शनिवार, २ मार्च, २०१३

गालिबची प्रेमाची परंपरा आणि नेमाडेंचा प्रेमाचा विद्रोह !

---------------------------------------
गालिबची परंपरा आणि नेमाडेंचा प्रेमाचा विद्रोह !
-----------------------------
    कुसुमाग्रजांचा जनस्थान पुरस्कार स्वीकारताना कवितांसंबंधी नेमाडेंना भरून येणे हे साहजिकच होते. तशात त्यांनी गालिबला सोबतीला घ्यावे हे रीतीला, परंपरेला धरूनच आहे. नेमाडे बोलतही परंपरेबद्दलच होते. तर आपल्याला जे सांगायचे आहे ते अजून थोरा मोठ्यांनीही कसे सांगितलेले आहे असे संदर्भ देण्याची आपल्याकडे परंपरा आहे. त्यातल्या त्यात एखादा अवघड विषय असेल किंवा त्यावरचा साग्रसंगीत अभ्यास असेल ( जसे पिएच.डी.चे प्रबंध ) तर असे संदर्भ मुद्दाम द्यावेच लागतात.
    ह्या भाषणात नेमाडे परंपरा आणि विद्रोह ह्याचा उहापोह करताना म्हणत आहेत की परंपरा ह्या जाणीवपूर्वक तपासून घ्यायला हव्यात व त्यात विद्रोह करायचा असेल तर तो प्रेमाने करावा. हे सांगत असताना त्यांनी उदाहरण म्हणून सांगितले की आपल्याकडे रोमॅंटिसिझम ही भानगड परंपरेत नव्हती. जे काही सांगायचेय ते नीट विचारांती, छंदात, दोन ओळीत सांगणे होते. ह्याला समर्थन म्हणून ते गालिबची साक्ष काढतात. म्हणतात की गालिबनेही म्हटले आहे की प्रेम हे बेबुनियाद ( बिन पायाचे ) असते तर एकनिष्ठता ही निश्चित पायाची असते. त्यामुळे ऍन्थ्रॉपॉलॉजिस्ट म्हणतात त्याप्रमाणे संततीही निकोप होते.
    गालिबचे समर्थन म्हणून नेमाडे जो गालिबचा शेर उदाहरणादाखल सांगतात त्याची ओळ ते अशी देतात : "वफा मुकाबिल ओ धावा ए इश्क बेबुनियाद ". आता ह्याचा नेमका अर्थ नेमाडे सांगताहेत तसाच आहे का वेगळा आहे, हे पाहण्यासाठी थोडा अभ्यास करू.     गालिबचा मूळ शेर दोन ओळींचा असा सापडतो:
"वफा मुकाबिल ओ दावा ए इश्क बेबुनियाद
जुनूने साख्ता ओ फस्ले गुल कियामत है"
( अर्थ :प्रियेला म्हटले आहे , तू एकनिष्ठ बनावीस आणि आमचा प्रेमाचा दावा खोटा निघावा (ही आश्चर्येच). जसा वसंत ऋतू यावा पण प्रेमवेड हे बनावटी (खोटे) असावे असाच हा प्रकार आहे...
संदर्भ - मिर्जा गालिब आणि त्याच्या उर्दू गझला (सेतुमाधवराव पगडी)
    इथे गालिब आपल्या प्रियेला म्हणत आहे की माझ्या प्रेमाचा दावा बिनपायाचा किंवा खोटा निघावा हे आश्चर्यच आहे, जसे वसंत ऋतू यावा पण प्रेम आसमंतात पेटून निघण्याऐवजी ते बेगडी, बिनपायाचे वा खोटे निघावे असेच आश्चर्याचे हे आहे.
    "हजारो ख्वाईशे ऐसी के हर ख्वाईश पे दम निकले" अशी प्रेमाची तुतारी वाजवणारा गालिब ह्या वरच्या शेरात प्रेम खोटे ठरावे ह्याबद्दल आश्चर्य व्यक्त करीत असताना नेमाडेंना गालिबने प्रेम हे बिनपायाचे असते तर एकनिष्ठता खरी असते असे वाटावे हे महदाश्चर्यच म्हणायला हवे. बरे नेमाडेंचा गालिबचा अभ्यास नसेल असेही अनुमान काढता येत नाही . कारण एकट्या "हिंदू"तच त्यांनी ४०-५० गालिबचे शेर उदधृत केलेले आहेत. तर ह्या अर्थाच्या भिन्नतेचा अर्थ कसा लावायचा ?
    कदाचित मी जशी पुढचे मागचे संदर्भ तोडून विधाने उदधृत करतो, आणि अशी परंपरा अनेक जण पाळतात, तीच परंपरा नेमाडे पाळत असावेत. किंवा हा त्यांचा प्रेमाने केलेला विद्रोह असावा !
--------------------------------------------------------------------------


शुक्रवार, १ मार्च, २०१३






-------------------------------
रोमॅंटिक नेमाडे ?
-----------------------
    जनस्थान पुरस्कार स्वीकारतानाच्या भाषणात नेमाडे म्हणाले की परंपरेचा चोखंदळपणे विचार करून मग ती पाळावी. आपल्या परंपरेत नसलेले आपण केले तर ते चुकीचे होते. जसे, ते म्हणाले, आपल्याकडे रोमॅंटिसिझम ही भानगड नव्हती. काही कवींनी ती उगाचच आणली. मग कोणी कोणाच्या कुरळ्या केसावर कविता करी, कोणी विशाल भालप्रदेशावर....
    आता हे खरे की खोटे हे तपासण्यासाठी मी काही कवितासंग्रह तपासू लागलो. तर काय आश्चर्य ! अगदी नेमाडे म्हणतात तसेच... हे कवी बघा केसांवर काव्य करीत आहेत. उदाहरणादाखल खालील कवितेच्या काही ओळी पहा :

