रविवार, २९ मे, २०११

बख्तिनचे ओंगळ रुपडे
"हिंदू": ले: भालचंद्र नेमाडे----४
आता थोडेसे भाषेविषयी व शैलीविषयी पाहू. बख्तिन म्हणतो: (पृ.४७,५०) : "कादंबरीची भाषा ही एक भाषा नसून अनेक भाषांची व्यवस्था असते. ह्या अंतर्व्यवस्थेमुळे त्या एकमेकीशी तात्विकपणे देवाणघेवाण करतात. शैलीमीमांसकांना कादंबरीत, म्हणूनच भाषाप्रकारांच्या खास प्रतिमांचा अभ्यास करावा लागतो. भाषाप्रकारांच्या मिटणे-दिसणे, बंद-चालू होणे, आणि त्यांचे संभाषणात्मक संबंध परिवर्तित होणे हे तपासावे लागते." आता कादंबरीतले एक निरिक्षण: गालिबचे शेर नेमाडे भरपूर वापरतात. ते मोजले तर एकूण १७ शेर भरतात. मोजताना जाणवले की ते सर्व शेवटाच्या शे-दीडशे पानातच येतात. नायक औरंगाबादीचे वर्णन करताना येतात. गालिबच्या काव्याची थोरवी नक्कीच निर्विवाद आहे. त्याचा वापरही वाचकांना माहीतीचा, सरावाचा, आहे. पण तो संभाषण नाही करीत. शेवटी प्रगट होतो. नायकाचे पाकीस्तानात नोकरी करणे पाहता, ते मुक्त हस्ते सर्वत्र यायला हरकत नव्हती. नायकाचा रेखाटलेला स्वभाव पाहता सर्व कालक्रमणेत असायला हवा होता. पण ते शेर असे एकाच कप्प्यात दिल्याने सह्जी येऊन संवाद करणारे राहात नाहीत. अडगळ करणार्‍या भरताडासारखे वाटतात. नेमाडेंना बोली भाषा वापरण्याचे आवर्जून अप्रूप आहे. पण वाक्यांची रचना बोली भाषेतली का प्रमाण भाषेतली अशी मोजदाद केली तर प्रमाण भाषेचे पारडे खूपच जड होईल. पण नेमाडेंची प्रमाण भाषा कमालीची भारदस्त असल्याने ती शोभा वाढवते. मग बोली भाषेचा परिणाम साधण्यासाठी नेमाडे भरपूर लोकगीतात्मक पोवाडे वापरतात. हे स्वरचित असल्यामुळे की काय, काही ठिकाणी संवादाच्या निकडीपायी ते फारच पोरकट होतात. जसे : आमचा मेहुणा नोकरी नो करी..हॉं,हॉं,...तो पीएचडी करी ; क्या बने भात जहॉं, भात बनाये न बने ॥ ; माह्या घराच्या पाठीमागे रे, उंटणी डुलक्या खाये ।; अरे भाग्यवंताची बाईल मरते, अन अभाग्याचा बैल, हो, रामा रे, जी जी ; अरे लभान्यांच्या बाया, नंग्या पोहती रे मासोया, अरे पाटील गांड फाटिल नको लभानीच्या पडू फंदी यारा, दाटील तिची काचोळी तवर सुटील झगारा, ; वगैरे. संतांची वचनेही मुबलकपणे येतात. विनोद, किस्से, पोवाडे, शेर-शायरी, शाब्दिक कोट्या, उत्क्रांतीच्या कथा, यक्षाच्या कथा, संतवचने, कविता, गाण्यांचे मुखडे, हे शैली प्रकार म्हणूनच कादंबरीत सर्वत्र पेरलेले दिसतात. पण नायक वा पात्रे ती एकमेकांशी सहजी संवादीत आहेत असे न झाल्यामुळे हीच काय ती "समृद्ध अडगळ" असे जाणवायला लागते.
