शनिवार, ८ डिसेंबर, २०१२

नेमाडेंनी गाठली सीमा !

नेमाडेंनी सीमा गाठली !
    श्री.भालचंद्र नेमाडे सध्या महाराष्ट्राच्या सीमा-भागात ( बेळगावला) का बरे गेले असावेत ? ह.मो.मराठे ह्या ब्राह्मण-संमेलनाध्यक्ष-इच्छुका-विरुद्ध कोणा महानुभावीला समर्थन देण्यासाठी ? सीमा-भागावरून, नेमाडेंचे सीमा-ओलांडणे आठवले. "हिंदू" लोकांनी अडगळीत टाकली हे पाहून रा.रा. भालचंद्र नेमाडेंना रागाची उबळ आली असावी, व त्यांनी सीमा गाठली ?  त्या भरात त्यांनी मागच्या प्रमाणे, तमाम मराठी सारस्वतावर कोरडे ओढण्याची सीमाच गाठायचे ठरवले असावे. म्हणून तर ते सीमेवरच्या बेळगावात दाखल झाले, म्हणतात. कोणते कोरडे ? 
"टीकास्वयंवर" ह्या ग्रंथातून त्यांनी जे परिसीमेचे कोरडे ओढले होते ते असे:
१) "सरोजिनी बाबर व ग.दि. माडगूळकर ह्यांसारखे निकृष्ट दर्जाचे लेखक ह्या समाजात महत्वाहचे होऊन बसावेत याची लाज बाळगण्याची जरूरी नाही...( पृ. ३७)
२) "सरकारी बक्षिसांच्या चढाओढीत प्रकाशकांचा किती भाग असतो हे प्रत्यक्ष ह्या क्षेत्रात उतरणार्‍यांना नीट माहीत आहे....( पृ.३७)
३) "काही लेखक तर प्रकाशकांच्या रखेल्याच आहेत" ( पृ.३७)
४) "रा.रा. पाडगावकरांनी रा. वालन्‌ची भक्ती करावी व रा. वालन्‌नी पाडगावकरांचा उदो उदो करावा ;" ( पृ.३९)
५) "आमचे जुने स्नेही रा. आरती प्रभू यांनी रा.वालन्‌ना पुस्तक अर्पण करावे आणि रा.वालन्‌नी रा.आरती प्रभू व रा. दिलीप चित्रे यांच्या करिअरिस्ट रद्दीत मराठीची प्रयोगशीलता पहावी;"( पृ.३९)
६) "रा.मे.पु.रेग्यांनी कुरुंदकरांसारख्या पोरकट लेखकाची दोन पानात फेंफें करावी पण रा. वा.ल.कुलकर्ण्यांबद्दल दोन ओळी कुठे लिहायच्या नाहीत.."( पृ.३९)
७) "श्री.ना. पेंडशांना कुठले तरी बक्षीस मिळाले म्हणून वरची जागा दिली जाणे हे काय ?"..( पृ.४१)
८) पदमा गोळे : अगोदरच गंजलेले आपले अर्धवट टीकानिकषही उपयोगी पडू नयेत असेच हे साहित्य...रा.श्री.जोग ह्यांनी पाडगावकरांच्या संदर्भात म्हटल्याप्रमाणे "शब्द इकडचे तिकडे व तिकडचे इकडे फेकून देण्याची कला"...( पृ.१२८)
९) दिलीप चित्रे ह्यांच्या मराठी पोएट्री ह्या भाषांतराबद्दल : "भाषा इथून तिथून सारखीच, असा दरिद्री पवित्रा ज्या भाषांतरात असेल ते भाषांतर निव्वळ हमाली ठरते"..( पृ. १३७)
१०) नारायण सुर्वे यांचा वैचारिक पाया असा सेकंड-हॅंड आणि कच्चा आहे....( पृ.१४८)
११) विंदा करंदीकर : कुठल्याही गोष्टीकडे निव्वळ शब्दसौंदर्याच्या दृष्टीतून पाहाण्याचा पोरकट प्रवाह मराठीत गेली वीस वर्षे प्रबळ होता. करंदीकरांच्या बहुसंख्य कविता ह्या प्रकारच्या असल्याने त्यांची इंग्रजी भाषांतरे एकूण मराठीबद्दल बाहेर चांगले मत करून देण्याची शक्यता दिसत नाही...( पृ.१५१) .....तरी बरे ह्याच अकादमीने त्यांना ज्ञानपीठ देऊन सन्मानिले !