"लामणदिव्याच्या उजेडात
कशी विणीत बसलीस वेणी...
.......
आणि अबंध अबंध केसांच्या वाटा...
.......
केसांच्या कडांवरून घसरतात बोटांची पावलं
..........
दे सोडून केसाकेसांच्या आकाशगंगा होऊ दे---
........
केसाकेसांवर उडू दे त्या विश्वह्रदयाच्या अनाकारबद्ध नाड्या..
..........
ढवळत रहा ह्या नितळखोल केशसमुद्रातून
..........."
हा कवी कुरळ्या केसांवर नव्हे पण लामणदिव्याच्या उजेडात कोण वेणी विणीत बसलेय ते सांगतो आहे. न बांधलेल्या केसांच्या त्याला अबंध वाटा वाटत आहेत. त्याच्या बोटांची पावलं केसांच्या कडांवरून घसरत आहेत. तो तिला म्हणतोय की ह्या जणू केसांच्या आकाशगंगाच आहेत व त्या तिने सोडून द्याव्यात. त्या केसांवर विश्वाच्या ह्रदयाच्या नाड्या उडाव्यात. आणि तिने असेच ह्या नितळखोल केशसमुद्रात ढवळत बसावे, म्हणजे केसात हात फिरवावा....
    व्वा ! अगदी खरेच निघाले की हे वर्णन, कुरळ्या केसांसारखे रोमॅंटिक !
......आणि कोण आहे हा कवी ? तर अहो तेच स्वत:ला थोर कवी म्हणवणारे भालचंद्र नेमाडे. ( भाषणात ते म्हणाले होते की मी थोर कवी आहे हे मी जाणतो, तसेच मी थोर कादंबरीकार नाही हेही जाणतो....काय विनय ना ! )
आणि कविता आहे : लामणदिव्याच्या उजेडात ( पृ.७१, दृश्यांतर, चंद्रकांत पाटील संपादित, नॅशनल बुक ट्रस्ट )

---------------------------------

-----------------------------
स्त्रीविरोधी नेमाडे !
-----------------------
    जनस्थान पुरस्कार स्वीकारतानाच्या भाषणात नेमाडेंनी स्त्रियांना एक बंडखोरी करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, की स्त्रियांनी स्त्री-भ्रूण-हत्येविरुद्ध फाशीची शिक्षा मागावी, नाही तर स्त्रियांची संख्या इतकी कमी होईल की ते सिमल्यात पाहतात तसे चारपाच पुरुषात मिळून एकच बायको राहील. मानववंशशास्त्रानुसार प्रत्येक पुरुषाला एक बाई हवी व त्यासाठी स्त्रियांनी ह्या स्त्री-भ्रूण-हत्येविरुद्ध जोरदार शिक्षेची मागणी करायला हवी.
    उपदेश बरोबर असला तरी तो चुकीच्या कारणासाठी त्यांनी दिला आहे. पुरुषांना निदान एक तरी बाई मिळावी ह्या कारणासाठी नाही तर स्त्रीला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून मान/न्याय/अस्तित्व मिळावे ही कोणाही स्त्री-पुरुषांची ह्या जेंडर-रेशो-इंम्बॅलेन्स वरची प्रतिक्रिया असली पाहिजे.
तसेही नेहमीच नेमाडे स्त्रीवादी भूमिकेच्या बेदखलीवर पोसलेले आहेत हे त्यांचे साहित्य वाचणार्‍यांना लगेच समजेल. "आधुनिक समीक्षा-सिद्धान्त" ( ले: मिलिंद मालशे/अशोक जोशी ) ह्यांत स्त्रीवादाचा उहापोह करताना म्हटले आहे, ( पृ. २४७) "केट मिले या लेखिकेने Sexual Politics या ग्रंथामध्ये अशी भूमिका मांडली आहे की, पितृसत्ताक समाजव्यवस्था ( patriarchy ) हे स्त्रियांच्या शोषणाचे आदिकारण आहे; आणि आर्थिक व्यवस्था भांडवलशाहीवादी असो वा साम्यवादी असो, स्त्रियांचे शोषण दोहोंमध्ये होतच राहते. समाज कोणत्याही प्रकारचा असला तरी स्त्रियांविषयीचे विशिष्ट प्रकारचे पूर्वग्रह सार्वत्रिक स्वरूपात आढळतात, याचे प्रत्यंतर आपण वर उल्लेखिलेल्या ऍरिस्टॉटल, पेटर, प्रभृतींच्या भूमिकांवरून आलेलेच आहे. लोकशाहीवर आधारलेल्या समाजव्यवस्थांमध्येसुद्धा स्त्रीविषयक कल्पनांचे रूढीबद्ध साचे ( stereotypes) वापरले जातात, आणि त्यांच्याद्वारे पितृसत्ताक व्यवस्थेला स्त्रियांचे शोषण करता येते, त्यांना अबला बनविता येते, विशिष्ट सामाजिक-सांस्कृतिक व्यवहारांपासून त्यांना दूर ठेवता येते, अशी भूमिका केट मिलेने मांडली."
    ज्या कुसुमाग्रजांचा पुरस्कार नेमाडेंना मिळाला ते आज हयात असते तर असे पुरुषसत्ताक बरळणे पाहून ते म्हणाले असते :
        "उजेडात दिसू वेडे
        आणि ठरू अपराधी"
-------------------------------------------

मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१३

हेच का नेमाडे ?








