गुरुवार, २८ जुलै, २०११

देरीदा व नेमाडे :
आपल्याला नेहमी एक कोडे पडलेले असते की , लोक कोणती कादंबरी चांगली व कोणता लेखक दर्जेदार , हे कसे ठरवत असतात ? आपण जेव्हा शिकत असतो तेव्हा कोणी तरी एक सन्मान्य परीक्षा घेत असतात व त्यात चांगले मार्क्स मिळाले की आपले लिहिणे "उत्तम" असे ठरते. तशी काही परीक्षा, प्रकाशित कादंबरीला लागू नसते. चांगले प्रकाशक पदरी जाणकार संपादक ठेवतात व त्यांच्या मते लेखन कसे आहे त्याचा आडाखा घेतात. पण ह्या जाणकार संपादकांचा अंदाज सपशेल चुकलेलाही आपण प्रत्यही पाहतो. शिवाय आपण जर स्वत:च कादंबरी प्रकाशित केली, तर मग ती चांगली आहे का नाही, हे कोण ठरवते ? बरे, खपावरून ठरवावे तर खप काय, तुम्ही कसे खपवता, त्यावर अवलंबून असतो. म्हणतात की जगात सगळ्यात ज्यास्त खपलेले पुस्तक "हॅरी पॉटर" हे होते. नंतर एका आनंद नावाच्या बाईने इंग्लंडात "इंडियन फुड मेड ईझी" नावाचे पुस्तक हॅरी पॉटरपेक्षाही ज्यास्त खपवून दाखवले. आता स्वयपाकाचे पुस्तक हे कादंबरीपेक्षा श्रेष्ठ, असा तर अर्थ ह्याने प्रस्थापित होत नाही. मग ज्या पुस्तकाबद्दल ज्यास्तीत ज्यास्त लोक चांगले बोलतात, तशी परिक्षणे देतात ते पुस्तक चांगले असे समजायचे तर, हे सगळे काही लोक घडवून आणतात हेही आपल्याला नंतर कळते. मग चार नावाजलेले लोक ज्याला चांगले म्हणतात ते चांगले असे समजावे असे ठरवू लागलो तर हे लोक आपापले कंपू स्थापून हे घडवून आणतात असेही दृश्य दिसते. आता ह्या सगळ्या अडचणींवर एकच मार्ग उरतो व तो म्हणजे आपण स्वत:च आपल्याला कोणते पुस्तक आवडते ते ठरवावे व तसे तर्काने सांगावे. किंवा बाजारात कोणी कशी लबाडी करून पुस्तकासंबंधी भ्रम पैदा केले त्याचा शोध घ्यावा. लोकांना सांगावे. कदाचित त्यांना ते पटले, तर मग सगळे मिळून ठरवतील की कादंबरी फसली की जमली ?
पुस्तक चांगले आहे असे ठसविण्याचा सध्याचा अजून एक मार्ग म्हणजे प्राध्यापक मंडळींनी आवई उठवायची की कोणा पाश्चात्य तत्ववेत्त्याच्या मतांप्रमाणे, हे पुस्तक असल्याने, ते श्रेष्ठ आहे. उदाहरणार्थ आत्तापर्यंत "हिंदू" ह्या भालचंद्र नेमाडेंच्या कादंबरीविषयी नावाजलेल्या प्राध्यापक मंडळींनी ज्या कार्यशाळा घेतल्या आहेत, त्यात म्हटले आहे की पाश्चात्य तत्ववेत्ते श्री. देरीदा ह्यांच्या साहित्यविषयक मतप्रणालींनुसार ही कादंबरी असल्यामुळे ती श्रेष्ठच आहे. म्हणजे नुसती "हिंदू" वाचून नव्हे तर हे देरीदा कोण आहेत व ते असे का म्हणत आहेत, हे कळल्याशिवाय आपण काहीच ठरवू शकत नाही.
