेरिकेत मोठमोठ्या क्लबातून सामूहिक बाथरूम मध्ये) लोक नागडयाने वावरू धजतात. पण बाहेर योग्य कपडे घालूनच येतात. कधी कधी क्रिकेट मॅच दरम्यान कोणी नागडयाने मैदानावर पळतो. त्याला मग पोलीस अटक करतात. ह्या सर्व प्रतिक्रियांमध्ये कुठले दाब उफाळून येण्याचे दिसत नाही. हां, लेखकाने जर कथानकात असे दाखविले असते की हा वेसकर, मुद्दाम, निवडून, ब्राह्मणांच्या घरांसमोर जाऊन असे करायचा किंवा ब्राह्मण व्यक्ती दिसल्या की त्यांच्या समोर असे करायचा तर "दाब वर येणे" शक्यतेतले होते.त्यामुळे हे अनुमान शक्यतेतल्या कोटीचे वाटत नाही. अर्थात भाषाशास्त्रात कोणत्या जातीच्या लेखकांनी कोणत्या जातीच्या लोकांची बदनामी करावी, वा करू नये, ह्याचा काही दंडक नसल्यामुळे जी ती जात बदनामीची सुखदु:खे भोगतील. ( क्रमश: )

बुधवार, १६ मार्च, २०११

भैरप्पा व नेमाडे--एक तौलनिक अभ्यास:

भाषा व ज्ञानपीठे:
भैरप्पांची मूळ "दाटू" ही कन्नड भाषेत आहे तर नेमाडेंची "हिंदू" मराठीत आहे. ( तसे नेमाडेंचे शिक्षण इंग्रजी विषयात झालेले असले तरी ते आवर्जून कादंबरी मराठीतच लिहितात हे कौतुकाचे आहे.). कन्नड भाषेत आतापर्यंत सहा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आहेत, मल्यालमला आठ, तर मराठीत फक्त तीन. तुकारामाने वर्णन केल्याप्रमाणे मराठीने कानडी नवरा केला तर फजीती होते, तसेच मराठी कानडी प्रादेशिक वाद अजून सुटलेले नाहीत. ह्यावरून कोणती भाषा श्रेष्ठ ते ठरवणे अवघड. त्यामुळे भाषेच्या एकमेकापेक्षा वरचढ असण्याचे आपल्याला काही निकष लावता येत नाहीत व तशी तुलना रास्त होत नाही.
ज्ञानपीठे किती मिळालीत त्यावरून भाषेच्या श्रेष्ठत्वाची तुलना करता येत नाही, असे असले तरी वस्तुस्थितीची मात्र तुलना होऊ शकते. त्यामुळे दोन्ही वाचकांनी आपापले रास्त अभिनिवेष जपायला हरकत नसावी. दोघेही स्वत:ला वाखाणणू शकतात. कदाचित कन्नडिगांना जरा ज्यास्त अभिमान असेल, ज्यास्तीच्या ज्ञानपीठांमुळे !
वाचनीयता वा रमणे ( इंटरेस्ट ) ह्या निकषावर "दाटू" किती तरी पटीने ज्यास्त वाचनीय व रंजक आहे तर "हिंदू" वाचायला अतिशय अवघड जाते, वाचवल्या जात नाही. आतापावेतो शंभर जणांनी ती वाचलेली आहे असे मला कळवलेले आहे. पण ह्या पैकी ८० जणांनी ती केवळ पहिली ७०/८० पानेच वाचू धजलो, पुढची वाचूच शकलो नाही असेही कबूलले आहे. एका ग्रंथपालाने तर सुरुवातीचा खप पाहता आम्ही खूप प्रती मागवल्या असे सांगितले पण आजकाल कोणी ही कादंबरी मागतच नाही असेही सांगितले. असे असले तरी "हिंदू" बरीच खपली हे मान्यच करावे लागेल. त्यामानाने "दाटू"च्या आवृत्या ज्यास्त झाल्या असतील, ती ग्रंथालयातून अजूनही ज्यास्त मागणीची असेल पण मार्केटिंगच्या बाबतीत जितका बोभाटा "हिंदू"चा झाला तितका "दाटू"चा झाला नाही.
शिवाय "हिंदू" प्रसिद्धीनंतरच्या काळातच नेमाडेंना पद्मश्री हा किताब मिळाला हेही नजरेआड करता येत नाही. असा कुठला किताब प्रसिद्धिनंतर भैरप्पांना मिळालेला नाही. त्यांना साहित्य अकादेमीचा पुरस्कार मिळालेला आहे तर नेमाडेंना महाराष्ट्र फौंडेशनचा . तसे जातीच्या तुलनेत पाहिले तर दोघेही आजकालच्या वजनदार जातीचे ( सत्ताधार्‍यांना योग्य वाटणार्‍या जातीचे ) लेखक आहेत व त्यात तुल्यबळ आहेत हेही निर्विवादच आहे.
पार्ल्याला देशीवादावरच्या भाषणादरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना नेमाडे म्हणाले की मराठी पुस्तकांच्या विक्रीतून असे कितीसे पैसे सुटतात ? त्यामुळे खपाच्या दृष्टीने त्यांनी ह्या कादंबरीत काही क्लृप्त्या केलेल्या नाहीत. तरीही जर कोणाला ही कादंबरी आवडली नसेल तर ते त्या प्रतीचे पैसे परत द्यायला तयार आहेत. भैरप्पांनी अशी काही सोय जाहीर केलेली नाही. हाही प्रसिद्धीपश्चात व्यवहारातला महत्वाचा फरक म्हणता येईल.
( समाप्त )

