शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०१०

भैरप्पा व नेमाडे--एक तौलनिक अभ्यास

विद्रोह व बहु-आवाजी रेखाटन:
आता बंडखोर प्रवृत्तीचं द्योतक असलेलं एक उदाहरण पाहू. विद्रोहाला भडक रंग द्यावा, मग दिसण्याची तमा बाळगू नये, असे जणु धोरणच असलेले नेमाडे (पृ.२५३) वर एक प्रसंग असा रेखाटतात : "शांतता चिरणारा बनी रांड हिचा कोळीवाडयातून धारदार आवाज...पन तू कोनता सत्वाचा हायेस महात्मा गांधीच्या लवडयाचा ते पाहतेच मी बी, तुह्या बहीनचा झौ...तोंडाची गांड करतूस..."
आपल्याच बापाला शिव्या घालायच्या म्हणजे प्रचंड धैर्य लागते. तशी जिगर लागते. पण एकदा बापालाच घाणेरड्या शिव्या हासडल्या की मग कोणी आपल्या वाटेला धजत नाही. मग महात्मा गांधी भले राष्ट्राचे पिता असले तर त्याचे काय हो ? साहित्यिकांना रांडेचे अप्रूप असणे समजू शकते ( कारण कुणाकुणाच्या धर्मपत्न्या सोडून गेलेल्या असतात ! ). पण हे पात्र काही "ब्राह्मणांनी हिंदु धर्म बिघडवला" ह्या मध्यवर्ती "निश्चित नैतिक’ भूमिकेच्या फारसे जवळचे नाही. शिवाय कायम हरिजनांचा कैवार घेणारे महात्मा गांधी हे काही लेखकाच्या वा नायकाच्या जाती विरोधातले नव्हते. बरे एखाद्या रांडेने ठरलेले पैसे न देणार्‍या कादंबरीकाराला अशा शिव्या हासडल्या तर ते क्षम्य करता येईल. पण तिने डायरेक्ट महात्मा गांधीलाच हात लावावा हे असंभव व अर्वाच्य ! महात्मा गांधींवर अनेकांनी टीका केलेली आहे. पण ही अगदी खालच्या पातळीची तळ गाठते. रांडेचे चित्रण वास्तवादी करण्यासाठी तिने शिव्या देणे क्षम्य असले तरी तिने थेट महात्मा गांधींनाच शिव्या देणे अनावश्यक आहे. अर्थात रांडात पक्षीय अभिनिवेश असतो असे लेखकाला सूचित करायचे असेल तर मग हे चित्रण पुरेसे केलेले नाही असेच म्हणावे लागेल. महात्मा गांधींचे चित्र असलेला साहित्य अकादेमीचा पुरस्कार घ्यायला मात्र आता नेमाडेंना अमळ अवघडच जाणार आहे !
भैरप्पांच्या कादंबरीत महात्मा गांधींचे शिष्य राहिलेली दोन पात्रे आहेत. एक बेटटया व दुसरे मंत्री. मुख्य पात्र असलेल्या सत्या हिचे वडील आपली मुलगी (जी ब्राह्मण आहे), लिंगायतांच्या घरात लग्न करते आहे, त्याने व्यथित झालेले असतात. त्या वेडाच्या भरात ते तिला वहाणेने बेदम मारतातही. चूक समजल्यावर स्वत:लाही चपलेने मारून घेतात. त्यांना समजावयाला आलेल्या त्यांच्या हरिजन मित्राला ( बेट्टयाला ), ते इथे (पृ. १७३ ) पहा कसे बोलतात: "काय केलंत हे ? स्वत:च्या देहाला केली तरी हिंसा, हिंसाच नाही का ? महात्मा म्हणत होते---"."