१२) इंदिरा संत यांच्या एकसूरी कवितांमुळे म्हणा, का ह्या दोघा भाषांतरकारांच्या उथळपणामुळे म्हणा, हा संग्रह साधारण प्रतीचा झाला आहे ( पृ.१५२)
१३) पु.शि.रेगे :सावित्री, अवलोकिता, व रेणू ह्या तिन्ही कादंबर्‍या सकृदर्शनीच छापून छापून वाढवलेल्या दिसतात...( पृ.२२८)
१४) ह.ना. आपट्यांची भोबरे निर्माण करणारी भाषा ;
१५) फडक्यांची कृत्रीम बनावट;
१६) खांडेकरांची आरास; ---( खांडेकरांनाही ज्ञानपीठ मिळाले होते बरं ! )
१७) माडखोलकरांची आलंकारिकता;   हे दुर्गुण ज्या रीतीप्रधान प्रवृत्तीतून आले ती प्रवृत्ती स्वातंत्र्योत्तर काळात इतिहासजमा होऊ लागल्याची चिन्हे दिसत आहेत....( पृ. २४९)
१८)  मात्र मराठी वृत्तपत्रांबद्दल मला मनापासून तिरस्कार आहे. कारण मराठी वर्तमानपत्रांचे संपादक नुसते निर्बुद्धच नाहीत तर अडाणीपणामुळे येणारी मग्रूरी आणि प्रसिद्धीच्या सत्तेचा मद त्यांच्यात दिसून येतो....( पृ.३५९)
१९) सत्यकथा ह्या मासिकासंबंधी : सत्यकथा चालू राहिल्यामुळे जी पोकळी निर्माण झाली होती ती सत्यकथा बंद पडल्यामुळे भरून निघाली . ( पृ.३९०)
२०) हैद्राबाद साहित्य संमेलनात रा.प्रल्हाद अत्रे नेहमीप्रमाणे व्याख्यानात अतिशय विवस्त्र अश्लील विनोद करीत असताना श्रोतेसुद्धा चिडून रा.अत्र्यांना व्याख्यान बंद करा म्हणाले. पण धूर्त कुलकर्णी अध्यक्ष असून गप्प होते...( पृ.४०)
२१) पु.ल.देशपांडे : एकदा तुझे आहे तुजपाशी चा प्रयोग आणि त्यावेळी हसणारे व शेवटी रडून घेणारे प्रेक्षक पाहून मी मराठी नाटकांचा धसकाच घेतला आहे....( पृ.३४१)
( तूर्तास एवढेच...)
---------
अरुण अनंत भालेराव
----------------------------------
नेमाडे : एक सोक्षमोक्ष ! ( लेखक : सरपोतदार )
नेमाड्यांचा समाचार घेण्यापूर्वी 'टीका स्वयंवर' या कुप्रसिद्ध पुस्तकात त्यांनी कुणाविषयी काय मुक्ताफळे उधळली आहेत ती आधी देतो.
१) कालिदासाचे मेघदूत - दुय्यम कलाकृती (पृष्ठ २५१)
२) टेनिसन, ब्राउनिंग, इलियट, बेकेट - दुय्यम दर्जाचे साहित्यिक (पृ. ११५)
३) शि. म. परांजपे - मराठी नीट न येणारा माणूस (पृ. २४८)
४) पु. शि. रेगे - अपरिपक्व कादंबरीकार (पृ. २२८)
५) खांडेकर, फडके, माडखोलकर, गाडगीळ, भावे, रेगे, खानोलकर, जोगळेकर - लैंगिक स्वातंत्र्याच्या दृष्टीने बुभुक्षित (पृ. २५५)
६) इंदिरा संत - क्षीण आशयाच्या कविता लिहिणारी कवयित्री (पृ. १५२)
७) पद्मा गोळे - शब्दभांडार उबवित राहणारी कवयित्री (पृ. १३३)
८) पुन्हा फडके, खांडेकर, माडखोलकर - क्षुद्र लेखक, कवी (पृ. ८७)
९) आचार्य अत्रे - (कायम 'प्रल्हाद अत्रे' असा तुच्छतेने केलेला उल्लेख) (पृ. ४०, १२२, २५६)
१०) श्री. के. क्षीरसागर - मास्तरकी, भुंकणारी शैली, अर्ध्या हळकुंडाने पिवळे, लटपटपंची, अपुरे ज्ञान, घमेंडखोर इ. (पृ. १६, २३, २६, २८, २९, ३१)
११) ग. दि. माडगुळकर व सरोजिनी बाबर - निकृष्ट दर्जाचे लेखक (पृ. ३७)
१२) नरहर कुरुंदकर - पोरकट लेखक (पृ. ३९)
१३) दिलीप चित्रे - धन्देबाजी करणारे, काडीचाही व्यासंग नाही, अडाणी, मराठीचा नीट अभ्यास नाही (पृ. ३९)
१४) अरुण कोलटकर - सांस्कृतिक क्षुद्र वृत्ती (पृ. ८३)
१५) बोरकर, बापट, अनिल, पाडगांवकर, आरती प्रभू - रविकिरण मंडळाची हास्यास्पद परंपरा सांभाळणारे कवी (पृ. ९२)
१६) पु. ल. देशपांडे - आधुनिकीकरणाला सुप्त विरोध (पृ. ९८)
१७) विजय तेंडूलकर - आधुनिकीकरणाला सुपर फ्याशन म्हणून कवटाळणारे (पृ. ९८)
१८) चोखामेळा, ग्रेस - बावळट साहित्यिक (पृ. १८०)
१९) रेगे, खानोलकर, दळवी - अडाणी लेखक (पृ. २६६)
२०) 'तुझे आहे तुजपाशी' - आपली वांग्मयिन संस्कृती किती खालच्या दर्जाची आहे हे या नाटकावरून लक्षात येते (पृ. ३४१)
२१) एकूण समीक्षक - धंदेवाईक बदमाष. वास्तववादी समीक्षेची आपल्याकडे परंपराच नाही. (पृ. ३७३, १७६, ३४२)
२२) एकूण साहित्यिक - गिधाडे (पृ. ४२)
अशातर्हेने तमाम मराठी साहित्यिक आणि समीक्षकांचा नेमाडे नावाच्या अतृप्त आत्म्याने अक्षम्य अधिक्षेप केला आहे.