--------------------------
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

रविवार, ६ मार्च, २०११

नेमाने-नेमाडे
भैरप्पा व नेमाडे--एक तौलनिक अभ्यास:

पात्रे, चारित्र्ये व कथानक:
जोनॅथन कुल्लर नावाच्या समीक्षकाचे एक पुस्तक आहे, "स्ट्रक्चरलिस्ट पोएटिक्स" नावाचे. केंब्रिजच्या सेल्व्हियन कॉलेजचे हे प्राध्यापक. त्यांचे कादंबरीच्या रचनेसंबंधी असे म्हणणे आहे की ( पृ.२३०-२३८) पात्रांचे चारित्र्य हे कोणत्याही कादंबरीचे महत्वाचे अंग असते.कादंबरीतला सर्व पसारा केवळ पात्रांचे चारित्र्य उभारण्यासाठी असतो. ती साक्षात जीवनातली तर वाटलीच पाहिजेत, शिवाय त्या काळात ती आपल्याला सातत्याने धारदार होऊन आवडलीही पाहिजेत. हे खरे म्हणजे अगदी सामान्य वाचकाची अपेक्षाच व्यक्त करण्यासारखे आहे. ह्या दृष्टीने पाहिले तर नेमाडेंचे मुख्य पात्र भले उच्च शिक्षित आहे, नोकरी पुरातत्व खात्याची जरा वेगळी वाटणारी आहे, पण त्याच्या व्यक्तिमत्वाला आवडणारे विविधांगी कंगोरे दिसून येत नाहीत. त्यामानाने भैरप्पांच्या नायिकेची इतिहास शिक्षणाची सूप्त ईच्छा खूपच मोहक आहे. शिवाय तिचे वडिलांसारखे ब्राह्मण होऊन जानवे घालणे, हवन करणे, दलितांचा कैवार घेणे हे एका उत्तुंग व्यक्तिमत्वाची साक्ष देते. नायक, पात्रे भले अतिसामान्य असावीत पण वाचकाला ती भावली पाहिजेत. नेमाडेंची पात्रे व त्यांचे चारित्र्य उभारणी त्यामानाने फारच तोकडी पडते.
कथानकातला फापटपसारा जर पात्रांच्या व्यक्तिमत्वात भर टाकत नसेल तर वाचकांच्या दृष्टीने ती निव्वळ खोगीर-भरतीच ठरते व असे अडगळीचे पसारे नेमाडेंच्या हिंदूत ठासून आहेत. जसे, लमाणी स्त्रिया, नामांतर प्रकरण, विद्यापीठातले भ्रष्टाचार, ढाब्यावरची शेरोशायरी, वगैरे. बरे ह्यासर्वांबाबत नायकाचे प्रेम वा द्वेष कुठेच चित्रित न झाल्याने त्याचे व्यक्तिमत्व बाळसे धरत नाही. त्याउलट भैरप्पांची नायिका कॉलेजच्या अनुभवातून, गावकीतल्या अनुभवातून, मंदिरातल्या वादविवादातून, नातेवाईक व मित्रांच्या वागणुकीतून खूपच उंचीने उभी राहते, भावते. ( क्रमश: )

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com