बुधवार, १९ ऑक्टोबर, २०११

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

२) मार्क्सवाद/सामाजिकता समीक्षा व "हिंदू"
सध्याच्या जगातला मार्क्सवादाचा पाडाव पाहता आता मार्क्सवादी समीक्षा सिद्धान्ताचे प्रयोजन आहे काय असेच कोणाला वाटावे. पण एखाद्या सिद्धान्ताचे अपयश हेसुद्धा बरेच सांगणारे असते. शिवाय बर्‍याच जणांच्या मते खरी मार्क्सवादी संस्था जगात कोठेच अस्तित्वात नव्हती. ज्या होत्या त्या पक्षाच्या हुकुमशाह्या होत्या. त्यामुळे ह्या समीक्षापद्धतीचा उहापोह करायला हरकत नाही. मनोविश्लेषणात्मक समीक्षा सिद्धान्तात आपण जसे माणसाच्या वैयक्तिक वागणुकीचा विचार केला तसाच ह्या मार्क्सवादी पद्धतीत माणसांचे समूह दिलेल्या अर्थव्यवस्थेत कसे वागतात त्याचा विचार केला जातो. माणसांचे शोषणाच्या रेषे अलीकडचे व पलीकडचे बनणारे वर्ग, आहे-रे,नाही-रे, त्यांचे वर्ग-हितसंबंध, वर्गकलह वगैरे संज्ञा सर्वश्रुत आहेतच. मार्क्सवादात असे मानल्या जाते की माणसांच्या सर्व वागण्यात ( जसे;शिक्षण, धर्म, कला, सत्ताकारण, तत्वज्ञान, तंत्रज्ञान, प्रसार-माध्यमे, वगैरे ) आर्थिक सत्ता काबीज करणे व टिकवणे हेच प्रमुख कार्य असते. त्याचे वागणे हे तो दिलेल्या व्यवस्थेत त्याक्षणी कोणत्या स्तरावर आहे त्यावर अवलंबून असते. मार्क्सवादात सर्व विचारसरण्या ह्या आर्थिक व्यवस्थेने बाधित झालेल्या असतात. ज्या विचारसरण्या चांगल्या नसतात त्या नैसर्गिक भावनेवर आधारित असून साहजिकच आहेत असे भासवतात, पण परिणामी चुकीचे राजकीय वर्तन घडवतात. जसे: वैयक्तिक व्यक्तिवाद. प्रत्येकाला बंगला, गाडी, चैन हे दिसायला नैसर्गिक वाटते पण त्याने कामकरी वर्गाचे शोषण होते, म्हणून मार्क्सवादात ही विचारसरणी बाद ठरवतात. मार्क्सवादात माणसाच्या मानसशास्त्रावर भांडवलशाहीचे कसे दुष्परिणाम होतात ह्यावर आवर्जून जोर दिलेला असतो. माणसाचे एक प्रकारे वस्तुकरण ( कॉमॉडिफिकेशन ) होते असे मानतात.
हिंदू ह्या कादंबरीचे उप-शीर्षकच आहे मुळी : जगण्याची समृद्ध अडगळ ! त्यात हिंदू धर्मामुळे माणसाचे बिनकामाच्या वस्तूंमध्ये कसे रूपांतर घडते आहे, अशाच अर्थाची खंत जागवली आहे. ही खंत थेट मार्क्सवादी वळणाचीच आहे. शिवाय वर्ग-कलहाची चित्रे सर्वत्र ओतप्रोत पहायला मिळतात. जसे : ब्राह्मणद्वेष : ब्राह्मण-द्वेषाची किंवा ब्राह्मण-दोषाची काही उदाहरणे पाहू. ( पृ.१३):"....सोम पिऊन होम जाळणार्‍या ब्राह्मण स्तोमड्यांनो, अर्कात गर्क होत तर्क करत राहणार्‍या कर्कांनो, यज्ञातील सेवेसाठी ठेवलेल्या आमच्या सुंदरींना बेवारस संतती निर्मिणार्‍या जुगाड्यांनो, द्यूतात विद्युतसदृश बायका पणाला लावून, हरून, यांना पोरांसकट वार्‍यावर सोडून देणार्‍या जुगार्‍यांनो, हा पहा, एकवीस वेळा ही पृथ्वी निर्ब्राह्मण करण्यास्तव वैठल खंडेराव आला आहे". व्वा ! भारदस्त भाषेमुळे हा खंडेराव म्हणजेच नेमाडे, काही ब्राह्मण-द्वेष करीत आहेत हे कळतही नाही ! ( पृ.१४ ) : "ह्या आर्यवर्तात ब्राह्मणच प्रत्येक युगात राज्य करील", "तुम्हास शोध लावता आलेच तर ते गणितातलं शून्य किंवा बुद्धीबळाचा खेळ असे किंवा माया, संन्यास, अपरिग्रह, अहिंसा, समाधी, हठयोग, सल्लेखना, अशा नकार्‍या गोष्टीचेच तुम्ही शोध लावसान...", ( पृ.