तुझ्या महात्म्याचं इकडं काही सांगू नकोस. पित्त खवळलेला म्हातारा तो ! एवढ्या जखमांनी काही होत नाही. माझ्या मुलीची हकीकत सांग-- म्हणत ते त्याच्या पासून दोन हात अंतरावर बसले". संयमित अविष्कार करीत महात्म्याचा विरोध नोंदवणे हे अवघड काम भैरप्पा इथे अपार कौशल्यानं करीत आहेत. उगाच माथे भडकवणारे शब्द न वापरता ! असेच एका क्रांतीकारी पात्राच्या तोंडी ( पृ.२०८) गांधीविरोधातले हे वक्तव्य पहा: "शिकत असताना सांगितलेलं ऐकत होता तो. आता त्याची वेगळीच लाईन झाली आहे. महात्मा गांधींचं किंवा अहिंसेचं नाव काढलं तर रागानं फणफणतो नुसता ! आता तो क्रांती-आंबेडकर म्हणत असतो. मला तर त्याची काळजीच वाटते." शेलक्या शिव्या न वापरता किती नेमकेपणाने भावना व्यक्त होताहेत इथे. असाच वस्तुपाठ भैरप्पा पृ.२५३ वर असा घालून देतात: "--छे ! असं नाही त्या विचारात गुंतणं बरं नव्हे. आहे त्या परिस्थितीत काय करता येईल हे पाहिलं पाहिजे. अकबरानं राजपूत राजकन्यांनी आपला जनानखाना भरला आणि तो एवढा मोठा सम्राट झाला म्हणे. पण हे लोकसत्ताक राज्य म्हणजे---इतिहासाशी तुलना करता करता त्यांच्या तोंडून इरसाल शिव्या उधळल्या जात." शिव्यांचा वर्षाव न करता भैरप्पा तोच परिणाम इथे कसा साधतात हे पाहणे कौतुकाचे आहे. बख्तिन ह्या समीक्षकाने म्हटल्याप्रमाणे सत्य हे जर बहु-आवाजात वसत असेल तर अशा बहु-आवाजांचा कोलाहल ( कार्निव्हल ) वाटेल तितपत चित्र रेखाटणे हे कादंबरीकाराचे एक कसबच म्हणायला हवे. ह्या दृष्टीने पाह्यले तर नेमाडेंच्या कादंबरीतले आवाज शिव्या देणारे एकसूरी वाटतात तर भैरप्पांच्या "दाटू" त आवाजांचे वैविध्य दिसते. कथानक गांधी ह्या व्यक्तीच्या तत्वांना सहानुभूतीपूर्ण असूनही गांधीविरोधी आवाजही भैरप्पा वर दाखविले तसे देतात. अजून एका ठिकाणी ( पृ.१२०) ते एक प्रवाद असाही देतात: "गांधी वैष्णव जातीचा म्हणे. आपल्या जातीची माणसं ज्यास्त व्हावीत म्हणून त्यानं हा डाव टाकलाय ! मागं रामानुजाचार्यांनीही असंच करून महारा-मांगांना उभं नाम लावून आपल्या धर्मात घेतलं तसं ! लिंगायत मुखंडांनीही आपली शंका व्यक्त केली." विद्रोह व बहु-आवाजी चित्रण असावे तर असे ! ( क्रमश:)