हे मिखाइल बख्तिन कोण आहेत ते थोडक्यात पाहिले तर ते एक रशियन साहित्यिक व तत्ववेत्ते होते ( १८९५ ते १९७५) असे आढळते. ह्यांना मान्यता मरणानंतर मिळाली. १९२० दरम्यान ते "बख्तिन सर्कल" चालवीत पण त्यांना मान्यता १९६० नंतर मिळाली. त्यांचा पीएचडीचा प्रबंध खूपच विवादास्पद झाला व सरकारी हस्तक्षेपानंतर त्यांना पीएचडी नाकारल्या गेली. १९५७ त ते मास्कोत हेड ऑफ रशियन व वर्ल्ड लॅंग्वेजेस होते. ते तत्ववेत्ते का समीक्षक ह्यावर अजून खल होतो. सुरुवातीला रूपवाद्यांना हे जवळचे वाटले तरी शेवटच्या काळात बख्तिनच स्वत:ला त्यांच्यापासून वेगळे समजू लागले. कारण त्यांच्या मते रूपवादी, साहित्यातल्या मजकूराचे(कंटेंट) महत्व कमी करतात व रुपबंधाचे अवडंबर माजवितात. बख्तिनच्या कल्पना अशा : दोन माणसे वाद करीत असतील तर सत्य दोघांपैकी एकाकडे असते असे नसून सत्याला प्रगट व्हायला खूप मते, आवाज/संवाद लागतात. एकाच्या तोंडी सत्य असू शकत नाही. त्याचसाठी कादंबरीत अनेकांचा संवाद असावा, रिओ-द-जानिरोत कार्निव्हलचा जल्लोष असतो तसा मतांचा जल्लोष असावा, मी-माझ्यासाठी, मी इतरांसाठी, व इतर माझ्यासाठी असे एक तत्वज्ञान सांगत ते इतरांचा आपल्यावर कसा परिणाम होतो व त्याचा कसा मान राखावा हे आवर्जून सांगतात. ( इथे नेमाडेंचे एक मुंबईतले नुकतेच केलेले भाषण पहा. नेमाडे म्हणतात, मराठी टिकायची असेल तर आपली मुले मराठीतूनच शिकायला हवी. ज्या राजवाडेंबद्दल नेमाडे प्रमोशन मध्ये म्हणाले होते की हा ब्राह्मण मोठा धूर्त होता व त्याने ज्ञानेश्वरीची मूळ प्रत जाळली व ओव्या पदरच्य़ाच घुसवल्या असतील, त्याच राजवाडेंसारखे नेमाडे इथे मराठीच्या काळजीने बोलत आहेत. हा इतरांचा आपल्यावर होणारा परिणाम असा पाह्यला मिळतो.).
बख्तिनचे रूपबंधाचे मुद्यांबाबत, वर आपण पाहिले की "हिंदू" ह्या नेमाडेंच्या कादंबरीला कसे गैरलागू होतात. बख्तिनची विचारसरणी म्हणजे काही वाङमयीन महात्मतेच्या कसोटयांचा भोज्ज्या नाही, असलीच तर ती एक निरिक्षणाची पद्धत म्हणता येईल. शिवाय कादंबरीकारानेच अथवा त्याच्या चाहत्यांनी हीच कसोटी वापरा (...कादंबरीतलीच एक म्हण वापरायची तर,... मला पहा व फुले वहा...) असे म्हणण्यासारखे आहे. हे सूज्ञ वाचकांची, समीक्षकांची, कोंडी केल्यासारखे होईल. कादंबरीतला मुद्देमाल सामान्य़ पण बख्तिनीय क्लृप्त्या वापरल्याने तो असामान्य होतो, हे कदापी सह्य होणारे नाही. उलट मुद्देमाल कमजोर व रुपबंधांचे रुपडेही ओंगळ असे होते ! ( शिवाय बख्तिनचे ब्रह्मवाक्यही सांगते की सत्य हे क्वचितच एकाच्या मुखी ( नेमाडेंच्या मुखी ) असते.)

अरुण अनंत भालेराव
१८६/ए-१, रतन पॅलेस, गरोडियानगर, घाटकोपर( पूर्व) , मुंबई:४०००७७ ;भ्र: ९३२४६८२७९२

रविवार, १५ मे, २०११

बख्तिनचे ओंगळ रुपडे,
हिंदू : भालचंद्र नेमाडे----३
आता कादंबरीत बर्‍याच ठिकाणी येणारे विनोद, शाब्दिक कोटया, चुटके, किस्से हे पाहू :
(पृ.१३४):आंघोळ करणार्‍या लभान्यांकडे पहात दोघे जण संवाद करतात: का रे सुदाम्या, दोघीतली कोनती चांगली लागते तुले ? गाय की वासरी ? दुसरा: आपल्यासारख्या न कांडणार्‍याला काय दोन्ही बोखारे सारखेच.ऊठ शेवटची भाकर टाकाली तव्यावर तुह्या घरात. पहिला: शेवटी आपल्याच घरातल्या तव्यावरची भाकर ऑं ? दुसरा: जे आपली तेच गोड. ("तवा गरम है"वरचे घासून घासून चपटे झालेले जोक, इतक्या प्रतिभावान लेखकाला, पाने भरायला टाकावे लागतात, म्हणजे त्यांचा लेखकरावच झालाय की काय ? का म्हातारपणी "भाकरीची" भूक प्रबळ होते ?)