१५७): "एवढा जातीभेद मोडणारा आपला वारकरी पंथ ह्या ब्राह्मणांनी नासवला. पुन्हा ब्राह्मणी धर्मच वारकरी पंथावाटे लादला हो आपल्यावर पेशवाईपासून. स्वराज्य तर बुडवलच, आता चालले एकेक इंग्रजी शिकून नोकर्‍या धरायले शहराईत. शहरी होत चालले ब्राह्मण...अरे बामण तसे झाले, तुम्ही कोनते शहाणे हैतं ? ", ( पृ.२६८) : "लाखो हिंदू जन आपला पवित्र सनातन हिंदू धर्म सोडून नास्तिक बौद्धधर्म स्वीकारते झाले. पर्यायी स्वर्ग, देव, वेद, इत्यादी न मानणार्‍या बौद्ध धर्माची सर्व जंबू द्वीपात गावोगाव वाढ होत चालली. बौद्ध भिक्षूंनी तर ह्या सर्व बौद्ध धर्मवृद्धीचे श्रेय मग नाशिक क्षेत्री सनातन ब्राह्मणांस दिले. कारण एरव्ही त्यांस मंदीर प्रवेश करू दिला असता तर एवढी प्रचंड बौद्ध वृद्धी झाली नसती. हे तर खरेच असून शरमिंदे करणारे होते. तसेच बर्‍याच सुधारकांनी असे प्रयत्नही केले होते", ( पृ.३२९) : "आपला हिंदू धर्म खालच्यांसाठी काय शेटं करतो ?". पुस्तकाच्या प्रमोशन दरम्यान जी प्रदीर्घ मुलाखत नेमाडेंनी दिली त्यात राजवाड्यांसंबंधी असेच सांगितले आहे. त्यांच्या मते मूळ ज्ञानेश्वरीची प्रत राजवाडेंनी जाळली व तीत आपल्या पदरच्या ओव्या घुसडल्या. हे कादंबरीत आलेले नसले तरी लेखकाचे मत असून ते वर्गकलहातले लेखकाचे धागेदोर कोणासमवेत गुंतले आहेत ते छान दाखवते ! त्याकाळच्या समाजरचनेत अत्यल्प संख्य असूनही समाजात सर्व थरात ब्राह्मणांचे वर्चस्व होते व त्यामुळे खालच्या वर्गांचे शोषण झाले हे उघडच मार्क्सवादाप्रमाणे होते व तेच हिंदू ह्या कादंबरीत नेमाडे ह्यांनी नेटाने लावून धरलेले दिसेल.
वर्ग कलह हा त्याकाळी मराठा/कुणबी व दलित बलुतेदार ह्यांच्यातही असला पाहिजे. त्यावरची कादंबरीतली भाष्ये अशी : "शेतकर्‍यांनी कष्ट करावेत आणि ह्या लोकांनी कणसं खुडून न्यावी ? काय नीतीच्या गोष्टी करता हो. ...शेवटी कुणब्याकडेच खेटे घालतील ना ? " . दलित व कुणब्यांमध्ये हे लावून देणे आहे. कदाचित दलितांच्या लक्षात ही गोष्ट येईलच. एके ठिकाणी तर ते म्हणतात, ( पृ.१५१ ): "मानवी हक्कांची सगळी परिभाषा मोरगावच्या महारा-पोरांपर्यंत पोहोचली. जयभीम." हा दिलासा मिळतो न मिळतो तोच नेमाडेंची पात्रे म्हणतात : ( पृ.३८४) : "सोमा देवनारकडे कत्तलखान्यात चामडे उचलून न्यायचं काम करतो. गायीचं मटण मिळतं फुकट--खेडी सोडून हे नवबुद्ध काय वाघ मारायला गेले शहराईत ? --काय फरक पडला, सांग .", किंवा ( पृ.४०६) : "सुरुवातीला सटार्‍या देशमुख म्हणतो, हल्ली कायदाही शेतकर्‍यांच्या विरुद्ध चालला आहे. शेतकर्‍यानं काही पेरू नये, उत्पन्न काढू नये, असे कायदे काढले आहेत. अहो उद्या महारामांगांनी कुणब्याची गांड मारावी, असाही कायदा निघेल...आपल्याच भागातले कुणबी लोक गांडू आहेत हो, दुसरीकडे लोक नाही सहन करणार एवढं . म्हणजे ? अरे ह्या ह्या इसमानं आम्हाला जातिवाचक शिव्या दिल्या, असं नुस्तं पोलीस चौकीवर सांगून आले हे हरिजन कीं, पोलिसांना भागचं पडतं गुन्हा नोंदवणं. धरून नेणंच पडतं तुम्हाला जेलात. का हो पाव्हणं, तुमच्या तिकडे मोगलाईत असंच चालतं का ? ". मार्क्सवादात वर्गकलहाचे अप्रूप असल्याने त्याची चित्रणे नेमाडे अशी इमाने इतबारे करतात त्यावरून त्यांचा मार्क्सवादी समीक्षा सिद्धान्ताबद्दलचा विश्वास असा दिसून येतो. ह्याच विश्वासापोटी ते मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचे प्रकरणही लावून धरतात व दलितांच्या अंडर-डॉग असण्यावरची सहानुभूती कादंबरीत दाखवतात.