रविवार, १९ डिसेंबर, २०१०

भैरप्पा व नेमाडे: एक तौलनिक अभ्यास:५

दाब व त्यांचे समर्थन :
चुकीचा निष्कर्ष व त्याचे चुकीचे समर्थन ह्याचे एक उदाहरण पाहू. "हिंदू"त जातीयते मुळे जातीजातींचा एकमेकावरचा दाब कसा उफाळून येतो हे दाखवणारा खास नेमाडपंथी वळणाचा एक किस्सा ( पृ.१५६) दिलाय. तो असा :
"एक बुला वेसकर. वेशीखालच्या देवडीत बसलेला. हा ह्याच नावानं विख्यात होण्याचं कारण आजूबाजूला कोणी नाही, हे चाणाक्षपणे पाहून हा एकदम त्याच्या धोतरातली बुल्लीच मुठीत धरून आम्हा पोरांना दाखवायचा. पुन्हा धोतर खाली टाकून साळसूद चेहर्‍यानं काहीच झालं नाही, किंवा काहीच केलं नाही, असं दाखवायचा. हे कोणाला सांगायचं तरी कसं ? याचा अर्थ आपल्याला तेव्हा लागत नव्हता. आता लागतो: सवर्ण हिंदू -अस्पृश्य संबंधाचा तो दृष्टांत होता, कव्हणी एकु कुरवंडी करीत सांता कुरघोडी करी त्या वेसकरीयाचा दृष्टांत. जैसे फ्राइडचा सिद्धांत जातीयतेत मोडून सांगितल्यास जैसे होईल तैसे. किंबहुना ज्ञानेश्वर : ऐसा शिवमुष्टिगुंडु । घेउनु ठाके ॥ अस्पृश्यता एक हजार वर्षांपासून आहेच, तेव्हापासूनचे दाब असे वर येतात. "
ज्ञानेश्वरीच्या अध्याय १३ त ओवी ७१५-७१७ मध्ये विद्या व वय ह्यांच्या उन्मादाने माणुस कसा गर्व करीत छाती काढून चालतो व माझ्यासारखा मोठा कोणी नाही असा शिवभक्तांना असतो तसा गर्व ( शिवमुष्टीगंडु, गुंडु नव्हे) धारण करतो व मग त्याला चांगले बघवत नाही अशा अर्थाच्या ह्या ओव्या मुळात अशा : म्हणे मीं चि येकु आथि । माझा चि घरिं संपत्ति । माझी आचरती रीती । कोण्हासी नाही ॥ नाहिं माझे नि पाडे वाडु । मी चि सर्वज्ञु एकु रूढु । ऐसा शिवमुष्टिगंडु । घेउनु ठाके ॥ व्याधिलेया माणसा । न ये भोगु दाखवुं जैसा । नीके न साहे तैसा । पुढिलाचे ॥ आता ह्यात वेसकराने काय दाखवले त्याचा व का दाखवले त्याचा हा कसा काय दृष्टांत होतो.काव्यात दृष्टांत म्हणजे जे निवेदन केले त्याच्या समर्थनार्थ दुसरे तसेच एखादे उदाहरण देणे. काव्यशास्त्रात दृष्टांत हा अलंकार, व्याख्या करताना, म्हणतात की "विषयाचे वर्णन करून झाल्यावर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टांत अलंकार होतो." इथे मूळ गोम "त्याच अर्थाचा दाखला" ही आहे. ज्ञानेश्वर म्हणत आहेत गर्व, ताठा बाळगू नका. त्याचा अर्थ त्यांनी ताठा दाखवला, असा आपण काढू शकत नाही. काढलाच तर ते अज्ञानाचे वा खोडसाळपणाचे लक्षण होईल. इथे हा वेसकर ब्राह्मणांच्या दारासमोर जाऊन काही दाखवीत नाही आहे. शिवाय कोणाही मानसशास्त्रज्ञाला विचारा, अत्याचाराच्या दाबाची प्रतिक्रिया अशी नसते.शाळेत लहान मुले असा व्रात्यपणा करतात तो अर्धवट लैंगिक कुतुहुलातून असतो.