"बिढार" ( पृ.४१-४२) ले: भालचंद्र नेमाडे
''सकाळपासून कुसुमाग्रजाला शिव्या देतोय, कुठं म्हातारं तडफडायला आलं आमच्या नवीन पोरांच्यात ! मग मी त्याला एक क्लासिक उपमा सांगितली. भाद्रपदात नवीनवी कुत्री प्रयत्न करत असतात एखाद्या कुत्रीवर, तेवढय़ात एखादं म्हातारं आडदांड निब्बर कुत्रं मध्ये घुसून ताव मारून निघून जातं. तसं प्रधानचं झालं! खरं म्हणजे सगळीकडे म्हातारी कुत्री बोकाळलीयत. साहित्य परिषदांत तीच, बक्षिसांत तीच, रेडिओवर, साहित्य अकादमीत, साहित्य संमेलनात-सगळीकडे हेच बाप्ये मनमुराद. तिकडे नेहरू आणि इकडे साले हे..''
    " स्वातंत्र्य मिळायच्या आधी साले तरुण होते तेव्हा यांना संधी नव्हती. नुस्ते कातावले होते. सत्तेचाळीसनंतर आणि संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर साल्या सरकारनी धडाधड उत्तेजनपर प्रकार सुरू केले. तेव्हा ही म्हातारी मंडळी त्यावेळची राहिलेली खाज भागवायला तुटून पडली. आज इतकी वर्ष झाली तरी ह्या निब्बर लोकांची चढायची हौस कमी होत नाही. तुम्हा नवीन पोरांचं कौतुक कोण करणार ह्या गर्दीत ? "

--------------------
तर नेमाडेंच्या मते कुसुमाग्रज हे निब्बर व आडदांड कुत्र आहेत. अप्रतीम उपमा आहे. पूर्वी दत्ताच्या तसबिरीत श्वान दाखवलेले असत. श्वान म्हणजे देवाचे लाडके. त्यातल्याच एका आडदाड श्वानाचे प्रतीक करीत कुसुमाग्रजांना नेमाडे ह्यांनी हा बहुमानच केला आहे. ह्याच प्रतिमासृष्टीचे देखावे बघताना मग संजय भास्कर जोशी हे अजून एका डॉग-स्क्वॅड मधले श्वान वा चालक असावेत. त्यांनी इतर पुस्तकांचे गठ्ठे हुंगून हुंगून नेमाडेंचे साहित्य बिनधोक ठरवले हे बरे झाले ! आता त्यावर इतर श्वान मंडळी आपापली तंगडी वर करतीलच !
आता ह्या श्वान प्रतिमेला जागून स्वत: नेमाडे हे कुठल्या प्रकारचे श्वान आहेत असा प्रश्न निर्माण झाला तर त्यांच्या झुबकेदार मिशा आठवा व आठवा एक लाडके केसाळ श्वान, ज्याचे तोंड कुठे व ढुंगण कुठे हे दाट केसाळ प्रतिमेत दिसत नाही. हेच का नेमाडे ?
-----------------------

गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१३

----------------------
ओवेसी कदाचित उदारमतवादी---नेमाडे ?
--------------------------------------------
    श्री.श्रिकांत उमरीकर ह्यांनी भालचंद्र नेमाडे ह्यांची ४० वर्षांपूर्वीची एक कविता देत नेमाडे कसे उस्फुर्तपणे धर्मांध मुस्लिमांना जवाब देत आहेत, त्यांच्या तुमानीत...वगैरे.. त्याची वाखाणणी केली आहे.
    कदाचित श्रेष्ठ विचारवंतांचे हे एक लक्षण असावे की त्यांच्या साहित्यात कायम परस्पर विरोधी विचारांचे दर्शन होत असते. कारण १९८३ साली लिहिलेल्या ( म्हणजे ३० वर्षांपूर्वी ) एका लेखात ते म्हणतात : ( टीकास्वयंवर पृ. १२०, ):
"देशीयतेचा अतिरेक एखाद्या समाजाला आत्मकेंद्रित करून र्‍हासशील करू शकतो, हे आपण मागे अंतर्जननासंबंधीच्या चर्चेत उल्लेखले. जगातल्या इतर समाजापासून विभक्त राहाण्याची प्रवृत्ती त्यामुळे आपोआपच बळावते. एक प्रकारचा वंशाभिमान आणि आत्मसंतुष्ट जीवनव्यवहार अशा समाजात वाढतात. साहजिकच अशा संस्कृती परकीय आक्रमणात नष्ट होण्याची भीती असते. अल्‌-बिरुणीने इसवी सनाच्या दहाव्या शतकाच्या आधी अस्तित्वात असलेल्या ब्राह्मण-केंद्री हिंदू समाजात अशा देशीयतेचा अतिरेक अतिशय स्पष्टपणे वर्णिलेला आहे. तथापि हिंदुस्थानला आपला देश मानून निर्माण झालेल्या, उदारमतवादी मुसलमान वर्ग आणि महानुभाव-वारकरी अशा ब्राह्मण्यविरोधी संप्रदायांनी देशभर उभारलेल्या आत्मशुद्धीपर देशीवादी चळवळींनी हिंदुस्थानातील समाजाचा पाया पुन्हा नव्याने घालून सर्वनाश चुकविला....... "
    नेमाडेंच्या आगामी हिंदूनंतरच्या कादंबरीत कदाचित मुसलमानांच्या उदारमतवादाचे चित्र पहायला मिळणार असावे. कारण हिंदूतला हिरो पाकिस्तानात असूनही त्यात मुसलमानांसंबंधी काहीच ( चांगले वा वाईट ) नव्हते. कदाचित ब्राह्मणांनी हिंदू धर्म बिघडवला हे प्रमुख चित्र दाट करण्यासाठी त्यांनी हे केले असावे. आता मुसलमानांच्या तुमानीचे काही खरे नाही. बा अदब, मुलाहिजा....उदारमतवादी महानुभाव-मुसलमान-युती येत आहे..!
------------------------------------------------------------

शनिवार, ८ डिसेंबर, २०१२

नेमाडेंनी गाठली सीमा !