ह्याच वर्गकलहात खरे तर वारकर्‍यांना कोणीही घेतले नसते व ती भक्तीमार्गाला वाहिलेली सहानुभूती ठरती. पण वारकरी विरुद्ध स्थानिक मुसलमान व महारमांग असा वर्गकलह ऊभारून ते वारकर्‍यांना आरोपीच्या पिंजर्‍यात, मार्क्सवादाच्या निकडीपायी असे उभे करतात :( पृ.४४० ) : "पैठण . वारकरी पंथाबद्दल एकच मिनिटात ओळख---कसे जातिभेद मिटवले वगैरे. मुसलमान तर सोडाच, आपापल्या गावातल्या महारामांगानांसुद्धा वारकर्‍यांनी जवळ घेतले नाही. सामावून घेणं आणखी दूरचं . विठठलाच्या चरणीं सगळे एक ? पंढरपुरात आषाढीला चोवीस सवर्णांच्या पालख्या गेल्यावर अजामेळ मांगाची शेवटून....एकादशीला मिरची, रताळं, पेरू, पपया, शेंगदाणे, खजूर, बटाटा, साबुदाणा, असले म्लेंच्छ यावनी पदार्थ कसे काय चालतात ?" वर्गकलहाची निकड इतकी जबरदस्त दिसतेय की वारकर्‍यांच्या उपवासाचे निरुपद्रवी खाणेही खटकावे अशा पद्धतीने ते केवळ मूळचे म्लेंच्छ/यावनी आहेत ह्या विरोधाभासावर वाचकाला एक कलह म्हणून दाखवतात. हा वर्गसंघर्ष एरव्ही इतर कोणा लेखकाला दिसलाही नसता. पण खुद्द नेमाडे पडले लेवा पाटील व महानुभाव पंथाचे व ह्या पंथाचा परंपरेने वारकर्‍यांशी उभा दावा आहे. इतका की विष्णुबोवा जोगांवर त्यांनी कचेरीत दावाही लावलेला होता. कदाचित लेखक-नायक-व्यक्ती ह्यात आत्मचरित्रपर कादंबरीत गल्लत झाल्याने हिंदूत नायकाच्या बहिणीचे संन्यासीण होणे, महानुभावी पंथाचे असणे ह्याचे उदात्तीकरण सहजी दिसून येते. कादंबरीत तर्काला हवे तसे मोडण्याची मुभा असल्याने, वर्गकलहाच्या दाट रंगाखातर इथे आसूड वारकर्‍यावरही नेमाडेंना ओढावा लागतो आहे.