तर पुष्ट्यर्थ फ्राइड ह्या मानसोपचारतज्ज्ञाचा निर्वाळा आहे. जेव्हा कोणी असे वागतो तेव्हा मानसशास्त्र सांगते की ती एक विकृती असून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न ( अटेंशन डेफिशियन्सी सिन्ड्रोम ) असतो. किंवा क्वचित प्रसंगी, समजा आपण बाथरूम मध्ये टॉवेल न्यायला विसरलो, व पॅसेजमधला वाळत टाकलेला टॉवेल घ्यायला तसेच बाहेर आलो, तर असे अपघाताने होते. काही ठिकाणी ( जसे अमेरिकेत मोठमोठ्या क्लबातून सामूहिक बाथरूम मध्ये) लोक नागडयाने वावरू धजतात. पण बाहेर योग्य कपडे घालूनच येतात. कधी कधी क्रिकेट मॅच दरम्यान कोणी नागडयाने मैदानावर पळतो. त्याला मग पोलीस अटक करतात. ह्या सर्व प्रतिक्रियांमध्ये कुठले दाब उफाळून येण्याचे दिसत नाही. हां, लेखकाने जर कथानकात असे दाखविले असते की हा वेसकर, निवडून, ब्राह्मणांच्या घरांसमोर जाऊन असे करायचा किंवा ब्राह्मण व्यक्ती दिसल्या की त्यांच्या समोर असे करायचा, तर "दाब वर येणे" दिसणे शक्यतेतले होते.त्यामुळे हे अनुमान शक्यतेतल्या कोटीचे वाटत नाही. शिवाय ह्या वेडसर वेसकराने धोतर उचलून जे दाखवले ते लेखक म्हणतो तसे "आम्हा पोरांना"!. त्यात महानुभावी पंथाचे नेमाडे वा नायक खंडेराव व त्यांचे ब्राह्मण नसलेले मित्र आहेत. त्यामुळे हा दाब असलाच तर कुणब्यांच्या विरुद्धचा आहे. ब्राह्मणांच्या किंवा ज्ञानेश्वरांच्या विरुद्धचा अजिबात होत नाही. लेखक हेच पुढे कबूलतो ते असे : "शेतकर्‍यांनी कष्ट करावेत आणि ह्या लोकांनी कणसं खुडून न्यावी ? काय नीतीच्या गोष्टी करता हो. ...शेवटी कुणब्याकडेच खेटे घालतील ना ? " . असा अर्थ काढून दलित व कुणब्यांमध्ये हे लावून देणेही वाईट व निषेधार्यच आहे. कदाचित दलितांच्या लक्षात ही गोष्ट येईलच. शिवाय ज्या अकादेमीच्या मानसन्मानासाठी कादंबरीचा आटापिटा आहे, तिच्या सौंदर्यात काडीचीही अशा कलागतींनी भर पडत नाही.
आता असलाच, ब्राह्मणांविरुद्ध दाब वर येण्याचा, भैरप्पांच्या "जा ओलांडुनी" मधला, ( पृ.२२६) हा संवाद पहा. कथेची नायिका असलेल्या सत्या चा भाऊ ( जो ब्राह्मण व पुजारी असतो ) तो निवडणुकात ब्राह्मण-विरोधात कसा प्रचार करतात ते सांगताना म्हणतो:
"हजारो वर्ष घरात बसून ब्राह्मणांच्या बायकांनी आपली कातडी गोरी करून घेतली आहे, आमच्या बायका उन्हातान्हात शेतात राबून काळ्या झाल्या आहेत. त्या बिचार्‍या बामणांची घरची खरकटी भांडी घासत होत्या. माझ्या हातात आणखी दहा वर्ष सत्ता येऊ दे. बामणांच्या बायकांना आमच्या घरचे केरवारे करून खरकटी भांडी घासायला लावतो, आमच्या शेतांवर उन्हा-तान्हात राबायला लावतो--". आता भैरप्पांच्या कादंबरीचा मूळ रोख, प्रत्येक जात ब्राह्मणासारखे वागायचे प्रयत्न करते, असा वेगळाच असला तरी ब्राह्मण-विरोधाचा प्रसंग वर्णन करताना इथे पहा ते कसे सांगोपांग तर्क देत आहेत. असलेच तर हे खरे "दाब वर येणे " म्हणता येईल. ह्याला फ्राइडचा वरदहस्त नको किंवा ओढून ताणून ज्ञानेश्वरांचे विडंबन करायला नको. शिवाय सगळे कसे सभ्यतेत बसणारे आहे. बरे ह्या कादंबरीला खुद्द साहित्य अकादेमीनेच पुरस्कार दिलेला आहे. म्हणजे ती तुल्यबळ आहेच. भले नेमाडे आता शिकण्यापल्याड असतील पण नवशिक्या कादंबरीकारांना, एखादे विद्रोहाचे कसे वर्णन करावे, व समर्थनाचा पाया कसा मजबूत असावा, त्याचा हा आदर्श असा वस्तुपाठच आहे. (क्रमश: )
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