१९३० ते २००४ दरम्यानच्या काळात ह्या देरीदांनी एकूण ४० पुस्तके लिहिलेली असून त्यांची मते खूपच विवादास्पद होती. तसेच त्यांनी त्या काळातल्या प्रस्थापित तत्ववेत्त्यांच्या विरुद्ध बंडखोरीची मते मांडलेली आहेत. त्यांच्या गाजलेल्या पुस्तकात "ऑफ ग्रॅमॅटोलॉजी", "स्पीच ऍंड फिनॉमिना", "रायटिंग ऍंड डिफरन्स ", "मार्जिन्स ऑफ फिलॉसॉफी", "पोझीशन्स" वगैरे मूलभूत विचारांची पुस्तके आहेत. प्लेटो, ऍरिस्टॉटल च्या काळापासून तर्क ( लॉगॉस ), कार्यकारण-भाव हेच मुख्यकेंद्र मानले जायचे. म्हणजे प्रत्येक विचाराला तर्क व विवेक हे केंद्रस्थानी मानल्या जायचे. देरिदांचे म्हणणे की विचार व वस्तूंना हा कार्यकारण-भाव लागू करणे चुकीचे आहे व त्याऐवजी प्रत्येक विचार व वस्तू, भेदक्रीडा करीत असते हेच खरे आहे. म्हणजे गमतीने म्हणायचे तर जसे म्हणतात की प्रत्येक लठ्ठ माणसात बाहेर पडू पाहणारा एक रोड माणूस असतो व प्रत्येक रोड माणसात आत शिरू पाहणारा एक लठ्ठ माणूस असतो, तशा प्रकारचे अंतर्विरोध सगळ्या जगात व्यापलेले असतात. पूर्वी भाषाशास्त्री म्हणत असत की भाषा म्हणजे बोलणे. लिहिणे ही फक्त बोललेल्या शब्दाची टिकवून धरण्याची फक्त एक युगत आहे. आता देरीदांनी ह्याविरुद्ध म्हणणे त्यांच्या बंडखोरीला साजेसेच होते. ते म्हणाले, प्रत्येक बोललेला शब्द हा आधी कधी तरी बोललेलाच असतो, म्हणून तो पुनरावृत्त झालेला असतो. तो केवळ भेदक्रीडा दाखवतो. म्हणजे समजा आपण "कमळ" असे एखाद्या फुलाला म्हटले तर ते इतर फुलांपेक्षा कसे वेगळे आहे हा भेद दाखवणारा शब्द होतो. त्याऐवजी मूळ लेखनात एक चिन्ह दुसर्‍या चिन्हाचा माग घेत असते व त्यामुळे आज आहे त्यापेक्षा वेगळ्या अर्थाच्या शक्यता मूळ लेखनाच्या संकल्पनेने शक्य होतात. जसे आपण जर म्हटले की "हे मूल आज जन्मलेले आहे" तर इथे जन्म हे चिन्ह "ते मूल कधीतरी मरणार आहे" ह्या "मृत्यू"चा माग काढीत जाते.
"हिंदू" ह्या भालचंद्र नेमाडे ह्यांच्या कादंबरीतले पृ.१५६ वरचे हे भाष्य पहा: "एक बुला वेसकर. वेशीखालच्या देवडीत बसलेला. हा ह्याच नावानं विख्यात होण्याचं कारण आजूबाजूला कोणी नाही, हे चाणाक्षपणे पाहून हा एकदम त्याच्या धोतरातली बुल्लीच मुठीत धरून आम्हा पोरांना दाखवायचा. पुन्हा धोतर खाली टाकून साळसूद चेहर्‍यानं काहीच झालं नाही, किंवा काहीच केलं नाही, असं दाखवायचा. हे कोणाला सांगायचं तरी कसं ? याचा अर्थ आपल्याला तेव्हा लागत नव्हता. आता लागतो: सवर्ण हिंदू -अस्पृश्य संबंधाचा तो दृष्टांत होता, कव्हणी एकु कुरवंडी करीत सांता कुरघोडी करी त्या वेसकरीयाचा दृष्टांत. जैसे फ्राइडचा सिद्धांत जातीयतेत मोडून सांगितल्यास जैसे होईल तैसे. किंबहुना ज्ञानेश्वर : ऐसा शिवमुष्टिगुंडु । घेउनु ठाके ॥ अस्पृश्यता एक हजार वर्षांपासून आहेच, तेव्हापासूनचे दाब असे वर येतात. ".