(पृ.२९८):गांधीजी म्हणतात गरजा कमी करा, पण तो कोण कवी म्हणतो की गरजा जयजयकार. पाने भरण्यासाठी अशा कोट्या म्हणजे गरजवंताला ( पाने भरण्याची गरज ) अक्कल नसते ते खरेच तर !
(पृ.३७२):बोबड्या लेक्चररचे किस्से : साले जहॉंसे अच्छा...लाजाधि लाज....असे पाणचट वाचून वाचकांची बोबडीच वळणार.
(पृ.३९०): तुमची उंची किती, बेलबाला? सटपटून बोलली, चार फिट अकरा उंच...(हाय रे ह्य़ा विनोदाची उंची !)
(पृ.४५७.):युरोपात काय होतं ?...आठशे वर्ष सलग डार्क एजिस---कृष्णयुगं ? ( ---अरेरे असे चातुर्य कामी आले ?)
(पृ.१८३): ...पहा कसे जीएएनडीला पाय लावून... ( हा विनोद जी ए एन डी तच जाणार !)
(पृ.३५७): थंडी कडाक्याची..त्यांचं उठतच नाही तर लोकसंख्या कमी राहणारच...
मुळात गंभीर प्रवृत्तीच्या लेखकाने, ३५ वर्षे खपून लिहिलेल्या गंभीर विषयावरच्या कादंबरीत असले विनोद, कोट्या असाव्यात का ? ( नेमाडे टीकास्वयंवरात पु.ल.देशपांडेंनाही खरमरीत टीकेपासून माफ करीत नाहीत.) तर मग इथे असले विनोद, कोटया कशासाठी असाव्यात ? बख्तिनचे ह्याबाबत काय मार्गदर्शन आहे ? बख्तिन म्हणतो : ( पृ.२३, डायलॉगिक इमॅजिनेशन ):"पात्रांचे वाचकांपासूनचे जे अंतर असते ते हास्य-विनोद कमी करतात. आपण ज्यावर हसतो, ते आपल्या नजीक असते. विनोद-निर्मितीचे सृजन कमाल जवळिकीच्या क्षेत्रात असते. हास्यात अशी शक्ती असते की पात्रे जवळ येतात, ते अशा जाड्याभरड्या संपर्कात येतात की आपण त्यांना उलट सुलट, आत बाहेर, वरून खालून न्याहाळू शकतो. त्यांना उघडे करू शकतो, त्यांची मुक्तपणे पाहणी करू शकतो, त्यांच्याशी नाना प्रयोग करू शकतो. जगाचे असे जवळ आणणे हास्यविनोदाने शक्य होते." पण विनोदाचे दुसरे एक भागधेय बख्तिन सांगत नाही की पुष्कळ वेळा अहमहमिकेने विनोद करू जाता तो हसू आणत नाही, तर आपलेच हसे करतो. आपण विनोदांच्या कार्यक्रमात हे प्रत्यही पाहतोच. विनोद जमणे हे सर्जकतेला म्हणूनच आव्हान असते. आता ३५ वर्ष घेऊन, असे पाणचट विनोद झाले तर ते वैगुण्य आपण बख्तिनचे म्हणू शकत नाही. ह्याचे उत्तरदायीत्व नेमाडेंनाच घ्यावे लागेल किंवा कादंबरी एका बैठकीत लिहावी ( जशी कोसला ) का ३५ वर्षे खपून, हे त्यांचे त्यांनी ठरवावे. वाचकांनी हे विनोद हसण्या सारखे आहेत का हास्यास्पद आहेत, हे पहावे.