नेमाडेंनी सीमा गाठली !
    श्री.भालचंद्र नेमाडे सध्या महाराष्ट्राच्या सीमा-भागात ( बेळगावला) का बरे गेले असावेत ? ह.मो.मराठे ह्या ब्राह्मण-संमेलनाध्यक्ष-इच्छुका-विरुद्ध कोणा महानुभावीला समर्थन देण्यासाठी ? सीमा-भागावरून, नेमाडेंचे सीमा-ओलांडणे आठवले. "हिंदू" लोकांनी अडगळीत टाकली हे पाहून रा.रा. भालचंद्र नेमाडेंना रागाची उबळ आली असावी, व त्यांनी सीमा गाठली ?  त्या भरात त्यांनी मागच्या प्रमाणे, तमाम मराठी सारस्वतावर कोरडे ओढण्याची सीमाच गाठायचे ठरवले असावे. म्हणून तर ते सीमेवरच्या बेळगावात दाखल झाले, म्हणतात. कोणते कोरडे ? 
"टीकास्वयंवर" ह्या ग्रंथातून त्यांनी जे परिसीमेचे कोरडे ओढले होते ते असे:
१) "सरोजिनी बाबर व ग.दि. माडगूळकर ह्यांसारखे निकृष्ट दर्जाचे लेखक ह्या समाजात महत्वाहचे होऊन बसावेत याची लाज बाळगण्याची जरूरी नाही...( पृ. ३७)
२) "सरकारी बक्षिसांच्या चढाओढीत प्रकाशकांचा किती भाग असतो हे प्रत्यक्ष ह्या क्षेत्रात उतरणार्‍यांना नीट माहीत आहे....( पृ.३७)
३) "काही लेखक तर प्रकाशकांच्या रखेल्याच आहेत" ( पृ.३७)
४) "रा.रा. पाडगावकरांनी रा. वालन्‌ची भक्ती करावी व रा. वालन्‌नी पाडगावकरांचा उदो उदो करावा ;" ( पृ.३९)
५) "आमचे जुने स्नेही रा. आरती प्रभू यांनी रा.वालन्‌ना पुस्तक अर्पण करावे आणि रा.वालन्‌नी रा.आरती प्रभू व रा. दिलीप चित्रे यांच्या करिअरिस्ट रद्दीत मराठीची प्रयोगशीलता पहावी;"( पृ.३९)
६) "रा.मे.पु.रेग्यांनी कुरुंदकरांसारख्या पोरकट लेखकाची दोन पानात फेंफें करावी पण रा. वा.ल.कुलकर्ण्यांबद्दल दोन ओळी कुठे लिहायच्या नाहीत.."( पृ.३९)
७) "श्री.ना. पेंडशांना कुठले तरी बक्षीस मिळाले म्हणून वरची जागा दिली जाणे हे काय ?"..( पृ.४१)
८) पदमा गोळे : अगोदरच गंजलेले आपले अर्धवट टीकानिकषही उपयोगी पडू नयेत असेच हे साहित्य...रा.श्री.जोग ह्यांनी पाडगावकरांच्या संदर्भात म्हटल्याप्रमाणे "शब्द इकडचे तिकडे व तिकडचे इकडे फेकून देण्याची कला"...( पृ.१२८)
९) दिलीप चित्रे ह्यांच्या मराठी पोएट्री ह्या भाषांतराबद्दल : "भाषा इथून तिथून सारखीच, असा दरिद्री पवित्रा ज्या भाषांतरात असेल ते भाषांतर निव्वळ हमाली ठरते"..( पृ. १३७)
१०) नारायण सुर्वे यांचा वैचारिक पाया असा सेकंड-हॅंड आणि कच्चा आहे....( पृ.१४८)
११) विंदा करंदीकर : कुठल्याही गोष्टीकडे निव्वळ शब्दसौंदर्याच्या दृष्टीतून पाहाण्याचा पोरकट प्रवाह मराठीत गेली वीस वर्षे प्रबळ होता. करंदीकरांच्या बहुसंख्य कविता ह्या प्रकारच्या असल्याने त्यांची इंग्रजी भाषांतरे एकूण मराठीबद्दल बाहेर चांगले मत करून देण्याची शक्यता दिसत नाही...( पृ.१५१) .....तरी बरे ह्याच अकादमीने त्यांना ज्ञानपीठ देऊन सन्मानिले !
१२) इंदिरा संत यांच्या एकसूरी कवितांमुळे म्हणा, का ह्या दोघा भाषांतरकारांच्या उथळपणामुळे म्हणा, हा संग्रह साधारण प्रतीचा झाला आहे ( पृ.१५२)
१३) पु.शि.रेगे :सावित्री, अवलोकिता, व रेणू ह्या तिन्ही कादंबर्‍या सकृदर्शनीच छापून छापून वाढवलेल्या दिसतात...( पृ.२२८)
१४) ह.ना. आपट्यांची भोबरे निर्माण करणारी भाषा ;
१५) फडक्यांची कृत्रीम बनावट;
१६) खांडेकरांची आरास; ---( खांडेकरांनाही ज्ञानपीठ मिळाले होते बरं ! )
१७) माडखोलकरांची आलंकारिकता;   हे दुर्गुण ज्या रीतीप्रधान प्रवृत्तीतून आले ती प्रवृत्ती स्वातंत्र्योत्तर काळात इतिहासजमा होऊ लागल्याची चिन्हे दिसत आहेत....( पृ. २४९)
