सोमवार, ६ एप्रिल, २०१५

नि. नू. ने. ( नित्य नूतन नेमाडे ! )
घुमान साहित्य संमेलनाला गेलेल्या लोकांना ज्ञानपीठा पेक्षा जिलेबी ज्यास्त आवडते. “ज्यांना नव्याने काही लिहावयाचे नाही, अशी मंडळी संमेलनास उपस्थित राहात असल्याचा आरोप नेमाड्यांनी केला. नाशिक येथील गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे रविवारी झालेल्या जीवन-गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.”
खरेच मराठी सारस्वत, कागद आणि त्यात गुंडाळलेला गूळ एकाच चवीने खाणाऱ्या गाढवाप्रमाणे स्थितप्रद्न्य झालेला असावा . ( पहा : तुझे आहे तुजपाशी ले: पु.ल.देशपांडे ). नसता ते साहित्य संमेलनात ज्ञानपीठ आणि जिलेबी एकाच चवीने का मोजते बरे ? ( पहा : रा.रा . नेमाडे ह्यांचे आरोप ). मराठी सारस्वत गाढव तर नक्कीच असावे नसता त्याने “ज्ञानपीठ” असे भलत्याच माणसाला दिले नसते.
“ज्यांना नव्याने काही लिहायचे नाही अशी मंडळी” असा मार्मिक निकष लावीत रा.रा. नेमाडे ह्यांनी सह-साहित्यिकांना दूषणे दिलीत हे मात्र नेहमीप्रमाणे आहे, नव्याने काही नाही, असे मात्र वाटून घेवू नये. कारण नेमाडे नित्य नेमाने शिव्या देतात असे जरी वरकरणी वाटत असले तरी ते दरवेळी नव्या मंडळींना शिव्या देतात हे नोंद करण्यासारखे आहे. ते केवळ ब्राह्मण साहित्यिकांनाच  शिव्या देतात असे नाही तर त्यात दरवेळी नवीन नवीन ब्राह्मण साहित्यिकांना शिव्या देतात, त्यामुळे दस्तुरखुद्द नेमाडे हे स्वतः नित्य नूतन लिहिणारे लेखक आहेत हे सिद्ध होतेच !
काहींना वाटते की नेमाडेंचा नायक हा नेहमी न-नायक स्वरूपाचा, रुढ रीतीविरुद्ध वागणारा, डीप्रेशनचे अप्रूप असणारा, समाजाला तुच्छ लेखणारा, हरलेला नायक असतो. पण नि.नू.ने. हे दरवेळी त्याचे वेगळे नाव ठेवतात हे किती वाखाणण्याजोगे आहे ! नेमाडेंना उगाच नाही दररोज नित्य नूतन पुरस्कार मिळत आहेत.
इतके असूनही घुमान साहित्य संमेलनाला ज्ञानपीठा ऐवजी जिलेबी ज्यास्त गोड लागावी ? का ह्या आरोपा आडून नेमाडे आमंत्रण मागत आहेत ? एक शेवटचे संमेलन घेवूनच टाका कसे ! ( नेमाडे म्हणे फक्त ( का नेमाडे शैलीत फकत ?) शेवटच्या संमेलनाला येईन असा त्यांचा पण असल्याने ).
---------------------------------------------   


http://epaper.loksatta.com/c/4921098





 http://epaper.loksatta.com/c/4921098

मंगळवार, १० मार्च, २०१५


लिहिता लेखक
पूर्वी ज्ञानपीठ हे लेखकाच्या कलाकृतीला देत. आजकाल ते लेखकाच्या लेखनाला दिले जाते. असे होऊ नये की कधी काळी ( फारा वर्षापूर्वी ) लेखकाने लिहिले व त्याला आज पुरस्कार दिला. म्हणून अजून एक अट अशी की निदान गेल्या २० वर्षात लेखक लिहिता असलेला असावा. ह्या अटीमुळे, नेमाडे ज्यांना आडदांड म्हातारे कुत्रे म्हणतात ( जसे बिढार मध्ये कुसुमाग्रज ) अशा कधीकाळी लिहून गेलेल्या म्हाताऱ्यानाच पुरस्कार जाणार नाही अशी तजवीज होते.  
आता ह्या अटीवर नेमाडे कसे उतरतात ? नेमाडेना पुरस्कार दिला गेला २०१४ सालचा. त्या आधी २० वर्षे, म्हणजे निदान १९९४ पासून हा लेखक लिहिता असला पाहिजे, अशी ही अट होते. आणि ह्या अटीमुळे तरुण लिहित्या लेखकांना पुरस्कार मिळावा ( जी अपेक्षा नेमाडेंचीही त्यांच्या तरुणपणी होती ) अशी व्यवस्था तयार होते.
नेमाडे ह्यांची एकूण साहित्य संपदा पहिली तर १९६३ साली पहिली कादंबरी कोसला, त्यानंतर १९७५च्या आधी बिढार, हूल, जरीला, व झूल ह्या कादंबऱ्या. टीका-स्वयंवर हे १९९० साली व काव्य-संग्रह देखणी व मेलडी हेही १९७५च्या आधीचे. म्हणजे ज्ञानपिठाच्या कट-ऑफ वर्षापासून ( १९९४ पासून ) नेमाडे ह्यांनी केवळ “हिंदू” ही कादंबरी लिहिलेली दिसेल. त्यांचे बाकीचे लेखन हे त्या आधी किती तरी वर्षे अगोदर लिहिलेले. हिंदू कादंबरी त्यांना लिहायला लागली ३५ वर्षे. हे काय सृजन म्हणायचे ? तेव्हढ्यावर का ह्याना “लिहिता लेखक” म्हणायचे ? खरे तर केवळ ह्याच मुद्द्यावर नेमाडे ह्यांनी हा पुरस्कार दुसऱ्या कोणा तरुण, लिहित्या लेखकाला द्या असे म्हणावे !
-------------------------------------