इथे वेसकराने बुल्ली दाखवणे हे "चिन्ह" सर्वसाधारण समाजात एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाला विचारले तर ते तो लक्ष-वेधून-घेण्याची ( अटेंशन डेफिशियन्सी सिन्ड्रोम ) विकृती म्हणून सांगेल. एखाद्या ज्ञानेश्वरीच्या विद्यार्थ्याला विचारले तर तो म्हणेल वर उदधृत केलेल्या ओव्या वेगळ्या संदर्भाच्या आहेत ( शिवभक्तांचा अहंकारही कसा वाईट असतो ते सांगणार्‍या आहेत ). पण हेच "चिन्ह" समाजातल्या एका गटाने दुसर्‍या गटावर केलेल्या अत्याचाराची प्रतिक्रिया आहे असा अर्थ देरीदांच्या चिन्हांच्या माग काढण्याच्या गुणांमुळे दाखवता येतो व तो तसा आहे असे लेखक आपल्याला सांगतो आहे. आंतर-जातीय विवाह केल्याने जातीभेदाची झळ कमी होईल असे एखाद्या समाजशास्त्रज्ञाने म्हणावे व त्याच विवाहासंबंधी एखाद्या जात्यंधाने "तुम्ही आमच्या बायका बाटवल्या होत्या म्हणून आता आम्ही तुमच्या बायका बाटवतो आहोत" असे प्रतिक्रिया म्हणून म्हणावे, त्याच प्रकारचे हे लेखकाचे भाष्य आहे. इथे जात्यंधाला असलेली मुभा, देरीदा ह्यांच्या तत्वामागे बेमालूमपणे लपवता येते. एरव्ही जातीय सलोखा ढवळून काढणारे हे भाष्य ठरवून सामान्य प्रतीच्या लेखकाला संपादकाने अडगळीत लोटले असते. पण, देरीदांच्या चिन्हाच्या माग काढण्याचा व तसा अर्थ लावण्याने, "हिंदू" साहित्यिक श्रेष्ठत्वाला नेऊन पोचवते. आपल्याला देरीदा माहीत नसल्याने हे जमले नसते, जे नेमाडेंनी खुबीने जमवले आहे. हीच साहित्यिक श्रेष्ठता !
देरीदा ह्यांचे दुसरे एक तत्व आहे. ते असे की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कोणतीही संहिता ही एकसंध सेंद्रीय अशी नसावी व विविध संहितांचे काही तुकडे एकत्र करून त्यावर कलमे केली तरी चालावे . त्यामुळे संदिग्धता चांगली दाटते व अनेकार्थता साधते. आता देरीदाने सांगितले व नेमाडेंनी नाही केले तर मग काय मजा ? पडत्या फळाची आज्ञा घेऊन, मग नेमाडे "हिंदू"च्या संहितेत, पूर्वीच्या अनेक संहितांचे तुकडे एकत्र करतात. जसे, "कोसला"तला नायक जसा न-नायक होता तसाच "हिंदू"चा नायक अगदी सरळ-साधा, फारसा तडफदार नसलेला, असा आहे. "बिढार"मधल्या नायकाला जसे शिकवता येत नाही, जिंकण्याची कैफ नसते तसाच "हिंदू"चा नायक ठेवलेला आहे. नामांतर चळवळीचे चर्‍हाट ( चर्‍हाट ह्यासाठी की समता प्रस्थापित व्हावी म्हणून योजलेले नामांतर समता जवळपासही येणार नाही असे आरक्षून बसले आहे. ), युनिव्हर्सिटीलले भ्रष्टाचार, पांचट झालेले विनोदी चुटके, भाषेवर बलात्कार करून केलेले थिल्लर विनोद ( जसे: मराठीतल्या फक्त ला फकत असे उच्चारणे,), महानुभाव पंथाचे किस्से, वगैरे मसाला ! गालिबचे शेर नेमाडे भरपूर वापरतात. ते मोजले तर एकूण १७ शेर भरतात. मोजताना जाणवले की ते सर्व शेवटाच्या शे-दीडशे पानातच येतात. नायक औरंगाबादीचे वर्णन करताना येतात. गालिबच्या काव्याची थोरवी नक्कीच निर्विवाद आहे. त्याचा वापरही वाचकांना माहीतीचा, सरावाचा, आहे. पण तो संभाषण नाही करीत. शेवटी प्रगट होतो. नायकाचे पाकीस्तानात नोकरी करणे पाहता, ते मुक्त हस्ते सर्वत्र यायला हरकत नव्हती. नायकाचा रेखाटलेला स्वभाव पाहता सर्व कालक्रमणेत असायला हवा होता. पण ते शेर असे एकाच