शुक्रवार, १० डिसेंबर, २०१०

भैरप्पा व नेमाडे:
एक तौलनिक अभ्यास:---५

निवेदन शैली:
बख्तिनच्या हुकुमाबरहुकूम "हिंदू"ची शैली विनोद, विडंबन, त्रागा, असणारी आहे. त्यात गोष्टीवेल्हाळपणा आहे. लोकवाङमायतले पोवाडे, गार्‍हाणे, अभंग, ओव्या, वगैरे असणारे आहे. त्यात उत्क्रांतीच्या कथा आहेत. बोली भाषेचा बाज आहे. नायकाचे निवेदन व इतर वर्णने अप्रतीम भारदस्त प्रमाण भाषेत आहेत. त्यात राजकारणातले नामांतर प्रकरण आहे. मराठवाडा विद्यापीठातले भ्रष्टाचार प्रकरणाचे किस्से आहेत. आधुनिक जागतिक वस्तुस्थिती सांगणारे ( नायकाला कसे सहा महिन्यात अमेरिकेतून व्हिसा संपला की हाकलतात,) शहरीकरणाने नायक कसा विव्हळ होतो, तरी मुलाच्या सोयीसाठी दहिसरला फ्लॅट घेऊन राहतो असे वस्तुस्थितिचे वर्णन करणारे आधुनिकपण आहे. प्रमाणभाषेचा भारदस्तपणा आहे, बोलीचा आभास आहे. बोधपर वचने आहेत, त्राग्याची स्वगते आहेत तर तात्विक चर्चा कराव्यात असल्या विषयांवरची भाषिते आहेत. एकूण नेमाडे म्हणतात तशी शैलीचीही समृद्ध अडगळ आहे.
भैरप्पांची भाषा अतिशय सरळ, बाळबोध, अनलंकृत अशी आहे. त्यात जी अवतरणे येतात ती कथेतली पात्रे जेव्हा श्लोक वगैरे म्हणतात तेव्हाच येतात. भर आहे तो निरनिराळ्या जातींची माहीती, त्यांचे रीतीरिवाजांचे बारकावे, त्यांच्या समजुती वगैरेवर. प्रसिद्ध प्रचलित म्हणी आहेत. इतिहासाच्या अभ्यासानिमित्त इतिहासावरची भाष्ये आहेत. उमा कुलकर्णी ह्यांनी आतापर्यंत ३८ पुस्तकांची भाषांतरे केलेली आहेत तसेच त्यांना बरेच पुरस्कारही मिळालेले आहेत. मुद्रणाच्या अनेक चुका असल्या तरी भाषांतरित भाषा सरळ साधी आहे. भैरप्पांची अशी हातोटी आहे की ते अतिशय बारकाईने व सावकाश वर्णन करतात. नायिका मळ्यात झोपडीत स्वयपाक करते असे दाखवताना चुलीवर ती कशी काटकसर करते, आधी कोणती भांडी घासून घेते, कपडे कसे वगैरे बारकाईचे निरिक्षण असते, त्यामुळे चित्र अगदी रेषा अन रेषाने चितारल्या जाते.
नेमाडेंना स्वत: अलंकारिक भाषा आवडत नाही. प्रमाण भाषा ही बोली भाषा बोलणार्‍यांच्या सहनशीलतेचे उदाहरण आहे , असा त्यांचा लाडका दावा आहे. कदाचित त्यामागे भाषेच्या साधेपणाच्या सौंदर्याचे भान असावे. असाच शैलीचा साधेपणाही भैरप्पांच्या लिखाणात भावणारा आहे. इथे नेमाडेंची अगडबम/भारदस्त प्रमाण शैली ही सरळ शैलीवाल्यांच्या सहनशीलतेचे उदाहरण ठरावे !
नेमाडेंची शैली गुंतागुंतीची, प्रचंड दाहक, व्यवस्थेच्या टोकाच्या विरोधासाठी प्रचंड शिव्या व विडंबन असलेली अशी आहे तर भैरप्पांची शैली सरळ, बाळबोध वळणाची, तरीही विचार प्रबोधन करणारी, अशी आहे. अर्थात ह्यावरून कोणती शैली चांगली व कोणती वाईट हे आपण ठरवू शकत नाही, पण फरक अवश्य जाणवू शकतो.
कादंबरी आत्मचरित्रपर केल्याने नेमाडेंना विश्वासार्हतेचा फायदा जरूर मिळतो पण त्याचबरोबर भैरप्पांची पात्रे जी उदात्ततेचा रंग लेतात ते नेमाडेंच्या पात्रांकडून हुकतेच. कल्पितकथेत नायिका मळ्यावर राहून हवन, शेती, अभ्यास, करू शकते; तिचे पुजारी वडील देवाला दगड म्हणू शकतात, वेडे होऊ शकतात; परत मुलीला वारसाहक्क देऊन आदर्शही होतात. असे नेमाडेंची पात्रे करू शकत नाहीत. त्यामुळे पात्रे वास्तवातली मुळमुळीत, रीतीनिष्ठ, पण लेखकाची व पात्रांची स्वगते मात्र जहाल असा विरोधाभासही जाणवतो. विद्रोहाच्या रंगासाठी नेमाडेंची आत्मचरित्रपर शैली थोडी तोकडी पडते तर भैरप्पांची कल्पितकथा विषयाला न्याय देते. ( क्रमश: )
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