रविवार, ८ फेब्रुवारी, २०१५

आंधळे  दळताहेत व कुत्रे पीठ खाताहेत ....
साहित्याचा व्यवहार मोठा अजब पद्धतीने चालतो ! इथे कशाला चांगले साहित्य म्हणावे ह्याचे काही नक्की निकषच नसतात. जे पुस्तक खूप खपले त्याला चांगले म्हणावे तर समीक्षक म्हणतात खपण्याचा व चांगले असण्याचा अर्थाअर्थी काही संबंध नसतो ! किंवा जे लोकप्रिय ते कमअस्सल असाच साहित्यिक हेका असतो. एखाद्या लेखकाने सगळे साहित्य प्रकार हाताळलेले असतील तर तो मोठा का ? तर असे काही नाही . एकाच अभंग ह्या वृत्तात कवने लिहिणारे संत तुकाराम ह्याना कमी कसे लेखायचे ?
आपण जसे सोनाराच्या दुकानात गेल्यावर त्यालाच विचारतो की हे सोने २३ कॅरट की २४ कॅरट ? असेच मग लोक साहित्यातल्या जाणकारांना ( पक्षी प्राध्यापक, प्रकाशक, समीक्षक, विध्यार्थी वगैरे ) विचारतात की कसे आहेत हो हे नेमाडे लेखक ? त्यावेळी जर असा दबदबा असेल की त्यांनी म्हणावे आहेत बुवा ! व मग आपण ते मानावे ! असाच असतो का साहित्य-व्यवहार ?
नुकतेच ज्ञानपीठ मिळालेल्या श्री. रा. रा. भालचंद्र नेमाडे ह्यांनी ह्यावर एक छान मार्गदर्शन केले आहे. ज्याना ज्ञानपीठ किंवा नोबेल पारितोषिक मिळालेले आहे अशा साहित्यिकांना तरी आपण मोठे मानायचे का ? तर नेमाडे म्हणतात, छे, पारितोषिके कशी दिली जातात हे का आपल्याला माहीत नाही ? त्यावरून कसे कोणाला मोठे समजायचे ? उलट अशा पुरस्कार-प्राप्त लोकांची अशी टर उडवायची की कोणी मोठे उरलेच न पाहिजे . (..... मग मीच मोठा ठरणार नाही का ?). त्यात मग दया माया नाही. ज्यांच्या नावाने पुरस्कार देताहेत त्यांची तर ज्यास्तच खिल्ली उडवायची ..उदाहरणार्थ : कुसुमाग्रज . ( ह्यानाही ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता व त्यांच्या नावाचा पुरस्कार नुकताच नेमाडेंना देण्यात आला होता. ).

कुसुमाग्रजांबद्दल ते बिढार मध्ये काय म्हणतात ते पहा व ठरवा की कुसुमाग्रज कोण आहेत व नेमाडे कोण आहेत ?
बिढार ( पृ.४१) : "सकाळपासून कुसुमाग्रजाला शिव्या देतोय, कुठं म्हातारं तडफडायला आलं आमच्या नवीन पोरांच्यात ! मग मी त्याला एक क्लासिक उपमा सांगितली. भाद्रपदात नवीनवी कुत्री प्रयत्न करत असतात एखाद्या कुत्रीवर, तेव्हढ्यात एखादं म्हातारं आडदांड निब्बर कुत्रं मध्ये घुसून ताव मारून निघून जातं, तसं प्रधानचं झालं ! खरं म्हणजे सगळीकडे म्हातारी कुत्री बोकाळलीयत. साहित्य परिषदात तीच, बक्षीसात तीच, रेडिओवर , साहित्य अकादमीत, साहित्य संमेलनात---सगळीकडे हेच बाप्ये मनमुराद. तिकडे नेहरू आणि इकडे साले हे."
 " स्वातंत्र्य मिळायच्या आधी साले तरुण होते तेव्हा यांना संधी नव्हती. नुस्ते कातावले होते. सत्तेचाळीसनंतर आणि संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर साल्या सरकारनी धडाधड उत्तेजनपर प्रकार सुरू केले. तेव्हा ही म्हातारी मंडळी त्यावेळची राहिलेली खाज भागवायला तुटून पडली. आज इतकी वर्ष झाली तरी ह्या निब्बर लोकांची चढायची हौस कमी होत नाही. तुम्हा नवीन पोरांचं कौतुक कोण करणार ह्या गर्दीत ? "

म्हणजे काय की जे साहित्याचे दळण दळीत आहेत ते आंधळे आहेत असे ठरवायचे किंवा त्याना आपल्या वाग्बाणाने आंधळे करायचे . मग जी कुत्री आजूबाजूला माजावर येउन घुटमळत आहेत त्यांनी यथेच्छ पीठ खायचे ! मग ते ज्ञानपीठ असो वा नोबेल !
( फक्त आज नेमाडे किती वर्षाचे आहेत ते विचारू नका, माजावर आहेत ना ? खाउ द्या ज्ञानपीठ !  )

----------------------------------------------------