नेमाडेंच्या सर्वच कादंबर्‍या आत्मचरित्रपर असतात. त्यामुळे नायकासंबंधी त्यांचे काय व्यूह आहेत हे सहजी उमजून येते. तसेच नायकाची मते, भाषिते, निष्कर्श, आक्रोश, समजूती ह्या सर्व आपल्याला नेमाडेंच्याच आहेत असे मानावे लागते. आपण वर पाहिलेच की टीकाकार म्हणून नेमाडेंना वाटते की नायकाने/लेखकाने काही एक निश्चित नैतिक भूमिका घेऊन कथेत वावरावे लागते. ह्याला बख्तिनचाही पाठिंबा मिळतो तो असा : ( पृ.३८, डायलॉगिक इमॅजिनेशन ): " कादंबरीत नायक वा पात्रे एक आदर्शवादी रूप घेतात व त्याने त्यांची प्रतिमा बदलण्यास मदत होते. पूर्वी हे सॉक्रेटिसच्या प्रतिमेमधून साधल्या जायचे. एक नियम म्हणून सांगता येईल की, कादंबरीत नायक हा बहुतेक करून एक आदर्शवादी असतो." नेमाडेंनी कादंबरीचे नाव दिलेय "हिंदू" व मलपृष्ठावरही सांगण्यात आलेय की हिंदू धर्मातल्या नाना घडामोडींमुळे ह्या धर्मात एक प्रकारची अडगळ साचून राहिली आहे. कादंबरीचे उपशीर्षकच "जगण्याची समृद्ध अडगळ" असे आहे. मग हे कादंबरीत का दिसत नाही. ब्राह्मणांमुळे अडगळ साचली असे कादंबरीत नाहीय, केवळ हिंदू धर्मामुळे नाही तर वैश्विक अशा घडामोडींमुळे सर्वांकडेच अशी समृद्ध अडगळ जमते आहे, ही वस्तुस्थिती आपण जाणतोच. असेच कथानकात आहे. पुस्तकाच्या सुरुवातीस असलेल्या पसायदानात लेखकाने वैश्विक भान मागावे व स्वत: कथानकात कोणत्याही समर्थनाशिवाय केवळ हिंदू धर्मामुळे अडगळ साचतेय असा निष्कर्श काढावा ह्यात आदर्शवाद न दिसता साध्या विचारशक्तीची दिवाळखोरीच ज्यास्त दिसून येते. निश्चित नैतिक भूमिकेचे हे कसले समर्थन ? तसा साधा प्रयत्नही दिसून येत नाही. आदर्शवाद दिसणे तर दूरच. शेतकर्‍याची विदारक परिस्थिती छान रंगवून होते. पण नायकाचा आदर्शवाद त्यावरचा काही मार्ग दाखवत नाही. उलट एक अगतिकताच दाखवतो. वृद्धापकाळी नायकाच्या मुलाने गावी येणार नाही म्हणावे, सोयीसाठी दहिसरला फ्लॅट घ्या म्हणावे व नायकाने तसे करावे ह्यात नेहमी दिसते तशी अगतिकताच, मेलोड्रामा सारखी दिसते. शहरीकरणा विरुद्ध बोलणारा नायक व प्रत्यक्षातला लेखक आनंदाने शहरी होतो, स्त्रिवादापायी समर्थांची, गौतमाची खिल्ली उडवणारा नायक हा स्वत: मात्र लग्न करू इच्छित नाही, आत्यावर झालेल्या वारसाहक्क डावलण्यावर तोडगा काढू शकत नाही, हे अतिशय निराशाजनक आहे व बख्तिनच्या मार्गदर्शनाविरुद्ध आहे. तमाशा कलावंतांच्या जीवनाची ससेहोलपट चालूच रहावी व त्यावरचा नटरंग सिनेमा मात्र खूप चालावा, किंवा शेतकर्‍यांच्या आत्महत्त्या चालूच रहाव्यात व त्यावरची चित्रणे कादंबरीत छान झाली आहेत असे म्हणावे, ह्यातला विरोधाभास उघड दिसणारा आहे. हे कलेचे यश नाही, निश्चित नैतिक भूमिकेचे निदर्शक नाही, अगदीच डेली सोप च्या वळणाचे मात्र होते. त्याला उदात्ततेचा रंग कसा यावा ? मग कादंबरीला यमुनापर्यटनी म्हणावे का कुठलीच निश्चित नैतिक भूमिका न दिसणारी रीती-प्रधान म्हणावे ?
(क्रमश: )