१८)  मात्र मराठी वृत्तपत्रांबद्दल मला मनापासून तिरस्कार आहे. कारण मराठी वर्तमानपत्रांचे संपादक नुसते निर्बुद्धच नाहीत तर अडाणीपणामुळे येणारी मग्रूरी आणि प्रसिद्धीच्या सत्तेचा मद त्यांच्यात दिसून येतो....( पृ.३५९)
१९) सत्यकथा ह्या मासिकासंबंधी : सत्यकथा चालू राहिल्यामुळे जी पोकळी निर्माण झाली होती ती सत्यकथा बंद पडल्यामुळे भरून निघाली . ( पृ.३९०)
२०) हैद्राबाद साहित्य संमेलनात रा.प्रल्हाद अत्रे नेहमीप्रमाणे व्याख्यानात अतिशय विवस्त्र अश्लील विनोद करीत असताना श्रोतेसुद्धा चिडून रा.अत्र्यांना व्याख्यान बंद करा म्हणाले. पण धूर्त कुलकर्णी अध्यक्ष असून गप्प होते...( पृ.४०)
२१) पु.ल.देशपांडे : एकदा तुझे आहे तुजपाशी चा प्रयोग आणि त्यावेळी हसणारे व शेवटी रडून घेणारे प्रेक्षक पाहून मी मराठी नाटकांचा धसकाच घेतला आहे....( पृ.३४१)
( तूर्तास एवढेच...)
---------
अरुण अनंत भालेराव
----------------------------------
नेमाडे : एक सोक्षमोक्ष ! ( लेखक : सरपोतदार )
नेमाड्यांचा समाचार घेण्यापूर्वी 'टीका स्वयंवर' या कुप्रसिद्ध पुस्तकात त्यांनी कुणाविषयी काय मुक्ताफळे उधळली आहेत ती आधी देतो.
१) कालिदासाचे मेघदूत - दुय्यम कलाकृती (पृष्ठ २५१)
२) टेनिसन, ब्राउनिंग, इलियट, बेकेट - दुय्यम दर्जाचे साहित्यिक (पृ. ११५)
३) शि. म. परांजपे - मराठी नीट न येणारा माणूस (पृ. २४८)
४) पु. शि. रेगे - अपरिपक्व कादंबरीकार (पृ. २२८)
५) खांडेकर, फडके, माडखोलकर, गाडगीळ, भावे, रेगे, खानोलकर, जोगळेकर - लैंगिक स्वातंत्र्याच्या दृष्टीने बुभुक्षित (पृ. २५५)
६) इंदिरा संत - क्षीण आशयाच्या कविता लिहिणारी कवयित्री (पृ. १५२)
७) पद्मा गोळे - शब्दभांडार उबवित राहणारी कवयित्री (पृ. १३३)
८) पुन्हा फडके, खांडेकर, माडखोलकर - क्षुद्र लेखक, कवी (पृ. ८७)
९) आचार्य अत्रे - (कायम 'प्रल्हाद अत्रे' असा तुच्छतेने केलेला उल्लेख) (पृ. ४०, १२२, २५६)
१०) श्री. के. क्षीरसागर - मास्तरकी, भुंकणारी शैली, अर्ध्या हळकुंडाने पिवळे, लटपटपंची, अपुरे ज्ञान, घमेंडखोर इ. (पृ. १६, २३, २६, २८, २९, ३१)
११) ग. दि. माडगुळकर व सरोजिनी बाबर - निकृष्ट दर्जाचे लेखक (पृ. ३७)
१२) नरहर कुरुंदकर - पोरकट लेखक (पृ. ३९)
१३) दिलीप चित्रे - धन्देबाजी करणारे, काडीचाही व्यासंग नाही, अडाणी, मराठीचा नीट अभ्यास नाही (पृ. ३९)
१४) अरुण कोलटकर - सांस्कृतिक क्षुद्र वृत्ती (पृ. ८३)
१५) बोरकर, बापट, अनिल, पाडगांवकर, आरती प्रभू - रविकिरण मंडळाची हास्यास्पद परंपरा सांभाळणारे कवी (पृ. ९२)
१६) पु. ल. देशपांडे - आधुनिकीकरणाला सुप्त विरोध (पृ. ९८)
१७) विजय तेंडूलकर - आधुनिकीकरणाला सुपर फ्याशन म्हणून कवटाळणारे (पृ. ९८)
१८) चोखामेळा, ग्रेस - बावळट साहित्यिक (पृ. १८०)
१९) रेगे, खानोलकर, दळवी - अडाणी लेखक (पृ. २६६)
२०) 'तुझे आहे तुजपाशी' - आपली वांग्मयिन संस्कृती किती खालच्या दर्जाची आहे हे या नाटकावरून लक्षात येते (पृ. ३४१)
२१) एकूण समीक्षक - धंदेवाईक बदमाष. वास्तववादी समीक्षेची आपल्याकडे परंपराच नाही. (पृ. ३७३, १७६, ३४२)
२२) एकूण साहित्यिक - गिधाडे (पृ. ४२)
अशातर्हेने तमाम मराठी साहित्यिक आणि समीक्षकांचा नेमाडे नावाच्या अतृप्त आत्म्याने अक्षम्य अधिक्षेप केला आहे.

बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१२

३) स्त्रीवादी समीक्षा सिद्धान्त व हिंदू :

    आपल्याला स्त्री-मुक्तीची चळवळ माहीती असते. पण साहित्यात अशी काही समीक्षा-सिद्धान्त पद्धती असेल असा अदमास नसतो. सिमॉन द बोवा ह्या प्रख्यात फ्रेंच स्त्रीवादी लेखिकेचे नेहमी नाव घेतल्या जाते. तिच्या "द सेकंड सेक्स" ह्या पुस्तकातून ही मते मांडलेली आहेत. सर्वच क्षेत्रात पुरुषवर्चस्ववादी दृष्टीने स्त्रीकडे पाहिल्या जाते आणि न्यूनवादच अंगिकारल्या जातो असे तिचे प्रतिपादन आहे. त्याअगोदर न्यूनवादात ऍरिस्टॉटलने कसे "स्त्रीमध्ये जे न्यून असते त्यातच तिचे स्त्रीत्व असते" असे म्हटलेले आहे हे आपल्याला कळते. तसेच फ्रॉईड्सारख्या डॉक्टरानेही स्त्रीच्या कामभावनेचा आधार हा तिचे पुरुषाविषयीचे लिंग-वैषम्य ( पेनिस-एन्व्ही ) असते असे सांगितले होते त्याचा ही लेखिका समाचार घेते. हे पुरुषप्रधानत्व इतके सूक्ष्मपणे समाजात बोकाळलेले असते  की अमेरिकेसारख्या प्रगत समाजात, जिथे मिळकतीत निम्मा वाटा कायदा स्त्रीला देते, जिथे पगारात स्त्री असल्यामुळे भेदभाव होत नाही, तिथे स्त्रीचे सरासरी उत्पन्न आजही पुरुषांपेक्षा कमीच भरते. कारण एम.बी.ए च्या वर्गात जरी मुली मुलांच्या बरोबरीने असल्या तरी नोकरीत मूल झाल्यावर अजूनही स्त्रीचे प्राधान्याचे मुद्दे पुरुषांपेक्षा वेगळेच होतात. ह्या बाबतीत सिमॉन द बोवा चे एक प्रसिद्ध वाक्य फार उद्‌बोधक आहे. ते असे: "स्त्री जन्माने स्त्री नसते, तर नंतर स्त्री बनते.". ह्यात समाज तिला देत असणारी वागणूक फार प्रभावीपणे दाखविल्या जाते. आपल्या साहित्यातले बरेचसे शब्द पुरुषी वर्चस्वाच्या खुणा दाखवतात. जसे : बंधुभाव, सर्व प्राणीमात्रांसाठी सरसकट माणूस हा शब्द वापरणे, जसे रस्त्यावरचा माणूस, वगैरे, चेयरमॅन, वगैरे. ह्याबाबत माझे असे निरिक्षण आहे की कैक काळापासून सर्व समाजात जो पुरुष-प्रधान दृष्टीकोण बोकाळलाय त्याचे दृश्य, प्रत्यक्ष, परिमाण म्हणजे समाजातला जेंडर रेशो. दर हजार पुरुषांमागे अजूनही सर्व योजनांअखेर फक्त ९०० स्त्रिया आढळतात. समाजात प्रत्यक्ष स्त्रियाच वर्षानुवर्षे कमी असतील तर भाषेतही त्यांचे स्त्रीवाचक शब्द कमीच असणार. मराठी भाषेत पुरुषवाचक शब्द किती व स्त्रीवाचक शब्द किती असे कोणी अजून मोजून पाहिलेले नाही. शब्दकोशात प्रत्येक शब्दाचे तो पुरुषवाचक आहे का स्त्रीवाचक, अशी नोंद कंसात दिलेली असते. जसे : १) सळ ( पु ): तलवारीचे म्यान; तिच्या मुठीला अडकवण्याची दोरी; घडीचा मोड, दुमड , सोन्याची लगड, पीक कापल्यानंतर उरणारा बुडखा २) सळई ( स्त्री ) : शलाका ; धातूची बारीक काडी; गणना करताना संख्या समजण्यासाठी काढून ठेवलेला भाग; लोखंडाचे कडे बसविल्यावाचून असलेले मुसळाचे लाकूड; जनानी मुकट्यावरच्या उभ्या रेघा. वा.गो.आपटयांच्या "शब्दरत्नाकर" ह्या शब्दकोशात एकूण ६०,५५९ शब्द आहेत, पैकी स पासून सुरू होणार्‍या शब्दांचा गट हा सगळ्यात मोठा असून त्यात ५८८८ शब्द आहेत. आता ह्यापैकी पुरुषवाचक व स्त्रीवाचक शब्द मोजले ( एक मोठा नमुना म्हणून ) तर ते भरतात: पुरुषवाचक : १३३९ तर स्त्रीवाचक : ९३६. आता लिंगभेद जसा दर १०००वर मोजतात तसे स्त्रीवाचक शब्दांचे प्रमाण काढले तर ते भरते : दर १००० पुरुषवाचक शब्दांमागे : ६९९ स्त्रीवाचक शब्द. नशीब आपल्या भाषेचे नाव "मराठी" हे स्त्रीवाचक आहे व "भाषा" हेही स्त्रीवाचक आहे. तरीही स्त्रीवाचक शब्द ( हा मात्र पुरुषवाचक) असे कमी आहेत.
कधी कधी वाटते की शब्दकोशात काय, शब्द असतात भरपूर, पण आपण वापरतो त्यातले मोजकेच. तर मग त्यापैकी आपण किती पुरुषवाचक वापरतो व किती स्त्रीवाचक वापरतो हे रॅंडमली पहावे. तर असे आढळून आले:
मंगला गोडबोले : पुस्तक "आडवळण"( पृ.३३ )--पु:३६;स्त्री:१९ ( दर १००० मागे ५२७ स्त्रीवाचक शब्द )