बुधवार, १ डिसेंबर, २०१०

भैरप्पा व नेमाडे
एक तौलनिक अभ्यास:

शहरीकरण व श्रमप्रतिष्ठा:
नेमाडेंच्या कादंबरीत शेतकर्‍यांचे विदारक हालाचे फार चांगले रेखाटन आहे. शेतकर्‍यांच्या दैनंदिन प्रश्नांची हाताळणीही अप्रतीम रेखीव झाली आहे. नायक लहानपणी व नंतर कॉलेजात गेल्यावर सुटीत शेतीची कामे स्वत: करतोही. पण शेती परवडत नाही व त्यातल्या अनंत अडचणींमुळे भयंकर त्रासलेला असतो. तसेच शेवटी शहरीकरणाच्या रेटयामुळे नायकही शहरात येतो, शेतीच्या वाटण्या होतात व त्या नैसर्गिक वातावरणापासून त्याची ताटातूट होते व त्याचे दु:ख त्याला सलत राहते. श्रमाची कामे आता आपण करू धजत नाही व खेडयाचा निसर्ग अंतरला ह्याची त्याला खंत वाटत राहते. ही जाणीव नेमाडे वाचकांपर्यंत फार समर्थपणे पोचवतात. पण ह्यावरचा काही उपाय सुचवत नाहीत. ते त्यांच्याकडे ह्यावर काही "निश्चित नैतिक भूमिका" नसल्याचेच लक्षण आहे. जागतिकीकरणाच्या रेटयाचे वाईट वाटणे हे भावनात्मक असले तरी, नैतिक भूमिकेतून त्याविरुद्धचे तर्क लेखक कादंबरीत देत नाही, हे एक मोठेच अपयश म्हणावे लागेल.
भैरप्पांच्या नायिकेला श्रमाची कामे करण्याचे खूप अप्रूप आहे. ती वडिलांच्या जागी मळ्यात झोपडी बांधून राहते. शेतीतली कामे स्वत: करते. प्रयत्नांनी एका रेषेत नांगर धरायचा सराव करते. (पृ.२३४) वर तिचे मनोगत येते ते पहा: "ती काही बोलली नाही.हातातलं काम संपवून खाली उतरत ती म्हणाली, " मला लग्न करायचं नाही. आपल्या हातानं राबाव असं वाटतं. मला वाटयात फारसा रस नाही. या झोपडीच्या जागी एक छोटंसं घर बांधून दे . शेतीची अवजारं ठेवता येतील एवढं असलं तरी पुरे. आणि एक छोटंसं स्वयंपाकघर. आणखी काही नको.बाकी सगळं तूच पहा." नंतर ती तशीच शेतीची कामे स्वत: करते. हरिजन मित्र-कम-शिष्य असतो त्याला लाकडे फोडून दे म्हणते व तो क्रांतीच्या मनसुब्यापायी ती फोडतोही. इथे श्रमाची प्रतिष्ठा दाखवीत भैरप्पा, ऍन रॅंड च्या फौंटनहेडची आठवण करून देणारी व्यक्तिरेखा चितारतात. पात्रे त्यांच्या कृतीनेच "निश्चित नैतिक भूमिका" दाखवितात.
नेमाडेंच्या कादंबरीत शहरीकरणाची व शेतीच्या श्रमांची,त्या आसमंताच्या विरहाची, खंत आहे तर भैरप्पांच्या कादंबरीत नायिका स्वत: ते जीवन जगत श्रमप्रतिष्ठा व निसर्गसान्निध्याचे दर्शन देते. जाणिवांचा मूळ पोत सारखाच असला तरी नेमाडेंचा खंतीचा रंग आहे तर भैरप्पांचा सकस दाट रंग आहे. ( क्रमश: )
अरुण अनंत भालेराव arunbhalerao67@gmail.com