कप्प्यात दिल्याने सह्जी येऊन संवाद करणारे राहात नाहीत. अडगळ करणार्‍या भरताडासारखे वाटतात. नेमाडेंना बोली भाषा वापरण्याचे आवर्जून अप्रूप आहे. पण वाक्यांची रचना बोली भाषेतली का प्रमाण भाषेतली अशी मोजदाद केली तर प्रमाण भाषेचे पारडे खूपच जड होईल. बोली भाषेचा परिणाम साधण्यासाठी नेमाडे भरपूर लोकगीतात्मक पोवाडे वापरतात. हे स्वरचित असल्यामुळे की काय, काही ठिकाणी संवादाच्या निकडीपायी ते फारच पोरकट होतात. जसे : आमचा मेहुणा नोकरी नो करी..हॉं,हॉं,...तो पीएचडी करी ; क्या बने भात जहॉं, भात बनाये न बने ॥ ; माह्या घराच्या पाठीमागे रे, उंटणी डुलक्या खाये ।; अरे भाग्यवंताची बाईल मरते, अन अभाग्याचा बैल, हो, रामा रे, जी जी ; अरे लभान्यांच्या बाया, नंग्या पोहती रे मासोया, अरे पाटील गांड फाटिल नको लभानीच्या पडू फंदी यारा, दाटील तिची काचोळी तवर सुटील झगारा, ; वगैरे. संतांची वचनेही मुबलकपणे येतात. विनोद, किस्से, पोवाडे, शेर-शायरी, शाब्दिक कोट्या, उत्क्रांतीच्या कथा, यक्षाच्या कथा, संतवचने, कविता, गाण्यांचे मुखडे, हे शैली प्रकार म्हणूनच कादंबरीत सर्वत्र पेरलेले दिसतात. ह्या इतरत्र उपलब्ध असलेल्या संहिता इथे लेखकाने छान कलमे करून कादंबरीत घुसवलेल्या आहेत. पण नायक वा पात्रे ती एकमेकांशी सहजी संवादीत आहेत असे न झाल्यामुळे हीच काय ती "समृद्ध अडगळ" असे जाणवायला लागते. हे खरे तर देरीदांच्या युक्तीमुळे एवढे सोपे "भरतकाम" होते, मग एका "हिंदू" कादंबरीसाठी ३५ वर्षे का लागावी ह्याचे मात्र वाचकाला कोडेच राहते ! कदाचित आमिर-खानचे सिनेमे जसे वर्षातून एकच केलेले असल्याने दर्जेदार असतात असे इंप्रेशन आहे तसे ३५ वर्षात लिहिलेली म्हणून "हिंदू" केवळ कालमापनानेच श्रेष्ठ ठरावी !
देरीदांना अनेकार्थतेचे एव्हढे अप्रूप आहे की कोणताच निश्चित अर्थ नसावा अशी संहिता त्यांना श्रेष्ठ वाटते. ह्याचा प्रत्यय आपल्याला मराठी समीक्षा-व्यवहारात अजूनही येतो तो मर्ढेकरांच्या कवितांबाबत. आज इतकी वर्षे होऊनही मराठी प्राध्यापक-समीक्षक मंडळी अजूनही मर्ढेकरांच्या ५० वर्षापूर्वीच्या कवितांचा नवनवीन अर्थ नित्यनेमाने व अहमहमिकेने काढत असतात, असे आपण पाह्तो. असेच काहीसे धोरण, हे समीक्षक "हिंदू"साठी वापरतात. बंडखोरी म्हणावी तर ह्यातला अत्याचार पाहणारा नायक काहीच बंडखोरीचे काम करीत नाही. रूढ अर्थाने ज्याला यश, संपन्नता म्हणता येईल असेही काही कथानकात नाहीय. कादंबरी ही काल्पनिक निर्मिती असते असे म्हणावे तर लेखक म्हणतो ही कादंबरी ( व त्याच्या इतर सर्व कादंबर्‍याही ) आत्मचरित्रपरच आहे, म्हणजे घडलेली गोष्ट. स्त्रीवादाचा अपार आदर करण्यासाठी लेखक पारंपारिक साधुसंतांना इथे शिव्यांची लाखोली वाहतो पण त्याचा नायक स्वत: लग्न करण्याच्या विरोधात असतो. असा विरोधाभास सर्वत्र भरून आहे असे आपल्याला वाटते न वाटते तोच देरीदा लेखकाच्या मदतीला असा धावून येतो की ह्यालाच अनेकार्थता म्हणत समीक्षक वाङमयीन महात्मता ह्या कादंबरीला बहाल करू शकतात !