शांता शेळके : पुस्तक "सांगावेसे वाटले म्हणून" ( पृ.५७ ) पु:४३;स्त्री:२० ( दर १००० मागे ४५६ स्त्रीवाचक शब्द )
अशोक रा. केळकर : पुस्तक "वैखरी" ( पृ.९२ ) पु: २०; स्त्री: ५० ( दर १००० मागे २५०० स्त्रीवाचक शब्द )
भालचंद्र नेमाडे : पुस्तक "तुकाराम गाथा" ( पृ.११ ): पु: ८३; स्त्री: २२ ( दर १००० मागे २६५ स्त्रीवाचक शब्द )
भालचंद्र नेमाडे : पुस्तक "टीकास्वयंवर" ( पृ.३४ ) : पु: २६; स्त्री: २४ ( दर १००० मागे ९२३ स्त्रीवाचक शब्द )
ज्ञानेश्वर नाडकर्णी: पुस्तक "अश्वत्थाची सळसळ" ( पृ.३५ ) पु:२३; स्त्री: २३ ( दर १००० मागे १००० स्त्रीवाचक शब्द )
एक केळकरांचा अपवाद वगळला, तर स्त्रीवाचक शब्द आपण कितीतरी कमी वापरतो असे दिसते.
    संपत्तीदर्शक, मालमत्तादर्शक असे शब्द जमा केले व त्यात स्त्रीवाचक किती हे पाहिले तर चित्र असे दिसते : खालील ७७ शब्दात पुरुषवाचक आहेत: १७, तर स्त्रीवाचक आहेत: ३७ ( नपुसक : २२) ( माल, संपत्ती, स्थावर, मिळकत, पैसा, रोकड, धन, मालमत्ता, वित्त, बंगला, गाडी, जमीन, शेती, शेत, प्लॉट, भूखंड, फ्लॅट, सदनिका, बॅंक, नोट, चिल्लर, कपडे, दागिने, अलंकार, सोने, वळी, हार, अंगठी, पाटली, बांगडी, जमा, फर्निचर, हिरा, चांदी, माणिक, मोती, कोठार, रत्न, वाडा, बंगली, देवडी, वस्त्र, मेजवानी, जहागीर, मोहरा, सिक्के, गोधन, स्त्रीधन, घर, शेअर्स, गुंतवणूक, भांडवल, पत, नगद, मान/मरातब, श्रीमंती/गरीबी, गडगंज, विपुल/ता, वाडी, कंपनी, उद्योग, उद्योगपती, उद्योजिका, खाते, आंदण, बक्षीस/सी, भेट, आहेर, मानपान, पगडी, जमा/डिपॉझिट, लाच/लुचपत, वास्तू, महाग, महागाई, दान, दाता ). ह्यावरून स्त्रीयांकडे मराठी समाज एक मालमत्ता म्हणूनच पाहतो हे उघड होते. लिंगाचे बिंग असे उघडे पडते, मराठी भाषेत !
    स्त्रीवादाचा पुरस्कार करण्यात नेमाडे त्यांच्या हिंदू ह्या कादंबरीत फारच कमी पडतात. त्यांनी वेळोवेळी स्त्रियांच्या कणवेची वाक्ये  पेरलेली असली तरी तो केवळ बुरखा आहे हे दिसून येते. हे तोंडदेखलेपण नेमाडे चांगले सांभाळतात जेव्हा ते मोघम म्हणतात की, "स्त्री ही सामाजिक कल्पना आहे का जीवशास्त्रीय ?" पण त्यावरचे उत्तर "हिंदू" त् ते कुठेच देत नाहीत. उलट नीट न्याहाळले तर खालील विधानांवरून त्यांची स्त्रियांकडे पाहण्याची ( किंवा बिलकुल न पाहण्य़ाची ) दृष्टी पारंपारिक पुरुषी असल्याचेच दिसून येईल:
(पृ.२६):"मुक्त ह्या संस्कृत शब्दाऐवजी आपला देशी शब्द मोकाटच ह्या संदर्भात वापरला पाहिजे. बस. तेवढ एक झालं की आपल्या मुली सुधारल्याच समज. लैंगिकदृष्ट्या लहानपणापासून ह्या बायका मोकाट असल्यानं पुढे काही भीड राहत नाही. व्यभिचाराचीही शक्यता ह्यात गृहित धरली जाते. प्रत्यक्षात लैंगिक अतिचार अशाच बाया करतात."
(पृ.१५७):"...अरे, पण सुईच्या मर्जीशिवाय दोरा जाईल काय ? "
(पृ.२०६):"..ह्या मारवाड्याच्या सारख्या दिसणार्‍या पोरांना गावातल्या शेतकर्‍यांच्या कामानं रंजलेल्या बायका, रे, इकडे ये बरं. तू कोणाचा ? असं विचारायच्या, मग त्यानं बापाचं नाव सांगितलं, की सगळ्य़ा पोट धरधरून हसायच्या. धनमत्सर. "
(पृ.२५७):"गाय आणि बायको---संध्याकाळशी दावणीला पाह्यजे."
(पृ.२६३):"आता दोन राण्याही गेल्या, त्यामुळे हल्ली एकाच बायकोत आवडती आणि नावडती दोघी आलटून पालटून पाहावं लागतं."
(पृ.२८०):"...मला पहा अन फुलं वाहा....लभान्यांनो, सवतीची फुगडी अन फेडा एकमेकीची लुगडी."
(पृ.३४०):" कि अबला वरतारे दाबली नं खाले भलत्याची नार."
(पृ.३४६):"...हे पहा वहिनी, कुलूप एकीकडे अन किल्ली एकीकडे असं चालतं का ?"
(पृ.३९०):"स्त्रीवादाविरुद्ध आम्ही सगळ्यांनी चर्चासत्राच्या आधीच नीट तयारी केली होती" हे वाक्य केळ्यांवरून सुचणे हे म्हणजे अश्लीलतेची कमालच.