पुरुष विरुद्ध स्त्री हा वाद तर तसा पुरातनच. नेमाडे हे काही स्त्रीवादासाठी प्रसिद्ध नाहीत. त्यांची पात्रेही स्त्रीयांपासून फटकूनच राहतात. हिंदूतला नायक तर लग्नही करीत नाही. मार्क्सवादाच्या वर्गकलहाच्या निकडीत हे अजिबात बसणारे नसल्याने मग नेमाडे स्त्रियांवर ज्यांनी अत्याचार केले आहेत त्यांचा निषेध वा टर उडवतात. त्याने स्त्रीवादाची तळी उचलल्यासारखे होत नसले तरी शत्रूचा शत्रू तो मित्र ह्या न्यायाने तोड निघू शकते. म्हणून ते रामदासांसारख्या संतांनी ऐन लग्नातून पळ काढला व त्यामुळे त्या लग्नमंडपात एकाकी पडलेल्या वधूचे दु:ख आपल्याला कसे विदारक वाटते ते जराशा टगेगिरीने असे सांगतात : ( पृ.४५० ): "रामदास स्वामींच्या मंडपात राहून गेलेल्या बायकोच्या दु:खावर फार सुंदर कविता होईल नाही ? वानखेडे म्हणाला, सुंदर ? तिकडे कवळी पोरगी का बोडकी ठेवली जन्मभर का मारली--आणि तुला सुंदर कविता लिहायचीय ? त्यापेक्षा ही उध्वस्त बाई हातात वाहाण घेऊन याला शोधत शिवथरकडे चाललीय अशी कविता--पेक्षा श्लोकच का नाही लिहीत ? --जनाचे श्लोक : मनाची नको लाज ठेवू जरी तू । जनाची तरी ठेवी पळपुट्या नागड्या तू ॥---तू भडव्या सिद्धार्थ गौतमावरच का नाही लिहीत ? ते तं एक पोरगं पण काढून पळालं बायको सोडून ....इथे मराठी कवींना रामदासाच्या ह्या बिचारीचं नाव सुद्धा माहीत नै..." खरे तर परमार्थात मोक्ष साधायचा असेल तर आपल्याकडे संसारात न पडता ब्रह्मचर्य आचरावे असा शास्त्रोक्त विचार खूप प्रसिद्ध आहे व विनोबा भाव्यांनी त्याचे समर्थनही केले आहे. पण इथे ब्रह्मचर्य पाळावे का संसार करावा असा पेच कादंबरीत नसल्याने निदान स्त्रीवादाला एक श्रद्धांजली वहावी हा नेकीचा विचार करून रामदास व गौतम बुद्ध ह्यांची टिंगल केली आहे. पण ती स्त्रीवादाची तळी उचलण्याच्या निकडीपायी आहे व त्यावरची निष्ठा दाखवताना पहा मी किती जोखीम उचलतोय असा लेखक आव आणतोय. रामदास हे ब्राह्मण. तेव्हा सच्च्या मार्क्सवादी विचाराने ब्राह्मण-बहुजन हा वर्ग-संघर्ष ज्यास्त सुकर ठरता, पण त्याऐवजी स्त्री-पुरुष असा सनातन संघर्ष लेखकाने काढला आहे, जो वरकरणी परमार्थ-संसार-ब्रह्मचर्य ह्या विचारात लागू होत नाही. स्त्रीवादाचे खरेच एवढे सोयर सुतक असेल तर , रामदास , गौतम बुद्ध असे चौफेर दंडुके मारत असताना, एवढी ६०३ पानं दिमतीला असताना, नेमाडेंनी मोहमद पैगंबर व त्याच्या अनेक बायकांना कसं काय सोडलं बुवा ? कदाचित्‌ हिंदू नंतर इस्लाम लिहितील तेव्हा घेतील त्यांचा समाचार ! नेमाडे काही मुसलमानांना घाबरतात काय ?
मार्क्सवादाने म्हणावे की सामाजिक संघर्षात रत असलेल्या प्रमुख वर्गाचे हितसंबंध जपणारे कल्पनाविश्व ( आयडियालॉजी ) हे प्राय: भासमान असते व ते एखाद्या आज्ञाधारक विद्यार्थ्यासारखे नेमाडेंनी फेटाळून लावत वर्ग-संघर्षात अंडरडॉगची बाजू लावून धरावी हे चित्र मोठे बाळबोध आहे. तशात मार्क्स नंतर लुकाच ह्याने ह्या कल्पनाप्रणालीत वर्गसंघर्ष वगळून जी तटस्थ कल्पना दाखवली त्याप्रमाणे समाजधारणेच्या मुळाशी असलेल्या विविध संघर्षांना साहित्यकृतीशी जोडताना रूपाचे आशयाचे लेखकाला अर्थनिर्णयन करावे लागते असे दाखवले आहे. ह्यात अर्थनिर्णयन करणार्‍याच्या हेतूकडेही आपल्याला बघावे लागते. ह्यामागची सुलभता पाहता ह्या सुलभतेमागेही कोठलेतरी अंतर्विरोध दडविणारी कल्पनाप्रणाली ( आयडियालॉजी ) असण्याची शक्यता नाकारता येत नाही. निदान मार्क्सवादाचा आज जगात झालेला प्रत्यक्ष पाडाव लक्षात घेता, नेमाडेंनी मार्क्सवादाची इतकी कास धरण्याची आवश्यकता नव्हती, असेच वाचकाला जाणवेल.

( क्रमश: ३ )
-----------------------------------------------------------------------------------------------------