देरीदा हे विरचना ह्या प्रकारासाठी प्रसिद्ध आहेत. विरचनेत काय करतात की कोणत्याही लेखकाच्या संहितेत परस्पर विरोधी भेदक्रीडा असतात असे म्हणून ज्या क्रीडा विरोधी आहेत त्यांना संहितेत उलटे पाडायचे. विवेककेंद्रवादात तर्क, तत्व ह्यांचे अधिष्टान होते तर विरचनेत काही ठाम निश्चित सांगण्याऐवजी "सांगण्यातील" अनिश्चितता वा अनेकार्थता मिरवत राहायचे. ह्याचे प्रात्यक्षिक घेऊ या. नेमाडे हिंदू च्या टीव्ही मुलाखतीत, वा मल-पृष्ठावरच्या ब्लर्बवर काय म्हणतात ? की ब्राह्मणांनी हिंदू धर्म बिघडवला. बरे हे जर रास्त धरले, तर कादंबरीत ह्यावर काही निश्चित मार्ग सुचवला आहे का ? देरीदा म्हणतात त्याप्रमाणे निष्कर्ष सांगायचा नाही, केवळ अनिश्चितता रंगवत जायची. कादंबरीत प्रतिपादले आहे की ही कसली नाती ? पैशांचा प्रसंग आला की निखळून पडणारी ! पण कथानकात ह्यावर काही मार्ग दाखवलाय का ? नाही ! कादंबरीत स्त्रीवादाच्या स्तोमापायी लेखक संत रामदासांना ते बोहल्यावरून पळून गेले म्हणून पळपुट्या, नागड्या असे शेलके बोलतो. पण मग नायक अथवा लेखक स्त्रीवादाबद्दल काय करतो? तो तर लग्नही करायला तयार नसतो. रामदासांना नावे ठेवायची व नायकाने रामदासांसारखेच वागायचे हीच खरे तर देरीदांच्या भाषेतली भेदक्रीडा ठरावी. ह्यावर लेखक निश्चित असे काही सुचवत नाही. स्वत: नेमाडे टीकास्वयंवर मध्ये म्हणून गेलेत की "व्यक्ती व समाज ह्यांच्या संबंधात अनेक प्रश्न असतात व ह्या संदर्भात काही निश्चित नैतिक भूमिका घेऊन कादंबरीकाराने भाषिक कृति केलेली असते, त्यानुसार आशयसूत्र निवडलेले असते." ( टीकास्वयंवर--पृ २४२ ). असे जर निश्चित नैतिक भूमिकेतून वरील विटंबना करणारे लिहिल्या गेले असेल तर नेमाडेंनीच त्याचे उत्तरदायीत्व स्वीकारायला हवे. मतभेद सभ्यतेच्या चौकटीतही ते दाखवू शकले असते. मग ते का दाखवीत नाहीत ? कारण इथेही त्यांना देरीदाच भडकवतो आहे.
विरचनेबाबत प्रा. हरिश्चंद्र थोरात "साहित्याचे संदर्भ"( पृ.९७) वर म्हणतात : "...कुठलाही वि-रचनावादी विचारवंत कोठल्याही संहितेची पूर्ण आणि अंतिम वि-रचना करू शकत नाही. आणि त्याची स्वत:ची संहिताही अंतविरोधांनी युक्त असल्यामुळे वि-रचनेसाठी खुली राहते. अशा परिस्थितीत तो एकच गोष्ट करू शकतो. स्वत:ला भाषेच्या स्वाधीन करून भाषा त्याच्याशी जो खेळ खेळेल त्यात सहभागी होणे. या खेळातून अर्थनिर्मितीच्या अनंत क्षमता निर्माण करत राहणे. अंत नसलेल्या खेळात भाषेच्या हातचे बाहुले झालेला विरचनावादी विचारवंत आणि उपस्थितीच्या अतिभौतिकीच्या प्रभावाखाली असलेला दुसरा एखादा लेखक यांच्यामध्ये फारसा भेद उरत नाही. वि-रचनावादी लेखक हा खेळ खेळण्याचे जाणीवपूर्वक ठरवतो, एवढ्यापुरताच तो भेद मर्यादित राहतो. विरचनेच्या दृष्टिकोणातून हा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यही त्याचे नसते. तळ नसलेल्या पोकळीतले हे तरंगत राहणे असते ! ". देरीदांच्या ऑर्केस्ट्रावरच्या खाणाखुणातून सिमल्याच्या ऍडव्हान्स्ड संस्थेत भरपूर पगारावरच्या लेखकाने हे नाद वाजवत राहावे, खेळ खेळावेत, हे एकवेळ क्षम्य ठरेल, पण बिचार्‍या वाचकांच्या नशीबी हे "तळ नसलेल्या पोकळीतले तरंगणे" का यावे ?

-------------------------------------------------------------