(पृ.४२२):"..का वं ए नागरगोंडी, लई छाती काढून दबोयती का आम्हले ?....उंदरं खाता साल्या, त्याच्यागुनं पाहा कशा घागरी याहिच्या.." ( स्त्रीपात्रे अशीच ठेवल्यामुळे लेखकाला सर्वत्र पहा कशा इरसाल शिव्या वाहता आल्या आहेत.).
(पृ.४३८):"...गुरुची शिष्या गुरूला फळली..."
(पृ.४५२):"...दक्षिणेतूनच स्त्रीदाक्षिण्य हा शब्द आला असावा..."
(पृ.५३८.):"...बायकोला मी सोडून दुसर्‍यापासून मूल नाही होऊ शकत ?...ही नैतिकता भारतीयांच्या केंद्रस्थानी यायला पाहिजे."
कादंबरीचा नायक ब्रह्मचारी दाखविल्यामुळे एक स्त्रीपात्र वाया घालवले आहे. शिवाय जेव्हा तो म्हातारा होतो तेव्हा मुलाशी होणारा बेबनाव लेखकाला महत्वाचा वाटतो. पण म्हातारीच्या जाणीवा दाखवण्याचे कटाक्षाने टाळण्यात आले आहे. खंडेरावाच्या लहानपणी बापाची व्यक्तिरेखा रंगविली आहे, पोराच्या डोळ्याच्या जखमेची कणव दाखविली आहे, पण आईचे कोणतेही थोरपण चितारलेले नाही. हे विशेष जाणवण्याचे कारण, लेखक व्यक्तिश: मराठी साहित्यिकात फक्त "श्यामची आई" वाल्या साने गुरुजींनाच मानतो, तरीही आईचे थोरपण चितारीत नाही. कादंबरीत स्वत:ची ओळख पटवण्यासाठी वाचकाला स्त्री पात्रेच उपलब्ध नसतील( जी पात्रे आहेत ती लभान्या, रांड, अशा,किंवा महानुभावी आत्यासारख्या संन्याशीण ) तर स्त्रीवाद कसा वाखाणायचा ? अखेरच्या घटकेला दुसर्‍या आत्येवरचा अन्याय दाखवलाय. पण नायक त्याचे निराकरण करीत नाही, पारंपारिकतेने म्हणतो, बायकांनी सहनशील रहावे. मूळ पुरुषप्रधान विचारसरणी शाबूत ठेवून, त्या आड सरावाच्या-टाळीच्या-फुटकळ स्त्रीसहानुभूतीच्या काही व्याक्यांच्या मिषाने / मिशाने नेमाडे स्त्रीवादाची तळी समर्थपणे पेलू शकणार नाहीत हे एव्हाना वाचकांच्या सहजी ध्यानात यावे.
    मार्क्सवादाच्या मिषाने कादंबरीकार वर्गसंघर्षाची चित्रणे करतो त्याला समाजशास्त्रीय पद्धत वापरून ते निष्कर्ष जोखता येतात असे इतरत्र आढळून आले आहे. जसे एस.एल.भैरप्पा ह्यांच्या "जा ओलांडुनी" ह्या कादंबरीत नायिका ब्राह्मण असून तिचा दलित, लिंगायत जातीच्या पात्रांशी संघर्ष रंगवला असून प्रत्येक ब्राह्मणेतर जातीला आपण ब्राह्मणांबरोबर किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असे वाटत असते असे दाखवले आहे. हा त्या कादंबरीतला निष्कर्ष समाजशास्त्राच्या एका पिएच.डी.च्या विद्यार्थ्याने संशोधनाअंती दाखवून दिला आहे. एक पीएच.डी.चा प्रबंध : श्री.रमेश बायरी टी एस ,  ह्यांनी कर्नाटकातल्या ब्राह्मणांची मुलाखती घेत केलेला आहे ( "बीईंग ब्राह्मीन-बीईंग मॉडर्न" रूटलेज प्रकाशन २०१० ). असे नेमाडेंच्या हिंदूतल्या चिकित्सेचे वा निष्कर्षांचेही होऊ शकते व तेच खरे मूल्यमापन होईल.
    (स्त्रीवादामध्ये सर्व जगात स्त्रीकडे पाहण्याची सर्वच समाजांची दृष्टी कशी पुरुषप्रधान आहे असे सांगत असताना एक फरक म्हणून जाता जाता नोंदवावे वाटते की काही मध्यपूर्व आशियन राज्यात जरा वेगळे चित्र दिसू लागले आहे. मी नोकरीनिमित्त चार वर्षे बॅंकॉक येथे असताना तिथे डोळ्याला दिसण्याएवढे स्त्रियांचे प्राबल्य दिसत असे. सगळीकडे झकपक पाश्चात्य पोषाखातल्या स्त्रिया व पुरुष जवळ जवळ गायबच. नंतर कळले की तिथल्या पुरुषात व्यसनाधीनता व नपुंसकत्व हे मोठ्या प्रमाणात असून आजकाल तिथे तरुण मुले, मुलीसारखे राहतात. एवढेच नव्हे तर कॅबेरेत मुलेच मुलींच्या भूमिका करतात. रोजच्या व्यवहारातही जी मुले दिसतात ती मुले का मुली अशा काठावर असतात, इतकी मुलींसारखी राहतात. शहरात ५०० बार्स असे आहेत की जिथे मुली, मुलांना नेण्यासाठी येतात. अर्थात हे निरिक्षण वैयक्तिक असून कुठल्याही समाजशास्त्रीय पद्धतीने नसल्याने, ह्याला बदलता कल म्हणता येणार नाही .)

                                                ( क्रमश: ४)
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------